हवामान बदलाचे परिणाम खोटे असल्याचं सांगणारे हे '5' दावे किती खरे? जाणून घ्या वस्तुस्थिती

    • Author, मार्को सिल्वा
    • Role, बीबीसी व्हेरिफाय

संयुक्त राष्ट्रसंघाची हवामान बदल परिषद (कॉप 30) ब्राझीलमध्ये सुरू होताच, सोशल मीडियावर हवामान बदलाबाबतचे खोटे आणि भ्रामक दावे सातत्यानं पसरत आहेत. लाखो लोकांनी ते पाहिले आहेत.

अशा 5 दाव्यांवर आपण नजर टाकूया आणि ते चुकीचे का आहेत ते जाणून घेऊयात.

1) दावा: हवामान बदलाला मानव जबाबदार नाही

मानवामुळे हवामान बदल होत नसल्याचे खोटे दावे सातत्यानं पसरत आहेत. हे दावे इंग्रजी, स्पॅनिश, रशियन आणि फ्रेंच यासारख्या अनेक भाषांमधून पसरत आहेत.

वस्तुस्थिती अशी आहे की पृथ्वीच्या इतिहासात तापमान वाढण्याचे आणि घटण्याचे अनेक नैसर्गिक कालखंड आले आहेत. त्यामागे ज्वालामुखीचे स्फोट किंवा सुर्यावरील हालचालींमधील बदल ही कारणं होती.

मात्र हवामानातील असे बदल प्रदीर्घ काळात झाले आहेत. सर्वसाधारणपणे त्यासाठी हजारो किंवा लाखो वर्षे लागली आहेत.

जागतिक हवामान विज्ञान संघटनेनुसार (डब्ल्यूएमओ), फक्त गेल्या 150 वर्षांच्या कालावधीतच पृथ्वीवरील तापमान जवळपास 1.3 अंश सेल्सिअसनं वाढलं आहे.

वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की गेल्या कित्येक हजार वर्षांमध्ये इतक्या वेगानं तापमान वाढ झालेली नाही.

इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजचं (आयपीसीसी) म्हणणं आहे की हा बदल स्पष्टपणे मानवी क्रियांमुळे होतो आहे. उदाहरणार्थ, कोळसा, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूसारख्या इंधनांचं ज्वलन.

आयपीसीसी संयुक्त राष्ट्रसंघाची एक संस्था आहे. ती जगभरातील वैज्ञानिकांना एकत्र आणून हवामान बदलाशी निगडीत संशोधनाचं विश्लेषण करते आणि वस्तुस्थितीवर आधारित अहवाल तयार करते.

जीवाश्म इंधन जाळल्यानं किंवा त्याच्या वापरामुळे ग्रीनहाऊस म्हणजे हरितगृह वायू विशेषकरून कार्बन डायऑक्साईडचं हवेतील प्रमाण वाढतं.

हे वायू पृथ्वीभोवती एक थर किंवा आवरण तयार करतात. त्यामुळे पृथ्वीवर अतिरिक्त उष्णता रोखली जाते आणि परिणामी त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढून ती अधिक उष्ण होते.

लंडनच्या इम्पीरियल कॉलेजच्या हवामान बदल वैज्ञानिक जॉयस किमुताई म्हणतात, "हवामान बदल ही काही मानण्याची किंवा न मानण्याची गोष्ट नाही. ती पुराव्यांनिशी सिद्ध होणारी वस्तुस्थिती आहे."

"मानवी क्रियांच्या खुणा पृथ्वीवरील हवामान प्रणालींच्या प्रत्येक भागात स्पष्टपणे दिसतात."

2) दावा: पृथ्वी गरम नाहीतर थंड होते आहे

सोशल मीडियावर काहीजण, उदाहरणार्थ, पोलंड किंवा कॅनडात राहणारे युजर्स त्यांच्या भागातील सामान्यपेक्षा अधिक थंड हवामान पाहून म्हणतात की वैज्ञानिक खोटं बोलत आहेत. पृथ्वी प्रत्यक्षात गरम नाही तर थंड होते आहे.

मात्र हा दावा चुकीचा आहे.

हवामानाचा अर्थ आहे, पृथ्वीच्या वातावरणात काही दिवस किंवा आठवड्यांमध्ये होणारा बदल. तर हवामान बदल असे ट्रेंड आणि सरासरी परिस्थिती दाखवतो, जी प्रदीर्घ काळ राहते.

फिलीपिन्सचे हवामान बदल वैज्ञानिक डॉक्टर जोसेफ बासकोंसिलो म्हणतात, "प्रदीर्घ काळाच्या तापमानाच्या नोंदी स्पष्टपणे दाखवतात की पृथ्वीचा पृष्ठभाग सातत्यानं गरम होतो आहे. मग भलेही काही ठिकाणी थोड्या काळासाठी थंड हवामान जाणवलं तरी."

जागतिक हवामान विज्ञान संघटनेनुसार, 1980 च्या दशकापासून आतापर्यंत प्रत्येक दशक, आधीच्या दशकाच्या तुलनेत उष्ण होतं. हा ट्रेंड पुढेही असाच सुरू राहण्याची शक्यता आहे.

जागतिक हवामान विज्ञान संघटनेनं सांगितलं की 2024 हे वर्ष आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष होतं. या वर्षी पृथ्वीचं सरासरी तापमान 1800 च्या दशकाच्या शेवटच्या तुलनेत जवळपास 1.55 अंश सेल्सिअस अधिक होतं.

3) दावा: कार्बन डायऑक्साईडमुळे प्रदूषण होत नाही

जे लोक मानवामुळे हवामान बदल होत असल्याचं नाकारतात, ते अनेकदा दावा करतात की कार्बन डायऑक्साईड म्हणजे पोल्युटंट नाही, म्हणजे त्यामुळे प्रदूषण होत नाही, उलट ते 'रोपांचं भोजन' आहे.

बीबीसीला पोर्तुगीज आणि क्रोएशियन भाषेत अशा पोस्ट सापडल्या आहेत, ज्यात म्हटलं आहे की वातावरणात अधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साईड असणं निसर्गासाठी चांगलं असतं.

मात्र ते खरं नाही.

पोल्युटंट म्हणजे असा पदार्थ जो पर्यावरणात गेल्यानं ईकोसिस्टम किंवा मानवी आरोग्याला अपाय करतो.

नासानुसार, वातावरणात सामान्य पातळीवर असलेला कार्बन डायऑक्साईड पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक आहे. जर ग्रीनहाऊस म्हणजे हरितगृह वायू, उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड नसेल, तर जीवनासाठी पृथ्वी फारच थंड ठरेल.

रोपं किंवा वनस्पतीदेखील पाणी आणि सूर्यप्रकाशाबरोबर कार्बन डायऑक्साईडचा वापर करून ऑक्सिजन आणि जैविक पदार्थ तयार करतात. पृथ्वीवरील अन्नसाखळीचा तो पाया आहे.

मात्र जेव्हा वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूपच जास्त असतं, तेव्हा वैज्ञानिक याला 'पॉल्युटंट' मानतात. कारण त्यामुळे नुकसान होऊ लागतं.

जागतिक हवामान विज्ञान संघटनेनुसार, 2024 मध्ये कार्बन डायऑक्साईडची पातळी आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर पोहोचली होती. 1750 मध्ये त्याचं प्रमाण जवळपास 280 पीपीएम (पार्ट्स पर मिलियन) होतं. ते आता वाढून 423 पीपीएम झालं आहे.

वैज्ञानिकांनी हे सिद्ध केलं आहे की मानवी क्रियांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं आहे. याचा थेट संबंध पृथ्वीवरील वाढत्या तापमानाशी आहे. याचा परिणाम ईकोसिस्टम, पर्यावरणावर होतो आहे.

कॅनडातील ईकोलॉजिस्ट आणि कॉन्झर्व्हेशन सायंटिस्ट, मिशेल कलामांडीन म्हणतात, "जंगलांना आग लागण्याचा धोका वाढतो आहे. दुष्काळ आणि पूर यामुळे पिकांचं नुकसान होतं आहे. तसंच ईकोसिस्टममधील संतुलन बिघडल्यामुळे वन्यजीव त्यांचा नैसर्गिक अधिवास गमावत आहेत."

इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेंट चेंजचं म्हणणं आहे की वातावरणात अधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साईड असल्यामुळे रोपांची, वनस्पतींची वाढ थोडी वाढू शकते. मात्र दुष्काळ, उष्णता आणि पाण्याची टंचाई यासारख्या हवामान बदलामुळे होणाऱ्या विनाशकारी परिणामांची भरपाई करण्यासाठी ते पुरेसं नाही.

4) दावा: हवामान बदलामुळे नाही, तर लोकांमुळे जंगलांमध्ये आग लागते आहे

जेव्हा मोठ्या प्रमाणात जंगलांमध्ये आग लागते, जसं यावर्षी अमेरिका, दक्षिण कोरिया आणि तुर्कियेमध्ये झालं. त्यावर सोशल मीडियावर अनेकजण त्यामागचं कारण हवामान बदल नाही तर लोकांनी आग लावल्यामुळे तसं झाल्याचं सांगतात.

अशा व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये, जे वैज्ञानिक आणि नेते आग लागण्यास हवामान बदल कारणीभूत असल्याचं म्हणतात, त्यांची टिंगल केली जाते.

अर्थात हे खरं आहे की अनेकदा मानवी बेजबाबदारपणामुळे किंवा मुद्दाम करण्यात आलेल्या कृतींमुळे जंगलांमध्ये आग लागते. मात्र जंगलात मोठ्या प्रमाणात आग यामुळेच लागते असं म्हणणं हे 'भ्रामक' स्वरूपाचं आहे.

कोलंबियातील नॅशनल युनिव्हर्सिटीमधील वैज्ञानिक डॉक्टर डोलोर्स अरमेंटेरस आगीशी संबंधित ईकोसिस्टमवर संशोधन करतात. त्या म्हणतात की, "जंगलात आग लागण्यासाठी फक्त एकच कारण असल्याचं म्हणणं हे मूलभूतपणे चुकीचं आहे."

एखाद्या विशिष्ट आगीचा थेट संबंध हवामान बदलाशी जोडणं सोपं नाही. कारण यामुळे अनेक घटक कारणीभूत असतात. उदाहरणार्थ, जंगलांचं व्यवस्थापन, हवामानाची स्थिती आणि जमिनीचा पोत.

तरीदेखील, हे सिद्ध झालं आहे की हवामान बदलांमुळे अशी परिस्थिती निर्माण होते आहे की ज्यामुळे जंगलांमध्ये आग लागणं आणि ती पसरणं अधिक सोपं झालं आहे.

इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेंट चेंजनुसार (आयपीसीसी), वायव्य अमेरिका आणि दक्षिण युरोपसारख्या प्रदेशात हवामान बदलामुळे 'फायर वेदर' म्हणजे आगीसाठी अनुकूल हवामान असण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

यात दीर्घ काळ दुष्काळ किंवा कोरडं हवामान असणं, अतिशय उष्णता असणं आणि वेगानं वाहणारे वारे यांचा समावेश आहे.

अशा परिस्थितीत जर कोणत्याही प्रकारची ठिणगी, मग ती वीज पडण्यासारखी नैसर्गिक स्वरूपातील असो की मानवनिर्मिती आग लागणं किंवा दुर्घटना असो, त्यात सुकलेल्या वनस्पती, रोपं यांच्या अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन जंगलातील आग भीषण स्वरूप धारण करू शकते.

डॉक्टर अरमेंटेरस म्हणतात, "जाळपोळ किंवा आग लावण्यामुळे हे होतं आहे की हवामान बदलामुळे होतं आहे हा प्रश्न नाही. खरा प्रश्न आहे की वाढती उष्णता आणि हवामान, कोणत्याही प्रकारे लागलेल्या आगीचा प्रभाव कित्येक पटीनं वाढवतात. त्यामुळेच आज आपल्याला इतक्या भीषण स्वरूपात लागलेल्या आग दिसत आहेत."

5) दावा: वातावरणातील इंजिनिअरिंगमुळे हवामानात बदल होत आहेत

सोशल मीडियावर अनेकदा दावे केले जातात की प्रचंड पाऊस, पूर किंवा वादळ यासारख्या हवामानाशी निगडीत घटना, हवामानात करण्यात येत असलेली छेडछाड किंवा 'जिओइंजिनिअरिंग'मुळे होत आहेत.

गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीतील दुबई किंवा स्पेनमधील वेलेंसियामध्ये अचानक पूर आल्यानं मोठा विध्वंस झाला. त्यावेळेस बऱ्याच युजर्सनं या घटना अशाच प्रयोगांमुळे झाल्याचं म्हटलं.

मात्र हवामानात बदल आणि जिओइंजिनिरिंग या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्याद्वारे पृथ्वीवरील वातावरणात होत असलेल्या असामान्य बदलांना स्पष्ट करता येणार नाही.

हवामानात एका मर्यादेपर्यंत बदल केला जाऊ शकतो. अमेरिकन सरकारच्या एका अहवालानुसार, गेल्या काही वर्षांमध्ये चीन, मेक्सिको आणि भारतासह 30 हून अधिक देशांनी 'क्लाऊड सीडिंग'च्या तंत्राचा वापर केला आहे.

या तंत्रज्ञानात ढगांमध्ये सिल्व्हर आयोडाईडसारखे छोटे कण सोडले जातात. जेणेकरून त्यामध्ये असलेल्या बाष्पाचं रुपांतर पाण्याचे थेंब किंवा बर्फाच्या कणांमध्ये करता येईल आणि पाऊस किंवा हिमवर्षावाची शक्यता वाढेल.

भारतीय विज्ञान संस्थेच्या सेंटर फॉर ॲटमॉस्फिरिक अँड ओशनिक सायन्सेसचे प्रोफेसर गोविंदासामी बाला म्हणतात, "हवामानात बदल करण्याच्या तंत्रज्ञानाचा फक्त छोट्या प्रदेशात आणि थोड्या काळासाठी परिणाम होतो. त्यातून गेल्या कित्येक दशकांपासून वेगानं होत असलेल्या हवामान बदलांसंदर्भात स्पष्टीकरण देता येणार नाही."

वैज्ञानिकांना वाटतं की क्लाऊड सीडिंगसारख्या तंत्रांच्या परिणामांवर चर्चा होऊ शकते. मात्र त्यामुळे एखादा मोठा पूर किंवा मोठं वादळ येऊ शकत नाही.

दुसऱ्या बाजूला जिओइंजिनिअरिंगचा अर्थ आहे, हवामानावर परिणाम करण्याच्या उद्देशानं पर्यावरणात मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा प्रयत्न करणं.

याची एक प्रस्तावित पद्धत 'सोलर रेडिएशन मॉडिफिकेशन' ही आहे. यात सूर्याचा काही प्रकाश अंतराळात परावर्तित व्हावं आणि पृथ्वी थंड व्हावी यासाठी वातावरणात सूक्ष्म कण सोडले जातात.

अर्थात याचे काही मर्यादित आणि स्थानिक प्रयोग झाले आहेत. मात्र जगातील कोणत्याही भागावर मोठ्या प्रमाणात सोलर जिओइंजिनिअरिंगचा वापर केला जात नाहिये.

युकेसह काही देशांमध्ये अलीकडच्या काही वर्षांमध्ये या तंत्रज्ञानावर संशोधन नक्कीच झालं आहे. या तंत्रज्ञानामुळे वाढत असलेली उष्णता आटोक्यात ठेवण्यास मदत होऊ शकते हे जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आलं आहे.

मग जगाच्या विविध भागांमध्ये होत असलेल्या हवामानाशी निगडीत घटनांमागचं कारण काय आहे?

वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की हवामान बदलामुळे, उष्णतेच्या लाटा किंवा अतिवृष्टी यासारख्या घटना आता पूर्वीपेक्षा अधिक वारंवार आणि अधिक तीव्रतेनं होत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)