रॅकूनचा दारूच्या दुकानात 'राडा'; रात्रभर तर्रर्र होऊन केली बाटल्यांची नासधूस

रॅकून (लांब शेपूट आणि दाट केस असलेला हा मांसाहारी सस्तन प्राणी आहे. हा उत्तर अमेरिकेत आढळून येतो)
फोटो कॅप्शन, अमेरिकेतील व्हर्जिनियात रॅकून या प्राण्याने चक्क दारूच्या दुकानात घुसून इतकी दारू प्यायली की तो अनेक तास मद्यधुंद अवस्थेत पडून होता.
    • Author, इम्मा रॉसिटर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

आपण अनेकवेळा चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दुकान फोडून चोरी केल्याच्या बातम्या वाचत असतो. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे चोरीच्या घटना या घडत असतात.

बहुतांशवेळा चोरटे दुकान फोडल्यावर पैशांबरोबर त्या दुकानीतील वस्तूंवर डल्लाही मारतात. मग ते मोबाइलचं दुकान असो स्टेशनरी दुकान असो किंवा मेडिकल.

पैसे घेऊन जाताना हे चोरटे त्या दुकानातील त्यांना लागणाऱ्या वस्तूही घेऊन जातात. हॉटेलमध्ये चोरी करून त्या हॉटेलच्या पदार्थांवर ताव मारणाऱ्या चोरट्यांबद्दलही आपण ऐकलेलं आहे.

पण हे झालं मनुष्य प्राणी म्हणजे माणूस असलेल्या चोरट्यांबाबत. पण तुम्ही कधी एखाद्या प्राण्यानं किंवा जनावरानं दुकान फोडून तिथल्या मालावर किंवा पदार्थांवर डल्ला मारल्याचं वाचलंय का?

फार तर फार, बेकरी किंवा किराणा दुकानात जाऊन उंदरांनी घातलेला उच्छाद तुम्हाला माहीत असेल. पण एखाद्या प्राण्याने दुकानात घुसून भरपूर दारू प्यायली हे कधी ऐकलंय का?

होय, असं झालं आहे. एक प्राणी रात्रीतून स्टोअरमध्ये घुसला आणि त्याने त्या स्टोअरमधील वस्तूंवर डल्ला मारला. तो इतका 'ओव्हरलोड' झाला की, अधिकाऱ्यांना तो शुद्धीवर येण्याची वाट पाहावी लागली.

ही घटना घडली आहे अमेरिकेतील व्हर्जिनियात. रॅकून (लांब शेपूट आणि दाट केस असलेला हा मांसाहारी सस्तन प्राणी आहे. हा उत्तर अमेरिकेत आढळून येतो ) या प्राण्याने चक्क दारूच्या दुकानात घुसून इतकी दारू प्यायली की तो अनेक तास मद्यधुंद अवस्थेत पडून होता.

'दुकानात अक्षरशः धुडगूस, सगळीकडे दारूच दारू'

व्हर्जिनियातील एका दारूच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडलं. दुकानाचं शटर वर केल्यानंतर कर्मचाऱ्यांना मोठा धक्काच बसला. कारण त्या दुकानात चक्क एक रॅकून दारूच्या नशेत 'टल्ली' होऊन पडला होता. ही घटना शनिवारी (29 नोव्हेंबर) सकाळी उघडकीस आली.

आदल्या दिवशी रात्री हा रॅकून या दारूच्या दुकानात कुठूनतरी घुसला. रात्री त्याने दुकानात अक्षरशः धुडगूस घातल्याचे त्या दुकानातील परिस्थितीवरून लक्षात आलं.

जमिनीवर दारूच्या फुटलेल्या बाटल्या आणि सगळीकडे पसरलेली दारू
फोटो कॅप्शन, कर्मचारी जेव्हा दुकानात आले, त्यावेळी त्यांना जमिनीवर दारूच्या फुटलेल्या बाटल्या आणि सगळीकडे पसरलेली दारू दिसली. त्यात स्कॉचचाही समावेश होता.

रॅकूनने त्या दुकानातील 'स्पिरिट' सेक्शनमध्ये प्रवेश केला आणि दारूच्या बाटल्या ठेवलेल्या शेल्फवर चढला. यात मद्याच्या अनेक बाटल्या खाली पडल्या.

या पडलेल्या बाटलीतील दारूचा आस्वादही त्याने घेतल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं आहे.

हा 'चोर' या दुकानाच्या बाथरूममध्ये टॉयलेट आणि कचरापेटीच्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याने इतकी दारू पिली होती की त्याला जागेवरून हलताही येत नव्हतं.

प्राणी नियंत्रण अधिकारी (ॲनिमल कंट्रोल ऑफिसर) सामंथा मार्टिन यांनी या 'संशयिताला' हॅनोव्हर काउंटी प्राणी संरक्षण केंद्रात चौकशीसाठी नेलं. पण त्याला पूर्ण शुद्धीवर येण्यासाठी त्यांना थोडा वेळ द्यावा लागला.

'तो' शुद्धीवर येण्याची वाट पाहावी लागली

रॅकूनने एका लिकर स्टोअरमध्ये अक्षरशः धुडगूस घातला
फोटो कॅप्शन, रॅकूनने एका लिकर स्टोअरमध्ये अक्षरशः धुडगूस घातला

हँगओव्हरमधून बाहेर येण्यासाठी त्याने काही तासांची झोप घेतली. कोणतीही दुखापत झाली नसल्याची खात्री झाल्यानंतर (फक्त थोडी 'हँगओव्हर'ची लक्षणं दिसत होती), त्याला सुरक्षितपणे परत जंगलात सोडून देण्यात आलं.

थँक्सगिव्हिंगमुळे ॲशलँड एबीसी हे दारूचं दुकान बंद होतं. त्याच काळात म्हणजे 'ब्लॅक फ्रायडे'ला दुकानात ही जगावेगळी चोरी झाली.

शनिवारी नेहमीप्रमाणे कर्मचारी जेव्हा दुकानात आले, त्यावेळी त्यांना जमिनीवर दारूच्या फुटलेल्या बाटल्या आणि सगळीकडे पसरलेली दारू दिसली. त्यात स्कॉचचाही समावेश होता.

'तो खाली पडला आणि त्यानं गोंधळ घातला'

अधिकारी मार्टिन यांनी सांगितलं की, रॅकून छताच्या एका टाइलवरून खाली पडला आणि मग त्याने 'आक्रमकपणे हल्ला' करत त्याला जे दिसेल ते सगळं तो पिऊ लागला.

या 'दारू चोरी'चा फक्त एक अस्पष्ट सीसीटीव्ही फोटो उपलब्ध आहे. त्यामुळे बाथरूममध्ये बेशुद्ध होण्यापूर्वी त्या रॅकूनने नेमकी किती दारू प्यायली, हे समजू शकलेलं नाही.

प्राणी नियंत्रण अधिकारी (ॲनिमल कंट्रोल ऑफिसर) सामंथा मार्टिन
फोटो कॅप्शन, प्राणी नियंत्रण अधिकारी (ॲनिमल कंट्रोल ऑफिसर) सामंथा मार्टिन

ॲशलँड एबीसी स्टोअरने सोशल मीडियावर पोस्ट करत हॅनोव्हर काउंटी प्राणी संरक्षण केंद्राचे आभार मानले. त्यांनी व्यावसायिक पद्धतीने बजावलेल्या कामगिरीबद्दल आणि या 'अनाहूत पाहुण्याला' सुरक्षितपणे शुद्धीत पुन्हा जंगलात सोडल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

"प्राणी नियंत्रण अधिकाऱ्याच्या आयुष्यातील हा आणखी एक नेहमीसारखा दिवस होता," असं अधिकारी मार्टिन यांनी या घटनेवर भाष्य केलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.