You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टेस्लाने केली 10 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कपात, काय आहे कारण?
- Author, शिओना मॅकुलम
- Role, तंत्रज्ञान प्रतिनिधी
नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिक वाहनं आणि इलॉन मस्क यांच्यामुळं नेहमीच चर्चेत असणाऱ्या टेस्लाने मोठी कर्मचारी कपात जाहीर केली आहे. त्यामुळे टेस्लाच्या शेअर्सच्या किमतीत थोडी घसरण तर नोंदवण्यात आलीच, त्याचबरोबर टेस्लाची वाढ आणि कंपनीच्या आगामी काळातील वाटचाली विषयीदेखील चर्चा होते आहे.
टेस्ला या जगातील आघाडीच्या इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनीने जगातील त्यांच्या एकूण मनुष्यबळातून 10 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे.
'इलेक्ट्रेक' या वेबसाईटने सर्वांत आधी हे वृत्त दिलं होतं.
त्यानुसार एका मेमोमध्ये टेस्लाचे सर्वेसर्वा आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या इलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना म्हटलं आहे की ''कर्मचारी कपातीचा त्यांना सर्वाधिक तिरस्कार वाटतो. मात्र असे केल्याशिवाय पर्याय नव्हता, हे करावंच लागणार होतं.''
बाजार मूल्यानुसार जगातील सर्वांत मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या टेस्लामध्ये डिसेंबरअखेर जगभरात एकूण 1,40,473 कर्मचारी काम करत असल्याचं त्यांच्या ताज्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे.
बीबीसीनं विचारलेल्या प्रश्नांवर टेस्लानं प्रतिक्रिया दिली नाही.
''आम्ही कंपनीचा सखोल आढावा घेतला आहे आणि जगभरातील मनुष्यबळ 10 टक्क्यांनी कमी करण्याचा कठीण निर्णय आम्ही घेतला आहे,'' असं इलॉन मस्क यांनी त्याच्या ईमेलमध्ये म्हटलं आहे.
''कर्मचारी कपातीबद्दल मला प्रचंड तिरस्कार वाटतो, मात्र हे करावंच लागणार आहे. यामुळं पुढील टप्प्यावरील प्रगतीसाठी कंपनी अधिक कल्पकतेने आणि ऊर्जेनी काम करू शकणार आहे.''
कर्मचारी कपातीत समाविष्ट असणाऱ्या टेस्लाच्या एका कर्मचाऱ्यानं बीबीसीला सांगितलं की त्याचं ईमेल खातं गोठवण्यात आलं आहे. नोकरीवरून काढलेल्या इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील असंच झालं आहे.
कंपनीच्या कार्यकारी व्यवस्थापनातील अॅंड्रयू ड्रीव बॅगलिनो यांनी सोमवारी एक्स (आधीचं ट्विटर) वरील एका पोस्टवर म्हटलं आहे की त्यांनादेखील कंपनीतून बाहेर पडावं लागतं आहे. 18 वर्षे काम केल्यानंतर त्यांना कंपनी सोडण्याच्या कठीण निर्णयाला तोंड द्यावं लागतं आहे.
टेस्लाच्या वेबसाईटनुसार, बॅगलिनो 2019 पासून टेस्लाच्या पॉवरट्रेन आणि ऊर्जा अभियांत्रिकी टीमचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
रोहन पटेल हे टेस्लाचे आणखी एक अधिकारी आहेत ज्यांना कंपनीतून बाहेर पडावे लागणार आहे. ते टेस्लाच्या पब्लिक पॉलिसी आणि बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख आहेत.
टेस्लामध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल आणि कंपनीतील मोठ्या योजनांचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी वैयक्तिकरित्या इलॉन मस्क यांचे आभार मानले आहेत.
ते पुढं म्हणाले की टेस्लाच्या टीममध्ये व्यापक प्रमाणात असणारी कधीही हार न मानण्याची वृत्ती आणि कणखरपणा यामुळं ही कंपनी काम करण्यासाठी एक खास जागा बनली आहे.
''कर्मचारी कपात म्हणजे टेस्लाची वाढीच्या मुख्य टप्प्यात गंभीर स्वरूपाच्या अडचणी येत असल्याची चिन्हे आहेत,'' असं रनिंग पॉईंट कॅपिटल अॅडव्हायझर्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी असलेल्या मायकल अॅशले स्कलमन यांनी म्हटलं आहे. नोकर कपातीपेक्षाही टेस्लासमोर गंभीर आव्हानं आहेत ही बाब अधिक नकारात्मक संकेत आहे असं त्यांनी पुढं म्हटलं आहे.
मात्र गार्टनर आणि हारग्रीव्हज लॅंड्सडाऊन मधील विश्लेषकांच्या मते, टेस्लानं कारचे नवीन मॉडेल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) गुंतवणूक केल्यामुळं कंपनीवर खर्चात कपात करण्याचा दबाव असल्याची ही चिन्हे आहेत.
इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी असलेल्या टेस्लाच्या जुन्या मॉडेलमध्ये बदल करण्याचा वेग मंदावला होता. कारण व्याजदरात झालेल्या वाढीमुळे महागड्या कार विकत घेण्याच्या ग्राहकांच्या क्षमतेवर परिणाम झाला होता.
त्याचबरोबर टेस्लावर चीनमधूनही दबाव वाढत होता. कारण चीनमध्ये तयार होणाऱ्या तुलनेने स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्या आहेत.
कंपनीचा ताजा तिमाही अहवाल या महिन्याअखेरीस सादर करण्यात येईल असे टेस्लाने म्हटले आहे. मात्र कंपनीने पहिल्या तिमाहीतच वाहनांच्या विक्रीत घट झाल्याची बाब आधीच नोंदवली आहे.
मागील चार वर्षात ही पहिलीच तिमाही आहे ज्यात टेस्लाच्या कारविक्रीत घट झाली आहे. शिवाय टेस्लाने केलेली कारविक्री ही बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. काही विश्लेषकांनी टेस्लाच्या तिमाही आकडेवारीचा उल्लेख ''गोंधळ'' असा केला आहे.
मागील महिन्यात टेस्लाने शांघाय येथील त्यांच्या प्रसिद्ध गिगा फॅक्टरीतील उत्पादनात कपात केली होती. तर मागील आठवड्यात टेस्लाने ऑस्टिन येथील उत्पादन विभागात सायबरट्रकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं की त्यांच्या शिफ्टचा कालावधी कमी करण्यात आला आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत होत असलेल्या घटीचा परिणाम टेस्लाला जाणवू लागला आहे.
कंपनीने स्वस्त कारचे उत्पादक करण्याच्या योजना गुंडाळल्या असल्याच्या वृत्ताचा इलॉन मस्क यांनी अलीकडेच इन्कार केला होता. सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्वस्त कारचे उत्पादन करणे, हे इलॉन मस्क यांच्या दीर्घकालीन उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे.
सोमवारी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत प्रीमार्केट सत्रात 0.8 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.