बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती 'अत्यंत चिंताजनक' : पक्षाची माहिती

फोटो स्रोत, AFP
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती 'खूपच गंभीर' आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, असं त्यांच्या पक्षाच्या म्हणजेच बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) नेत्यांनी म्हटलं आहे.
80 वर्षीय खालिदा झिया यांना 23 नोव्हेंबर रोजी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना छातीत संसर्ग झाला होता, त्यामुळे त्यांच्या हृदय आणि फुप्फुसांवर परिणाम झाला होता.
त्यांची प्रकृती बिघडल्याने, चार दिवसांनी त्यांना कोरोनरी केअर युनिटमध्ये हलवण्यात आलं होतं.
'टीबीएसन्यूज.नेट' या न्यूज पोर्टलनुसार, बीएनपीचे उपाध्यक्ष अहमद आझम खान म्हणाले की, "खालिदा झिया यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे."
ते म्हणाले की, "ही परिस्थिती खूप गंभीरही म्हणता येईल. यावेळी, संपूर्ण देशाला त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा असं सांगण्याशिवाय दुसरं काहीही बोलण्यासारखं नाही."
खालिदा झिया कोण आहेत?
बांगलादेशाचे राजकारण हे माजी पंतप्रधान शेख हसीना आणि खालिदा झिया यांच्या भोवतीच फिरले आहे.
1991मध्ये बांगलादेशात 20 वर्षांनंतर प्रथमच लोकशाही पद्धतीनं झालेल्या निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या खालिदा झिया यांच्या पक्षानं विजय मिळवला होता.
या विजयामुळेच खालिदा झिया या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या.

फोटो स्रोत, Getty Images
2001 मध्ये त्या पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या आणि 2006 मधल्या निवडणुकीनंतर त्यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागलं.
झिया या बांगलादेशचे माजी राष्ट्रपती झियाऊर रहमान यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप झाले आहेत.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे 2014 सालची निवडणूक त्यांना लढवता आली नव्हती. त्यावेळी बांगलादेशात त्यांच्या समर्थकांनी मोठं आंदोलन केलं होतं.
खालिदा झिया आणि बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टी
1975 साली शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येनंतर बांगलादेशात लष्करी राजवट सुरू झाली. पण 1981 मध्ये लष्करशाह झियाउर रहमान यांचीही हत्या करण्यात आली.
झियाउर हे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात बीएनपी या प्रमुख पक्षाचे नेते होते. त्यांची पत्नी खलिदा झिया या तेव्हा राजकारणापासून दूर होत्या. पण पतीच्या हत्येनंतर पक्ष सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली.

फोटो स्रोत, Getty Images
खालिदा यांनी 1980 च्या दशकात राजकारणात पाऊल टाकलं, तेव्हा त्यांना पक्षांतर्गत गटबाजी आणि पुरुषी वर्चस्ववादाचा सामना करावा लागला, असं अविनाश पलिवल सांगतात. अविनाश हे लंडनच्या सोएस (SOAS) विद्यापीठात रीडर आहेत.
ते सांगतात की खलिदा झिया यांनी सगळ्या आव्हानांवर मात करत पक्षाची बांधणी केली, सामान्य जनतेचा पाठिंबा मिळवला आणि त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. त्यांचं व्यक्तीमत्व हेच त्यांच्या यशाचं एक कारण होतं.
"असं मानलं जातं की नव्वदच्या दशकात पंतप्रधान बनल्यावर खालिदा झिया सुरुवातीला काही काळ आपलं कुटुंब आणि पक्षाच्या निवडक लोकांच्या सल्ल्यानुसार काम करत असत."

फोटो स्रोत, Getty Images
"बीएनपीमध्ये इस्लामी मूलतत्त्ववादी गट आणि बांगलादेशी डाव्या गटांचा प्रभाव होता. त्यांच्याकडे पक्षातल्या वेगवेगळ्या गटांसोबत समन्व आणि संतुलन राखून काम करण्याची क्षमता होती. त्या कमी बोलायच्या आणि शांतपणे काम करणं त्यांना आवडायचं. कदाचित हेच त्यांच्या यशाचं रहस्यही होतं."
खालिदा झिया यांनी 1991 मध्ये देशाचं नेतृत्व स्वीकारल्यावर पाकिस्तानशी जवळीक साधली आणि भारतापासून थोडं अंतर ठेवलं आहे, असं पलिवल यांनी बीबीसीला सांगितलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











