एका गँगस्टरला तुरुंगात हलवण्यासाठी लष्कर रस्त्यावर, रणगाडे-हजारो सशस्त्र सैनिकांचा बंदोबस्त

गँगस्टर फिटो

फोटो स्रोत, reuters

फोटो कॅप्शन, गँगस्टर फिटो
    • Author, अँटिओनेट रॅडफोर्ड
    • Role, बीबीसी न्यूज

इक्वाडोर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका कुख्यात गँगस्टरला दुसऱ्या तुरुंगात हलवण्यासाठी एक मोहीम राबवण्यात आली.

या पार्श्वभूमीवर इक्वाडोरच्या रस्त्यावर 13 ऑगस्ट पहाटेपासून कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये लष्करी रणगाडे, हजारो सशस्त्र सैनिक आणि पोलिसांचा समावेश होता.

'फिटो' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गँगस्टरचं पूर्ण नाव जोस अडोल्फो मॅकियास असं आहे.

येथील मूव्हिमेंटो कॉन्स्ट्रुए पक्षाशी संबंधित राष्ट्रपतिपदाचे उमेदवार फर्नांडो व्हिलाव्हिसेन्सिओ यांचा बुधवारी (9 ऑगस्ट) रोजी गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

या प्रकरणात फर्नांडो यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिटोवर आहे.

9 ऑगस्ट रोजी आयोजित एका प्रचारसभेदरम्यान फर्नांडो यांच्या डोक्यात हल्लेखोराने 3 गोळ्या झाडल्या होत्या. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आपल्या हत्येपूर्वी फर्नांडो यांनी आपल्याला मिळत असलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांबाबत माहिती दिली होती.

प्रचारादरम्यान लॉस चोनेरोस गँगचा उल्लेख केल्यास संपवण्यात येईल, अशी धमकी मिळत असल्याचं फर्नांडो यांनी म्हटलं होतं.

फर्नांडो व्हिलाव्हिसेन्सिओ हे येथील भ्रष्टाचारविरोधी नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी येथील कोलंबियन आणि मेक्सिकन ड्रग्ज कार्टेलवर निशाणा साधला होता.

सुरुवातीला एक शोध पत्रकार म्हणून कार्यरत असलेल्या फर्नांडो यांनी नंतरच्या काळात राजकारणात प्रवेश केला होता.

त्यांनी पुढे अनेक दशके ड्रग्स, गँगवॉर आणि भ्रष्टाचार यांच्याविरुद्ध मोहिम उघडली होती.

गँगस्टर फिटो

फोटो स्रोत, REUTERS

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इक्वाडोरमध्ये गेल्या काही वर्षांत ड्रग्ज रॅकेटमुळे गुन्हेगारी वाढली आहे. त्याविरोधात ते सतत आवाज उठवत होते.

यंदाच्या निवडणुकीत फर्नांडो व्हिलाव्हिसेन्सिओ यांच्या मूव्हिमेंटो कॉन्स्ट्रुए पक्षाकडून त्यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देण्यात आली होती.

मात्र, त्यांच्या हत्येनंतर आता आंद्रिया गोन्झालेझ यांना पक्षाने अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं आहे.

आंद्रिया गोन्झालेझ यांनी आपल्या कारकिर्दीत प्रामुख्याने पर्यावरणीय मुद्द्यांवर काम केलेलं आहे. व्हिलाव्हिसेन्सियो यांच्या वारसदार म्हणून त्या योग्य काम करतील, असं पक्षाने म्हटलं आहे.

दरम्यान, फर्नांडो यांच्या विधवा पत्नी व्हेरोनिका सरोझ यांनी आपल्या पतीच्या मृत्यूसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला.

तसंच फर्नांडो यांच्या जागी आंद्रिया गोन्झालेझ यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षाच्या निर्णयावरही त्या नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.

फर्नांडो व्हिलाव्हिसेन्सिओ यांची मोहीम भ्रष्टाचार आणि ड्रग्ज यांच्या विरोधात होती.

त्यांनी इक्वाडोरमधील सरकारी अधिकारी आणि संघटित गुन्हेगारी यांच्यात संबंध असल्याचे आरोप केले होते.

हत्येच्या आदल्या दिवशी फर्नांडो यांनी माजी अध्यक्ष राफेल कोरिया यांनी केलेल्या तेल करारातील कथित अनियमिततेबद्दल तक्रारही दाखल केली होती.

फर्नांडो व्हिलाव्हिसेन्सिओ यांच्या हत्येप्रकरणी सहा कोलंबियन लोकांना अटक करण्यात आली आहे, तर सातवा गोळीबारात मारला गेला.

फर्नांडो यांच्या हत्येची सुपारी कुणी दिली. हा कट कशा प्रकारे रचण्यात आला, याबाबत कोणतीही माहिती येथील अधिकाऱ्यांनी अद्याप दिलेली नाही.

तर गँगस्टर फिटो हा येथील ग्वायाकिल तुरुंगात 2011 पासून कैदेत आहे.

इक्वाडोरच्या सुरक्षा दलाने आज प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओंमध्ये त्याला दुसऱ्या एका तुरुंगात हलवण्यात येत असल्याचं दिसून येतं.

यामध्ये तो केवळ चड्डी घातलेल्या अवस्थेत आहे. त्याच्या हातात बेड्या असून चारही बाजूंनी सुरक्षारक्षकांची गर्दी आहे.

इक्वाडोरचे अध्यक्ष गिलेर्मो लासो यांच्या माहितीनुसार, गँगस्टर फिटो याला आता रोका तुरुंगात हलवण्यात आलेलं आहे. या तुरुंगाला 150 सशस्त्र सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)