You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अॅमेझॉनच्या खोऱ्यात सापडलं प्राचीन शहर, त्यासाठी रडारची मदत कशी घेतली गेली? वाचा
- Author, जॉर्जिना रॅनार्ड
- Role, विज्ञान प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
अॅमेझॉनच्या खोऱ्यात एक मोठं प्राचीन शहर सापडलं आहे. हे शहर गेली हजारो वर्षं दाट झाडीखाली दडलेलं होतं.
अॅमेझॉनच्या खोऱ्यात लोक कसे राहायचे याची माहिती यामुळे मिळणार आहे. हे शहर कशामुळे नष्ट झाले असावे, कोणता धोका या शहराला होता याबद्दल तज्ज्ञ अभ्यास करत आहेत.
इक्वेडोरच्या पूर्वेस असणाऱ्या उपानो भागात हे शहर सापडले आहे. यामध्ये घरं आणि चौक असल्याचं दिसून आलं आहे तसेच रस्ते आणि कालव्यांचं जाळंही तेव्हा असल्याचं दिसलं आहे.
हा परिसर एका ज्वालामुखीच्या लाव्हाक्षेत्रात येतो. या ज्वालामुखीच्या लाव्हामुळेच येथे समृद्ध मृदा तयार झाली आहे आणि कदाचित हे शहर नष्ट होण्याचं कारणही हाच ज्वालामुखी असेल.
दक्षिण अमेरिकेत पेरुमधील माचू-पिचूसारख्या शहरांबद्दल आपल्याला माहिती असते आणि तिथले लोक भटके जीवन जगायचे किंवा लहानशा वस्त्यांमध्ये राहायचे असं मानलं जातं.
नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च या फ्रान्समधील संस्थेने हे नव्या शहराचं संशोधन काम केलं आहे. त्याचे संचालक प्रा. स्टिफन रोस्टेन सांगतात. अॅमेझॉनमधील आतापर्यंतच्या कोणत्याही पुरातनस्थळापेक्षा हे शहर जास्त प्राचीन आहे. नागरी संस्कृतीबद्दल आपली आजवरची भूमिका अतिशय युरोपकेंद्री राहिली आहे, मात्र आता संस्कृती आणि पुरातन नागरीकरणाबद्दल आपल्याला आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे.
हा शोध आपण अॅमेझॉन खोऱ्यातल्या संस्कृतीकडे जसं पाहायचो तो दृष्टिकोन बदलून टाकतो. बहुतांश लोकांच्या मनात या संस्कृतीबाबत विचार करायचा झालं की लोकांचे लहान गट, बहुतांश नग्न लोक, झोपडीत राहाणारे आणि शेतीसाठी जमीन तयार करणारे लोक येतात. यावरुन प्राचीन काळी लोक एकप्रकारच्या क्लिष्ट नागरी संस्कृतींमध्ये राहात होते असं दिसतं.. असं या शोधाबद्दलचा निबंध सादर करणारे सहलेखक अँटोनियो डोरिसन सांगतात.
पुरातत्वतज्ज्ञांच्या मतानुसार सुमारे 2500 वर्षांपूर्वी हे शहर बांधलं गेलं आणि तिथं 1000 वर्षं लोक राहात होते.
तिथं किती लोक राहायचे याबद्दल अचूक माहिती नसली तरी लाखो लोक राहात नसले तरी किमान काही हजार लोक तिथं राहात असावेत असं ते सांगतात.
पुरातत्वशास्त्रज्ञांनी 300 चौरस किमी प्रदेशाचा लेसर सेन्सरचा विमनातून वापर केला आणि त्यामधून झाडीखाली दडलेल्या अवशेषांची माहिती मिळवली.
LiDAR ला 6000 आयताकार बांधकामं मिळाली. त्यांचा 20 मी X10 मी असा आकार होता आणि ते 2 ते 3 मीटर उंच होते.
हे आकार तीन ते सहाच्या गटांनी चौकाभोवती बांधलेले दिसून आले.
यातले बहुतेक अवशेष घरांचे असावेत असं तज्ज्ञांचं मत आहे. तर काही केवळ औपचारिक बांधकामं असावीत. किलामोपे येथे 140 मीटर x40 मी अशा आकारातले संकुल सापडले.
ही बांधकामं डोंगर उतार कापून घरासाठी पाया करुन बांधलेली आहेत.
यांना जोडणारे रस्तेही सापडले असून एक 25 किमी लांबीचा रस्ताही सापडला आहे.
हे रस्तेच या संशोधनातला महत्त्वाचा भाग होते असं डोरिसन सांगतात.
ते म्हणाले, हे रस्त्यांचं जाळं एकदम अत्याधुनिक दिसतं. हे जाळं लांबवर पसरलेलं असून सर्व ठिकाणं जोडणारं आहे. तसेच त्यांचे कोनही अगदी बरोबर आहेत. हे सगळं चकीत करणारं आहे.
इथं काही कॉजवे आणि खंदकासारखे रस्ते सापडले आहेत. तज्ज्ञांच्या मते हे कालवे असावेत. या कालव्यांनी परिसरात उपलब्ध असलेल्या पाण्याचं योग्य नियोजन करता आलं असावं.
इथं काही शहराला असलेल्या धोक्यांची लक्षणं दिसतात. काही कालव्यांचे खड्डे वस्तीचे मुख्य प्रवेश अडवताना दिसतात. कदाचित त्यामुळेही जवळच्या लोकांना त्याचा तडाखा बसला असू शकतो.
1970च्या दशकात इथल्या शहराचे पहिले पुरावे मिळाले, पण असा विस्तृत सर्वे हा अभ्यास सुरू झाल्यावर 25वर्षांनी मिळाला आहे.
मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतल्या माया संस्कृतीतल्या वस्त्यांपेक्षाही या स्थानावर मोठा समाज राहात असल्याचं दिसतं.
एक्स्टर विद्यापिठातले पुरातत्वशास्त्राचे प्राध्यापक जोस इरियार्टे सांगतात, कल्पना करा, तुम्हाला माया संस्कृतीपेक्षाही वेगळी संस्कृती सापडली तर... त्यातही तिथलं बांधकाम, व्यवसाय वेगळे असतील तसेच वेगळे अवशेषही सापडले तर? तेच इथं दिसत आहे.
अष्टकोनी तसेच आयताकार बांधकांमांकडे लक्ष वेधून ते यातील काही शोध तर दक्षिण अमेरिकेच्या बाबतीत फारच नवे आहेत, असं सांगतात.
इथल्या वसाहती सुनियोजित आणि एकमेकांशी जोडलेल्या होत्या असं ते इथल्या रस्त्यांचा उल्लेख करुन सांगतात.
इथं लोक कसे होते, त्यांचा समाज कसा होता याबद्दल फारशी माहिती मिळालेली नाही. काही जळालेल्या बिया, कंदवेली कुटण्यासाठी दगड, रांजण आणि खड्डे-चुली सापडलेल्या आहेत.
या प्रदेशातले लोक मुख्यत्वे शेतीवर अवलंबून असावेत. ते मका आणि रताळी खात असावेत आणि बहुतेक चिचा नावाची गोड बिअरही ते पित असावेत.
प्रा. रोस्टेन सांगतात, करिअरच्या सुरुवातीला इथं अभ्यास करताना अॅमेझॉनमध्ये कोणतीही प्राचीन वस्ती नव्हती असं अनेक शास्त्रज्ञांनी मला बजावलेलं होतं. पण मी दृढ राहिलो आणि ते पूर्ण केलं. एवढा मोठा शोध लागल्याचा मला भरपूर आनंद झाला आहे.
आता तज्ज्ञ जवळच्या 300 चौरस किमी प्रदेशात आणि ज्याचं सर्वेक्षण झालेलं नाही अशा प्रदेशात काय दडलं असावं याचा कानोसा घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)