इस्रायलवर इराणचा हल्ला, आतापर्यंत काय काय घडलं ?

    • Author, रफी बर्ग
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळं आधीच जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. आता इराणने केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यामुळं आखाती देशांमधील तणाव निवळण्याऐवजी अधिकच वाढला आहे.

इस्रायल आणि इराणमधील संघर्षाकडं जगाचं लक्ष लागलेलं आहे. यात इस्रायल, इराणसह अमेरिका आणि इतर देशांची काय भूमिका आहे यावर देखील या परिसरातील शांतता अवलंबून असणार आहे.

इराणने इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मोठा हल्ला केला आहे. सीरियामध्ये असलेल्या इराणच्या दुतावासावर हल्ला झाल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी इराणने हा हल्ला केल्याचं सांगितलं जातं आहे.

इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून छुपे युद्ध सुरू आहे. मात्र पहिल्यांदाच समोरासमोरची लढाई होते आहे.

तर इस्रायली सैन्याचं म्हणणं आहे की इस्रायल आणि त्यांच्या मित्र देशांनी 300 पेक्षा अधिक क्रूझ क्षेपणास्त्र आणि ड्रोन हवेत हाणून पडले आहेत. यातील बहुतांश इस्रायलच्या हवाई हद्दीबाहेर पाडण्यात आले.

इस्रायलचं म्हणणं आहे की या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना त्यांच्या देशाच्या हवाई हद्दीबाहेरच पाडण्यात आलं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले, ''हल्ल्यातील जवळपास सर्वच ड्रोन आणि क्षेपणास्त्र पाडण्यात आम्ही इस्रायलची मदत केली आहे.''

जो बायडन यांनी इराणच्या हल्ल्याचा निषेध करताना म्हटलं की इराण आणि त्यांच्याकडून मदत होत असलेल्या संघटनांनी येमेन, सीरिया आणि इराकमधून इस्रायलमधील सैन्य तळावर एक अभूतपूर्व हल्ला केला आहे.

त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना म्हटलं की ''इराण आणि येमेन, सीरिया आणि इराकमधून त्यांच्या समर्थकांनी इस्रायलच्या सैनिकी तळांवर एक अभूतपूर्व हवाई हल्ला केला.''

इराणच्या इस्लामिक रेव्होल्यूशन गार्ड कोअर (आयआरजीसी) ने म्हटलं आहे की विशिष्ट ठिकाणांना टार्गेट करण्याच्या उद्देशानेच हल्ला करण्यात आला आहे.

नेतान्याहू यांनी बोलावली वॉर कॅबिनेटची बैठक

इराणकडून हल्ला झाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी वॉर कॅबिनेट म्हणजे युद्ध समितीची बैठक बोलावली आहे.

यानंतर त्यांनी फोनवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी चर्चा केली. नेतान्याहू यांनी सांगितलं की अमेरिकेने इस्रायलच्या सुरक्षेसंदर्भातील त्यांच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.

इराणकडून ड्रोन हल्ला करण्यात आल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की 'देशाच्या सुरक्षा यंत्रणेला कार्यरत करण्यात आले आहे.'

''आम्ही कोणत्याही प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी तयार आहोत. मग ती बचावात्मक असो वा आक्रमक. इस्रायल एक समर्थ राष्ट्र आहे. इस्रायलचं लष्कर सामर्थ्यवान आहे. जनतादेखील समर्थ आहे.''

नेतान्याहू म्हणाले की आमची मदत केल्याबद्दल अमेरिकेसोबत ब्रिटन, फ्रान्स आणि इतर अनेक देशांचे आम्ही आभार मानतो.

या आठवड्याच्या सुरूवातीलाच इस्रायलच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांनी चेतावनी दिली होती की जर इराणने इस्रायलवर हल्ला केला तर ते इराणवर प्रतिहल्ला करतील.

इस्रायली सैन्याने काय सांगितलं

इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) म्हणजे इस्रायलची लष्कराचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डेनियल हगारी म्हणाले, ''इस्रायल आणि इस्रायलच्या जनतेचे संरक्षण करण्यासाठी आमचे सहकारी आणि मित्रांनिशी आम्ही संपूर्ण ताकदीनं उभे आहोत.''

त्यांनी पुढं सांगितलं की इस्रायलमध्ये काही क्षेपणास्त्रे येऊन पडली आहेत. यामुळे एका लष्करी तळावर किरकोळ नुकसान झालं आहे, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आणखी एका पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की इराणने रात्रभरात इस्रायलवर 300 हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली आहेत. यातील 99 टक्के पाडण्यात आली आहेत.

त्यांनी सांगितलं की काही हल्ले इराक आणि येमेनमधून करण्यात आले आहेत.

डॅनियल हगारी यांनी सांगितलं की ''इराणने इराणच्या भूमीवरून इस्रायलवर थेट हल्ले सुरू केले आहेत.''

''इस्रायलच्या दिशेने येत असलेल्या इराणच्या किलर ड्रोनवर आमचं बारकाईनं लक्ष आहे. परिस्थिती खूपच गंभीर आणि धोकादायकरित्या चिघळली आहे.''

त्यांनी सांगितलं की इस्रायली वायुसेनेची विमाने हवाई मार्गे होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यासाठी सक्षम आहेत.

इस्रायलच्या अॅम्ब्युलन्स सर्व्हिसनं सांगितलं की दक्षिण भागात घुमंतू जमातीची एक 10 वर्षांची मुलगी ढिगाऱ्यातून पडलेल्या धारदार वस्तूमुळं जखमी झाली आहे.

इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी काय सांगितलं

इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलांट यांनी सांगितलं की ''अमेरिका आणि इतर मित्रराष्ट्रांच्या मदतीने आम्ही इस्रायलला सुरक्षित ठेवण्यात यशस्वी झालो आहोत. फारच किरकोळ नुकसान झालं आहे.''

त्यांनी सांगितलं की ''मात्र अद्याप प्रकरण संपलेलं नाही. आम्ही अजूनही सतर्क आहोत. इस्रायली सैन्याकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आम्हाला सर्व प्रकारच्या परिस्थितीसाठी तयार राहावं लागेल. या हल्ल्याला अपयशी करण्यात आम्हाला यश मिळालं आहे.''

ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं की हवाई हल्ल्यांना रोखण्यासाठी त्यांनी आरएएफ जेटला तैनात केलं आहे.

हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये सायरनचे आवाज ऐकू येत होते. जेरुसलेममध्ये देखील मोठे आवाज ऐकू आले आहेत. कारण इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालीने अनेक गोष्टी पाडल्या आहेत.

लेबनॉन आणि इराकने देखील बंद केल्या आपल्या हवाई सीमा

इराणपासून इस्रायल 1,800 किमी अंतरावर आहे. तर अमेरिकेने अद्याप हे स्पष्ट केलेलं नाही की त्यांनी ड्रोन नेमके कुठे पाडले आहेत.

इस्रायल, लेबनॉन आणि इराकने त्यांच्या हवाई सीमा बंद केल्या आहेत. तर सीरिया आणि जॉर्डनने त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीला सतर्क ठेवलं आहे.

1 एप्रिलला सीरियातील इराणी दूतावासावर हल्ला झाल्यानंतर इराणने बदला घेण्याची भाषा केली होती. या हल्ल्यामध्ये एक टॉप कमांडरसहीत सात सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

इराणने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार ठरवलं होतं. तर इस्रायलने मात्र या हल्ल्याची जबाबदारी घेतली नव्हती आणि त्याचबरोबर हल्ला केल्याचं नाकारलंदेखील केलं नव्हतं.

अमेरिका काय करते आहे?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.

इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या प्रवक्त्याने फोनवर बोलत असल्याचा फोटो प्रसिद्ध केला आहे.

राष्ट्राध्यक्ष जो बाडडन यांनी इराणच्या हल्ल्याचा निषेध करताना म्हटलं की त्यांचा देश इस्रायलच्या लोकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.

त्यांनी दावा केला की इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणकडून डागण्यात आलेले सर्व क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडले आहेत.

बायडन यांनी सांगितलं की ''माझी टीम सातत्यानं इस्रायलच्या नेत्यांच्या संपर्कात आहे. आम्ही आमच्या लोकांना वाचवण्यासाठी आवश्यक असणारं प्रत्येक पाऊल उचलणार आहोत.''

राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी सांगितलं की इराणने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते रविवारी, 14 एप्रिलला जी7 देशांच्या नेत्यांची बैठक बोलणार आहेत.

याशिवाय अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन यांनी देखील इराणच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. इराण आणि त्यांच्या छुप्या समर्थक गटांनी ताबडतोब हे हल्ले थांबवावेत असं त्यांनी म्हटलं आहे.

त्यांनी सांगितलं की अमेरिका, इराणशी संघर्ष करू इच्छित नाही. मात्र आपल्या सैनिकांचं संरक्षण करण्यासाठी आणि इस्रायलचं संरक्षण करण्यासंदर्भात ते एक पाऊलदेखील मागे हटणार नाहीत.

इराणने हल्ला केल्याचं वृत्त आल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते अॅड्रियन वॉटसन देखील म्हणाले की इस्रायलचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडन कटिबद्ध आहेत.

ते म्हणाले की ''अमेरिका इस्रायलच्या नागरिकांच्या पाठी उभा राहील आणि इराणकडून होणाऱ्या हल्ल्यांपासून त्यांचं संरक्षण करेल.''

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांनी इराणने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्याचबरोबर त्यांनी वचन दिलं आहे की ते इस्रायल आणि त्या परिसरातील आपल्या सर्व मित्रांच्या संरक्षणासाठी उभे राहतील.

इराणी सैन्याची सर्वात शक्तीशाली शाखा असलेल्या आयआरसीजीनं म्हटलं आहे की त्यांनी हा हल्ला इस्रायलकडून वारंवार करण्यात आलेल्या गुन्ह्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी केला आहे. सीरियाची राजधानी असलेल्या दमास्कसमधील इराणी दुतावासावरील इस्रायली हल्ल्याचादेखील यात समावेश आहे.

( बीबीसी मराठीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन)

हेही वाचलंत का?