You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात थंडीची लाट अन् पावसाचीही शक्यता, पण थंडीची लाट म्हणजे नेमकं काय असतं?
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या थंडी जाणवत असून काही ठिकाणी पारा दहा अंशांच्याही खाली घसरला आहे. राज्यातल्या काही ठिकाणी थंडीची लाटही आली आहे.
पुढच्या काही दिवसांत मध्य भारतात थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज असून महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं काय अंदाज वर्तवला आहे, जाणून घेऊयात.
महाराष्ट्रात सध्या कोरडं आकाश असून, उत्तर आणि पश्चिमेकडून कोरडे थंड वारे वाहात आहेत. हिमालयावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर आणि मध्य भारतात विशेषतः रात्रीचं किमान तापमान आणखी खाली घसरत आहे. त्यामुळे रात्रीचं किमान तापमान खाली घसरलं आहे.
महाराष्ट्रातही किनारी भाग आणि दक्षिणेकडचे जिल्हे वगळता इतर ठिकाणी किमान सरासरीएढं किंवा त्यापेक्षा खाली राहिलं. ही स्थिती पुढचे दोन तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून दक्षिण भारतात तामिळनाडू आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडतो आहे. महाराष्ट्रातही 22 नोव्हेंबरच्या आसपास पावसाची शक्यता आहे.
पूर्व राजस्थान आणि पूर्व मध्य प्रदेशातील काही भागांत 18 ते 20 नोव्हेंबरदरम्यान थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर छत्तीसगड, मराठवाडा, तेलंगणा आणि मध्य महाराष्ट्रात, तर मंगळवारी (18 नोव्हेंबर) विदर्भात थंडीची लाट राहू शकते, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
थंडीच्या लाटेची शक्यता पाहता धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, जालना, बीड, वाशिम, परभणी, हिंगोली, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आदि ठिकाणी मंगळवारी (18 नोव्हेंबर) यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर बुधवारी (19 नोव्हेंबर) जळगाव आणि नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणच्या तापमानात घट दिसून येईल.
थंडीमुळे सर्दी, ताप, नाक वाहणे, नाकातून रक्त येणं यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. थंडीत जास्त वेळ राहिल्यास हे त्रास अधिक वाढू शकतात, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
कृषी, पिके, जनावरं, पाणीपुरवठा, वाहतूक आणि वीजपुरवठ्यावरही काही ठिकाणी थंडीचा परिणाम होऊ शकतो.
थंडीची लाट म्हणजे काय?
हिवाळा सुरू होताच शीतलहर, थंडीची लाट असे शब्दप्रयोग अनेकदा कानावर पडतात. पण थंडीची लाट म्हणजे काय?
सोप्या शब्दांत सांगायचं तर नेहमीपेक्षा जास्त थंडी पडली आणि ती बराच वेळ कायम राहिली तर शीतलहर किंवा थंडीची लाट आली असं म्हटलं जातं.
त्यासाठी हवामान विभागाचे काही निकष आहेत. आणि हो, भारतासारख्या देशात एकच निकष सरसकट सगळीकडे लावता येत नाही.
पर्वत आणि पठारं तसंच किनारी प्रदेशासाठी हे निकष थोडे वेगवेगळे असतात. वाऱ्याची दिशा आणि बाष्पाचं प्रमाण यांचाही त्यासाठी विचार केला जातो.
एरवी एखाद्या पठारी भागात तापमान दहा अंशांखाली किंवा डोंगराळ भागात शून्यावर घसरलं किंवा नेहमीच्या सरासरी तापमानापेक्षा पारा खाली गेला तर त्याला कोल्ड डे म्हणजे थंड दिवस म्हटलं जातं.
पठारी भागात किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा 4 अंशांनी खाली गेलं, आणि अशी परिस्थिती किमान दोन वेदर स्टेशन्सवर नोंदवली गेली, तर तिथे थंडीची लाट जाहीर होते.
डोंगराळ भागात तापमान शून्याच्या खाली गेलं किंवा तिथल्या सरासरी तापमानापेक्षा 4.5 अंशांनी खाली गेलं तर तिथे थंडीची लाट जाहीर करतात. अशा प्रदेशात तापमान सरासरीपेक्षा 6.4 अंशांनी खाली गेलं, तर तिथे तीव्र थंडीची लाट जाहीर होते.
किनारी प्रदेशात मात्र पारा पंधरा अंशांच्या खाली गेला किंवा नेहमीच्या सरासरीपेक्षा साडेचार अंशांनी खाली गेला तर थंडीची लाट जाहीर केली जाते.
अशा थंड तापमानाचा माणसाच्या शरिरावरही वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या भागात थंडीची लाट जाहीर झाली असेल, तर योग्य ती काळजी घेऊनच बाहेर पडा.
थंडीमध्ये कशी काळजी घ्यावी?
थंडीचे पुरेसे कपडे आहेत की नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास घरातच राहावं. प्रसारमाध्यमात थंडीविषयी जी माहिती येते त्यावर लक्ष ठेवावं.
शेजारी कोणी वृद्ध माणसं रहात असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवावं. त्यांना काही लागल्यास योग्य ती मदत करावी.
गरम सूप किंवा चहा-कॉफी घेत राहावं. गरम पाणी प्यावं. त्यामुळे शरीरात उब निर्माण होईल. जर तुमच्या भागातील पाइपलाइन गोठणार असतील तर त्यातून पाण्याचा निचरा करत रहा. या काळात वीज गेली तरी ठेवलेलं अन्न 48 तास टिकतं त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही.
घरात स्लीपर आणि पायमोज्यांचा वापर करावा. थंडी कमी करण्यासाठी अल्कोहोलचे सेवन करू नका, त्याने शरीराचं तापमान आणखी कमी होण्याची शक्यता असते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)