78 वर्षांच्या आजीबाईंना बॅंक दरोड्यात अटक, कॅशिअरकडे चिठ्ठी दिली आणि...

फोटो स्रोत, PLEASANT HILL MISSOURI POLICE DEPARTMENT
- Author, ब्रँडन ड्रेनन
- Role, बीबीसी न्यूज, वॉशिंग्टन
बॅंकेवर दरोडा पडल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील किंवा टीव्हीवर पाहिल्या असतील. पण त्या दरोडेखोरांपैकी कुणी ऐंशी वर्षांच्या जवळ असलेल्या आजी पाहिल्या आहेत का?
अमेरिकेत सध्या हीच चर्चा सुरू आहे. 78 वर्षांच्या आजींनी चक्क बॅंकेवर दरोडा टाकला. विशेष म्हणजे या आजीबाईंना याआधी दोनदा बॅंकेवर दरोडा टाकण्याप्रकरणी शिक्षा झाली आहे. हा त्यांचा तिसरा दरोडा होता. या आजीबाईंना अटक करण्यात आली असून आता त्यांचा मुक्काम तुरुंगात आहे.
झालं असं की 78 वर्षांच्या बोनी गूच या मिसुरीतील गोप्पर्ट फायनान्शियल बॅंकेत गेल्या. काळ्या रंगाचे मास्क, काळ्या रंगाचा चष्मा आणि प्लास्टिकचे ग्लोव्हज अशा अवतारात या आजी बॅंकेत शिरल्या. त्यांनी कॅशिअरला एक चिठ्ठी दिली. त्यावर लिहिलं होतं मला हजारो डॉलर्स हवे आहेत.
कॅशिअरने त्यांच्या सूचनेनुसार ती रक्कम त्यांना दिली.
जाताना त्यांनी एक दुसरी चिठ्ठी देखील लिहिली होती, तुम्हाला घाबरवण्याचा माझा काही उद्देश नव्हता. आय एम सॉरी.
आणि ती रक्कम घेऊन त्यांनी धूम ठोकली.
जेव्हा पोलिसांनी तपास केला तर त्यांना कळलं की गूच यांनी जी चिठ्ठी दिली होती त्यावर लिहिलं होतं, 'आय नीड 13,000 स्मॉल बिल्स.'
जेव्हा गूच बॅंकेत शिरल्या त्यांनी आरडा ओरडा केला. लवकरात लवकर कॅश मिळावी म्हणून त्यांनी काउंटरवर बुक्की देखील मारली.
त्यांचा हा दरोडा सुरू असताना पोलिसांना एक कॉल गेला आणि त्यांनी सांगितले की बॅंकेत दरोडा सुरू आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली.

फोटो स्रोत, Getty Images
तो पर्यंत गूच पसार झाल्या होत्या. पोलिसांनी त्यांना शोधलं. त्यांना पकडण्यासाठी फार वेळ लागला नाही. पण जेव्हा पोलिसांनी त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तेच गोंधळले. त्यांचा विश्वासच बसला नाही. एक 78 वर्षांची महिला कारमध्ये बसलेली होती. गूच यांनी दारू घेतलेली होती असा पोलिसांना वाटलं. आणि कार सीटवर आणि सीटखाली बॅंकेच्या दरोड्यातून लुटलेली कॅश पडलेली होती.
बॅंकेचा दरोडा टाकण्याची गूच यांची ही काही पहिलीच वेळ नव्हती.
यापूर्वी 1977 साली कॅलिफोर्नियात दरोडा टाकल्यानंतर आणि 2020 साली आणखी एका बँक दरोड्यानंतर गूच यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. यावेळी गूच यांनी कॅशिअरकडे बर्थडे कार्ड सोपवला होता, त्यावर लिहिलं होतं की, ‘हा दरोडा आहे’.
नोव्हेंबर 2021 मध्येच 2020 मधील दरोड्याची शिक्षा संपली होती. गूच यांना कुठलाही आजार नसल्याचं समोर आलंय. मात्र, त्यांचं वय पाहता आणखी कोणता आजार आहे का, ज्यामुळे त्या दरोडे टाकत आहेत, याची तपासणी पोलीस करत आहेत.








