‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीत 'संयोजक' ठरणार की 'बिघाडी' होणार?

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठी

शरद पवार यांनी आधी ‘अजित पवार आमचेच नेते आहेत’, असं म्हणणं आणि नंतर ‘मी असं म्हणालोच नाही’, असं घुमजाव करणं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबाबत सावध भूमिका घेणं आणि फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणं. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

शरद पवार यांच्याकडून हा संभ्रम ठरवून निर्माण केला जातोय की खरंच तो अपोआप घडतोय?

पण, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईत इंडिया आघाडी बैठक होतेय. शरद पवार यांची त्यात महत्त्वाची भूमिका आहे. शिवाय या आघाडीत संयोजकपदावरून रुसवे-फुगवे आहेतच.

तर या बैठकीत काय काय होणार आहे? तिची तयारी कशी सुरू आहे? त्याचाच हा आढावा...

विरोधकांच्या ‘इंडीया’ या महाआघाडीची बैठक 1 सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी केली जात आहे.

याआधी पटना आणि बंगळूरला दोन बैठका झाल्या. यात भाजपविरोधी 26 पक्ष एकत्र आले होते. या महाआघाडीचं नावही मागच्या बैठकीत ठरवण्यात आलं होतं.

इंडीयाची ही तिसरी बैठक असणार आहे. या बैठकीत नेमकं काय ठरवलं जाणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

कसं असणार बैठकीचं नियोजन?

23 ऑगस्टला राज्यातील महाविकास आघाडीची ‘इंडीया’च्या तयारीसंदर्भातील महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीला शरद पवार उध्दव ठाकरे, अशोक चव्हाण, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते उपस्थित होते.

या नियोजनासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार 31 ऑगस्टला संध्याकाळी देशभरातून इंडीयाच्या महाआघाडीत सामिल झालेल्या पक्षाचे प्रमुख नेते सांताक्रुजच्या ग्रॅण्ड ह्यात या हॉटेलमध्ये दाखल होतील.

या दिवशी ग्रॅण्ड हायातमध्ये उध्दव ठाकरे यांच्याकडून प्रितिभोजन आयोजित करण्यात आलं आहे. यावेळी सर्व नेते एकमेकांना भेटतील आणि अनौपचारिक चर्चा केली जाईल.

1 सप्टेंबरला सकाळी साधारण 10-10.30 सुमारास प्रत्यक्ष बैठकीला सुरूवात होईल. आतापर्यंत या बैठकीत 26 पक्ष या महाआघाडीत सामिल झाले आहेत. मुंबईच्या बैठकीत राजकीय पक्षांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती देताना खासदार संजय राऊत म्हणाले, “आम्हाला आसाम आणि ईशान्यकडील राज्यातील पक्षांनी या महाआघाडीत सामिल करून घेण्यासाठी विनंती केली आहे. यासंदर्भात इंडीयातील प्रमुख नेते निर्णय घेतील.

याचबरोबर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर राजू शेट्टी यांनी 11 पक्षांची जी प्रागतिक आघाडी निर्माण केली आहे त्यापैकी जयंत पाटील (शेकाप) बैठकीला उपस्थित होते. या देशातील ज्या पक्षांना हुकूमशाहीविरोधात लढायचं आहे, त्यांचा आम्हाला पाठींबा आहे. सत्ताधारी पक्षांनी कितीही धाडी टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी आमच्यात सामिल झालेले पक्ष फुटणार नाहीत.”

या बैठकीत इंडीया या महाआघाडीचा लोगो ‘लॉन्च’ केला जाणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर पुढच्या रणनितीबद्दल प्रमुख नेत्यांची भाषणं होतील.

बैठकीनंतर कॉंग्रेस पक्षाकडून अनौपचारिक भेटी आणि दुपारच्या जेवणाची मेजवानी असेल. या बैठकीत देशातील पाच राज्यांचे मुख्यमंत्री , पक्षाध्यक्ष असे जवळपास 80 नेते सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

समन्वय टिकवून ठेवण्याचं आव्हान?

देशातील इतके पक्ष भाजपविरोधासाठी एकत्र आले तरी प्रत्यक्षात निवडणूकीवेळी समन्वय टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान हे ‘इंडीया’समोर असणार आहे.

आतापर्यंत दोनच बैठका झाल्या आहेत. पण बैठकीत मुद्दे सकारात्मकपणे मांडले गेले असले तरी काही पक्षांचे नेते वेगवेगळ्या कारणांवरून नाराज असल्याचं समोर येत आहे.

लोकसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेस नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्लीत पार पडलेल्या बैठकीनंतर कॉंग्रस नेत्या अलका लांबा यांनी दिल्लीच्या सातही लोकसभेच्या जागेवर कॉंग्रेस तयारी करत असल्याचं म्हटलं.

त्याचबरोबर किती जागा लढवणार याबाबत कोणाताही निर्णय झाला नसला तरी 2019 च्या निवडणूकीत कॉंग्रेसचे अनेक उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते, असं लांबा यांनी सांगितलं.

कॉंग्रेसच्या या वक्तव्यानंतर आपचे नेते नाराज झाले. आपचे नेते दिलीप पांडे यांनी “जर कॉंग्रेसची दिल्लीत आघाडी करण्याची इच्छा नसेल तर संविधान वाचवण्यासाठी जी महाआघाडी बनवली आहे त्याचा भाग होण्याला काही अर्थ नाही,” असं म्हटलं.

त्यामुळे मुंबईच्या बैठकीत आपचे नेते येणार की या महाआघाडीतून बाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना अरविंद केजरीवाल यांनी इंडीयाच्या मुंबईच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं जाहीर केलं.

पटणा झालेल्या पहील्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेवेळी आपचे नेते अरविंद केजरीवाल हे निघून गेले. त्यानंतर केजरीवाल यांनी दिल्लीबाबत केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाच्या विषयाबाबत कॉंग्रेसविरोधी वक्तव्य केलं. त्यामुळे बैठकीनंतरच्या नाराजीचा सूर समोर आला.

आरएलडीचे पक्षाचे नेते जयंत चौधरी यांनी बंगळूरच्या बैठकीनंतर प्रतिक्रीया देताना म्हटलं होतं, “प्रत्येक नेत्यांनी पुढचा अजेंडा, निवडणूक प्रक्रीया याबाबत भाषणं केली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत शून्य चर्चा झाली.”

यावरून महाआघाडीच्या बैठकीतील दिशा ही सर्वांना पटतेय की नाही हा प्रश्न समोर आला.

बंगळूरला झालेल्या दुसऱ्या बैठकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.

केजरीवालांनंतर नितीशकुमार यांनी पत्रकार परिषदेला उपस्थित राहणं का टाळलं? यावरून ते नाराज असल्याच्या बातम्या आल्या. त्यांना या आघाडीचं संयोजकपद पाहिजे असल्याच्या चर्चासुद्धा रंगल्या.

भाजपकडूनसुध्दा याबाबत भाष्य करत बैठकीत नितिशकुमार नाराज झाल्याचा दावा केला गेला. पण मी नाराज होण्याचं काही कारण नसल्याचं स्पष्टीकरण नितिशकुमार यांनी दिलं.

नेत्यांची ही नाराजी रोखण्यासाठी मुंबईत होणाऱ्या बैठकीत सवन्वय समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती आहे.

या समन्वय समितीत 11 नेत्यांची निवड केली जाईल. या समन्वय समितीमार्फत आगामी लोकसभा निवडणूकीत कोणता पक्ष किती जागा लढणार? काही पक्षांसाठी इतर पक्षांना जागा सोडाव्या लागतील या सगळ्यावर काम केलं जाईल आणि प्रमुख नेत्यांकडून अंतिम निर्णय घेतले जातील असं प्रमुख नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.

पण लोकाचं लक्ष आहे ते संयोजकपद कुणाकडे जातं याकडे.

एकीकडे भाजपला प्रादेशिक पक्षांत फूट पाडण्यास यश येत असताना इंडीयाची जादू चालणार? की भाजप यावेळीही सरस ठरणार ? हे बघणं महत्त्वाचं असेल.

हेही वाचलंत का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.