रोहिणी खडसे कोण आहेत? राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा प्रवास

    • Author, विहंग ठाकूर
    • Role, बीबीसी मराठीसाठी

राष्ट्रवादी काँग्रेसनं महिला प्रदेशाध्यक्षपदावर रोहिणी खडसे यांना स्थान दिले आहे. विद्या चव्हाण यांच्या जागी रोहिणी यांना संधी देण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात विरोधी आघाडी I.N.D.I.A.ची बैठक मुंबईत होणार आहे. या संदर्भात मंगळवारी (29 ऑगस्ट) हयात हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे, नाना पटोले, संजय राऊत, राघव चढ्ढा यांच्यासह अन्य विरोधी पक्षनेते उपस्थित होते.

उद्धव आणि शरद पवार यांनी बैठकीत तयारीचा आढावा घेतला.

या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदावर रोहिणी खडसे-खेवलकर यांना स्थान दिलं आहे.

शरद पवार हे लवकरच जळगावात सभा घेणार आहेत. या सभेची जबाबदारी एकनाथ खडसे यांनी घेतली आहे. या सभेत रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं जाईल,अशी चर्चा आहे.

अजित पवार आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या बंडानंतर एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्या सोबत कायम राहिले. त्यामुळे त्यांच्या कन्येला ही जबाबदारी मिळाल्याचं सांगितलं जात आहे.

कोण आहेत रोहिणी खडसे-खेवलकर ?

रोहिणी खडसे या महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतले आहे. रोहिणी यांनी एलएलबी आणि त्यानंतर एलएलएम केलं आहे.

विशेष म्हणजे 2019 मध्ये भाजपने एकनाथ खडसे यांची उमेदवारी नाकारली होती. त्यानंतर पक्षाने उत्तर महाराष्ट्रातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून रोहिणी यांना तिकीट दिले.

मात्र, त्या निवडणुकीत अल्पशा फरकाने पराभूत झाल्या. यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केल्यावर रोहिणी खडसे यांनीही पक्षात प्रवेश केला.

रोहिणी यांनी 2015 ते 2021 या कालावधीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद भूषवले होते, तर 2015 पासून आतापर्यंत त्या महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्ष आहेत.

आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूत गिरणी लिमिटेडच्या 2013 पासून ते आत्तापर्यंत त्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या कार्यकाळात बँकेनं संगणकीकरण, एटीएम या सेवा सुरू केल्या. या काळात बँकेनं अनेक क्षेत्रात पुरस्कार पटकावले.

मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षा असून त्यांनी एकनाथ खडसे यांनी स्थापन केलेली परंतु काही कारणानं अपूर्णावस्थेत असलेली सूतगिरणी सुरू करून स्थानिक महिला आणि युवकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या रोहिणी खडसे उपाध्यक्ष आहेत.याचबरोबर त्या मुक्ताईनगर परिसरातील प्रमुख शैक्षणिक संस्था असलेल्या मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी मुक्ताईनगरच्या अध्यक्षा आहेत. यासंस्थेअंतर्गत बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षणाची सोय आहे

पित्याकडून राजकीय वारसा; भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश

रोहिणी खडसे यांना राजकारणाचे धडे वडील एकनाथ खडसे यांच्याकडून मिळाले. एकनाथ खडसे यांच्या बरोबरीनं त्या जळगाव जिल्ह्यात भाजपचं काम करत होत्या.

मात्र, वडिलांमुळं त्यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी मिळाली आणि त्या भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाल्या.

पित्याच्या पावलावर पाऊल ठेवतं त्या राजकारणात पुढे जात आहेत.

2014 साली राज्यात भाजपचं सरकार सत्तेत आल्यापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पक्षात ज्येष्ठ असलेल्या एकनाथ खडसेंनी त्यानंतर आपले फडणवीसांसोबतचे मतभेद कधी लपवले नाहीत.

2016 साली एकनाथ खडसे यांच्यावर ते फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला. ही जमीन एकूण 3.1 एकर इतकी आहे.

या जमिनीची एकूण किंमत 31 कोटी इतकी असताना विक्री मात्र 3 कोटी 7 लाख रुपयांत झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर खडसे यांना मंत्रिपद गमवावं लागलं.

पक्षात त्यांची कोंडी होत असल्याचे आरोप त्यांनी अनेकदा केले होते. देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी लक्ष्य केलं.

जळगाव मध्ये गिरीश महाजन यांचं भाजपातील महत्त्व वाढलं आणि खडसे पक्षापासून दूर जात होते. त्यात 2019 मध्ये मुलगी रोहिणी खडसे यांना तिकीट दिलं गेलं. त्या पराभूत झाल्या आणि एकनाथ खडसे यांच्या नाराजीत भर पडली.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबतच रोहिणी यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न

मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात त्यांनी राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा काढली होती. राज्यात जनसंवाद यात्राही पहिल्यांदाच रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात काढली होती.

या यात्रेचं जळगाव जिल्ह्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, याबरोबरच वरिष्ठ नेत्यांनी मोठं कौतुक केलं होतं. तसेच इतर जिल्ह्यात अशाच पद्धतीने जनसंवाद यात्रा काढण्याच्या पदाधिकाऱ्यांना आदेश केले होते

यात्रेदरम्यान त्यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून 182 गावं वस्त्या पाड्यांवर जाऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला शिवाय पक्षाची सदस्य नोंदणी केली होती.

कापूस, केळी कांदा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी काढलेला जनआक्रोश मोर्चा लक्षवेधी ठरला होता.महिला अत्याचाराविरोधात त्यांनी मूक मोर्चाचे आयोजन केले होतं त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

महिला सक्षमीकणासाठी त्या विविध उपक्रम राबवत असतात याशिवाय पक्षाचे विविध आंदोलने, सभा , कार्यक्रम उपक्रमामध्ये त्यांचा मुख्य सहभाग असतो त्यांचे कार्य बघून पक्षाने त्यांना महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे

दरम्यान ,रोहिणी खडसे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "जळगाव जिल्ह्यातील अगदी दोन चार कार्यकर्ते अजित पवार यांच्यासोबत गेले. जळगावमध्ये संपूर्ण पक्ष हा शरद पवार यांच्या सोबत आहे.आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी होणाऱ्या जळगावच्या सभेत शरद पवार यांची ताकद दिसून येईल."

विद्या चव्हाण नाराज?

विद्या चव्हाण या अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांच्या सोबत राहिल्या. तरीही त्यांना बाजूला करून रोहिणी खडसे या लेव्हा पाटील समाजातील महिला नेत्याला जबाबदारी देण्यात आली.

यामुळे शरद पवारांना साथ देणाऱ्या विद्या चव्हाण नाराज असल्याची चर्चा आहे.

रोहिणी खडसे यांना पद देताना सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी नाराज विद्या चव्हाण यांची समजूत काढल्याची सूत्रांची माहिती आहे.

त्यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची किंवा मुंबई प्रदेश राष्ट्रवादीची जबाबदारी देण्यावरही विचार होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.

विद्या चव्हाण यांनी याबाबत बीबीसीला सांगितलं की, " मी नाराज नाही, नवाब मलिक यांच्या नंतर पक्षाची मीडियाशी संवाद साधण्याची जबादारी माझी आहे. त्यामुळे प्रदेश महिला संघटनेची जबाबदारी असता राज्यभर फिरावं लागतं, मुख्य प्रवक्ते पद आपल्याकडे येणार असल्यानं ते शक्य होणार नव्हतं."

दरम्यान ,रोहिणी खडसे यांना विद्या चव्हाण यांच्या नाराजी बद्दल विचारलं असता, त्या म्हणाल्या "विद्या चव्हाण या आमच्या जेष्ठ नेत्या आहेत, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करणारच आहोत, त्या नाराज नाहीत मी त्यांच्याशी चर्चा केलीय."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotifyआणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)