'सुंदर दिसण्यासाठी मी 23 व्या वर्षीच बोटॉक्सला सुरुवात केली'

    • Author, रुथ क्लेग
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. व्हीडिओ कॉलवर बोलत असताना सिडनी ब्राऊनच्या आईला तिच्या कपाळावर एक हलकीशी सुरकूती आल्याचं लक्षात आलं.

त्यानंतर त्यांची चर्चा झाली आणि सिडनीनं एँटी-रिंकल म्हणजे सुरकुत्या घालवणारं इंजेक्शन घ्यायचं ठरवलं.

सिडनीने ही इंजेक्शनं घ्यायला सुरुवात केली, तेव्हा ती फक्त 23 वर्षांची होती. आता सिडनीचं वय 25 वर्ष आहे.

तिनं बोटॉक्स आणि लिप फिलर या उपचारपद्धतीही करून घेतल्यात. त्यातून तिच्या चेहऱ्यात बराच बदल झालाय. त्याबाबत ती फार खूष आहे.

छान दिसण्यासाठी आणि आत्मविश्वास वाटवा यासाठी जे काही करावं लागेल ते केलं पाहिजे, असं सिडनीला वाटतं.

तिची आई म्हणजे पुरस्कार विजेत्या प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर हॅले ब्राऊन.

अमेरिकेतल्या लॉस वेगस या शहरात ते राहतात. त्या स्वतः रोज थोड्या थोड्या प्रमाणात बोटॉक्सचं इंजेक्शन मुलीच्या कपाळावरून त्वचेत देत असतात.

तरूणांमध्ये वाढती लोकप्रियता

हॅले ब्राऊन म्हणतात की, यामुळे सिडनीची त्वचा एकदम ताजीतवानी दिसते. तिचा आत्मविश्वासही वाढतो.

आत्तापासूनच ही इंजेक्शन्स घेतल्यामुळे भविष्यात चेहऱ्यावरच्या मोठ्या सुरकुत्या घालवण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची गरज सिडनीला शक्यतो पडणार नाही, असंही त्यांना वाटतं.

सिडनी ज्या अँटीयरिंकल इंजेक्शनचा वापर करते त्याला 'प्रिव्हेंन्टेटिव्ह बोटॉक्स' असं म्हटलं जातं.

चेहऱ्यावर सुरकुत्या येऊच नयेत किंवा चेहऱ्यावरच्या लहान रेषांचं पुढं मोठ्या सुरकुत्यांमध्ये रुपांतरण होऊ नये यासाठी हा बोटॉक्स उपयोगी ठरू शकतो, अशी आशा सिडनीसारख्या 20 ते 30 वर्षांच्या तरूण वापरकर्त्यांना वाटते.

पण वयानुसार सुरकुत्या येणं हे नैसर्गिकच आहे. मग असे सौंदर्यवर्धक उपचार करणं खरंच योग्य आहे का?

आपल्या मनातील नाजूक कोपऱ्यांचा, असुरक्षिततेच्या भावनांचा वापर करून बहरणाऱ्या एका मोठ्या उद्योगाला आपण हजारो रूपये खर्च करून बढावा देत आहोत का?

या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी आम्ही बोटॉक्स वापरकर्ते आणि काही तज्ज्ञांशी चर्चा केली.

आपण हालचाल करतो तेव्हा शरीरातले स्नायूंचं आंकुचन प्रसरण होत असतं. चेहऱ्यावरच्या स्नायूंचं आकुंचन कमी झालं, तर सुरकुत्याही कमीच पडतात.

सुरकुत्या थांबवण्याच्या उपचारपद्धती एकेकाळी फक्त श्रीमंत सेलिब्रिटीच करून घेत होते. पण आता त्याची लोकप्रियता वाढली आहे. त्याला एका उद्योगाचंच स्वरूप आलंय.

ब्रिटनमध्ये दरवर्षी 9 लाख बोटॉक्स इंजेक्शन्सचा वापर केला जातो.

जगभरात 18 ते 34 वर्षांचे तरूणही अशा उपचारपद्धती करून घेत आहेत. जवळपास 25 टक्के तरूण याकडे वळालेत.

सुरकुत्यांवर काय परिणाम होतो?

अनेकदा तरूण चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याआधीच त्यावर उपचार घेऊ लागतात.

पण चेहऱ्यावर सुरकुत्या आल्याच नसतील तर बोटुलिनम टॉक्सिन म्हणजेच बोटॉक्सचं इंजेक्श्न देऊन त्वचेचं तारूण्य कसं टिकवता येईल?

याचं उत्तर देताना डॉ. जावेद हुसेन सांगतात, "यानं तारूण्य टिकून राहत नाही. पण त्वचेचं वय वाढण्याचा वेग नक्की कमी होतो."

मॅंचिस्टर शहरातल्या 'निओ डर्म' या कंपनीचे ते संचालक आहेत.

हसणं, रडणं अशा हावभावांनी चेहऱ्यावर तात्पुरत्या सुरकुत्या पडतात. त्याला डायनॅमिक रिंकल्स, असं म्हटलं जातं. या डायनॅमिक सुरकुत्यांवर उपचार केले तर कायमस्वरूपी रेषा (स्टॅटिक रेषा) कमी होतात.

डॉ. हुसेन सांगतात, "हावभाव केल्यानंतर आकुंचित झालेले स्नायू आपण शिथील केले तर चेहऱ्यावर तात्पुरत्या सुरकुत्या पडण्याचं प्रमाणही कमी होईल. पुढे जाऊन या सुरकुत्या कायमस्वरूपी चेहऱ्यावर येणार नाहीत."

डॉ. हुसेन सांगतात की, अशा उपचारपद्धती घेण्यासाठी त्यांच्याकडे अलिकडे 18 ते 19 वर्षांचे तरूणही येत आहेत.

18 पेक्षा जास्त वय असलेल्या कोणालाही हे इंजेक्शन दिलं जाऊ शकतं, असं कायदा सांगतो. पण अनेकदा डॉ. हुसेन स्वतःच मुलांना असे उपचार न घेण्याचा सल्ला देतात.

"माझ्याकडे काही मुली आल्या होत्या. त्यांना बोटॉक्स आणि लिप फिलर करायचं होतं. काही मुली तर 3 ते 4 मिलीलीटरचा फिलर करण्याची मागणी करतात. विशेषतः असे उपचार करण्याची ही पहिलीच वेळ असेल तर हे प्रमाण फार जास्त आहे."

मात्र, 'प्रिव्हेंन्टेटिव्ह बोटॉक्स' हा सुरकुत्या थांबवण्याचा चांगला उपाय आहे या डॉ. हुसेन यांच्या मताशी अनेकजण सहमत नाहीत.

एवढ्या कमी वयात बोटॉक्स उपचार करू नयेत, असा सल्ला प्लॅस्टिक सर्जन नोरा न्यूजेंट देतात. त्या ब्रिटिश असोसिएशन ऑफ ॲस्थेटिक प्लॅस्टिक सर्जन्स (बीएएपीएस) या संस्थेत अध्यक्ष आणि सल्लागार म्हणून काम करतात.

त्या म्हणतात, "जी गोष्ट आत्ता अस्तित्वातच नाही त्यावर उपचार केले जाऊ शकत नाहीत. 20 व्या वर्षी घालवण्यासाठी चेहऱ्यावर सुरकुत्या नसतील तर बोटॉक्स करणं म्हणजे गरज नसताना पैसा खर्च करण्यासारखं आहे."

सुरकुत्यांचा किती विचार करावा?

चेहऱ्यावर निदान लहान रेषा दिसत असतील तरच असे उपचार करावेत, असं नोरा यांचं म्हणणं आहे. वयाचा त्वचेवर किती परिणाम होतोय हे तेव्हाच समजतं आणि त्या हिशोबाने उपचार करता येतात.

"आपल्या रंगरूपाच्या काळजीनं असे सौंदर्यवर्धक उपचार करण्यात काही चुकीचं नाही. पण आपण हे नेमकं कशासाठी करतोय याचा विचार जरूर करावा," त्या म्हणतात.

अनेकदा मित्र-मैत्रिणींच्या किंवा समाजाच्या दबावाखाली असे निर्णय घेतले जातात. हे उपचार आपल्याला स्वतःबद्दल चांगलं वाटावं यासाठी असतात. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली नाही, तर स्वतःच्या मर्जीनं बोटॉक्स करायचं की नाही हे ठरवायला हवं.

हा दबाव जेन टॉमी यांच्यासारख्या तज्ज्ञांनाही जाणवतो. त्या पोषण आणि खाण्यासंबंधीचे आजार या विषयातल्या समुपदेशक आहेत.

'स्वप्रतिमा' या विषयावर ते शाळांमध्ये मुलांशी संवाद करत असतात.

"अँटी-एजिंगचं, म्हणजे वय वाढण्याची गती कमी करण्याचं, फॅड आपल्या समाजात आहे. किशोरवयीन मुलांमध्येही बोटॉक्स आणि फिलर्ससारख्या गोष्टींची लोकप्रियता वाढताना दिसतेय," त्या म्हणतात.

याचा दीर्घ परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर पडेल अशी भीती जेन यांना वाटते.

फक्त आपण कसे दिसतो याचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्या व्यक्तिमत्वातील चांगल्या गोष्टींवर भर द्यावा, असं जेन मुलांना समजावतात.

"इतक्या लहान वयात त्यांना म्हातारपणी येणाऱ्या सुरकुत्यांची काळजी करण्याची काही गरज नाहीय," त्या म्हणतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्याच

एश्टन कॉलिन्स 'सेव्ह फेस' नावाच्या एका संघटनेच्या संचालक आहेत. सौंदर्यप्रसाधनांच्या उद्योगांवर नियंत्रण ठेवणारे नियम आणि कायदे यावेत यासाठी ही संघटना प्रयत्न करते.

कॉलिन्स सांगतात की अनैतिक पद्धतीनं काम करणाऱ्या तज्ज्ञांकडून बोटॉक्स उपचार करून घेतल्यानं त्रासात असलेले अनेक तरूण त्यांच्या संपर्कात आहेत.

"प्रिव्हेंन्टेटिव्ह बोटॉक्सच्या जहिराती पाहिल्या की मला फार काळजी वाटते. तरूण महिलांना लक्ष्य करून सोशल मीडियावर त्यासंबंधी अनेक पोस्ट्स टाकल्या जातात. त्यातून या मुली अशा उपचारांकडे वळतात. त्याची खरंतर त्यांना गरज नसते." कॉलिन्स सांगतात.

बोटॉक्स करताना योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होतो.

चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात, ठेवण बिघडते आणि काही वेळा तर स्नायू कमकुवत होतात. त्यातून बरं व्हायला अनेक वर्ष लागतात.

शिवाय, लहान वयात बोटॉक्स घेतल्यानं शरीरात त्याचा 'टॉलरन्स' निर्माण होऊ शकतो. म्हणजे, शरीराला त्याची सवय होते.

कॉलिन्स सांगतात की, त्या स्वतः 26 वर्षांच्या असल्यापासून बोटॉक्सची इंजेक्शनं घेत होत्या. आता त्यांचं वय 37 वर्ष आहे. पण शरीराला बोटॉक्सची सवय झाल्यानं त्यांना सतत इंजेक्शन्स घ्यावी लागतात. प्रत्येकवेळी इंजेक्शनचा परिणाम लवकर संपतो.

बोटॉक्समुळे सुरकुत्या किती कमी होतात याबद्दल तज्ज्ञांची वेगवेगळी मतं असू शकतात. पण चेहरा नियमितपणे स्वच्छ केल्यानं, त्यातील ओलावा टिकवून ठेवल्यानं आणि दररोज सनस्क्रीन लावल्यानं त्वचेचं तारूण्य टिकून राहतं, असं सगळेच तज्ज्ञ सांगतात.

तरीही एखाद्याला बोटॉक्ससारखे उपचार करायचे असतील तर ते वैद्यकीय पार्श्वभूमी असणाऱ्या मान्यता प्राप्त डॉक्टरकडूनच करून घ्यावेत.

काही महिनेच टिकून राहतो बोटॉक्सचा परिणाम

आपण आयुष्यभर नियमितपणे बोटॉक्स करत राहिलो तर काय होईल? याबाबत ठोस माहिती देणारं संशोधन अजून तरी उपलब्ध झालेलं नाही.

बोटॉक्सचा परिणाम तीन ते सहा महिने टिकून राहतो. त्यामुळे त्यावर दीर्घकालीन अभ्यास करायचा असेल तर संशोधनातील लोकं नियमित बोटॉक्स घेतील याची काळजी घ्यायला हवी. ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अभ्यास करता येईल अशी लोकं संशोधनासाठी मिळवणं फार अवघड आहे.

त्वचेचं आरोग्य अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. जीवनशैली, आसपासचं वातावरण, मनावर असलेला ताण, खाणं-पिणं आणि व्यायाम असे अनेक घटक त्यावर प्रभाव टाकतात.

बोटॉक्स करून घेतलं तरी त्याचा परिणाम काही महिन्यांनी कमी होतो. त्यामुळे इंजेक्शनं ठराविक अंतरानं नियमित घेत रहावी लागतात. याचाच अर्थ, सुरकुत्यांविरोधातली तुमची लढाई आयुष्यभर चालूच राहते.

सिडनीही अजूनही अँटी रिंकल इंजेक्शनं घेते. आईवर विश्वास ठेऊन घेतलेली ही इंजेक्शनं तिला तरूण आणि सुंदर दिसण्यास मदत करतात.

तिची आई गरजेपेक्षा जास्त बोटॉक्स घेण्यापासून थांबवेल आणि बोटॉक्समुळे चेहऱ्यात होणारे बदल ओळखायलाही मदत करेल, असं सिडनीला वाटतं.

या अवस्थेला "बोटॉक्स ब्लाइंड" किंवा "फिलर ब्लाइंड" असं म्हणतात.

सिडनी म्हणते, "मी इंजेक्शनचे लहान डोस घेते आणि पुढेही घेईन. ते करणं फार सोपं आहे. काय करायचंय ते माझ्या आईला माहिती आहे.

महत्त्वाचं म्हणजे, यामुळं मला माझा आत्मविश्वास वाढल्याचं जाणवतं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)