'शेतीपेक्षा नोकरी मोठी नाही' असं म्हणत फेसबुकवरून शेती शिकवणारी सविता ताई

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

एकेकाळी शेतीचं काहीएक ज्ञान नसणाऱ्या सविता डकले आज फेसबुकवर अनेकांना शेतीविषयक मार्गदर्शन करत आहेत.

शेतकरी सविता डकले औरंगाबाद जिल्ह्यातील पेंडगावमध्ये राहतात.

सविता यांनी फेसबुकवर women in agriculture नावाचा ग्रुप सुरू केला आहे. या ग्रुपचे साडेसात लाख सदस्य आहेत.

या ग्रुपच्या माध्यमातून सविता त्यांच्या शेतातील ज्ञानाचा फायदा लाखो महिलांना करुन देत आहेत. इतरांना शेती संदर्भात माहिती देत आहेत.

त्या सांगतात, “शेतीत काम करणाऱ्या महिलांसाठी काहीच नसतं. त्यामुळे मी फेसबुकवर जो ग्रुप बनवला, त्याचं नाव women in agriculture असं ठेवलं. या ग्रुपवर शेतीविषयक माहितीची देवाणघेवाण होत असते. खरेदी-विक्री, बियाण्यांची माहिती याची चर्चा होत असते.”

सविता यांच्या या कामामुळे फेसबुकने त्यांचा दिल्लीत सत्कार केला.

सविता फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप आणि लिंक्डइनच्या माध्यमातून शेतीविषयक अपडेट टाकत राहतात.

सविता यांच्याकडे दीड एकर शेती आहे. 2017 पासून त्यांनी सोशल मीडियाचा वापर सुरू केला. यासाठी त्यांना त्याचे पती सुनील डकले यांनी मदत केली.

सविता यांनी शेतकरी सविता ताई या नावानेही फेसबुक ग्रूप सुरू केला आहे. त्याचे जवळपास साडे तीन लाख सदस्य आहेत.

हा ग्रुप शेतीविषयक, खते व कीडनाशकांची आणि बियाण्याची माहिती व पूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे.

लग्नानंतर शेतीत सगळं काही नवीन

सविता यांचं बालपण संभाजीनगरमध्ये एका सामान्य कुटुंबात गेलं. वयाच्या सतराव्या वर्षी लग्न करुन त्या पेंडगावात आल्या. शेतकरी कुटुंबात त्यांना दिलं गेलं.

सविता सांगतात, “शेती म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं. शेतात काम कसं करायचं माहिती नव्हतं. पहिल्या दिवशी शेतात कापूस वेचायला गेले तर सगळ्या महिला माझ्याकडे पाहून हसायला लागल्या की हिला काहीच काम येत नाही. ही कशी काम करणार आहे? मी पहिल्या दिवशी फक्त 8 किलो कापूस वेचला.”

आज सविता एका दिवसात 50 किलो कापूस वेचतात.

'सेवा' संस्थेची झाली मदत

2017 मध्ये सविता घराबाहेर पडल्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या इला भट यांच्या 'सेवा' या संस्थेनं सविता यांच्या गावात एक कार्यक्रम आयोजित केला होता.

महिलांना स्वयंरोजगार आणि व्यवस्थापनाची कौशल्यं शिकवण्याची काम सेवा ही संस्था करते.

यानंतर सविता यांनी गावातील महिलांना प्रशिक्षण द्यायला, सक्षम करायला सुरुवात केली. गावात पहिला बचतगट स्थापन केला.

आज त्यांच्या गावात 12 बचतगट आहेत. आता त्या आसपासच्या खेड्यातील महिलांना शेतीचे प्रशिक्षण देत आहेत.

सविता गावातील महिलांना शाश्वत शेतीची माहिती देतात. त्यांनी सेवा संस्थेमार्फत गावातील 700 हून महिलांना एकत्र केलं आहे.

गावातल्या महिलांना ऑनलाईन पेमेंटचे मोबाईल अॅप्लिकेशन्स कसे वापरायचे, बँकेत खाते कसे काढायचे, हेसुद्धा सविता सांगतात.

“सवितामुळे बँकेत जायला शिकले. आधार कुठं लिंक करायचं शिकले. आता कलेक्टर हाफिसला एकटी जाऊ शकते,” असं या गावातल्या ज्येष्ठ महिला सांगत होत्या.

‘बाईच्या कष्टालाही समान मोबदला हवा’

दीड एकर शेतीत घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागत नसल्यामुळे सविता मजुरी करतात.

बाईला पुरुषाप्रमाणे मजुरी मिळावी, असं त्यांचं मत आहे.

त्या सांगतात, “आम्हा बायांना 250 रुपये आणि पुरुषाला 400 मिळते मजुरी मिळते. हा भेद कशासाठी? असे कोणतेच काम नाही जे बाई करू शकत नाही.”

शेतीपेक्षा मोठी कोणतीच नोकरी नाही असं सविता यांचं ठाम मत आहे.

“शेतकरी राजा आहे. कोरोनाने दाखवून दिलं की नोकरी कधीही जाऊ शकते. पण शेतात आपण कधीही पिकवून पोट भरू शकतो. दुसऱ्यांना खाऊ घालू शकतो. म्हणून शेतीपेक्षा मोठी नोकरी नाही.”

पुन्हा शिक्षणाची वाट

लग्नावेळी दहावी नापास असलेल्या सविता यांनी 2 वर्षांपूर्वी दहावीची परीक्षा देत पास झाल्या. आता त्यांनी बारावीला प्रवेश घेतला आहे.

सध्या त्या सेवा संस्थेसाठी मास्टर ट्रेनर म्हणून काम करतात. कधीकधी संध्याकाळी प्रवास करावा लागत असल्याने त्यांनी स्कूटी घेतली आहे.

शेतकरी महिलांना शेतकऱ्याचा दर्जा मिळाल्यास त्यांना सरकारी योजनांचा अधिक फायदा होईल ,असं त्या सांगतात.

शिवाय शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, हीच शेतकऱ्यांची प्रमुख समस्या असल्याचंही सांगतात.

सविता यांचं उदाहरण आज गावातल्या इतर घरांमध्ये दिलं जातं. एक महिला सक्षम झाली की ती कुटुंबालाच नव्हे तर समाजालाही सेवा देते आणि दिशा दाखवते, हेच सविता यांनी सिद्ध करुन दाखवलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)