संतोष आग्रे : बारावी नापास ते वर्षभरात कोट्यवधींचा टर्नओव्हर करणारा शेतकरी

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

“असं वाटत नव्हतं की, मी माझ्या हातानं एक लाखाच्या किंवा दोन लाखाच्या चेकवर सही करेल. माझं अकाऊंटसुद्धा नव्हतं बँकेत. आता मी माझ्या हातानं लाखाचे, दहा लाखाचे, कोटीचे व्यवहार करतोय.”

हे सांगताना संतोष आग्रे यांचा ऊर अभिमानानं भरुन येतो.

संतोष आग्रे औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील बाभुळगावमध्ये राहतात. बारावी नापास असलेल्या संतोष यांच्याकडे दीड एकर शेती आहे.

दहावीनंतर ते औरंगाबाद शहरात नोकरीसाठी आले आणि खासगी कंपनीत नोकरी करू लागले.

7 ते 8 वर्षं तिथं काम केल्यानंतर त्यांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्यासाठी हे सोपं नव्हतं. त्यांना घरच्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं.

संतोष सांगतात, “मी औरंगाबादमध्ये खासगी संस्थेत 7 ते 8 वर्षं काम केलं. पण, तिथं माझं काही व्यवस्थित जमलं नाही. मग मी पुन्हा गावाकडं येण्याचा निर्णय घेतला. गावाकडं यायचा निर्णय घेतला पण घरचे मला यायला नाही म्हणत होते. इकडं काय करशील? शेती आपल्याला दोनच एक्कर आहे. मग कसं भागणार आहे? असं घरचे म्हणत होते. तरी पण मी गावाकडं आलो.”

गावाकडे आल्यानंतर संतोष यांनी 6 वर्षं शेळीपालन केलं. त्यातून त्यांनी शेती क्षेत्रातील जाणकारांशी ओळखी झाल्या आणि पुढे 2022 च्या ऑक्टोबर महिन्यात संतोष यांनी शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

अशी स्थापन झाली कंपनी

“मला एफपीओ म्हणजे काय हेच माहिती नव्हतं. माझे मार्गदर्शक दीपक जोशी 6 महिने माझ्या मागे लागले. पण मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. पण एक दिवस ते आले आणि मग तुला हे करायचंच आहे, असं म्हणाले. मग मी त्यांना हो बोललो.”

कंपनी स्थापन करायची म्हटल्यावर काही जणांना तयार करणं हे संतोष यांच्यासमोर पुढचं आव्हानं होतं. गावातीलच सुशिक्षित बेरोजगार मित्रांना त्यांनी सोबत घ्यायचं ठरवलं.

संतोष सांगतात, “माझ्या लक्षात आलं की आपले चुलत भाऊ गावात नुसतेच फिरताहेत. गावाकडं काम नाही, पण त्यांचं शिक्षण झालेलं आहे. काहींची दहावी-बारावी झालीय, काहींचं ग्रॅज्युएशन झालेलं. ते नुसतेच फिरत होते. मी त्यांना कंपनी स्थापन करायची का, असं विचारलं. पण आपल्याजवळ पैसा नाही, कंपनी स्थापन करायला पैसा लागेल असं म्हणत त्यांनी निगेटिव्ह विचार करायला सुरुवात केली.”

संतोष यांनी 10 जणांना तयार करत बाभुळगावकर मित्र फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड या नावानं शेतकरी उत्पादक कंपनीची ऑक्टोबर 2021 मध्ये नोंदणी केली.

प्रत्येकी 10 हजार रुपये गोळा करून 1 लाखांच्या भांडवलावर कंपनी सुरू केली. कंपनीचे सगळे सदस्य अल्पभूधारक म्हणजे 5 एकरच्या आतील शेती असणारे आहेत.

“सुरुवातीला आम्ही मका खरेदी चालू केली. आम्ही शेयर कॅपिटल म्हणून गोळा केलेले दहा-दहा हजार रुपये वापरले. आमच्या सदस्यांच्याच घरची मका आधी खरेदी केली. त्यातून आणखी थोडं भांडवल उभं राहिलं. ते एक दीड महिन्यानंतर आम्ही आमच्या सदस्यांना वापस केलं. त्यातून मग बाकीच्या लोकांची मका खरेदी चालू केली.”

गेल्या वर्षी या कंपनीकडे केवळ गावातलेच लोक माल विक्रीसाठी घेऊन आले. कारण, कंपनी नवीन असल्यामुळे पैसे देईल की नाही, अशी साशंकता लोकांच्या मनात होती. यंदा मात्र जवळपासच्या 4 खेड्यातील लोक त्यांच्याकडे मका आणि सोयाबीन विक्रीसाठी घेऊन आले आहेत.

संतोष सांगतात, “इतर व्यापाऱ्यांपेक्षा आम्ही शेतकऱ्यांमा चेकनं पेमेंट करतो. ज्या दिवशी मका घेतली, त्याच्या दुसऱ्या दिवशी चेक देतो. बाकीच्या व्यापाऱ्यांपेक्षा क्विंटलमागे दहा-वीस रुपये वाढवून देतो.”

वर्षभरात कोट्यवधींचा टर्नओव्हर

गेल्यावर्षीपासून आतापर्यंत कंपनीनं जवळपास 1 हजार टन शेतमाल कंपनीनं खरेदी केलाय.

“वर्षभरात आम्ही जवळपास एक हजार टनापर्यंत माल खरेदी केला. त्यात गहू, मका, सोयाबीन, तूर, हरभरा आहे. आम्ही बँक स्टेटमेंट काढलं आहे. जवळपास 1 कोटींच्या पुढे टर्नओव्हर गेलेला आहे,” संतोष त्यांच्या हातातील बँक स्टेटमेंट दाखवतात.

बाभूळगावकर मित्र फार्मर प्रोड्यूसर कंपनीनं यंदा 11 लाख रुपये गुंतवून वजन काटा खरेदी केलाय.

कंपनीकडे येणाऱ्या शेतकऱ्यांना शेतमालाच्या वजनासाठी दुसऱ्या गावात जावं लागत असल्यानं संतोष यांनी काटा खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

आता इथून पुढे कंपनीला जो नफा राहणार आहे त्यानुसार जे शेतकरी त्यांच्याकडे शेतमाल विकतील, त्यांना दिवाळीला बोनस वाटप करण्याचा संतोष यांचा निर्धार आहे.

वैयक्तिक आयुष्यही बदललं

गेल्या वर्षभरात संतोष यांच्या आयुष्यातही मोठा बदल झालाय. त्यांनी कुक्कुटपालन सुरू केलंय. मळणीयंत्रही घेतलंय.

संतोष सांगतात, गावातल्या लोकांचा, पाहुण्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फेल गेलेला मुलगा असा होता. जिकडं गेला तिकडं फेल झाला. पुन्हा आता गावाकडं आला. आता दृष्टिकोन असा बदलला की, लोक पुढं होऊन फोन करताहेत, पाहुणे जवळ करताहेत.

“नाहीतर आधी एक एक वर्ष ते फोन करत नव्हते. आता दर दोन दिवसांनी फोन करून तुझं काय चाललंय, तुझा बिझनेस कसा चाललाय याची विचारपूस करताहेत.”

संतोष यांचे कुटुंबीयही त्यांच्या कामावर समाधानी आहे. आता ते लवकरच घर बांधण्याचा विचार करत आहेत.

संतोष यांच्या पत्नी कावेरी आग्रे सांगतात, “आता आमचं खूप छान चाललंय. दहा-बारा लाख आमच्याकडे साचलेले आहेत. आणि आता घर पण बांधायचं आहे आम्हाला. सध्या सगळं व्यवस्थित चालू आहे.”

‘शेतकऱ्यांनी व्यापारी व्हावं’

अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनेक मर्यादा येतात. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकरी व्यापारी होऊ शकतो, असं संतोष यांचं मत आहे.

“आमचे आई-वडील पण शेती करतात. आम्ही सुरुवातीपासून बघतोय की, व्यापाऱ्याकडे माल घेऊन गेल्यास तो माल ते हातात घेणार, चावून घेणार. मॉईश्चर नावाची भानगड आई-वडिलांना कधी माहिचीच नव्हती. व्यापारी चावून बघायचे आणि तेच त्यांचा मॉईश्चर असायचं.

“ते बघून भाव काही पण सांगायचे, तिथं मग शेतकऱ्यांची लूट व्हायची. त्यामुळे असं वाटतं शेतकऱ्यांना व्यापारी व्हायला पाहिजे. स्वत: व्यापार करून शेतकऱ्यांना फायदा करून द्यायला पाहिजे.”

हाती असलेल्या पैशातून संतोष आता बिझनेस कसा वाढवता येईल, याचाच विचार करत आहेत.

‘आणखी एक पर्याय’

संतोष यांच्या कंपनीच्या आवारात आम्ही उभे होतो. तेव्हा तिथं शेतकरी रावसाहेब मोरे आले.

संतोष यांच्या एफपीओविषयी विचारल्यावर ते म्हणाले, “आधी आमच्या परिसरात दोनच व्यापारी होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्याशिवाय दुसरीकडे कुठे माल विकता येत नव्हता. आता मात्र तिसरी कंपनी आली आहे, जिथं शेतकरी माल विकू शकतात. शेतकऱ्यांना आणखी एक पर्याय मिळाला आहे.”

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)