पराग देसाई : चहा कंपनीच्या लोगोत 'वाघ-बकरी' असण्याचं महात्मा गांधी कनेक्शन

फोटो स्रोत, Getty Images
"भारतातील लोक कुणाहीशिवाय आणि कशाच्याहीशिवाय जगू शकतात, पण चहाशिवाय जगू शकत नाहीत."
हे शब्द आहेत भारतातील आघाडीच्या चहा कंपन्यांपैकी एक असलेल्या 'वाघबकरी टी ग्रुप'चे संचालक पराग देसाई यांचे.
पराग देसाई यांचं वयाच्या 49 व्या वर्षी निधन झालं.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पराग देसाई गेल्या आठवड्यात 15 ऑक्टोबर रोजी त्यांच्या घराबाहेर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात जखमी झाले होते आणि त्यांच्या मेंदूतून रक्तस्त्राव (ब्रेन हॅमरेज) झालेला.
वाघबकरी हा गुजरातमधील प्रसिद्ध चहाचा ब्रँड आहे आणि तो देसाई ग्रुपद्वारे चालवला जातो. पराग हे चौथ्या पिढीतील व्यावसायिक होते आणि कंपनीच्या वेबसाइटनुसार, त्यांनी अमेरिकेतील लॉंग आयलँड विद्यापीठातून एमबीए केलंय.
पराग देसाई 1995 मध्ये कौटुंबिक व्यवसायात रुजू झाले. कंपनीचा महसूल तेव्हा 100 कोटींपेक्षाही कमी होता.
त्यांनी अहमदाबादच्या पलीकडे व्यवसायाचा विस्तार केला आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म देखील सुरू केला. देसाई हे कंपनीच्या विक्री, विपणन आणि निर्यात विभागाचे प्रमुख होते.
दुखापत आणि मृत्यू
पराग देसाई 15 ऑक्टोबर रोजी त्यांच्या घराबाहेर कोसळले. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या भटक्या कुत्र्यांपासून ते पळत होते मात्र ते खाली पडले. त्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज झाला.
सुरक्षा रक्षकाने कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर त्यांना जवळच्या शेल्बी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्यांना शस्त्रक्रियेसाठी झायडस रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते.

फोटो स्रोत, Getty Images
पीटीआयच्या वृत्तानुसार, 7 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर रविवारी 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे कुटुंबीयांनी सांगितलं.
व्यवसायातील यश
वाघ बकरी टी ग्रुपचं रूपडं पालटण्यात पराग देसाई यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी 70 हून अधिक टी लाउंज सुरू केले आणि टी वर्ल्ड कॅफे देखील उघडला. त्यांनी ग्रुपच्या ई-कॉमर्सला चालना दिली आणि सोशल मीडियावर त्याचा प्रचार केला.
ते CII (भारतीय उद्योग महासंघ) सह इतर मंचांशी जोडलेले होते.
फोर्ब्स इंडियाच्या मते, टाटा आणि हिंदुस्थान युनिलिव्हरनंतर वाघ बकरी ही भारतातील तिसरी सर्वात मोठी पॅकेज (बंद पाकिटातून चहा पावडर विकणारी) चहा कंपनी आहे.
वाघ बकरी चहा कंपनीचा पाया कसा घातला गेला आणि त्यात ते कसे कार्यरत झाले याविषयी माहिती घेतल्यास कळतं की, पराग देसाई यांचे आजोबा गांधीजींच्या पावलावर पाऊल ठेवून आफ्रिकेतील चहाची बाग सोडून अहमदाबादला आले. त्यानंतर त्यांनी अहमदाबादच्या कोट भागात चहाचं दुकान उघडलं.

फोटो स्रोत, Facebook
वेस्टर्न इंडिया टी डीलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक रेलिया यांनी बीबीसीशी संवाद साधताना सांगितलं की, 80 च्या दशकापर्यंत अहमदाबाद आणि आसपासच्या गावांपुरता मर्यादित असलेला वाघ बकरी चहा आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा पोहोचला.
"पराग देसाई यांनी सर्वप्रथम 1990 च्या दशकात ई-प्लॅटफॉर्मवर चहाची विक्री सुरू केली आणि 1992 मध्ये वाघ बकरी चहाची निर्यात करायला सुरुवात केली," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
"त्यानंतर काही काळाने देशभरात कॉफी हाऊसच्या साखळ्या सुरू झाल्या आणि तेव्हा चहाला प्रतिष्ठेचा दर्जा नव्हता. चहासाठी ही एक निर्णायक वेळ होती."
"चहा टपरीवरच प्यायचा असतो असा समज लोकांमध्ये होता. तरुणांमध्ये कॉफी पिण्याचं प्रमाण वाढत होतं. यावेळी पराग देसाई यांनी आपल्या वडिलांच्या व्यवसायात नावीन्य आणण्याचं ठरवलं आणि त्यावर संशोधन करून टी लाउंज सुरू केले."
"कॉफी हाऊसमध्ये केल्या जाणा-या आदरातिथ्यासोबतच तरुणांच्या आवडीप्रमाणे चहासोबत अल्पोपाहारही द्यायचं त्यांनी ठरवलं."
"सर्वप्रथम जयपूरमध्ये आणि नंतर मुंबईत त्यांनी ही टी लाउंज सुरू केली. वाघ बकरी टी लाउंजला जयपूरमध्ये यश मिळालं नाही, पण मुंबईत ते यशस्वी ठरलं."
"वाघ बकरींने त्यानंतर आइस टी, ग्रीन टी, व्हॅनिला टी, चॉकलेट टी अशा वेगवेगळ्या फ्लेवर्सची सुरुवात केली, जी यशस्वी ठरली आणि देशातील 17 राज्यांमध्ये आणि परदेशात 14 देशांमध्ये टी लाउंज उघडली. आणि 100 कोटींची उलाढाल असलेल्या कंपनीची उलाढाल 2000 कोटींपर्यंत पोहोचली."
भारतावर प्रेम
पराग देसाई यांचे मित्र आणि कच्छ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजेश भट्ट यांनी बीबीसीला सांगितलं, "पराग देसाई यांनी अमेरिकेत मार्केटिंगचा एमबीए कोर्स केल्यानंतर त्यांच्यासोबत शिकलेले त्यांचे मित्र परदेशात स्थायिक झाले, पण पराग देसाई भारतात परतले."
"वडिलांच्या व्यवसायात ते सामिल झाले खरं पण भारतावरील प्रेमामुळे ते भारतात आले होते आणि त्यांच्या लक्षात आलं की वाघ बकरी चहाचा ग्राहकवर्ग श्रीमंत वर्ग, मध्यमवर्गीय, अल्प उत्पन्न वर्ग आणि चहाची टपरी देखील आहे. वाघ बकरी चहा चहाच्या टपरीवरही विकला जातो. .."

फोटो स्रोत, Waghbakritea
"वाघ बकरी चहा खरंतर समाजातील सर्व घटक पित होते. मार्केटिंग तज्ज्ञ पराग देसाई यांनी त्यांच्या वडिलांकडून व्यवसायाचे काही नियम शिकून घेतले. किरकोळमध्ये चहा विकण्यापूर्वी त्यांचे अहमदाबादच्या कोट भागात एक दुकान होतं."
"पण 1980 च्या दशकात अहमदाबादमध्ये जातीय हिंसाचार झाला तेव्हा त्यांच्या वडिलांनी बंद पाकिटांमध्ये चहा विकायला सुरुवात केली आणि त्यात ते यशस्वी झाले."
"त्यानंतर चहाची निर्यातही करू लागले. वडिलांच्या व्यवसायात गुंतलेल्या पराग देसाई यांनी 1990 च्या दशकात चहाचं ई-मार्केटिंग सुरू केलं. त्यानंतर त्यांनी टी लाऊंज सुरू केले आणि ते देश आणि जगभरात पोहोचले."
मित्र आणि कुटुंबीय काय म्हणतात?
अहमदाबादच्या थलतेज स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या व्यावसायिकांपैकी एक व्यापारी केतन पटेल यांनी बीबीसीला सांगितले की, "ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते, तेव्हा भटके कुत्रे त्यांच्या मागे लागले आणि ते पडले आणि ब्रेन हॅमरेज झाला. त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू. झाला."
भोपाळमध्ये राहणारे आणि पराग देसाईचे मित्र असलेल्या मनोज शाहांच्या म्हणण्यानुसार, "त्या दिवशी सकाळी फिरत असताना, ते कोणाशी तरी फोनवर बोलत होते आणि अचानक त्यांना दोन कुत्रे भांडताना दिसले, त्यामुळे ते धावत सुटले आणि पडले. त्यांच्या मेंदूला दुखापत झाली.

फोटो स्रोत, facebook
पराग देसाई हे वाघ बकरी ग्रुपचे एमडी रेशेश देसाई यांचे सुपुत्र होते. पराग यांच्या मागे पत्नी विदिशा आणि मुलगी परिषा असा परिवार आहे
बीबीसीने पराग देसाई यांच्या पत्नी विदिशा देसाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्या बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या आणि त्यांचे वडील रेशेश देसाई देखील संवाद साधण्याच्या स्थितीत नव्हते.
पराग देसाई यांचे मित्र आणि त्यांनी आठवडाभरापूर्वी ज्यांच्यासोबत जेवण केलं होतं, ते झाडूस हॉस्पिटलचे उपाध्यक्ष व्ही.एन. शाह बीबीसीशी बोलताना म्हणाले, “त्यांना ब्रेन हॅमरेज झाला तेव्हा त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना आमच्या रुग्णालयात आणण्यात आलं. त्यांच्यावर तात्काळ सर्व आवश्यक उपचार करण्यात आले पण रविवारी रात्री पराग देसाई यांचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला.
गांधीवादी नारनदास देसाई यांनी पायाभरणी केली
एक समर्पित गांधीवादी नारनदास देसाई यांनी वाघ बकरी ग्रुपची स्थापना केली. 1892 साली त्यांनी चहाच्या व्यापारात प्रवेश केला.
नारनदास देसाई हे हाडाचे उद्योजक होते आणि त्यांनी दक्षिण आफ्रिकेत चहाच्या मळ्यापासून सुरुवात केली. चहाच्या बागेची देखभाल करण्यापासून ते प्रक्रिया आणि चहा तयार करण्यापर्यंत त्यांनी मनापासून काम केलं. मात्र दक्षिण आफ्रिकेतील वांशिक भेदभावामुळे त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
फक्त काही सामान आणि दक्षिण आफ्रिकेतील सर्वात प्रामाणिक आणि अनुभवी चहाचे मळे मालक असल्याचे प्रमाणपत्र घेऊन ते रिकाम्या हाताने भारतात आले. हे प्रमाणपत्र त्यांना महात्मा गांधींनी दिलं होतं.
गांधी भारतात आल्यावर त्यांनी देसाईंचा सन्मान केला. 1915 मध्ये त्यांनी गुजरात टी डेपो सुरू केला आणि अहमदाबादमध्ये चहाचं दुकान उघडलं. गांधीजींच्या पावलावर पाऊल ठेवत देसाई त्यांनी कंपनीच्या माध्यमातून सामाyeजिक समतेचा संदेश देण्याचा निर्णय घेतला आणि चहाच्या लोगोमध्ये उच्च आणि खालच्या वर्गाच्या समानतेचे प्रतीक म्हणून एकाच कपमधून वाघ आणि बकरी एकाच कपातून चहा पिताना दाखवले.
नारनदास देसाई यांना तीन मुलं झाली. रामदास देसाई, ओच्छालाल देसाई आणि कांतीलाल देसाई या तीन मुलांनी वडिलांच्या व्यवसायात सामील होण्याचा निर्णय घेतला.
1980 पर्यंत देसाई कुटुंबाने गुजरात चहा डेपोच्या माध्यमातून चहाची घाऊक विक्री करणं तसंच चहाच्या किरकोळ विक्रिसाठी सात दुकानं चालवली.

फोटो स्रोत, Getty Images
कंपनीच्या वेबसाइटनुसार, देसाई कुटुंबाच्या कंपनीने 1980 मध्ये प्रथम चहा पॅकेजिंगची गरज ओळखली आणि गुजरात टी प्रोसेसर्स आणि पॅकेजर्सची स्थापना केली.
कंपनीने चहा लिलाव केंद्रांवरील खरेदीवर लक्ष ठेवण्यासाठी कोलकाता येथे कार्यालय उघडलं. 2006 मध्ये वाघबकरी चहाचे कॉर्पोरेट कार्यालय सुरू केले.
दक्षिण आफ्रिकेत मूळ असलेला चहाचा व्यवसाय आज भारतातील आघाडीच्या पॅकेज चहा कंपन्यांपैकी एक असून त्याची उलाढाल दोन हजार कोटींहून अधिक आहे.
वाघ बकरी कंपनीचे चहाचे वितरण पाच कोटी किलो आहे. सध्या ते 24 राज्यांमध्ये व्यापार करतात आणि 60 हून अधिक देशांमध्ये चहाची निर्यात देखील करतात.
2017 मध्ये वाघ बकरी यांना कौटुंबिक व्यवसाय पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे एका समारंभात त्यांचा सन्मान करण्यात आला.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार त्यावेळी त्यांनी अहमदाबादसह भारतभर टी लाउंज सुरू करण्याची घोषणा केली.
राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, हैदराबाद, छत्तीसगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि गोवा, तसेच गुजरातसह पंजाब आणि कर्नाटकमध्ये वाघ बकरी चहाची विस्तृत बाजारपेठ आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








