You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इलॉन मस्क आल्यानंतर ट्विटरमध्ये बदलू शकतात 'या' गोष्टी
- Author, जो क्लिनमॅन
- Role, टेक्नॉलॉजी एडिटर
बदलाचे संकेत
मस्क यांच्या मते आता ट्विटर अधिक स्वतंत्रपणे अभिव्यक्त होण्याची जागा असेल
मस्क आल्यानंतर बोट आणि स्पॅम कमी होऊ शकतात
ट्विटरचं नवीन बिझनेस मॉडेल काय असेल हे अजूनपर्यंत समजलं नाहीये.
मस्क ट्विटरच्या आधारे एखादं नवीन सुपर अपही आणू शकतात.
हा एक असा क्षण होता, ज्याची कदाचित कोणीच कल्पना केली नसेल. असंही होऊ शकेल हा विचार कोणी केला नसेल. मात्र कित्येक महिने चाललेल्या नाट्यानंतर इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्यासंबंधीची आपली डील पूर्ण झाल्याची घोषणा केली.
ही सर्वांत मोठी बातमी स्वतः मस्क यांनीच ट्विटरवरून दिली. त्यांनी ट्विटरवरचा आपला बायो बदलला आणि स्वतःला 'चीफ ट्वीट' असं संबोधलं. त्यासोबतच त्यांनी म्हटलं की, 'पक्षी आता स्वतंत्र झाला'
मस्क यांच्या बाजूने विचार केला, तर व्यवहार पूर्ण झाला आहे.
अर्थात, या व्यवहाराची अधिकृत घोषणा झालेली नाहीये आणि ट्विटरच्या मुख्यालयाकडून त्यामुळेच या व्यवहारावर अजूनपर्यंत मौन बाळगलं गेलंय. किंवा यासंदर्भात अधिकृत ई मेल पाठवणारंही आता कोणी ट्विटरमध्ये उरलं नसावं.
मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल, चीफ फायनान्शियल ऑफिसर नेड सीगल तसंच लीगल आणि पॉलिसी एक्झिक्युटिव्ह विजया गड्डे यांना पदावरुन हटवलं आहे. चेअरमन ब्रेट टेलर यांचं लिंक्डइन प्रोफाईलही बदललं आहे. ते आता या कंपनीत नाहीत, असंच यावरून दिसंतय.
आता या सगळ्या बदलांनंतर मस्क यांचं ट्विटर भविष्यात कसं असेल?
डिजिटल टाऊन स्क्वेअर
मस्क यांनी आपल्या संभाव्य जाहिरातदारांना अत्यंत नम्रपणे एक मेसेज लिहिला आहे. त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध असा हा मेसेज आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ट्विटर खरेदी करण्यामागचा उद्देश हा 'मानवतेची मदत' करणं हा आहे.
ते लिहितात, "मला वाटतंय की, या संस्कृतीकडे एक 'डिजिटल टाउन स्क्वेअर' असावा अशी माझी इच्छा आहे."
अर्थात, आपलं हे उद्दिष्ट अयशस्वी ठरू शकतं याचीही त्यांना जाणीव आहे.
मस्क यांनी ही पोस्ट त्या लोकांसाठी लिहिली आहे, जे ट्विटरवर जाहिराती देतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, ट्विटरचं धोरण हे डिजिटल अडव्हर्टायझिंग बिझनेस मॉडेल कायम ठेवण्याचं आहे.
खरंतर गुगलची कंपनी अल्फाबेट आणि फेसबुकची कंपनी मेटाप्रमाणे ट्विटरच्या कमाईतही घट होताना दिसत आहे.
जागतिक आर्थिक संकट आणि कंपन्यांकडून मार्केटिंगच्या खर्चात होत असलेली कपात यांमुळे या कंपन्यांच्या उत्पन्नात घट होताना दिसतीये.
यापूर्वी मस्क यांनी ट्विटरकडून केलं जाणारं 'मॉडरेशन' (पोस्टवरील नियंत्रण) कमी करण्याबद्दलही भाष्य केलं होते. ट्विटरवर अधिकाधिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावं, अशी त्यांची भूमिका होती. (ट्विटरवर डाव्या विचारांच्या उदारमतवादी पोस्टना अधिक प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप केला जातो. अर्थात, ट्विटरकडून हा आरोप फेटाळला जातो.)
असे अंदाज वर्तवले गेले असले तरी, मस्क यांनी सध्या तरी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
काही तासांपूर्वीच इलॉन मस्क यांनी ट्वीट केलं आहे. ते म्हणतात, "मी स्पष्ट करू इच्छितो की सध्यातरी आम्ही ट्वीटरचे कॉन्टेंट मॉडरेशन धोरण बदललेलं नाही."
यापूर्वी केलेल्या एका ट्वीटमध्ये त्यांनी कॉन्टेंट मॉडरेशन परिषद बनवली जाईल अशी घोषणा केली होती.
ते म्हणाले, "व्यापक आणि विविध दृष्टीकोन समजून घेण्यासाठी ट्वीटर एक कॉन्टेंट मॉडरेशन परिषद बनवेल. परिषदेच्या बैठकीपूर्वी कॉन्टेंटसंदर्भात कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. तसंच कोणालाही अकाऊंट पुन्हा मिळणार नाही."
ते काही वादग्रस्त ट्विटर हँडल पुन्हा सुरू करण्याचाही विचार करू शकतात. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि कायने वेस्ट यांच्यासारखे त्यांचे मित्रही असू शकतील.
अर्थात, मी याबाबतीत खात्रीनं काही सांगू शकत नाही. कारण मस्क यांनी यावर अधिकृतपणे काहीच भाष्य केलं नाहीये. पण त्यांनी हे निश्चित म्हटलं होतं, की "हे व्यासपीठ अधिक खुलं असेल. याचा अर्थ ही अशी जागा नसेल, जिथे चुकीच्या गोष्टींना परवानगी असेल. ते देशांतील कायद्यांप्रमाणेच असेल."
ज्यूविरोधी वक्तव्यांवरून वेस्ट याचं तर हिंसा भडकविण्याच्या आरोपांवरून ट्रंप यांचं ट्विटर अकाउंट कायमस्वरूपी बंद करण्यात आलं होतं.
स्पॅम आणि सुपर अॅपचे संकेत
मस्क यांनी स्पॅमची संख्या आणि बोट अकांउट्सविरोधातही मोर्चा उघडला होता. संपूर्ण साइटमध्ये या गोष्टी घुसल्या आहेत, असं त्यांचं मत होतं.
अकाऊंट्सची संख्या फुगवून सांगितली जाते, हा आरोप ट्विटरने नेहमीच फेटाळून लावला आहे.
मस्क आता मोठ्या संख्येनं या गोष्टी हटविण्याचा आदेश देऊ शकतात. मात्र, या निर्णयामुळे ट्विटरच्या सध्याच्या फॉलोअर्सची संख्या एकदम कमी होईल. मस्क यांचा हा निर्णय कटू आणि अप्रिय ठरू शकतो.
मस्क यांनी याच दरम्यान अजून एक संकेत दिला होता की, ते एक नवीन कंपनी स्थापन करतील. त्यांच्या या कंपनीचं नाव ठेवण्यात आलं होतं- अॅक्स, द एव्हरिथिंग अॅप. त्यांनी याच हेतूने ट्विटर खरेदी केल्याचंही बोललं जात आहे.
मस्क यांनी याविषयी अधिक सविस्तरपणे काहीच सांगितलं नाहीये. मात्र अनेकांच्या मते, ते चीनच्या व्ही चॅटप्रमाणेच एखादं सुपर अॅप बनवू इच्छितात.
व्ही चॅट हे एक वन स्टॉप अॅप आहे, ज्यामध्ये सोशल मीडिया मेसेजिंगसोबत फायनान्शियल प्रॉडक्टही विकत घेतले जाऊ शकतात. अगदी जेवणही ऑर्डरही केलं जाऊ शकतं. म्हणजेच एका अॅपमध्येच तुमच्या गरजेच्या सगळ्या गोष्टी आहे.
पाश्चिमात्य देशांमध्ये अजून तरी अशी कोणतीही गोष्ट आली नाहीये. अर्थात, मेटाचं व्हॉट्स अॅप आणि फेसबुक मेसेज आपल्या मल्टीपल फंक्शनमुळे या पद्धतीच्या सेवांमध्ये उतरले आहेत.
क्रिप्टोकरन्सी आणि बायनॅन्स
मस्क यांनी क्रिप्टोकरन्सीआणि बायनॅन्ससाठीचं प्रेम लपवलेलं नाही. बायनॅन्स जगातील सर्वात मोठं क्रिप्टो एक्सचेंज आहे.
आगामी काळात आपण असा काही ट्विटर सेट-अप पाहू शकतो का की जो क्रिप्टोच्या माध्यमातून पेमेंट घेईल. क्रिप्टोकरन्सी ग्राहकांसाठी किंवा चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असू शकते. पण आजही जे लोक क्रिप्टोकरन्सीबाबत संभ्रमात आहेत त्यांच्यासाठी मात्र हे धोका पत्करण्यासारखं आहे. परंतु मस्क हे दूरदर्शी समजले जातात. ते अनपेक्षित, महत्त्वाकांक्षी व्यक्ती आहेत.
एक बाब स्पष्ट आहे ती म्हणजे काही बदल तर नक्की होतील. पण काहींचं असंही म्हणणं आहे की जे बदल होणार होते ते आता आणखी लांबणीवर गेले.
टेक इंडस्ट्रिचे गुंतवणूकदार पीटर थिल म्हणाले, "आम्हाला उडणारी कार हवी होती. पण याऐवजी आम्हाला 140 शब्दांची मर्यादा मिळाली."
आणखी एका मीम म्हटलंय की, अपेक्षा आणि वास्तव यात खूप अंतर आहे. पण मिस्टर मस्क आल्यानंतर आता कदाचित आम्ही दोन्ही मिळवू शकू.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)