You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फडणवीसांना ब्लू टिक, पण शिंदेंना नाही : ट्विटर व्हेरिफिकेशनची भानगड काय आहे?
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी
फुटबॉलपटू रोनाल्डो, अभिनेत्री आलिया भट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यात काय एक गोष्ट समान आहे, सांगा?
कालपर्यंत या सगळ्यांचे ट्विटर अकाउंट व्हेरिफाईड होते, त्यांच्या नावापुढे ब्लू टिक दिसत होतं, पण आता नाहीय.
फक्त यांचंच नव्हे तर अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांचं व्हेरिफिकेशन बॅज 20-21 एप्रिलच्या रात्रीतून ट्विटवरून उडालं आहे.
पण मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अकाउंटवर तर ब्लू टिक दिसतंय, आणि पंतप्रधान मोदींच्या खात्यावर तर राखाडी अर्थात ग्रे टिक आहे. असं कसं?
ही ट्विटर व्हेरिफिकेशनची भानगड आहे तरी काय? आणि आता ती समजून घेणं आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे?
पाहा ही सोपी गोष
व्हेरिफिकेशन बॅज का असतात?
ट्विटरवर जगभरातल्या मोठ्या कंपन्या, सिने आणि क्रीडा क्षेत्रातले सेलिब्रिटी, राजकारणी, पत्रकार आणि सामान्य नागरिक असतात. इथे लोक आपापलं म्हणणं मांडतात, मोठ्या घोषणा करतात, एकमेकांशी भांडत असतात, महत्त्वाचे क्षण आणि माहिती जगाबरोबर शेअर करत असतात.
पण इथे असे लाखो-कोट्यावधी लोक आहेत, त्यामुळे कोणती व्यक्ती कोण, त्यांची ओळख पटवणं गरजेचं होतं. यासाठीच ट्विटरने 2009 साली ‘ब्लू टिक’ नावाचं फीचर आणलं, म्हणजे एखादं अकाउंट एखाद्या प्रसिद्ध किंवा मोठ्या व्यक्तीचं आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी या ब्लू टिकचा खूप उपयोग व्हायचा.
पण कालांतराने हे ब्लू टिक फक्त व्हेरिफिकेशन सिम्बॉल नाही तर एक स्टेटस सिम्बॉलही बनलं. व्हेरिफाईड अकाउंटवरून कुणी काही म्हणतंय, म्हणजे ते अधिकारवाणीने बोललं जातंय, असा समज इंटरनेट विश्वात निर्माण होऊ लागला. आणि बघता-बघता इन्स्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबवरही असे व्हेरिफिकेशन मार्क्स दिसू लागले.
पण ट्विटरमध्ये इलॉन मस्क यांची एन्ट्री झाल्यानंतर गोंधळ निर्माण झाला.
ऐका गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
ट्विटर व्हेरिफिकेशन कसं बदललं?
उद्योगपती इलॉन मस्क यांनी 2022च्या अखेरीस ट्विटर 44 अब्ज डॉलर्सना विकत घेतलं. कंपनी खूप तोट्यात आहे, म्हणत त्यांनी आधी तब्बल 80 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. आणि नंतर या ब्लू टिकसाठी लोकांनी पैसे मोजायला हवे, असं जाहीर केलं.
याला ट्विटर ब्लू योजनेअंतर्गत जर तुम्ही महिन्याला 650 रुपये किंवा वर्षाला 6800 रुपये मोजले तर तुम्हीही आता ट्विटरवर व्हेरिफाईड होऊ शकता, असं इलॉन मस्क यांनी जाहीर केलं.
बघता बघता त्यांनी या निळ्या चिन्हासोबतच आणखी दोन रंगांचे चिन्ह आणले – राखाडी किंवा ग्रे टिक जे शासकीय आणि सरकारी अकाउंट्ससाठी होतं. जसं की पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयं, संयुक्त राष्ट्र, इत्यादी. आणि दुसरे म्हणजे गोल्डन टिक. हे सुवर्ण चिन्ह त्या सर्व खासगी संस्था आणि बिझनेस अकाउंट्सला मिळू शकतं, जसं की ॲपल किंवा स्वतः ट्विटर.
पण या सगळ्या चिन्हांसाठी आता ट्विटरकडे तसा अर्ज करावा लागतो, त्याची एक सविस्तर प्रक्रियाही आहे.
पण जिथे पैसा आला, तिथेच खरा धोका सुरू होतो.
पैसे देऊन ओळख चोरता येईल का?
किमान ही बातमी लिहेपर्यंत म्हणजे 21 एप्रिल 2023च्या संध्याकाळपर्यंत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे ब्लू टिक आहे, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावपुढे नाही. याचा अर्थ असा की फडणवीसांनी ट्विटर ब्लूचं सब्सक्रिप्शन घेतलं आहे आणि शिंदेंनी नाही.
पण हो, गद्दारनाथ शिंदे नावाच्या या ट्विटर अकाउंटला व्हेरिफिकेशन आहे. म्हणजे जी गोष्ट आधी एक ओळखीचा पुरावा म्हणून सादर केली जायची, तीच आता पैसे देऊन कुणालाही मिळू शकते. त्यामुळे म्हटल्यावर कुणीही कुणाचीही ओळख विकत घेऊ शकतं. आणि इथेच खरा धोका सुरू होतो.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी ट्वीट करत घोषणा केली होती की त्या 2024च्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. पण हे अकाउंट त्यांचं खरं अकाउंट नव्हतं, आणि कुणीतरी ट्विटर ब्लूचं सब्सक्रिप्शन विकत घेऊन त्यांच्या नावाने हे ट्वीट केलं होतं, म्हणजेच ही एक फेक न्यूज ठरली.
तुम्हाला लक्षात येतंय ना, यामुळे किती गोंधळ उडू शकतो. त्यामुळे इथून पुढे इंटरनेटवर जरा सावधपणेच वावरण्याची गरज आहे.
खरं काय? खोटं काय? कसं ओळखावं?
अशात तुम्ही-आम्ही काय करावं? काही महत्त्वाच्या सोप्या टिप्स –
एक म्हणजे जे अकाउंट्स व्हेरिफाईड आहेत, त्यांच्या टिकवर क्लिक केलं की त्याबद्दलची माहिती येते – ती नक्की वाचा.
एखाद्या अकाउंटचे फॉलोअर्स किती आहेत ते पाहा – उदाहरणार्थ, विराट कोहलीचे 5.51 कोटी फॉलोअर्स आहेत. अनुष्काचे 2.34 कोटी. एवढे फॉलोअर्स विकत घेणं, किंवा एखाद्या खोट्या अकाउंटवरून मिळवणं शक्य नाही.
त्यांच्या ट्वीट्सचा मजकूर पाहा – जर त्यांच्या कामाच्या गोष्टी असतील तर ठीक. जर त्या अकाउंटवरून कुणाला शिवीगाळ किंवा त्रास दिला जातोय, किंवा काहीतरी खरेदी करण्याची, कुठेतरी गुंतवणूक करण्याची लिंक दिली जातेय, तर जरा सावध व्हा. चुकीच्या गोष्टी, लिंक्स ट्वीट करणं कुठल्याही पब्लिक फिगरला परवडणारं नाही.
अंतिमतः एक मूलभूत सिद्धांत कायम ध्यानात ठेवा – इंटरनेटवर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते. आणि आता आर्टिफिशल इंटेलिजेन्सच्या विश्वात तर अजिबातच नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)