गर्भनिरोधक गोळ्यांमुळे महिलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का? संशोधन काय सांगतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सॅंडी ओंग
- Role, बीबीसी न्यूज
गर्भनिरोधक गोळ्या म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल घेणाऱ्या अनेक महिलांना या गोष्टीची शंका असते की या गोळ्या घेतल्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम तर होणार नाही ना.
खरोखरंच या फक्त शंका आहेत की गोळ्यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे पुरावे देखील आहेत?
अनेक तरुणी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात. त्यांच्याप्रमाणे सारा ई हिल या तरुणीनं देखील वयाच्या 18 ते 30 वर्षांपर्यंत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या. हिल आता टेक्सास ख्रिश्चन युनिव्हर्सिटीमध्ये उत्क्रांतीवादी मानसशास्त्र शिकवतात. त्या म्हणाल्या, "मी याबद्दल पुन्हा कधीही विचार केला नाही."
टेक्सास ख्रिश्चन युनिव्हर्सिटी ही अमेरिकेतील ख्रिश्चन चर्चशी (डिसिपल्स आणि क्राइस्ट) जोडलेली एक संस्था आहे.
गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सुरुवात केल्यानंतर 12 वर्षांनी त्यांनी जेव्हा गर्भनिरोधक उपाय बदलण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना या गोष्टीची जाणीव झाली.
गर्भनिरोधक गोळ्या घेण्याच्या अनुभवांमुळे त्यांना त्याच्याशी निगडीत विज्ञानाचा अभ्यास करण्याची तसंच 2019 मध्ये 'हाऊ द पिल चेंजेस एव्हरिथिंग' हे पुस्तक प्रकाशित करण्याची प्रेरणा मिळाली.
अनेक महिलांना गर्भनिरोधक गोळ्यांच्या दुष्परिणामांची चिंता असते. विशेषकरून गर्भनिरोधक गोळ्यांचा त्यांच्या मूडवर म्हणजे मन:स्थितीवर आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो याची चिंता वाटत असते.


गर्भनिरोधक गोळ्यांचा घटता वापर
गर्भनिरोधक गोळ्यांवरील नकारात्मक प्रतिक्रिया वाढत आहेत. सोशल मीडियावर हा मुद्दा अधिक स्पष्टपणे समोर येतो आहे. 'क्विटिंग बर्थ कंट्रोल' या हॅशटॅगला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
असं मानलं जातं की, गर्भनिरोधक गोळ्या आता तितक्या लोकप्रिय राहिलेल्या नाहीत असं एका मर्यादेपर्यंत यातून लक्षात येतं.
अनेक विकसित देशांमध्ये डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शनवर गर्भनिरोधक गोळ्या देण्याचं प्रमाण कमी होतं आहे.
इंग्लंडच्या लैंगिक आणि प्रजनन आरोग्य सेवांनुसार तिथे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल म्हणजे गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापराचं प्रमाण 2020-2021 मध्ये 39 टक्के होतं. त्यात घट होत 2021-2022 मध्ये ते 27 टक्क्यांवर आलं आहे.
तर अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करणाऱ्यांची संख्या 2002 मध्ये 31 टक्के होती. त्यात घट होत, 2017 ते 2019 च्या दरम्यान ती 24 टक्क्यांवर आली.

फोटो स्रोत, Getty Images
कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये सुद्धा गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर अनुक्रमे 2006-2016 आणि 2008-2016 मध्ये 23 टक्के होता. तो घटून 11 टक्क्यांवर आला आहे.
गर्भनिरोधक गोळ्यांशी निगडीत रास्त चिंतांवर चर्चा करण्याऐवजी सोशल मीडियावर काही लोक या गोळ्यांच्या मानसिक आणि शारीरिक दुष्परिणामांबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत.
इतकंच नाही तर महिलांनी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करू नये यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. वास्तविक या लोकांना वैद्यकीय क्षेत्राची पार्श्वभूमी नसते.
काही तज्ज्ञांना वाटतं की, ब्रिटनमध्ये अलीकडच्या काळात गर्भपाताच्या प्रमाणात झालेल्या वाढीमागे या प्रकारची प्रवृत्ती हे एक कारण असू शकतं.
गर्भनिरोधक गोळ्यांबाबतचे प्रश्न
गर्भनिरोधक गोळ्यांमुळे खरोखरंच एखाद्याच्या व्यक्तिमत्वात आणि त्या व्यक्तीच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल होऊ शकतो का? या गोळ्यांमुळे चिंता आणि नैराश्यासारख्या मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्यांचा धोका वाढतो का? या गोळ्या आत्महत्येचं कारण ठरू शकतात का?
असं दिसतं की या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं नाहीत.
1960 मध्ये अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर सुरू झाला. त्यानंतर दोन वर्षांमध्येच या गोळ्यांचा वापर करण्यांची संख्या 12 लाखांवर पोहोचली होती.
पिवळ्या रंगाच्या या छोट्या गोळ्यांकडे महिलांनी महिला सबलीकरणाचं प्रतिक म्हणून पाहिलं आणि त्याचं कौतुक केलं.
यामुळे नको असताना गर्भधारणा झाल्यास, करियर किंवा शिक्षणाची गाडी रुळावरून घसरण्याच्या भितीपासून महिलांना मुक्ती मिळाली.
आज, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह हा जगभरातील जवळपास 15 कोटी महिलांचा आवडता पर्याय आहे. गर्भनिरोधक पर्यायांचा वापर करणाऱ्या जगभरातील लोकांमध्ये त्याचं प्रमाण जवळपास 16 टक्के आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हच्या अपयशाचा प्रमाण फक्त 1 टक्का आहे. (त्यामध्येही 9 टक्के प्रमाण जेव्हा मानवी चुकीमुळे कधीतरी डोस चुकवला जातो त्याचं आहे)
गर्भनिरोधक गोळ्या दोन प्रकारच्या असतात. या दोन्ही प्रकारच्या गोळ्यांमुळे कृत्रिम सेक्स हार्मोनची निर्मिती होते.
पहिल्या प्रकारात सर्वात लोकप्रिय असलेली संयुक्त गोळी म्हणजे कम्बाइन्ड पिल असते. त्यात सिंथेटिक ॲस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असतात. दुसरी गोळी प्रोजेस्टोजन-ओन्ली म्हणजे 'मिनी-पिल' असते.
दोन्ही गोळ्या अनेक प्रकारे गर्भधारणा होऊ देत नाहीत. यामध्ये ओव्युलेशनचं दमन करणं आणि गर्भाशयातील ग्रीवामधील म्युकस अधिक गाढ किंवा घट्ट करणं या गोष्टींचा समावेश आहे. यामुळे शुक्राणूंचं अंड्यापर्यंत पोहोचणं कठीण होतं.
अर्थात ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हमध्ये असलेले हार्मान फक्त शरीरावरच परिणाम करत नाहीत, तर महिलांच्या मेंदूवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो.
गर्भनिरोधक गोळ्यांचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम
जोहान्स बिट्जे, स्वित्झर्लंडच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटल बेसलमध्ये प्रसूती-स्त्री रोग तज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ आहेत.
ते म्हणतात, "या हार्मोनचा मेंदूवर होणारा परिणाम गुंतागुंतीचा असतो. काहीजणांच्या बाबतीत गर्भनिरोधक गोळीचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. तर काहीजणांना या गोळीमुळे चीडचीड होते, अगदी चिंता वाटण्याची समस्या देखील उद्भवू शकते."
गर्भनिरोधक गोळ्यांच्या 65 वर्षांच्या इतिहासात त्यांच्याबद्दल वर्तवण्यात आलेले वैद्यकीय इशारे फारच कमी आहेत. युके आणि अमेरिकेत लैंगिक आरोग्याची सेवा पुरवणाऱ्या काही वेबसाईट्सवर गोळीच्या मानसिक दुष्परिणामांचा उल्लेख देखील केला जात नाही.
जोहान्स बिट्जे जवळपास 40 वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहेत.
ते म्हणतात, "मला वाटतं की सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रसूती-स्त्री रोग तज्ज्ञांच्या प्रशिक्षणात मानसिक आरोग्याचा विषयच नाही. मानसिक आरोग्य फक्त मानसोपचार तज्ज्ञांसाठी आहे."
"हळूहळू परिस्थिती बदलते आहे. मात्र आधी आम्ही जेव्हा गर्भनिरोधक गोळीवर चर्चा करायचो, तेव्हा थ्रोम्बोसिस, कर्करोग, अनियमित रक्तस्त्राव, वजन वाढणं याबद्दल बोलायचो. यामध्ये मानसिक आरोग्याचा मुद्दा बाजूला ठेवण्यात आला होता."
याव्यतिरिक्त, संशोधकांनीदेखील गर्भनिरोधक गोळीच्या मानसिक आरोग्यावरील संभाव्य दुष्परिणामांवर फारसं संशोधन केलं नाही.
मात्र बिट्जे म्हणतात की, 2016 मध्ये डेन्मार्कमधील संशोधकांच्या एका गटानं या विषयावरील एक शोधनिबंध प्रकाशित केला आणि बदलाची सुरुवात झाली. यानंतरच्या काळात या विषयावर आणखी संशोधन झालं.

फोटो स्रोत, Dempsey Ewan
मूळ डॅनिश अभ्यासात, संशोधकांनी 14 वर्षांच्या कालावधीत 15 ते 34 वर्षे या वयोगटातील 10 लाखांहून अधिक महिलांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास करण्यासाठी देशाच्या राष्ट्रीय आरोग्याचा डेटाबेस तपासला.
त्यात त्यांना आढळलं की, ज्या महिलांनी ही गोळी घेतलेली नाही, त्यांच्यापेक्षा ज्या महिलांनी ॲस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या दोघांचं कॉम्बिनेशन असणारी गोळी घेतली, त्यांना सहा महिन्यांनी अँटीडिप्रेसंट घ्यावं लागण्याची शक्यता 70 टक्के अधिक होती.
तर प्रोजेस्टोजन-ओन्ली किंवा 'मिनी-पिल' घेणाऱ्या महिलांच्या बाबतीत हा धोका 80 टक्के होता.
2023 मध्ये संशोधकांच्या वेगळ्या गटाला देखील असेच निष्कर्ष आढळले. या गटानं युके बायोबँकमधील जवळपास 2 लाख 50 हजार महिलांच्या आरोग्याशी संबंधित माहितीचं विश्लेषण केलं होतं.
अभ्यासात त्यांना आढळलं की, गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सुरुवात केल्यानंतर दोन वर्षांनी, गोळी घेणाऱ्या महिलांना नैराश्य येण्याची शक्यता कधीही गोळी न घेतलेल्या महिलांपेक्षा 71 टक्के अधिक होती.

फोटो स्रोत, Dempsey Ewan
ओजविंड लिडेगार्ड, कोपेनहेगन विद्यापीठात प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. तसंच डॅनिश संशोधकांच्या गटाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. ते म्हणतात, "या गोळ्यांचा वापर सुरू करण्यामध्ये आणि नंतर नैराश्याची लक्षणं विकसित होण्यामध्ये एक निश्चित संबंध आहे."
अर्थात हे दोन्ही अभ्यास 'कोहोर्ट अभ्यास' होते. म्हणजे यामध्ये महिलांच्या एका मोठ्या समूहाच्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं होतं. यात ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह घेणाऱ्या महिलांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची तुलना ज्या महिला अशा गोळ्या घेत नाहीत त्यांच्याशी करण्यात आली होती.
याचा अर्थ, या अभ्यासात फक्त ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह घेण्याशी मानसिक आरोग्याचा असलेला संबंध आढळून आला होता. मात्र ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह घेतल्यामुळेच मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचं त्यातून स्पष्ट झालं नव्हतं.
उदाहरणार्थ, वेगवेगळ्या महिलांमध्ये मानसिक आरोग्याची समस्या आधीपासूनच असू शकते. त्यामुळे त्याचा परिणाम अभ्यासातून मांडण्यात येणाऱ्या निष्कर्षांवर झाला असण्याची शक्यता होती.
काही अभ्यासातून समोर आले परस्परविरोधी निष्कर्ष
काही अभ्यास असेही आहेत, ज्यात मानसिक आरोग्याच्या काही समस्या आणि ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हचा वापर यांच्यात काही संबंध असल्याचं खोडून काढण्यात आलं आहे.
उदाहरणार्थ, ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी जेव्हा आधीच्या 26 अभ्यासांचं विश्लेषण केलं, तेव्हा त्यांना त्यामध्ये गर्भनिरोधक गोळीचा प्रोजेस्टोजन-ओन्ली प्रकार आणि नैराश्य यामध्ये 'नगण्य' संबंध आढळून आला.
दोन वेगवेगळ्या क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे वैद्यकीय चाचण्यांमधून संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की कम्बाइन्ड गोळीमुळे नैराश्य येत नाही किंवा मूड देखील खराब होत नाही. यातील प्रत्येक चाचणीत स्वीडनमधील 200 ते 340 महिलांचा सहभाग होता.
ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांमधून 'ब्रेक' घेणं, म्हणजे अनेक प्रकारच्या संयुक्त गर्भनिरोधक गोळ्यांच्या बाबतीत दर महिन्याला सात दिवसांचा ब्रेक घेणं आवश्यक असतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, काही अभ्यासांनुसार हा 'ब्रेक' घेतल्यामुळेच मूड खराब होऊ शकतो.

फोटो स्रोत, Dempsey Ewan
2023 मध्ये ऑस्ट्रियामधील गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या 120 महिलांवर अभ्यास करण्यात आला. या 120 महिलांपैकी काही महिला प्रदीर्घ काळापासून गर्भनिरोधक गोळ्या घेत होत्या.
या अभ्यासानुसार, गोळी घेण्यास ब्रेक घेतल्यानंतर महिलांच्या चिंतेमध्ये 7 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं. याशिवाय, या कालावधीत नकारात्मक भावनांमध्ये 13 टक्के वाढ आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांच्या लक्षणांमध्ये 24 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
बेलिंडा प्लेट्झर, साल्जबर्ग विद्यापीठात कॉग्निटिव्ह न्युरोसायंटिस्ट आहेत. त्या म्हणतात, "मानसिक आरोग्याचा विचार करता, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करणाऱ्यांना याचा सततचा वापर करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं."
बेलिंडा प्लेट्झर, युरोपियन युनियननं निधी पुरवलेल्या एका प्रकल्पाचं नेतृत्त्व करत आहेत.
त्यामध्ये महिलांच्या मेंदूवर हार्मोनल गर्भनिरोधकांच्या परिणामांचा अभ्यास केला जातो आहे.
गोळी घेतल्यानंतर काही महिलांची मानसिक स्थिती खूपच वाईट होते किंवा त्यांना तसं जाणवतं आणि या लक्षणांना गांभीर्यानं घेतलं पाहिजे, हे वास्तव प्लेट्झर नाकारत नाहीत.
त्या म्हणतात, "मात्र अशा महिलांची संख्या खूपच कमी आहे."
परस्परविरोधी निष्कर्ष निघण्यामागचं कारण काय?
हेलेना कोप्प कॅलनर स्वीडनमध्ये स्टॉकहोमजवळ डेंडरिड हॉस्पिटलमध्ये प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत.
ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत झालेल्या अभ्यासांमधून समोर आलेल्या निष्कर्षांमध्ये खूपच फरक असण्यामागचं कारण हेलेना स्पष्ट करतात.
त्या म्हणतात की, मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे अनेकदा व्यक्तिमत्वाशी निगडीत निकषांच्या आधारे पाहिलं जातं. त्यामुळे त्याचा अभ्यास करणं खूपच कठीण असतं.
याशिवाय, वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गोळ्या आहेत (उदाहरणार्थ, कम्बाइन्ड गोळीचे 30 हून अधिक ब्रॅंड आहेत). त्यांची अनेकदा तुलना केली जाऊ शकत नाही.
हेलेना पुढे म्हणतात की, वेगवेगळ्या अभ्यासांसाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात.
बिट्झर म्हणतात की, अभ्यासाच्या शेवटी संशोधकांना जे आढळतं, त्याचा देखील त्यांच्या निष्कर्षांवर परिणाम होतो.
उदाहरणार्थ, डॅनिश अभ्यासात, "डॉक्टरांनी नैराश्यावरील औषध प्रिस्क्राईब केलं होतं. मात्र तसं करण्याचा संबंध नैराश्याचं निदान झाल्याशीच असेल असं नाही. ही बाब डॉक्टरांच्या प्रॅक्टिसशी देखील संबंधित आहे. यामुळे देखील निष्कर्षांवर परिणाम होऊ शकतो."
स्वीडनच्या गोथनबर्गमधील डॉक्टर सोफिया जेटरमार्क म्हणतात की, या प्रकारच्या अभ्यासांमधून कारण आणि परिणाम यामधील संबंध सिद्ध करणं कठीण आहे. कारण इतर देखील कारणं असू शकतात.
उदाहरणार्थ अनुवांशिकता आणि व्यक्तीच्या अवतीभोवतीची परिस्थिती. या गोष्टींचा देखील परिणाम होऊ शकतो.

फोटो स्रोत, Dempsey Ewan
जेव्हा संशोधकांनी राष्ट्रीय स्वीडिश नोंदीमधील जवळपास 10 लाख महिलांच्या आरोग्यविषयक माहितीचं विश्लेषण केलं, तेव्हा त्यांना आढळलं की कमी वय असणाऱ्या आणि स्थलांतराची पार्श्वभूमी असलेल्या महिला, हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यावर मूड बदलण्याचा अनुभव येण्याबाबत अधिक संवेदनशील होत्या.
ओजविंड लिडेगार्ड यांनी स्पष्ट केलं की, त्यांच्या अभ्यासाकडे व्यापक संदर्भातून पाहिलं पाहिजे.
लिडेगार्ड म्हणतात, "हार्मोनल गर्भनिरोधकाचा वापर सुरू करणाऱ्या काही महिलांच्या मानसिक आरोग्यात गंभीर परिवर्तन होतं या कोणतीही शंका नाही."
"मात्र हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की फक्त 7 ते 8 टक्के महिलाच अशा आहेत ज्यांना मानसिक समस्या उद्भवल्यामुळे त्यांची गोळी घेणं बंद करावं लागतं... या गोळ्यांचा वापर करणाऱ्या बहुतांश महिलांना कोणत्याही प्रकारची गंभीर मानसिक समस्या उद्भवत नाही."
त्याचबरोबर, काही महिलांना गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे दुष्परिणामांपेक्षा फायदेच अधिक होऊ शकतात. नको असलेल्या गर्भधारणेपासून सुटका करण्याव्यतिरिक्त गर्भनिरोधक गोळ्यांचे (संयुक्त आणि मिनी-पिल) इतर सकारात्मक शारीरिक परिणाम देखील होऊ शकतात.
हेलेना कोप्प कॅलनर म्हणतात, "जर तुम्हाला एंडोमेट्रियोसिस, खूप जास्त रक्तस्त्राव होणं किंवा पीएमडीडी (प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर, पीएमएसची गंभीर अवस्था आहे)ची समस्या असेल, तर गोळीमुळे यात सुधारणा होण्यास मदत होऊ शकते."
गर्भावस्थेत देखील आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. विशेषकरून विकसनशील देशांमध्ये त्या होऊ शकतात. अनेक अभ्यासांमधून दिसून आलं आहे की इच्छा नसताना किंवा नियोजन नसताना झालेली गर्भधारणा आणि नैराश्याच्या धोक्यामध्ये संबंध आहे.
मेंदूतील रसायनांमध्ये बदल
मात्र जेव्हा गर्भनिरोधक गोळ्यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, तेव्हा तो प्रत्यक्षात कसा होतो?
गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे महिलांच्या मूडवर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो.
गर्भनिरोधक गोळीचा एक दुष्परिणाम असा असतो की गोळीमुळे शरीरात नैसर्गिकरित्या होणाऱ्या ॲस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनच्या निर्मितीवर परिणाम होतो.
हे हार्मोन मेंदूतील आकलनाबरोबरच मज्जातंतूंना संरक्षण पुरवणं, रक्त प्रवाहाचं नियमन करणं, सूज आणि सिग्नल देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
गर्भनिरोधक गोळ्या तसंच हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी (HRT)मध्ये या हार्मोन्सच्या कृत्रिम आवृत्त्या असतात, ज्या मासिक पाळीच्या नैसर्गिक चक्रावर परिणाम करतात. यामध्ये प्रोजेस्टिनचा समावेश आहे.
तो कृत्रिम प्रोजेस्टोजन हार्मोनचा एक समूह असतो, ज्याची निर्मिती अनेक प्रकारे केली जाऊ शकते.
अर्थात यातील बहुतांश टेस्टोस्टेरॉनपासून बनलेले असतात. सिंथेटिक अॅस्ट्रोजन किंवा प्रोजेस्टिन, रासायनिकदृष्ट्या शरीरात तयार होणाऱ्या हार्मोनपेक्षा वेगळे असतात.
असं मानलं जातं की याचे अनेक परिणाम होऊ शकतात. एक परिणाम असा होऊ शकतो की गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या महिलांच्या मेंदूचा नैसर्गिक 'मूड-बूस्टर' म्हटला जाणाऱ्या सेरोटोनिनवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
एका अभ्यासात, डॅनिश संशोधकांनी सेरोटोनिनच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी 53 निरोगी महिलांच्या मेंदूच्या स्कॅनचं विश्लेषण केलं. यातील 16 महिला गर्भनिरोधक गोळ्या घेत होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
संशोधकांना असं आढळलं की ज्या महिला या गोळ्या घेत नव्हत्या त्यांच्यापेक्षा गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या महिलांमध्ये एक निश्चित प्रकारच्या सेरोटोनिन सिग्नलिंगचा स्तर 9-12 टक्के कमी होता.
हा परिणाम, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर (एसएसआरआय) नैराश्यावरील औषधांच्या या विशेष प्रकारच्या सिग्नलिंग वर होणाऱ्या परिणामापेक्षा दुप्पट होता.
संशोधकांनी अंदाज लावला की गर्भनिरोधक गोळ्या आणि नैराश्यामध्ये असणाऱ्या संबंधांसाठी हा जबाबदार असू शकतो.
गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये असलेल्या कृत्रिम ॲस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिन ॲलोप्रेग्नानोलोनच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण करू शकतात याचे काही पुरावे आहेत. ॲलोप्रेग्नानोलोन हा मेंदूच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणखी एक हार्मोन आहे.
विशेषकरून मूड आणि शरीराच्या तणावग्रस्त स्थितीतील प्रतिक्रियेसंदर्भात तो महत्त्वाचा असतो. प्रसूती झाल्यानंतर येणाऱ्या नैराश्यावरील उपचारासाठी या हार्मोनच्या एका फार्मास्युटिकल आवृत्तीला 2019 मध्ये अमेरिकेत मंजूरी देण्यात आली होती.
ज्या महिला कृत्रिम सेक्स हार्मोन घेत नाहीत, त्यांच्यात प्रोजेस्टेरॉन ॲलोप्रेग्नानोलोनमध्ये बदल होऊ शकतो. मात्र गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या महिलांमध्ये ही प्रक्रिया विस्कळीत होते.
या महिलांमध्ये प्रोजेस्टिन ॲलोप्रेग्नानोलोनमध्ये तुटत नाहीत. याचा अर्थ त्या महिलांमध्ये काही चिंता-विरोधी आणि नैराश्य-विरोधी परिणाम होत नाहीत.
उंदरांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह घेणाऱ्यांच्या मेंदूमध्ये ॲलोप्रेग्नानोलोनचं कमी प्रमाण आढळलं. उंदरांवर केलेल्या आणखी एका अभ्यासात, हे सामाजिक व्यवहारात कमी आणि लैंगिक इच्छा कमी होण्याशी संबंधित आढळून आलं.
संशोधकांचा अंदाज आहे की गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या महिलांसाठी हे दुष्परिणाम उपयुक्त असू शकतात. मात्र प्राण्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष नेहमीच मानवांना लागू होत नाहीत.
गर्भनिरोधक गोळ्यांमुळे तणावासंदर्भात महिलांच्या प्रतिक्रियेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे चिंता आणि नैराश्याची समस्या होऊ शकते.
हिल म्हणतात, "संशोधकांना आढळलं आहे की गर्भनिरोधक गोळ्यांमुळे तणावावर होणारी कोर्टिसोल प्रतिक्रिया कमी होते. कोर्टिसोल नसण्याचा अर्थ कोणताही तणाव नाही, वरवर पाहता ही एक चांगली गोष्ट वाटू शकते. मात्र हे तशा प्रकारे होत नाही."
"कोर्टिसोलमुळे तणाव होत नाही, याच कारणामुळे आपलं शरीर तणाव हाताळतं आणि त्यातून सावरतं."
किशोरवयीन तरुणींना अधिक धोका
ओजविंड लिडेगार्ड किशोरवयीन तरुणींबाबत अधिक चिंता व्यक्त करतात.
त्यांच्या अभ्यासातून समोर आलं आहे की 15-19 वर्षे वयोगटातील ज्या तरुणींनी गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या नव्हत्या, त्यांच्या तुलनेत ज्या तरुणींनी कम्बाइन्ड पिल घेणं सुरू केल्यानंतर त्यांना अँटिडिप्रेसंट औषधाचं प्रिस्क्रिप्शन दिलं जाण्याची शक्यता जवळपास दुप्पट (1.8 पट) होती.
मिनी-पिल घेणाऱ्या तरुणींच्या बाबतीत हा धोका दुपटीहून अधिक होता (ज्या तरुणींनी ही गोळी घेतली नव्हती त्यांच्या तुलनेत, या गटाला अँटीडिप्रेसंट प्रिस्क्रिप्शन दिलं जाण्याची शक्यता 2.2 पट अधिक होती).
याच प्रकारे, जेटरमार्कच्या अभ्यासात देखील आढळलं की किशोरवयीन मुलींनी हार्मोनल गर्भनिरोधकाचा वापर करणं आणि नैराश्यविरोधी किंवा चिंता-विरोधी औषधांच्या वापरामध्ये घनिष्ठ संबंध होता.
12-14 वर्षे वयोगटातील मुलींमध्ये संयुक्त गोळी आणि मिनी-पिल घेण्यास सुरुवात केल्यानंतर एक वर्षाच्या आत डिप्रेशनची औषधं दिली जाण्याची शक्यता अनुक्रमे 240 टक्के आणि 190 टक्के अधिक होती.
तर 15-17 वर्षे वयोगटातील मुलींमध्ये संयुक्त गोळी आणि मिनी-पिल घेण्यास सुरुवात केल्यानंतर डिप्रेशनचं औषध घ्यावं लागण्याची शक्यता 52 टक्के आणि 83 टक्के अधिक होती.
युके बायोबँकशी निगडीत 2 लाख 64 हजार 557 महिलांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक अभ्यास करण्यात आला.
त्यात संशोधकांना आढळलं की ज्या महिलांनी त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या होत्या, त्यांच्यात आयुष्यभरात नैराश्य निर्माण होण्याचा धोका अधिक होता. मात्र हा धोका गोळ्या घेण्यास सुरुवात केल्यानंतरच्या पहिल्या दोन वर्षात सर्वाधिक होता.
किशोरवयीन मुलींव्यतिरिक्त, आणखी एक समूह किंवा गट आहे, ज्यांना गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सांगायला डॉक्टर सावधगिरी बाळगतात.
कोप्प कॅलनर इशारा देतात की, "ज्यांना आधी नैराश्याची समस्या आली असेल किंवा आधीपासूनच एखादी मानसिक समस्या असेल, तर अशा लोकांनी गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे नैराश्याची समस्या येण्याचा धोका वाढतो."

फोटो स्रोत, Getty Images
काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अशा परिस्थितीत स्वत:देखील जागरुक राहणं महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गर्भनिरोधक गोळ्या घ्यायला सुरुवात करता, एका ब्रॅंडच्या गोळ्यां सोडून दुसऱ्या ब्रॅंडच्या गोळ्या घेऊ लागता, त्यावेळेस काही महिने स्वत:च्या मूडवर लक्ष ठेवलं पाहिजे.
जर तुम्हाला या गोष्टीची चिंता वाटत असेल की तुमच्या गर्भनिरोधक गोळ्या तुमच्या मूडवर कसा परिणाम करत आहेत, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे.
जोहान्स बिट्जे म्हणतात की गर्भनिरोधकांच्या अनेक पर्यायांपैकी योग्य पर्याय शोधला पाहिजे. ते म्हणतात, "हा खूपच वैयक्तिक स्वरुपाचा उपचार आहे."
अर्थात, गर्भनिरोधकाचे असेदेखील पर्याय आहेत, ज्यात हार्मोन नसतात किंवा गर्भनिरोधक गोळ्यांच्या तुलनेत छोटा डोस असतो.
या पर्यायांमध्ये पुरुष आणि महिला कंडोम (जे लैंगिक संबंधांमधून संक्रमित होणाऱ्या रोगांपासून बचाव करण्यास देखील उपयुक्त असतात), व्हजायनल रिंग, आययूएस (हार्मोनल कॉईल), आययूडी (कॉपर कॉईल) आणि नसबंदी यांचा समावेश आहे.
सारा ई हिल यांच्यासाठी, गर्भनिरोधकाची पद्धत बदलणं हे त्यांचं आयुष्य बदलण्यासारखंच होतं.
त्या सल्ला देतात की, "गर्भावस्थेपासून सुरक्षेचा असा पर्याय शोधण्यासाठी वेळ काढा, जो तुम्हाला एक व्यक्ती म्हणून जाणीव देईल, जे तुम्हाला हवं असतं. संयम आणि धीर ठेवल्यास तुमच्यासाठी उपयुक्त असं काहीतरी तुम्हाला सापडेल."
(डिस्क्लेमर: या लेखात देण्यात आलेली माहिती फक्त सामान्य स्वरुपाची माहिती आहे. ही माहिती डॉक्टर किंवा वैद्यकीय सल्ल्याला पर्याय समजू नये. या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे कोणत्याही युजरद्वारे करण्यात आलेल्या निदानासाठी बीबीसी जबाबदार असणार नाही. इथे लिस्टेड असलेल्या कोणत्याही बाहेरील वेबसाईटवरील माहितीसाठी बीबीसी जबाबदार नाही. तसंच कोणत्याही वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीचं किंवा सूचवण्यात आलेल्या व्यावसायिक उत्पादन किंवा सेवेचं समर्थन बीबीसी करत नाही. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारे तुमच्या आरोग्याची चिंता वाटत असेल तर नेहमीच तुमच्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.












