15 महिन्यांत 23 लाखांचं उत्त्पन्न मिळवणारा शेतकरी

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, औरंगाबाद

भाऊ निवदे हा 25 वर्षांचा शेतकरी जालना जिल्ह्यातल्या मच्छिंद्रनाथ चिंचोली गावात राहतो. महाराष्ट्र सरकारच्या रेशीम संचालनालयानं सप्टेंबर महिन्यात त्याचा रेशीमरत्न पुरस्कारानं सन्मान केला.

याला कारण ठरलं ते भाऊने रेशीम कोषाच्या विक्रीतून घेतलेलं विक्रमी उत्पन्न.

पण, लष्करात भरती होण्यासाठी तयारी करणारा भाऊ रेशीम शेतीकडे कसा वळाला आणि या शेतीतून त्यानं लाखोंचं उत्पन्न कसं घेतलं, त्याची ही गोष्ट.

रेशीम शेतीस सुरुवात

भाऊचं बी. कॉम झालेलं आहे. शिक्षण सुरू असताना तो भारतीय लष्करात भरती होण्यासाठीची तयारी करत होता. तीन चार वर्षं तयारी केली. सात ते आठ वेळी भरती प्रक्रियेत सहभागी झाला. पण त्यात त्याला काही यश आलं नाही.

भरती प्रक्रियेच्या तयारासाठी तो दररोज रनिंग करायचा. यादरम्यान त्याच्या नजरेस गावातीलच ज्ञानदेव बिडवे यांनी रेशीम कोषासाठी उभारलेला शेड पडला.

याविषयी भाऊ सांगतो, “मी रेशीम शेती गुगलला, याला त्याला बघत होतो. दहा वर्षांपासून पप्पांना म्हणत होतो की रेशीम शेती करू, पण ते काही ऐकत नव्हते. मग भरतीसाठी रनिंग चालू असताना मी ज्ञानदेव बिडवे यांच्या शेडमध्ये जायचो.

“त्यांचं 30 गुंठ्याचं क्षेत्र होतं. त्यात ते दर 2 महिन्यात 80, 90 हजार ते 1 लाख उत्पन्न घ्यायचे. माझं कॉलेज पार्ट टाईम असल्यामुळे मला टाईमही मिळत होता. त्यामुळे मग मी शेतीकडे वळालो आणि रेशीम शेती करायचं ठरवलं.”

रेशीम शेती करायची ठरवल्यानंतर भाऊनं ज्ञानदेव बिडवे यांच्या शेतातून तुतीच्या काड्या आणल्या. आणि त्यांची सरी पद्धतीनं लागवड केली.

भाऊ सांगतो, "रोपं 3 महिन्यांची झाल्यानंतर 25 जून 2018 मध्ये संपूर्ण एक एकरात तुतीची लागवड केली. लागवड केल्यानंतर अडीच महिन्यांनी पहिली बॅच आली, ती 125 अंडीपुंजाची होती. त्यापासून 120 किलो उत्पन्न झालं. त्यातून 60 हजार रुपये मिळाले. पहिली बॅच सक्सेस झाल्यामुळे लगेच मी एक एकर क्षेत्र वाढवलं.”

2021 पर्यंत भाऊकडे 4 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली होती. आता परत एक एकर क्षेत्र त्यानं वाढवलेलं आहे.

रेशीमरत्न पुरस्काराचा मानकरी

भाऊ दर महिन्याला अंडीपुज्याची बॅच घेतो. रेशीम शेतीतून 15 महिन्यांमध्ये 23 लाख उत्पन्न मिळवल्यामुळे त्याला रेशीम रत्न पुरस्कार देण्यात आला.

भाऊ सांगतो, “प्रत्येक महिन्याला माझी बॅच, 400, 500 किंवा 600 अंडीपुंज्याची असायची आणि प्रत्येक बॅचला मला चार, साडे चार किंवा पाच क्विंटल असा माल निघायचा. सुरुवातीला 50 हजार आणि मग उन्हाळ्यात 70 ते 80 हजारापर्यंत जालना मार्केटला कोषाचे भाव गेले. त्यापासून प्रत्येक बॅचला मला 1 लाख 80 हजार, 2 लाख किंवा अडीच लाख अशी इन्कम राहायची.

“ते सगळे टोटल मिळून मला 23 लाख रुपये उत्पादन झालं. मी 15 महिन्यांमध्ये 13 बॅच कम्प्लीट केल्या आणि त्यापासून 23 लाख उत्पन्न झाल्यामुळे व ते सर्वांत जास्त उत्पन्न असल्यामुळे मला रेशीम रत्न पुरस्कार मिळाला.”

रेशीम शेतीतील रिस्क फॅक्टर कसा कमी केला?

रेशीम शेतीमध्ये दोन गोष्टींची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. पहिलं म्हणजे शेडचं वातावरण व्यवस्थित टिकवून ठेवणं आणि दुसरं तुतीच्या पाल्याची क्वालिटी चांगली ठेवणं.

यासाठी काय केलं, असं विचारल्यावर भाऊ सांगतो,“शेडचं निर्जंतुकीकरण व्यवस्थित केलं नाही आणि पाल्याची क्वालिटी चांगली ठेवली नाही तर कोषाचं उत्पादन 30 ते 40 टक्केच होतं.”

“माझ्या शेडचं वातावरण मेंटेन राहण्यासाठी मी आतमध्ये 6 फॅन लावलेले आहेत. दोन कुलर आहेत आणि ग्रीन नेटला दोन इन-लाईन ठिबकच्या नळ्या शिवलेल्या आहेत. त्याच्यामुळे ग्रीन नेटवर पाणी कंटिन्यू 10 तास चालू राहतं.

“बाहेरून येणाऱ्या हवेमुळे वातावरण थंड राहतं आणि शेडचं वातावरण 27 C राहतं. शेडमधील भिंत पूर्ण ओली राहत असल्यामुळे आर्द्रता टिकून राहते. जमिनीवर पाणी टाकल्यामुळे आर्द्रता 70, 80, 85 कंटिन्यू राहते.”

पाल्याची क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी 4*3 पद्धतीनं तुतीची लागवड मदत करते, असा भाऊचा अनुभव आहे.

तो सांगतो,“तुतीच्या चार बाय तीन लागवड पद्धतीत पाला एकदम बेस्ट राहतो, असा माझा अनुभव आहे. यात हवा खेळती राहते. त्याच्यामुळे खालचा पाला पिवळा होत नाही. प्रत्येक झाडाला 10 ते 15 फुटवे फुटवलेले असतात. कमी फुटवे असल्यामुळे पाल्याची क्वालिटी एक नंबर असते.

“ज्या 10 ते 15 साईड ब्रँचेस असतात त्या सगळ्या आम्ही व्यवस्थितपणे कट करून घेतो. त्यामुळे झाडाचं अन्नद्राव्य खाली न जाता, ज्या वर ठेवलेलया 15 ब्रँचेस आहे, त्याच्यावरच जातं आणि पाल्याची क्वालिटी चांगल्याप्रकारे येते.”

दरमहा कमाईचं नियोजन

भाऊ सध्या दरमहिन्याला रेशीम कोषाची विक्री करतो. त्यामुळे त्याला दरमहा उत्पन्न मिळतं.

तो सांगतो, “मी चार एकराचं नियोजन असं केलं की, एका बाजूच्या दोन एकरवर 400, 500 अंडीपुंजाची बॅच आणि दुसऱ्या दोन एकर 400-500 अंडीपुंज्याची बॅच घ्यायची. हा दोन एकरचा पाला संपला की त्या बाजूचा पाला येतो. तो संपला की हा येतो.

“प्रत्येक महिन्याला बॅच घ्यायची असली तर पाल्याची थोडी साईज कमी राहते. पण आपला गाडा कंटिन्यू चालू राहतो. त्याच्यासाठी मी प्रत्येक महिन्याला बॅच घेत असतो.”

भाऊची 150 किलोची रेशीम कोषाची शेवटची बॅच ऑक्टोबर महिन्यात विक्रीसाठी गेली होती. जालना कृषी उत्पन्न समितीत या रेशीम कोषाला 650 रुपये प्रती किलो इतका दर मिळाला आहे. भाऊला यातून 75 हजार रुपये उत्पन्न मिळालं आहे.

याआधी शेतकऱ्यांना त्यांचा रेशीम कोष विक्रीसाठी कर्नाटकातील रामनगर मार्केटमध्ये न्यावा लागत असे. पण आता जालन्यातच बाजारपेठ उपलब्ध झाल्यानं इतर राज्यात कोष नेण्यासाठी जो खर्च लागत होता, तो वाचत असल्याचं भाऊ सांगतो.

रेशीम शेतीसाठी शासनाचं अनुदान

या अनुदानाविषयी महाराष्ट्राच्या रेशीम संचालनालयाचे सहाय्यक संचालक एम. बी. ढवळे सांगतात, "महाराष्ट्र सरकारची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून तुती लागवड ही 3 लाख 42 हजार रुपयांची योजना आहे. त्यामुळे शासनाकडून मिळालेले पैसे हे मजुरीचे असतात आणि पिकातून निघालेले पैसे हे पूर्णपणे बोनस असतात."

महाराष्ट्रातील रेशीम शेतीविषयी ढवळे सांगतात, “महाराष्ट्रात सर्वाधिक रेशीम शेती मराठवाड्यात केली जातो. त्याखालोखाल पुणे आणि नागपूर विभागाचा क्रमांक लागतो. सध्या राज्यात जवळपास 14 हजार एकर क्षेत्रावर रेशीम शेती केली जात आहे. दरवर्षी 7 हजार एकर क्षेत्र तुतीच्या लागवडीखाली येत आहे.”

“विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातील बडनेरा इथंही आता शेतकऱ्यांना रेशीम कोषाच्या खरेदी-विक्रीसाठीची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे या भागातील शेतकरीही रेशीम शेतीकडे वळतील,” असंही ते सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)