तियानानमेन आंदोलन : 4 जून 1989ला चीनमध्ये नेमकं काय घडलं होतं?

चीनमध्ये सध्याच्या घडीला अभुतपूर्व निदर्शनं आणि आंदोलनं सुरू आहेत. चीनची राजधानी बिजिंग, शांघाय, चेंगडू, वुहान आणि शिआन सारख्या शहरांमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. वेगवेगळ्या सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हीडिओ व्हायरल होत आहेत.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झिरो कोव्हिड पॉलिसीला लोकांचा तीव्र विरोध आहे. चीनच्या उरुमकी शहरात 2 दिवसांपूर्वी एका इमारतीला आग लागली. त्यात 10 जणांचा मृत्यू झाला.

शी यांच्या कडक लॉकडाऊनच्या धोरणांमुळे इथं मदत पोहोचण्यास उशीर झाला आणि त्यामुळेच 10 लोकांचा मृत्यू झाल्याचा ठपका आंदोलकांनी ठेवला आहे. याच आंदोलनाचं लोण आता देशभरात पसरताना दिसत आहे.

गेल्या आठवड्यात ऍपलसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केल्याचे व्हीडिओ व्हायरल झाले होते. तर गेल्या महिन्यात जेव्हा शी जिनपिंग यांना तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष घोषित करण्यात आलं तेव्हासुद्धा बिजिंगमधल्या एका ब्रिजवर विरोधाचे फलक झळकावण्यात आले होते.

चीनमध्ये अशा प्रकारची आंदोलनं खूपच दुर्मीळ आहेत. 1989 च्या तियानानमेन चौकातल्या आंदोलनानंतर चीनमध्ये कुठलंही मोठं आंदोलन आतापर्यंत झालेलं नाही.

त्याचं कारण आहे 1989 मधलं आंदोलनं चिरडण्यात आल्याची पद्धत आणि चिनी सरकारनं अवलंबलेली धोरणं.

ही गोष्ट 33 वर्षांपूर्वीची आहे. चीनमध्ये सुरू असणाऱ्या मोठ्या निदर्शनांचं केंद्र होतं बीजिंगमधला तियानानमेन चौक. चीनमधल्या कम्युनिस्ट शासकांनी ही निदर्शनं चिरडली होती.

याच निदर्शनांदरम्यानचा फोटोत पकडला गेलेला एक क्षण अजरामर झाला. सैन्याच्या रणगाड्यांच्या ताफ्यासमोर खडा ठाकलेला एक आंदोलक.

नेमकं काय घडलं?

1980च्या दशकात चीनमध्ये अनेक बदल होत होते. शासन करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाने काही खासगी कंपन्यांना आणि परदेशी गुंतवणुकीला परवानगी द्यायला सुरुवात केली होती.

यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि राहणीमानाचा दर्जा सुधारेल अशी आशा कम्युनिस्ट नेते डेंग श्याओपिंग यांना होती.

पण या बदलांसोबतच भ्रष्टाचारालाही सुरुवात झाली. हे सगळं घडत असतानाच राजकीय बाबींमध्येही पारदर्शकता असावी अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या.

कम्युनिस्ट पक्षातच दोन विचारगट पडले होते. झपाट्याने बदल व्हायला हवेत, असं एका गटाला वाटत होतं. तर देशावरचे कडक निर्बंध कायम रहावेत, असं दुसऱ्या कट्टर गटाला वाटत होतं.

1980च्या दशकाच्या मध्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनांना सुरुवात झाली. या आंदोलकांमध्ये असेही लोक होते जे परदेशात राहून आले होते, ज्यांना नवीन संकल्पना आणि चांगल्या राहणीमानाची कल्पना आली होती.

निदर्शनं कशी वाढली?

1989 च्या वसंत ऋतूमध्ये आंदोलनांनी जोर धरला, राजकीयदृष्ट्या जास्त स्वातंत्र्य द्यावं अशी मागणी वाढू लागली.

हू याओबांग यांनी काही आर्थिक आणि राजकीय बदल घडून आणले होते पण त्यांचं निधन झालं आणि आंदोलक खवळले.

दोनच वर्षांपूर्वी त्यांना कम्युनिस्ट पक्षातल्या वरच्या पदावरून हटवण्यात आलं होतं. हू यांच्या अंत्यसंस्कारांना हजारोंची गर्दी झाली.

जास्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावं, सरकारची सेन्सरशिप कमी व्हावी, अशी मागणी आंदोलक करत होते. पुढच्या काही आठवड्यांमध्ये बीजिंगमधल्या तियानानमेन चौकामध्ये आंदोलक जमत गेले.

एका घडीला या चौकात 10 लाख आंदोलक होते, असा अंदाज आहे. तियानानमेन स्क्वेअर हा बीजिंगमधल्या लोकप्रिय स्थळांपैकी एक आहे.

चीन सरकारने काय प्रत्युत्तर दिलं?

सुरुवातीला सरकारने आंदोलकांच्या विरुद्ध कोणतीही थेट पावलं उचलली नाहीत. या आंदोलनांना नेमकं कसं उत्तर द्यायचं याबद्दल कम्युनिस्ट पक्षात मतभेद होते.

काहींना वाटत होतं काही प्रमाणात सूट देण्यात यावी तर पक्षाने कठोर पावलं उचलावीत असं इतरांना वाटत होतं.

कट्टर मतं असणाऱ्यांचा या वादात विजय झाला आणि मे महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये बीजिंगमध्ये मार्शल लॉ लावण्यात आला.

3 आणि 4 जूनला सैन्याने तियानानमेन स्क्वेअरच्या दिशेने जायला सुरुवात केली. गोळीबार करत, आंदोलकांना चिरडत, अटक करत त्यांनी त्या या परिसराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला.

टँक मॅन कोण होता?

5 जूनच्या दिवशी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या रणगाड्यांच्या ताफ्यासमोर एक माणूस उभा ठाकला.

त्याच्या हातात दोन पिशव्या होत्या आणि जरा बाजूला सरकत पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या रणगाड्यांना तो रोखत होता.

दोन माणसं नंतर त्याला ओढून घेऊन गेली. त्याचं पुढे काय झालं, हे कळू शकलं नसलं तरी हा या आंदोलनातला सर्वांत लक्षणीय क्षण ठरला.

या आंदोलनात किती लोक मारले गेले?

नेमके किती जण या आंदोलनांत मारले गेले हे कोणालाच माहिती नाही. 200 नागरिक आणि काही डझन सुरक्षा रक्षक मारले गेल्याचं जून 1989च्या अखेरीस चीन सरकारने म्हटलं होतं.

पण काही इतर अंदाजांनुसार काही शे ते हजारो निदर्शक मारले गेल्याची शक्यता आहे.

2017 मध्ये युकेने काही कागदपत्रं सावर्जनिक केली. यामध्ये तेव्हा चीनमध्ये असणारे ब्रिटीश राजदूत सर अॅलन डॉनल्ड यांनी पाठवलेली एक तारही आहे. त्यात 10,000 जण मारले गेल्याचं म्हटलंय.

काय घडलं ते चीनमधल्या लोकांना माहिती आहे का?

तियानानमेन चौकात जे काही घडलं त्याविषयी चर्चा करणं चीनमध्ये अत्यंत संवदेनशील बाब आहे.

या घटनेविषयीच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट्स नियमितपणे इंटरनेटवरून काढून टाकल्या जातात.

सरकारचं त्याच्यावर नियंत्रण असतं. या आंदोलनांनंतर जन्मलेल्या सध्याच्या तरूण पिढीमध्ये तियानानमेन चौकात काय घडलं, याविषयी फारशी जागृती नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)