गांजाची तस्करी, भारतीय तरूणाला सिंंगापूरमध्ये फाशी आणि न सुटलेले काही प्रश्न

फोटो स्रोत, TRANSFORMATIVE JUSTICE COLLECTIVE
सिंगापूरमध्ये कथितरित्या गांजाची तस्करी करणाऱ्या एका तमीळ व्यक्तीस फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, त्याचं कुटुंब, मानवाधिकार कार्यकर्ते आणि संयुक्त राष्ट्रसंघाने शिक्षेतून माफी देण्याची मागणी करुनही संबंधित तरुणाला ही शिक्षा देण्यात आल्याने त्याची चर्चा होत आहे.
तंगराजू सुपिया असं शिक्षा मिळालेल्या व्यक्तीचं नाव असून तो 46 वर्षांचा होता. तंगराजूला बुधवारी (26 एप्रिल) पहाटे फासावर लटकवण्यात आलं.
मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या मते, तंगराजूला सबळ पुरावे प्राप्त झालेले नसतानाही दोषी ठरवण्यात आलं. तसंच खटल्याच्या सुनावणीवेळी त्याला पुरेशी कायदेशीर मदतही मिळू शकली नाही.
दुसरीकडे, सिंगापूरच्या प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळून लावले असून तंगराजूला आवश्यक कायदेशीर मदत पुरवण्यात आल्याचं म्हटलं आहे.
सिंगापूरधील अंमली पदार्थविरोधी कायदे हे जगातील इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कठोर असे आहेत.
सिंगापूर सरकारच्या मते, या कायद्याची त्यांना आवश्यकता असून दक्षिण-पूर्वे आशियातील प्रमुख समस्यांपैकी एक असलेल्या अंमली पदार्थांच्या व्यापाराचा बिमोड करण्यासाठी हे कायदे बनवण्यात आल्याचा युक्तिवाद त्यांच्यामार्फत केला जातो.
बुधवारी (26 एप्रिल) पहाटे फाशीची शिक्षा अंमलात आणल्यानंतर तंगराजूचा मृतदेह मिळवण्यासाठी त्याचे कुटुंबीय चांगी तुरुंगासमोर जमले होते.
या प्रकरणात न्याय मिळवल्याशिवाय, आम्ही शांत बसणार नाही, असं मृत्यूदंडविरोधी कार्यकर्ते कर्स्टन हान यांनी बीबीसीशी बोलताना यावेळी म्हटलं.
ते म्हणाले, “या प्रकरणात बरेच न सुटलेले प्रश्न आहेत. पुराव्यांबाबतही साशंकता आहे. हा त्यांच्यासाठी हा खूप त्रासदायक अनुभव आहे."
गेल्या वर्षी सिंगापूरमध्ये 11 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
या सर्व शिक्षा अंमली पदार्थांच्या तस्करीच्या गुन्ह्याअंतर्गतच देण्यात आल्या. यामध्ये तीन चमचे हेरॉइनची तस्करी करण्याचा आरोप असलेल्या मानसिकरित्या दुर्बल असलेल्या व्यक्तीचाही समावेश होता.
देशातील अंमली पदार्थ विरोधी कायदा आणि फाशीची शिक्षा यांच्यामुळे एक प्रगत राष्ट्राच्या प्रतिमेसाठी ते विरोधाभास बनलं आहे, असं मानवाधिकार कार्यकर्ते म्हणतात.

फोटो स्रोत, EPA
सिंगापूरचा शेजारी देश असलेल्या मलेशियाने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला फाशीची शिक्षा रद्द केली. गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने ही शिक्षा फारशी उपयुक्त नाही, असं कारण यामागे देण्यात आलं.
दुसरीकडे, जगातील अनेक देशांमध्ये गांजा हा पदार्थ गुन्हेगारीतून हटवण्यात आलेला आहे.
सिंगापूरशेजारच्याच थायलंडमध्ये याच्या व्यवसायाला प्रोत्साहन दिलं जातं.
ट्रान्सफॉर्मेटिव्ह जस्टिस कलेक्टिव्ह नामक एका स्थानिक संघटनेने याबाबत म्हटलं, “आपला देश ज्या पदार्थासाठी लोकांना फाशी देत आहे, त्या पदार्थाचा आस्वाद शेजारच्या देशामध्ये अन्न आणि पेयांमध्ये घेतला जातो. तसंच त्याचा वैद्यकीय फायद्यासाठी वापर करत आहेत. त्यामुळे आपला देश लोकांना फासावर लटवत असलेलं पाहणं, अतर्क्य आहे.”
सिंगापूरच्या कोर्टात मंगळवारी तंगराजू सुप्पियाच्या कुटुंबीयांनी शिक्षेविरुद्ध याचिकाही केली होती. पण ही याचिका फेटाळून लावण्यात आली.
याचिकाकर्त्यांनी सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्ष हलिमा याकोब यांच्याकडे पुनर्विचार याचिकाही दाखल केली.
ब्रिटीश मानवाधिकार कार्यकर्ते रिचर्ड ब्रॅन्सन यांनीही यासाठी आवाज उठवला होता.
सोबतच, संयुक्त राष्ट्र संघटनेतील मानवाधिकार कार्यालयाने मंगळवारी सिंगापूरला या शिक्षेबाबत पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं होतं. ही शिक्षा आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करते, असंही त्यांनी म्हटलं होतं.
तंगाराजू सुप्पियाला 2013 मध्ये मलेशियातून ते सिंगापूरमध्ये सुमारे 1 किलो (35 औंस) गांजा आणण्याचं षडयंत्र केल्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलं होतं.
विशेष म्हणजे, तंगराजू हा अंमली पदार्थांची तस्करी करताना किंवा जवळ बाळगलेल्या स्थितीत आढळून आला नव्हता.
परंतु, त्याला या प्रकरणात समन्वय साधल्याच्या आरोपाखाली जबाबदार धरण्यात आलं. या खटल्यात डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीने वापरलेले दोन मोबाईल नंबर ट्रेस करून तंगराजूवर आरोप करण्यात आले.
या प्रकरणात तंगराजूने त्याचा सहभाग नाकारलेला होता. डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधणारे आपण नव्हतो, असा बचाव त्याने केला.
पहिला फोन हरवला होता, त्यानंतर आपण दुसरा फोन विकत घेतला, असंही त्याने म्हटलं होतं.
सिंगापूरच्या कायद्यानुसार, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यामध्ये गांजा, कोकेन, हेरॉइन आणि केटामाईन यांचा समावेश होतो. ठराविक प्रमाणापेक्षा जास्त वजनाच्या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या व्यक्तींना फाशीची शिक्षा ठोठावणं, इथे बंधनकारक आहेत.
दरम्यान, ते फक्त कुरिअर होतं, असं सिद्ध करू शकल्यास संशयित तस्कराची शिक्षा टळू शकते. त्याशिवाय, अंमली पदार्थ बाळगणे आणि सेवन केलेल्यांनाही तुरुंगवास आणि दंडासह कमी शिक्षा होतात.
तंगराजू सुप्पियाच्या शेवटच्या याचिकेत न्यायाधीशांनी सरकारी पक्षाची बाजू घेतली.
तंगराजू हा गांजाच्या डिलिव्हरीवेळी समन्वयासाठी जबाबदार होता, त्यामुळे तो शिक्षेस पात्र आहे, असं त्यांनी म्हटलं.
मानवाधिकार कार्यकर्त्यांनी तंगराजूला तमीळ दुभाषी उपलब्ध करून न दिल्याबाबतचा मुद्दा मांडला. तंगराजूला स्वतःलाच स्वतःची बाजू मांडण्यास भाग पाडलं गेलं, त्याचे कुटुंबीयही वकील मिळवू शकले नाही, असं त्यांनी म्हटलं.
मात्र, सिंगापूर प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मते, तंगराजूने केवळ खटल्यादरम्यान दुभाषीची मागणी केली, आधी नव्हे. तसंच संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कायदेशीर मदत उपलब्ध आहे, असंही त्याला सांगण्यात आलं होतं, असं अधिकारी म्हणाले.
यापूर्वी, मानसिकरित्या दुर्बल असलेल्या नागेथरन धर्मलिंगम याला 2022 मध्ये फासावर चढवण्यात आलं होतं.
या शिक्षेवरही सर चिचर्ड यांनी टीका केली होती. अनेक मुद्द्यांवर हा प्रकार गंभीर आहे, असं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
शिक्षेपूर्वी दोन दिवस आधी सर रिचर्ड यांनी एक ब्लॉग लिहून याबाबत म्हटलं, “संदिग्ध स्थितीत एका निष्पाप व्यक्तीला मारण्यात येणार आहे.”
हे आरोप फेटाळून लावताना सिंगापूरच्या गृह मंत्रालयाने त्यांच्यावर ‘सिंगापूरच्या न्यायाधीशांचा आणि फौजदारी न्याय व्यवस्थेचा अनादर’ केल्याचा आरोप केला.
सिंगापूरला सुरक्षित आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रभावी ठरलेल्या बहु-आयामी दृष्टिकोनात मृत्युदंड हा ‘अत्यावश्यक घटक’ असल्याचं त्यांनी म्हटलं.
तंगराजू सुप्पियाच्या रुपाने या वर्षी देशातील पहिली फाशीची शिक्षा अंमलात आली.
हार्म रिडक्शन इंटरनॅशनल (HRI) या स्वयंसेवी संस्थेच्या माहितीनुसार, जगात अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावणाऱ्या जगातील 35 देशांपैकी एक सिंगापूर आहे.”
दरवर्षी, किमान 10 जणांना फाशीची शिक्षा होते, अशा देशांमध्येही सिंगापूरचा समावेश आहे.
HRI नुसार, अंमली पदार्थांच्या प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतूद असणाऱ्या देशांमध्ये अमेरिका आणि दक्षिण कोरिया हे देशही आहेत. पण गेल्या पाच वर्षांत त्यांनी अशा गुन्ह्यांत फाशीची शिक्षा दिलेली नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








