संगीत ऐकून प्राण्यांचाही ताण कमी होतो का? विज्ञान काय सांगतं? वाचा

फोटो स्रोत, Serenity Strull
- Author, ॲली हिर्शलॅग
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कुत्रे आणि मांजरांसाठी संगीताच्या स्वतंत्र आणि वेगवेगळ्या प्लेलिस्ट...
ऐकून जरा आश्चर्य वाटतंय ना? अशा संगीताच्या प्लेलिस्ट तुम्हाला ऑनलाइन मिळू शकतात.
मात्र संगीत ऐकल्यामुळे प्राणी खरोखरंच शांत होतात का? त्यांना छान वाटतं का?
सेरेनिटी स्ट्रल बीबीसीमध्ये फोटो एडिटर आहेत. त्यांच्या कुत्र्याचं नाव मार्गोट आहे.
त्यांनी जेव्हा मार्गोटला पाहिलं तेव्हा त्यांच्या लगेच लक्षात आलं की, पिटबुल जातीची ही तीन वर्षांची कुत्री नैराश्यग्रस्त वाटली.
"कुत्र्यांसाठीच्या शेल्टरनं ती लाजाळू आणि मुलांशी चांगलं वागणारी, मात्र इतर कुत्र्यांची तिला भीती वाटायची, त्यांच्यासोबतचं तिचं वर्तन अनिश्चित होतं," असं स्ट्रल म्हणतात.
मार्गोटला प्रोझॅक हे अँटी डिप्रेसन्ट औषध देण्यात येत होतं. त्यामुळे तिला झटके येत होते. त्यामुळे त्यांनी तिला हे औषध देणं थांबवण्याचा निर्णय घेतला.
मार्गोटला घरी आणल्यानंतर स्ट्रल यांना लवकरच कळालं की, त्यांच्या या कुत्र्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे एकटं राहणं.
मग त्यांनी वेगवेगळे ट्रेनर आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला. तिला शांत करण्याच्या अनेक पद्धती वापरून पाहिल्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
शेवटी एक गोष्ट यशस्वी झाली. ती म्हणजे मार्गोटला शास्त्रीय संगीत किंवा तालवाद्यांचा तीव्रतेनं वापर न झालेले वाद्यसंगीत ऐकवणं.
कुत्र्यांवरील संगीताच्या परिणामांचा अभ्यास
मार्गोटच्या एक प्रशिक्षकानं 'थ्रू अ डॉग्स इअर' या पियानोवरील संगीत रचनांची शिफारस त्यांना केली. यातलं संगीत शांत होतं.
कुत्र्यांमधला ताण कमी करण्यासाठीच या संगीताची रचना करण्यात आलेली आहे. ते जोशुआ लीड्स आणि सुसान वॅग्नर यांनी तयार केलं आहे.
जोशुआ सायकोअकॉस्टिक तज्ज्ञ आहेत (लोक आवाज कशाप्रकारे ऐकतात आणि त्याचा त्यांच्यावर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास ते करतात.) सुसान व्हेटर्नरी न्यूरोलॉजिस्ट आहेत. त्यांनी या संगीताचा कुत्र्यांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे.
हा अभ्यास करताना, त्यांनी वेगवेगळी घरं आणि कुत्र्यांसाठी असलेल्या छोट्या आश्रयस्थानांमधील (केनेल) 150 हून अधिक कुत्र्यांचं निरीक्षण केलं.

फोटो स्रोत, Madeleine Jett
त्यांना आढळलं की केनेलमध्ये राहणारे 70 टक्क्यांहून अधिक कुत्रे आणि घरांमध्ये राहणाऱ्या 80 टक्के कुत्र्यांमध्ये पियानोवरचं हे संगीत ऐकल्यानंतर त्यांच्यामधील चिंतेची लक्षणं कमी झालेली होती.
यात एकाच ठिकाणी फेऱ्या मारणं, थरथरणं आणि जोरजोरात धडधडणं यासारख्या लक्षणांचा समावेश होता.
स्ट्रल यांना त्यांच्या सीसीटीव्हीमध्ये या संगीताचा मार्गोटवर होणारा परिणाम लगेचच दिसला.
त्या म्हणतात की, त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांकडून मेसेज यायचे. यात मार्गोट एकटी असताना भुंकत असल्याची तक्रार केलेली असायची.
मात्र आता मालक घरातून बाहेर गेल्यानंतर फेऱ्या मारण्याऐवजी आणि भुंकण्याऐवजी, मार्गोट ब्राहम्स किंवा बीथोव्हेन यांचं संगीत ऐकत शांतपणे झोपते.
"काही वेळा असं घडलं आहे की मी पहाटे 4 वाजेपर्यंत घरी परतलेले नव्हते आणि ती झोपलेली असते," असं स्ट्रल म्हणतात.
वेगवेगळ्या आवाजांचे कुत्र्यांवरील प्रयोग
इतर अभ्यासांमधूनही असेच निष्कर्ष समोर आले आहेत. असाच एक अभ्यास क्विन्स युनिव्हर्सिटी बेलफास्टमध्ये करण्यात आला. त्यात केनेलमध्ये राहणारे कुत्रे आणि घरांमध्ये राहणारे कुत्रे यांच्यावर तीन प्रकारच्या आवाजाच्या परिणामांचं निरीक्षण करण्यात आलं.
हे तीन प्रकारचे आवाज म्हणजे, शास्त्रीय संगीत, ऑडिओबुक्स आणि शांतता.
कुत्र्यांच्या वर्तनात झालेल्या बदलांचं बारकाईनं निरीक्षण केल्यानंतर संशोधकांनी निष्कर्ष काढला की, 'अतिशय तणावाच्या स्थितीत' शास्त्रीय संगीत ऐकल्यावर कुत्रे शांत होतात.
कुत्र्यांसाठी तणावाची स्थिती काय असू शकते तर पशुवैद्यकीय डॉक्टरकडे जाणं किंवा कारमधून लांबवर फिरायला जाणं.
अर्थात, शास्त्रीय संगीताच्या सर्वच शैलींचा तितकाच परिणाम होत नाही.

फोटो स्रोत, Madeleine Jett
शांत किंवा मंद गतीमध्ये (50-60 बीट्स प्रति मिनिट किंवा त्याहून कमी) असणाऱ्या साध्या संगीत रचना ज्यात आघात करून आवाज काढणाऱ्या तालवाद्यांचा फार कमी किंवा अजिबात वापर केलेला नसतो, त्या कुत्र्यांसाठी सर्वोत्तम असतात.
या संगीत रचनांमुळे कुत्र्यांमधील कॉर्टिसोलची पातळी (तणावाशी संबंधित हार्मोन) कमी झाल्याचं दिसून आलं. मात्र असं का होतं, यामागच्या कारणाचं अद्याप व्यवस्थित आकलन झालेलं नाही.
"सर्वात योग्य स्पष्टीकरण असं आहे की या संगीतात मुळातच काहीतरी शांत करणारा गुण आहे. कदाचित हे संगीत ऐकल्यानंतर सुखद किंवा मनाला आनंददायी वाटणारी स्थिती निर्माण करणारी रसायन स्त्रवत असावीत," असं डेबोरा वेल्स म्हणतात. त्या या अभ्यासाच्या सह-लेखिका आहेत आणि क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्टमध्ये प्राण्यांच्या वर्तनाच्या संशोधक आहेत.
प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांवर शास्त्रीय संगीताचा सकारात्मक परिणाम
डेबोरा वेल्स यांनी, शास्त्रीय संगीताचा प्राण्यांच्या विविध प्रजातींवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे. यात प्राणीसंग्रहालयातील हत्ती आणि गोरिलासारख्या प्राण्यांचा समावेश आहे.
"प्राणीसंग्रहालयातील हत्ती आणि गोरिला यांच्यावर या संगीताचे चांगले परिणाम दिसून आले. हे संगीत ऐकल्यानंतर त्यांच्या सातत्यानं अकारण होणाऱ्या हालचाली, आक्रमकपणा कमी झाला," असं डेबोरा वेल्स म्हणतात.
प्राण्यांवर झालेल्या इतर चांगल्या परिणामांमध्ये व्यवस्थित आहार घेणं, चांगली झोप घेणं, मजबूत रोगप्रतिकारक शक्ती आणि प्रजनन क्षमतेत सुधारणा होणं या गोष्टींचा समावेश असू शकतो.
प्राणी आणि माणसांची ऐकण्याची क्षमता नैसर्गिकरित्याच वेगवेगळी असते.
माणसांपेक्षा कुत्र्यांची श्रवणशक्ती जवळपास तिप्पट (65,000 हर्ट्झपर्यंतची फ्रिक्वेन्सी) असते. त्यामुळे ते मानवी कानापेक्षा अधिक फ्रिक्वेन्सीचे आणि खूप दूरवरचे आवाज ऐकू शकतात.
मांजरांना तर त्याहूनही अधिक फ्रिक्वेन्सीचे (79,000 हर्ट्सपर्यंत) आवाज ऐकू येतात.
त्यामुळे रस्त्यावरील दूरवरचा गाडीचा हॉर्न किंवा टिन फॉईल चुरगळल्याच्या बारीकसा आवाजदेखील त्यांना लपण्यासाठी पळायला भाग पाडू शकतो.
मांजरांवर संगीताचा परिणाम
मांजरींवर संगीताचा काय परिणाम होतो, यासंदर्भात फार कमी अभ्यास झाला आहे. मात्र एक अभ्यासात संगीत आणि मांजरांच्या वर्तनातला संबंध दिसून आला.
12 मांजरींची नसबंदी करण्यासाठी त्यांना औषध दिलेलं असताना संशोधकांनी त्यांना हेडफोन लावले आणि सलग तीन प्रकारचे आवाज वाजवले. ते म्हणजे नताली इम्ब्रुग्लिया यांचा टॉर्न, बार्बर यांचा अडागियो फॉर स्ट्रिंग्स आणि एसी/डीसीचा थंडरस्ट्रक.
शास्त्रीय संगीतामुळे मांजरींचा श्वासोच्छवास मंद झाला, ह्रदयाच्या ठोक्यांची गती कमी झाली आणि डोळ्याच्या बाहुलीचा सर्वाधिक विस्तार झाला (या तिन्ही गोष्टी शांत होण्याचे निदर्शक आहेत).
शास्त्रीय संगीत हा संगीताचा एकमेव प्रकार नाही, ज्यामुळे पाळीव प्राणी शांत होऊ शकतात.
शांत लय असलेलं सॉफ्ट रॉक संगीत, मंद गतीतील संगीत आणि जोरदार तालवाद्य नसलेले संगीत यामुळेही शेल्टरमधील कुत्रे शांत झाल्याचं दिसून आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आणखी एका अभ्यासात हॉस्पिटलमधील 35 मांजरांचं निरीक्षण करण्यात आलं. त्यातून आढळलं की वेगवेगळ्या वाद्यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या संगीतानेदेखील (सिंफनी) मांजरांचा श्वासोच्छवास मंद झाला. त्या शांत झाल्या.
ऑडिओबुक्समुळे देखील पाळीव प्राणी शांत होऊ शकतात असं वाटतं. विशेषकरून शांत आवाजात केल्या जाणाऱ्या कथनामुळे ते शांत होऊ शकतात. मात्र प्रत्यक्षात हा सिद्धांत शास्त्रीय कसोटीवर टिकत नाही.
कुत्र्यांवर ऑडिओबुक्सचा तितकासा परिणाम नाही
2022 मध्ये वेल्स एका अभ्यासाचे सह-लेखक होते. यात 60 कुत्र्यांनी शास्त्रीय संगीत किंवा ऑडिओबुक्सवर दिलेल्या प्रतिक्रियांचं निरीक्षण करण्यात आलं. त्यावेळेस त्यांचे मालक तिथे उपस्थित नव्हते.
त्यातून असं आढळून आलं की, ऑडिओबुक्समुळे ते फारसे शांत झाले नव्हते. संगीत ऐकताना ते जसे बसतात किंवा झोपलेले असतात तसं असण्याऐवजी त्यातील बहुतांश जण ऑडिओबुकचं रेकॉर्डिंग ऐकवणाऱ्या स्पीकरकडे फक्त पाहत होते.
अनेक अभ्यासांमधून शास्त्रीय संगीतामुळे पाळीव प्राणी शांत होत असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. मात्र तरीदेखील त्याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक कुत्रा, मांजर किंवा हत्तीच्या बाबतीत ही गोष्ट लागू होईलच.
हे अभ्यास बहुतांशपणे छोट्या प्रमाणात आणि कमी कालावधीसाठी करण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं शेल्टर किंवा हॉस्पिटलमधील वातावरणावर लक्ष केंद्रित केलेलं होतं. या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असतं.
या संशोधनांमधील आणखी एक समस्या म्हणजे शास्त्रीय आणि वाद्य संगीतामधील उपश्रेणींची संख्या. तसंच या वाद्यांच्या भिन्नतेमुळे संगीताद्वारे साधल्या जाणाऱ्या परिणामावर होणारा लक्षणीय परिणाम.
पेट अकॉस्टिक कॅटलॉग
जेनेट मार्लो या साऊंड बिहेरवरिस्ट (आवाजाला माणूस किंवा प्राणी कसे प्रतिसाद देतात यावर काम करणारे) आणि संगीतकार आहेत.
त्यांना हा मुद्दा त्यांच्या स्वत:च्या पाळीव प्राण्यांच्या बाबतीत दिसून आला. मग त्यांनी त्या प्राण्यांना शांत करण्यासाठी संगीत तयार करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी इतरही अनेक प्राण्यांसाठी संगीत तयार केलं.
"कुत्रे, मांजरी, घोडे आणि इतर प्राण्यांच्या श्रवण क्षमतेनुसार खास त्यांच्यासाठी मी संगीत तयार करायला आणि त्याची चाचणी करायला सुरूवात केली," असं त्या म्हणतात.
प्राण्यांच्या गरजेनुरूप संगीत तयार केल्यामुळे त्यांना 'विचलित करणाऱ्या फ्रिक्वेन्सी काढून टाकता आल्या. तसंच संगीताची एकंदरीत लय आणि गती जुळवून घेता आली. जेणेकरून तो आवाज आरामदायी, सुखकारक, श्रवणीय वाटेल."
शेवटी, त्यांनी 'पेट अकॉस्टिक' नावाचा एक कॅटलॉग तयार केला. तो विविध शैलीच्या संगीताच्या मिश्रणातून तयार करण्यात आला होता. या कॅटलॉगला त्याच क्षेत्रातील इतर तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासांचं समर्थन आहे.
तुम्ही 'थ्रू अ डॉग्स इअर' वापरा, मार्लोच्या संगीत रचना वापरा किंवा वैयक्तकरित्या तयार केलेलं शास्त्रीय संगीताचं मिश्रण वापरून पाहा.
तुमच्या पाळीव प्राण्यासाठी कोणत्या प्रकारचं संगीत योग्य ठरतं हे तुम्हाला चाचण्या करून किंवा त्याचा वापर करूनच समजेल. मात्र मार्गोटच्या अनुभवातून जर काही निष्कर्ष निघत असेल तर शांत, योग्य आवाजामुळे सर्वकाही बदलू शकतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











