वीरप्पनला जिवंत पकडू पाहणाऱ्या अधिकाऱ्याचं जेव्हा वीरप्पनने मुंडकं छाटलं आणि आठवण म्हणून ठेवून घेतलं

फोटो स्रोत, TWITTER/SURENDER MEHRA IFS
- Author, जयदीप वसंत
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
टीप : काही मजकूर वाचकांना विचलित करू शकतो.
“मला श्रीनिवासनच्या छातीतून रक्त उसळताना पाहायचं होतं. त्याला काही कळायच्या आधीच मी त्याची बंदूक घेऊन गोळी झाडली. त्याचं शीर छाटलं आणि हातही. याच हातांना माझ्यावर मशीन गन रोखायची होती, मी त्याचं डोकं आठवण म्हणून ठेवून घेतलं.”
हस्तीदंत आणि चंदनाची तस्करी करणारा कुख्यात डाकू वीरप्पनच्या तोंडून हे शब्द निघाले वन अधिकारी (भारतीन वन सेवेतील) पंडिलापल्ली श्रीनिवास यांच्या हत्येनंतर.
श्रीनिवास आणि वीरप्पन यांची अखेरची भेट 1991 साली झाली. पण त्याच्या पाच वर्षांपूर्वी या दोघांचा आमनासामना झाला होता. आपल्या बहिणीच्या मृत्यूसाठी वीरप्पन श्रीनिवास यांना जबाबदार धरत होता, त्यामुळे तो व्यक्तिगत राग त्याच्या मनात होता.
श्रीनिवास यांनी आपल्या कर्तव्याप्रति दाखवलेल्या निष्ठेखातर त्यांना ‘कीर्ती चक्र’ हा भारतातील दुसरा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार प्रदान केला गेला.
मृत्यूच्या पाच वर्षांपूर्वीची भेट
नोव्हेंबर-1986 मध्ये कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे 'सार्क' (साउथ एशियन असोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन) ची बैठक होत होती. श्रीलंकेचे राष्ट्रपती जे. जयवर्धने येणार होते, त्यामुळे विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. या बाजूला श्रीलंकेतील तमिळ अतिरेकी संघटना एलटीटीईने डोकं वर काढायला सुरुवात केली होती.
कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाप्रमाणेच पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. संशयितांची धरपकड सुरू होती. अशा वेळी बंगळुरूमधील बस स्थानकाजवळ एक संशयित थांबला होता. 'तुझं नाव काय आहे?', 'कुठून आलात?', 'बंगलोरला का आलात?', 'कुठे उतरलात?' इत्यादी मुलभूत प्रश्नांची त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.
शिवाय त्याला कन्नड भाषा येत नसल्याने त्याला ताब्यात घेऊन जयनगर पोलीस ठाण्यात पाठवलं गेलं. चौकशीत त्याची वीरप्पन अशी ओळख पटली.

फोटो स्रोत, Getty Images
वीरप्पनचा जन्म कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील गोपीनाथम गावात एका गरीब कुटुंबात झाला. हे गाव चंदनाची झाडं आणि हत्तींच्या कळपांनी वेढलेल्या जंगलांच्या मधोमध वसलेलं आहे. हीच चंदनाची झाडं आणि हत्ती नंतर वीरप्पनच्या ओळखीचा भाग बनणार होती.
तामिळनाडूच्या सीमेवर वसलेलं असल्याने वीरप्पन आणि त्याची टोळी एका राज्यात गुन्हे करून दुसऱ्या राज्यात पळून जायची, त्यांच्या कारवायांबद्दल माहिती होती, पण त्यांना अटक होऊ शकली नाही. कर्नाटक आणि तामिळनाडू पोलिसांना बऱ्याच कालावधीनंतर चूक लक्षात आली आणि त्यांनी संयुक्त विशेष कार्य दलाची स्थापना केली.
1972 मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा मंजूर झाल्यानंतर, अनियंत्रित हत्तींच्या शिकारीला आळा घालण्यात आला. वीरप्पनचा प्रतिस्पर्धी तस्करीच्या व्यवसायातून निवृत्त झाला, आता वीरप्पनला मैदान मोकळं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
चामराजनगर येथे तैनात वनपरिक्षेत्र अधिकारी पी. श्रीनिवास यांनी वीरप्पन, त्याच्या कारवाया, त्याचे संपर्क यावर खूप माहिती गोळा केलेली होती.
त्यामुळे वीरप्पनची केस श्रीनिवास यांच्याकडे सोपवण्यात आली. वीरप्पनचं कथित चंदन तस्करीचं जाळं, त्याची शिकार करण्याच्या पद्धती, त्याचे ग्राहक, गोदामं यांच्यावर छापेमारी सुरू झाली. सुमारे महिनाभर या कारवाया सुरू होत्या.
वीरप्पनची अटक औपचारिकरीत्या दाखवण्यात आली नाही, कारण तसे केल्यास त्याला वैधानिक तरतुदीनुसार न्यायालयात हजर राहणे भाग पडले असते. फॉरेस्ट सेलने वीरप्पनचा ताबा घेतला होता.
बोडीपडगा येथील फॉरेस्ट गेस्ट हाऊसमध्ये पोलीस हवालदार आणि वनरक्षक वीरप्पनवर लक्ष ठेवून होते.
एके दिवशी श्रीनिवास काही कामासाठी बाहेर गेले होते. पहाऱ्यावरच्या पोलिसांनी ढीलाई दाखवल्याने वीरप्पन पळून जाण्यात यशस्वी झाला.
वीरप्पनच्या अटकेच्या आणि पलायनाच्या प्रकरणावर पत्रकार सुनाद रघुराम यांनी लिहीले आहे. वीरप्पनच्या जीवनावर त्यांनी विस्तृत संशोधनही केलं आहे, त्यांनी त्यांच्या 'वीरप्पन: इंडियाज मोस्ट वॉन्टेड मॅन' (पृष्ठ क्रमांक 35-37) या पुस्तकात त्यांनी यावर लिहिलं आहे.
श्रीनिवास विरुद्ध वीरप्पन
तत्कालीन आंध्र प्रदेश सरकारने श्रीनिवास यांच्या जीवनावर प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकानुसार, पी. श्रीनिवास यांचा जन्म 12 सप्टेंबर 1954 रोजी तत्कालीन आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे झाला.
श्रीनिवास 1976 मध्ये आंध्र प्रदेश विद्यापीठातून लाइफ सायन्समध्ये सुवर्णपदकासह उत्तीर्ण झाले. सन 1979 मध्ये ते भारतीय वन सेवेत उत्तीर्ण झाले. चामराजनगर येथे सहाय्यक वनसंरक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि नंतर ते उप वनसंरक्षक झाले.
त्यांनी चंदन तस्करांची नावं, फोटो, गाव, वय, टोळ्या, पुरवठादार अशी माहिती गोळा करायला सुरुवात केली. जंगलातील दळणवळण सुधारण्यासाठी वनविभाग आणि पोलीस यांच्याकडून वायरलेसचं जाळं पसरवलं गेलं. माहिती कमीत कमी वेळात मिळवण्यात याचा फायदा होऊ लागला.

फोटो स्रोत, Getty Images
माध्यमांमध्ये बातम्या आल्या की वीरप्पनबद्दल माहिती देण्यासाठी वनविभाग, पोलीस किंवा विशेष टास्क फोर्सच्या कर्मचार्यांकडून काही वेळा गावकऱ्यांचा छळ करण्यात आला, ज्यामुळे ते वीरप्पनकडे आकर्षित झाले.
मात्र, वीरप्पननेही एखादा माणूस वनखात्याचा किंवा पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून त्याचं डोकं छाटून गावातच त्याला फासावर लटकवण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांप्रमाणेच वीरप्पनलाही आसपासची जंगलं, तिथल्या नद्या, नाले, प्राणी-पक्षी, वनस्पती आणि वनौषधींबद्दल खडान् खडा माहिती होती. त्यामुळे तो एसटीएफला मात देऊ शकला. ही जंगलं इतकी घनदाट होती की काही ठिकाणी सूर्यप्रकाश कधी पोहोचलाच नसेल ना कुठल्या बाहेरच्या माणसाने पाऊल ठेवलं असेल.
रघुराम लिहितात की 1987 मध्ये, श्रीनिवास यांची कर्नाटकातील कॉफीसाठी प्रसिद्ध असलेल्या चिकमंगळूर भागात बदली झाली. पण वीरप्पनला गाठण्याची त्यांची उर्मी तशीच होती. ते अध्येमध्ये बसने चामराजनगर गाठायचे आणि नवीन खबरी तयार करायचे. आपल्या तपासाला आणि कारवायांसाठी पूरक माहिती मिळवायचे.
श्रीनिवास वि. वीरप्पन आणि रॉबिनहूड
तत्कालीन आंध्र प्रदेश वन विभागाने वनसंपत्तीचं रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ 'वन शहीद' हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. बी.आर. रेड्डी यांनी संपादित केलेल्या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 34 वर नमूद केल्याप्रमाणे, श्रीनिवास यांना विशेष प्रशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्यात आलं.
एप्रिल - 1990 मध्ये वीरप्पनने त्याचा पाठलाग करणाऱ्या तीन पोलिसांवर आणि एका हवालदारावर हल्ला केला. या घटनेनंतर कर्नाटक आणि तामिळनाडू सरकारने संयुक्त टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय घेतला. या टास्क फोर्ससाठी श्रीनिवास यांची निवड झाली आणि ते भारतात परतले आणि मे - 1990 मध्ये या टास्क फोर्समध्ये सामील झाले.
स्थानिकांमध्ये वीरप्पनची प्रतिमा 'रॉबिनहूड'सारखी होती. गोष्टींमधलं असं एक पात्र जे श्रीमंतांना लुटून किंवा तस्करी करून गरिबांना मदत करतं. यासाठी तरुणांना वीरप्पनच्या टोळीत सामील व्हायचं होतं. वीरप्पनच्या लोकांना माहिती पुरवणे, त्यांच्या हालचाली गुप्त ठेवणे आणि त्यांना वस्तू पुरवण्याचे काम करत असत.

फोटो स्रोत, Getty Images
रघुराम त्यांच्या पुस्तकाच्या तिसर्या प्रकरणात लिहितात की मूलभूत सेवा आणि आर्थिक संधींच्या अभावामुळे लोक वीरप्पनला सहकार्य करू लागल्याचं श्रीनिवास यांच्या लक्षात आलं. ज्यामुळे लोक वीरप्पनला अप्रत्यक्षपणे समर्थन देऊ लागले किंवा थेट त्यांच्या टोळीत सामील झाले.
गावकऱ्यांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी वनोत्पादनं विकणाऱ्या छोट्या सहकारी संस्था स्थापन केल्या. त्यांनी आपल्या गावांमधील पाणीपुरवठा आणि मलनिःसारण व्यवस्था सुधारली.
श्रीनिवास यांना हिंसेऐवजी अहिंसेच्या मार्गाने शस्त्र खाली ठेवून घ्यायची होती. श्रीनिवास यांनी वीरप्पनच्या गावात दवाखाना सुरू केला. राजमुंद्री येथील त्यांच्या आजोबांकडून शिकलेल्या आयुर्वेदाच्या शिकवणीच्या आधारे ते गावकऱ्यांवर सर्दी, खोकला, ताप आणि अतिसारावर उपचार करायचे. गरज पडल्यास ते आपल्या स्वतःच्या खिशातून आणि मित्रमंडळींकडून मदत घेऊनही खर्च करत असत.
आजही अनेक गावकर्यांचं म्हणणं आहे की आजारी पडल्यास श्रीनिवास त्यांना त्यांच्या जीपमधून जवळच्या रुग्णालयात घेऊन जायचे किंवा गरोदर महिलांना सुखरूप बाळंतपणासाठी मदत करायचे.
वीरप्पनच्या टोळीतील सुमारे 20 जणांनी आत्मसमर्पण केलं होतं. ते श्रीनिवास यांच्यासोबत त्यांच्याच गोपीनाथम गावामध्ये राहत होते. यात वीरप्पनची पत्नी मुत्तूलक्ष्मी, भाऊ अर्जुनन, बहीण यांच्यासह अनेक जुने आणि विश्वासू मित्रही होते.

फोटो स्रोत, Reuters
वीरप्पनची पत्नी मुत्तूलक्ष्मी म्हणते की, "तो अजिबात चांगला माणूस नव्हता, तो चांगला असल्याचा आव आणत होता. गावकरी वीरप्पनला देवासारखे का वागवतात हे जाणून घेण्यासाठी तो या गावात आला होता. त्याला वाटले की, वीरप्पन जे काही करतो ते मी केले तर, गावकरी वीरप्पनवर विश्वास ठेवतील की माझ्यावर? हे माझ्या पतीला खूप त्रासदायक होते."
रघुराम लिहितात की श्रीनिवास यांनी मरिअम्मा मंदिर पुन्हा बांधून घेतलं आणि तेथील पुजारी आणि कर्मचाऱ्यांना पगार मिळत राहावा यासाठी तीन लाख रुपयांची अनामत रक्कमही जमा केली होती.
द्वेषात वाढ?
श्रीनिवासने विरप्पनची बहिण मरियम्माला त्याच्या दवाखान्यात काम दिलं. तिचा नवरा तुरुंगात होता आणि तिला तीन मुलं होती. मरियम्मा पाणी गरम करणं, औषधाच्या गोळ्या करणे अशी कामं करायची. ती वीरप्पनची सर्वांत लाडकी बहीण होती.
श्रीनिवास हे स्पेशल टास्क फोर्सचे सर्वेसर्वा होते. आपण वीरप्पनला शरण आणू शकू असा त्यांना विश्वास होता. त्यामुळेच त्यांनी सहकाऱ्यांची अटक सरकारी रेकॉर्डमध्ये दाखवली नाही. ते श्रीनिवास यांच्यासोबत राहून मुक्तपणे संचार करत होते.
एकदा टास्क फोर्सने वीरप्पनला पकडण्यासाठी त्याच्या गावाला वेढा घातला. श्रीनिवासन यांच्या टास्क फोर्सला वीरप्पनवर गोळीबार न करण्याच्या सक्त सूचना होत्या.
पण यामुळे टास्क फोर्सच्या जवानांमध्ये श्रीनिवास यांच्याबद्दल राग होता. जवान पोलीस विभागाचे आणि श्रीनिवास वन विभागाचे होते. पोलिसांना प्रोटोकॉलप्रमाणे श्रीनिवास यांच्याकडे अहवाल सादर लागला.
एसटीएफमध्ये 'टायगर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक कुमारच्या म्हणण्यानुसार, "संध्याकाळी 6-7 च्या सुमारास जेव्हा गावकऱ्यांनी श्रीनिवास आणि मरियम्मा यांना जीपमधून एकत्र जाताना पाहिलं तेव्हा कॉन्स्टेबल सुधनने दोघांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू केली."

फोटो स्रोत, Getty Images
स्पेशल टास्क फोर्सला काही काळापासून वीरप्पनविरुद्ध कोणतेही विशेष यश मिळाले नव्हते. STF कमांडंटने गोपीनाथमच्या रहिवाशांना अटक केली. एका अलिखित कराराचा हा भंग असल्याने गोपीनाथममध्ये श्रीनिवास यांच्याबद्दल प्रचंड नाराजी पसरली होती.
वीरप्पनची पत्नी मुथ्थूलक्ष्मी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेली, मरियम्माने तिला मदत केल्याचा आरोप झाला. यामुळे श्रीनिवास प्रचंड संतापले.
रघुराम त्यांच्या पुस्तकात लिहितात की, जर मरियम्माने मुथुलक्ष्मीबद्दलची सर्व माहिती उघड केली नाही, तर तिला विवस्त्र करून विजेचे झटके दिले जाण्याची धमकी मिळत असे. हे ऐकून मरियम घाबरली.
मुथ्थूलक्ष्मीच्या म्हणण्यानुसार, "वीरप्पनने आपल्या बहिणीला लिहिले की, जर तुला श्रीनिवास आता भेटला तर त्याच्यावर गरम तेल ओतून ठार मार. अन्यथा तू माझी बहीण नाहीस."
त्याच्या काही दिवसांमध्यच मरियम्माने आत्महत्या केली. त्यामुळे वीरप्पन भडकला.
तत्कालीन वन अधिकारी बीके सिंह यांच्या म्हणण्यानुसार, "एसटीएफचे लोक वीरप्पनशी संबंधित एकही प्रकरण सोडवू शकले नाहीत, तर दुसरीकडे श्रीनिवासने एकट्याने 22 लोकांना आत्मसमर्पण करायला लावले."
शेवटचा अंक आणि श्रीनिवास यांचा अंत
तिकडे अर्जुननची तुरुंगातून सुटका करण्यासाठी श्रीनिवासने त्याच्या वैयक्तिक संबंधांचा वापर केला. 12 सप्टेंबर 1991 रोजी श्रीनिवास यांनी त्यांचा 37 वा वाढदिवस साजरा केला. मरियम्माच्या मृत्यूमुळे वीरप्पन खूप संतापला होता. पण श्रीनिवासला याची माहिती नव्हती.
एसटीएफमधील त्यांचा कार्यकाळ संपला होता, परंतु अर्जुनन परतल्यावर काही चांगली बातमी घेऊन येईल अशी श्रीनिवास यांना आशा होती. त्यामुळे त्यांनी वरिष्ठांकडे 15 दिवसांची मुदत मागितली.
श्रीनिवासला दिलेल्या कीर्तिचक्रातील मजकुरानुसार, एके दिवशी श्रीनिवास काली मंदिरात पूजा करत असताना अर्जुनन आला आणि त्याने श्रीनिवासला सांगितले की वीरप्पन शस्त्रं खाली ठेवू इच्छितो. श्रीनिवाससोबत एकही पोलिस नसावा, अशी अट त्यांनी घातली. 9 नोव्हेंबरच्या पहाटे निःशस्त्र श्रीनिवास अर्जुननसह गोपीनाथमहून निघाले.
सुमारे सहा किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर अर्जुनन एका झर्याच्या काठावर विश्रांती घेण्यासाठी थांबण्यास सांगितले. वीरप्पनच्या टोळीचा सदस्य कोलांडी याने त्याच्यावर गोळी झाडली. वीरप्पन आणि श्रीनिवासन या नाट्यातला हा शेवटचा अंक उलगडत असताना, वीरप्पनने त्याचाच भाऊ अर्जुननचा उपयोग केला आणि आपल्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेतला.
श्रीनिवास यांच्या शरीरावर पेट्रोल टाकून आग लावण्यात आली. त्याचं डोकं आणि हात दोन्ही छाटले गेले. वीरप्पनने आपल्या गावात, वनविभागात आणि विशेष टास्क फोर्समध्ये एक उदाहरण घालून देण्याचा प्रयत्न केला. रघुराम आपल्या पुस्तकात लिहितात की मुथ्थूलक्ष्मीने श्रीनिवास यांच्या डोक्यावर लाथ मारली.
दि. 18 ऑक्टोबर 2004 रोजी वीरप्पन आणि इतर तीन साथीदारांना तामिळनाडू पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने कंठस्नान घातलं. वीरप्पनला पकडण्यासाठी हजारो लोकांना कामी लावत कोट्यावधी रुपये खर्च झाले होते.
वीरप्पनच्या मुसक्या आवळल्याने दोन्ही राज्यातील अनेक नेत्यांच्या रहस्यावर कायमचा पडदा पडला, असंही काहींचं म्हणणं आहे.
उच्च न्यायालयात या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची मागणी झाली. वीरप्पन आणि त्याच्या टोळीवर सुमारे दोन हजार नर हत्तींची शिकार, 40 हजार किलोग्रॅम चंदनाची तस्करी, 124 लोकांची - ज्यापैकी निम्मे वन कर्मचारी किंवा पोलीस होते - हत्या असे अनेक आरोप आहेत.
याशिवाय कन्नड चित्रपट अभिनेते राजकुमार यांचे अपहरण वीरप्पनच्याच लोकांनी केल्याचंही उच्च न्यायालयाला सांगण्यात आलं. पण सीबीआयच्या तपासात याचे पुरावे मिळाले नाही.
मुथुलक्ष्मी, बीके सिंग आणि अशोक कुमार यांची वक्तव्ये 'द हंट फॉर वीरप्पन' या डॉक्युसिरीजवर आधारित आहेत.
हे ही पाहिलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








