महिलांना पुरुषांच्या तुलनेत AC मध्ये जास्त थंडी का वाटते? जाणून घ्या यामागचं विज्ञान

    • Author, कोटेरू श्रावणी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये एक गोष्ट पाहिली असेल. खोलीत एसी कोणत्या तापमानाला चालवावा याबद्दल महिला आणि पुरुषांमध्ये नेहमीच मतभेद असतात.

पुरुष तापमान कमी करण्याबद्दल बोलतात, तर महिला आधीच खूप थंडी असल्याचे सांगत तापमान वाढवण्याचा आग्रह धरतात.

हे वारंवार का घडतं? महिलांना पुरुषांपेक्षा जास्तं थंड वाटतं का?

महिलांमध्ये थंडी सहन करण्याची क्षमता कमी असते का? की ही केवळ एक भावना आहे?

पुरुषांपेक्षा महिलांना थंड का वाटते यावर बरंच संशोधन झालं आहे.

सायन्स डायरेक्ट आणि नेचर सारख्या सुप्रसिद्ध विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अनेक संशोधन अभ्यासातून असा निष्कर्ष काढला आहे की महिला स्वभावानं पुरुषांपेक्षा थंड असतात.

नेचर डॉट.कॉमवर प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, पुरुषांसाठी आरामदायक असलेल्या तापमानापेक्षा, जवळपास 2.5 अंश सेल्सिअस जास्त म्हणजेच सुमारे 24 ते 25 अंश सेल्सिअस तापमानात महिलांना आरामदायी वाटतं.

'द कन्व्हर्सेशन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, महिलांचा मेटाबॉलिक रेट म्हणजे चयापचय दर पुरुषांपेक्षा कमी आहे. ज्यामुळे थंडीच्या दिवसात शरीराची उष्णता निर्माण करण्याची क्षमता कमी होते.

या रिपोर्टनुसार, यामुळेच कमी तापमानात महिलांना जास्त थंडी वाजते.

सायन्स डायरेक्ट डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधानुसार, पुरुषांमध्ये चयापचय दर जास्त असतो.

म्हणूनच, त्यांना सामान्यत: शरीरात जास्त उष्णता जाणवते आणि जास्त तापमानात त्यांना आरामदायी वाटत नाही.

इंग्लंडमधील वॉरविक मेडिकल स्कूलचे प्राध्यापक पॉल थॉर्नले यांच्या मते, "पुरुष आणि महिलांमध्ये सरासरी चयापचय दर आणि शरीरातील उष्णता निर्मिती क्षमतेतील फरक हे त्याचं कारण असू शकतं. ज्यामुळे दोघांसाठी आरामदायी वाटणारं तापमान हे वेगवेगळं असतं."

चयापचय दर म्हणजे दिलेल्या कालावधीत आपले शरीर वापरत असलेल्या उर्जेचे प्रमाण.

अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे व्हिजिटिंग कन्सल्टंट डॉ. बी. सुजित कुमार म्हणतात की, बेसल मेटाबॉलिक रेट (बीएमआर) ही अशी ऊर्जा आहे जी आपले शरीर विश्रांतीच्या वेळी मूलभूत जीवन घालवण्याच्या कार्यांवर खर्च करते.

ते म्हणाले की, शरीराची उर्जा गरजा, पोषण आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.

प्रत्येक व्यक्तीचा चयापचय दर भिन्न असतो. हे आनुवंशिकी, चयापचय आणि जीवनशैली यांसारख्या गोष्टींवर अवलंबून असते.

विश्रांतीवेळी बीएमआर कमी असतो, तर व्यायामासारख्या हालचालींवेळी बीएमआर जास्त असते.

विश्रांती घेताना, शरीर केवळ हृदय, फुफ्फुस आणि मेंदू यांसारख्या महत्त्वपूर्ण अवयवांना योग्यरित्या कार्य करण्यासाठी उर्जा वापरतं.

चयापचय दर खालील तीन प्रकारे मोजला जातो.

  • ऑक्सिजनचा वापर
  • कार्बन डाय ऑक्साईडचं उत्सर्जन
  • उष्णतेची निर्मिती

द कन्व्हर्सेशनने अहवाल दिला आहे की, महिलांमध्ये आढळणारे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स शरीराचं तापमान आणि त्वचेच्या तपमानावर परिणाम करतात.

डॉ. सुजित कुमार म्हणाले की, जेव्हा शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढते तेव्हा रक्तवाहिन्या विस्कळीत होतात, ज्यामुळे काही महिलांना थंडी वाजू शकते.

त्याच वेळी, प्रोजेस्टेरॉन संप्रेरक त्वचेच्या रक्तवाहिन्या संकुचित करते. याचा अर्थ असा की शरीराच्या बाह्य भागात कमी रक्त पोहोचते आणि अंतर्गत अवयवांमध्ये उष्णता टिकून राहते, ज्यामुळे महिलांना आणखी थंडी जाणवते.

हे हार्मोनल संतुलन मासिक पाळीच्या चक्रानुसार दरमहा बदलते.

'द कन्व्हर्सेशन'च्या रिपोर्टनुसार, या हार्मोन्समुळे महिलांचे हात, पाय आणि कान पुरुषांपेक्षा सुमारे तीन अंश सेल्सिअस थंड असतात.

ओव्हुलेशनच्या एका आठवड्यानंतर, जेव्हा अंडाशयातून अंडी सोडली जातात तेव्हा प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते. या वेळी शरीराच्या मुख्य अवयवांचे (छाती व कंबरेच्या दरम्यानचा भाग) तापमान जास्त असते.

डॉ. सुजित कुमार यांच्या मते, याचा अर्थ असा आहे की या काळात महिलांना बाहेरील तापमानाचा जास्त त्रास होतो.

परंतु, डॉ. सुजित कुमार म्हणतात की रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचा प्रभाव कमी होतो. ज्यामुळे हॉट फ्लॅशेश म्हणजेच अचानक उष्णता वाढणं आणि चिडचिडेपणा यासारखी लक्षणं वाढतात.

डॉ. सुजित कुमार म्हणतात, "पुरुषांमध्ये सहसा स्नायूंची संख्या जास्त असते आणि चरबी कमी असते, म्हणून त्यांचे शरीर अधिक उष्णता निर्माण करते."

जेव्हा स्नायूंची संख्या जास्त असते. तेव्हा बेसल मेटाबोलिक रेट (बीएमआर) देखील जास्त असतो.

त्याच वेळी, महिलांमध्ये स्नायूंची संख्या कमी आणि चरबी जास्त असते. ज्यामुळे शरीरात उष्णता कमी निर्माण होते आणि त्यांना थंडी वाजते .

ते म्हणाले की, पुरुष आणि महिलांमध्ये शरीराचे तापमान भिन्न असते आणि बीएमआर स्नायूंच्या संख्येच्या आधारे निश्चित केलं जातं.

डॉ.सुजित कुमार सांगतात की, थंड रक्ताचे प्राणी आणि उबदार रक्ताचे प्राणी असे दोन प्रकारचे प्राणी असतात.

ते म्हणतात, "लहान प्राण्यांमध्ये चयापचय दर जास्त असतो आणि मोठ्या प्राण्यांचा चयापचय दर कमी असतो."

परंतु, हे देखील खरं आहे की पुरुषांपेक्षा महिलांना जास्त थंडी का वाटते यावरील वैज्ञानिक संशोधन अद्याप मर्यादित आहे. या विषयावर अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)