या देशात नाईलाजाने करावा लागतोय क्रेडिट कार्डचा वापर; सावकाराच्या तगाद्याने नागरिक हैराण

नाझ काकर
फोटो कॅप्शन, फॅक्टरी वर्कर नाझ म्हणते की ती तिचा पगार मिळवणे, तिच्या क्रेडिट कार्डची शिल्लक भरणे आणि नंतर पुन्हा कर्जात अडकणे या चक्रात अडकली आहे.
    • Author, ओझगे ओझदेमिर
    • Role, बीबीसी न्यूज तुर्की

"जर क्रेडिट कार्ड वापरता आलं नाही, ईएमआयनं वस्तू विकत घ्यायची सुविधा नसेल तर मला काहीच विकत घेता येणार नाही," असं नाझ ककर म्हणते.

नाझ ही 26 वर्षीय तरुणी तुर्कीतील अशा अनेक लोकांपैकी आहे जिचं आयुष्य आता क्रेडिट कार्डवरच अवलंबून आहे. नाझ ही एका कारखान्यात काम करते.

मार्च महिन्यात तुर्कीतील वार्षिक महागाई दर 68.5 टक्क्यांवर पोचला. अन्न किंवा निवारा यासारख्या मूलभूत गरजांसाठी क्रेडिट कार्डवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या तुर्कीमध्ये वाढत चालली आहे.

"आमचं वेतन घटलं आहे आणि प्रचंड महागाईमुळे आमची क्रयशक्ती कमी झाली आहे," असं नाझ सांगते.

"अगदी साध्या वस्तू विकत घेण्यासाठीसुद्धा आम्हाला दोनदा विचार करावा लागतो."

तुर्कीतील सर्वात मोठ्या कामगार संघटनांपैकी एक असलेल्या डीआयएसके (DISK)नुसार

तुर्कीमधील किमान वेतन दरमहा 17,000 लिरा (524 डॉलर) इतकं आहे. तर दारिद्ररेषेसाठीची मर्यादा दरमहा 25,000 लिरा (768 डॉलर) आहे.

अन्नधान्याच्या वाढत्या किमतीमुळे तुर्कीमधील नागरिकांवरील बोजा वाढतो आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अॅंड डेव्हलपमेंट (ओईसीडी)चा सदस्य असणाऱ्या देशांमध्ये तुर्कीमधील महागाईदर सर्वाधिक आहे. तुर्की मधील महागाईदर वार्षिक 70 टक्क्यांच्या पातळीवर पोचला आहे. ओईसीडीचे सदस्य असणाऱ्या देशांमधील सरासरी महागाई दर 6.7 टक्के आहे. म्हणजेच तुर्की मधील महागाईदर ओईसीडीच्या सरासरी महागाईदराच्या दहापट झाला आहे.

जून 2023 मध्ये महागाईला आटोक्यात आणण्यासाठी तुर्की सरकारनं त्यांचं कमी व्याजदराचं धोरण बाजूला केलं आणि तेव्हापासून तुर्कीमधील अन्नधान्याच्या किंमती तिपटीने वाढल्या आहेत.

नाझ म्हणते वाढतं घरभाडं ही एक त्रासदायक बाब आहे. घरभाड्याची रक्कम दुपटीने वाढल्यामुळे तिला फ्लॅट सोडावा लागला होता.

"मी कल्पना केली होती त्यापेक्षा परिस्थिती कितीतरी अधिक खडतर होत चालली आहे," असं ती म्हणते.

तुर्कीमध्ये अगदी मध्यवर्ती बँकेच्या माजी गव्हर्नर, हाफिज गये एरकान यांनीदेखील इस्तंबूलमध्ये घरभाडे आवाक्यापलीकडे गेले असल्याची तक्रार केली होती.

"आम्हाला घर मिळालेले नाही. इथं घरभाडे प्रचंड वाढलं आहे. आम्ही आमच्या पालकांसोबत राहत आहोत," असं त्यांनी जानेवारी महिन्यात म्हटलं होतं. त्यावेळी, "असं शक्य आहे का की इस्तंबूल शहर मॅनहॅटन पेक्षा महागडं झालं आहे?" असा प्रश्न त्यांनी विचारला होता.

अपारंपारिक आर्थिक धोरण

ऑक्टोबर 2022 मध्ये तुर्कीतील महागाई दर 86 टक्क्यांवर पोचला होता. मागील 24 वर्षातील हा उच्चांकी महागाईदर होता.

वाहतूक, अन्नधान्य आणि गृहनिर्माण क्षेत्रातील किमती सर्वाधिक वाढल्या आहेत.

इन्फ्लेशन रिसर्च ग्रुपमधील स्वतंत्र तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला होता की त्यावेळेस वार्षिक महागाईदर 186.27 टक्के झाला होता.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी महागाई गगनाला भिडलेली असताना देखील व्याजदर कमी ठेवून तुर्कीच्या आर्थिक वाढीला चालना देण्याचे अपारंपारिक धोरण कायम ठेवण्यावर भर दिला आहे.

महागाईला तोंड देण्यासाठी बहुतांश मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवत असताना तुर्कीमधील व्याजदर 10.5 टक्क्यांवर आहेत.

इस्तंबूलमधील बाजारात एक महिला काही किराणा सामान खरेदी करत आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जून 2023 पासून तुर्कीमधील अन्नधान्याच्या किमती तिप्पट झाल्या आहेत
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यामुळेच बॅंकांमधून कर्ज घेणं किंवा क्रेडिट कार्ड अवलंबून राहणं लोकांना अधिक सोयीचं वाटू लागलं आहे. कारण व्याजदर महागाई पेक्षा कमी आहेत. याचाच अर्थ दीर्घकाळात त्यांचं कर्ज आपोआप कमी होत जाणार आहे.

मागील वर्षी इर्दोगान यांची पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर त्यांनी मेहमेत सिमसेक यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक धोरणासाठी नवीन टीम तयार केली. या टीमने आर्थिक धोरणात बदल करण्यास सुरूवात केली आहे.

मार्च महिन्यात मध्यवर्ती बँकेने महागाईला आळा घालण्यासाठी अनपेक्षितपणे व्याजदरात 500 बेसिस पॉइंटची वाढ केली होती.

सिमसेक यांनी अलीकडेच क्रेडिट कार्ड्सवरदेखील नियमन आणण्याचे संकेत दिले होते. क्रेडिट कार्डच्या वापरावर बंधने घालण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले होते.

"इतरांच्या पैशांद्वारे म्हणजे कर्ज किंवा क्रेडिट कार्डद्वारे सुबत्ता निर्माण करता येत नाही," असं ते म्हणाले होते.

2023 मध्ये क्रेडिट कार्डचं कर्ज 2.5 पटीने वाढलं होतं. या कर्जाने 1 ट्रिलियन लिरा (34 अब्ज डॉलर्स) चा टप्पा ओलांडून नवी विक्रमी पातळी गाठली होती.

तुर्कीमधील सुपरमार्केट्स आणि शॉपिंग मॉलमध्ये अन्न आणि खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी एकूण 2.5 ट्रिलियन लिरा (72 अब्ज डॉलर्स) ची रक्कम क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च करण्यात आली होती.

विश्लेषक आणि बॅंकिंग क्षेत्रातील अधिकाऱ्यांना लवकरच क्रेडिट कार्डच्या वापरावर बंधनं येण्याची शक्यता वाटते आहे. कारण यावर सध्यापुरतेतरी आळा घालण्याचे संकेत सरकारकडून मिळत आहेत.

दुष्टचक्रात अडकलेली तुर्की जनता

"प्रदीर्घ काळासाठी व्याजदर कमी राहिल्यामुळे दुसऱ्या कार्डमधून कॅश काढणे किंवा क्रेडिट कार्डचं कर्ज किंवा बिलांची परतफेड करण्यासाठी पर्सनल लोन घेणं यासारख्या गोष्टी वाढल्या आहेत," असं अर्थतज्ज्ञ बिनहान एलिफ यिलमाझ म्हणतात.

गरजांची पूर्तता करण्यासाठी लोक अधिक कर्ज घेत आहेत आणि यातून ते दुष्टचक्रात अडकत असल्याची बाब त्या लक्षात आणून देतात.

अलीकडेच व्याजदर वाढल्यामुळे क्रेडिट कार्ड वर अवलंबून असणाऱ्या लोकांवरील कर्जाचा भार वाढला आहे.

एटीएममधून पैसे काढणारे लोक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्याजदरात नुकत्याच झालेल्या वाढीमुळे क्रेडिट कार्डवर अवलंबून असलेल्या लोकांवर कर्जाचा बोजा वाढला आहे

वर्षभरात अन्नधान्य, खाद्य पदार्थांच्या किंमती तिपटीने वाढल्या आहेत आणि अलीकडेच वाढलेल्या व्याजदरांमुळे कर्जाचा बोझा वाढला आहे. अशा परिस्थितीत अनेकजण कडक पतधोरणाच्या तडाख्यात सापडले आहेत, ही बाब त्या लक्षात आणून देतात.

"सर्वसामान्य माणसं आणि कंपन्या कर्जाच्या विळख्यात सापडल्या आहेत आणि दीर्घकाळासाठी राहणाऱ्या महागाईला तोंड देण्याच्या तयारीत ते नाहीत," असं त्या म्हणतात. त्या पुढे सांगतात, क्रेडिट कार्डवर व्याजमुक्त हफ्त्यांचा पर्याय मिळत असल्यामुळं लोक क्रेडिट कार्डचा वापर करून वस्तू विकत घेत आहेत.

तुर्कीमधील मध्यमवर्गाची संख्या कमी होते आहे, अशी चेतावनी त्या देतात. त्याचबरोबर क्रेडिट कार्डच्या वापरावर बंधनं घालण्याऐवजी उत्पन्नाचे योग्य प्रमाणात वाटप करून कमी उत्पन्न गटातील लोकांना आधार द्यावा असे त्या सरकारला आवाहन करतात.

कर्जपरतफेडीचा वाढता दबाव

"गरजेच्या वस्तू विकत घेण्याची क्षमता नसल्यामुळं क्रेडिट कार्डचा वापर करण्याची आवश्यकता निर्माण होते," असं नाझ म्हणते.

"कर्ज नसलेली व्यक्ती सापडणं कठीण आहे. मग ते कारखान्यात असो की माझ्या परिचितांमध्ये असो."

लवकरच नाझचं लग्न होणार आहे आणि ती म्हणते घरातील नवीन वस्तू विकत घेण्यासाठी म्हणून तिने क्रेडिट कार्ड वापर केला आहे. तिच्या क्रेडिट कार्डवरील कर्ज बहुतांश या खरेदीमुळेच आहे.

क्रेडिट कार्ड नसतं तर ती यातील कोणतीही वस्तू विकत घेऊ शकली नसती. मासिक हफ्त्याने मिळणाऱ्या वस्तूच ती फक्त विकत घेऊ शकते, असं नाझ सांगते.

डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये विक्री करत असलेली एक महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संपूर्ण तुर्कीमधील बरेच लोक केवळ क्लिअरन्स सेलच्या काळात किंवा सीझनच्या शेवटी खरेदी करण्यास प्राधान्य देतात

तुर्कीमधील बहुतांश लोक बाजारात सेल असल्यावर किंवा खरेदीचा हंगाम सरताना असणारे सेल किंवा स्टॉक क्लिअरन्स सेलमधून वस्तू विकत घेण्यास प्राधान्य देतात.

जरी सध्या व्याजदर वाढलेले असले तरी अजूनही लोकांना क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करणंच सोयीचं वाटतं आहे, असं नाझला वाटतं.

"मला माहीत आहे की वस्तूंच्या किमती आणखी वाढतील. जर एखादी वस्तू विकत घेण्यासाठी आपण वाट पाहत राहिलो तर दरम्यानच्या काळात त्या वस्तूंच्या किंमतीत वाढ होईल. त्यामुळेच ते क्रेडिट कार्डचा वापर करून वस्तू विकत घेत आहेत," असं नाझ पुढे म्हणते.

मात्र क्रेडिट कार्ड सातत्याने वापर केल्यामुळे नाझ एका दुष्टचक्रात अडकली आहे. हे दुष्टचक्र म्हणजे पगार झाला की क्रेडिट कार्डचं बिल भरायचं आणि मग पुन्हा एकदा क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करायची.

"प्रत्येकावरच क्रेडिट कार्डचं कर्ज आहे आणि ते त्यांना भरायचं आहे. जसजशी व्याजदरात वाढ होते आहे तसतसं हा दबाव वाढतच चालला आहे." असं नाझ म्हणाली.