You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'चीनची भारतात जाणूनबुजून आणि ठरवून घुसखोरी,' संशोधनातून दावा
“भारताच्या पश्चिम आणि मध्य सीमेवर चीनने अचानक घुसखोरी केलेली नाही. ही विचारपूर्वक केलेल्या रणनीतीचा भाग होता. या कृतीद्वारे चीनला सीमावर्ती भागावर नियंत्रण मिळवायचं होतं.”
भारतामध्ये चीनची घुसखोरी या विषयावर एक आंततराष्ट्रीय तज्ज्ञांच्या समुहाने हे संशोधन केलं आहे. Rising tension in Himalayas: A Geospcial analysis of Chinese Excursion या शोधप्रबंधात हा दावा केला आहे.
हे संशोधन अमेरिकेतील नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी, नेदरलँड्सची टेक्निल युनिव्हर्सटी ऑफ डेल्फ्ट आणि नेदरलँड्स डिफेन्स अकॅडमी यांनी एकत्रितपणे हे संशोधन केलं आहे.
यासाठी 2006 ते 2020 यादरम्यान चीनमधून भारतात आलेल्या घुसखोरांची आकडेवारीचा अभ्यास केला गेला आणि विविध पद्धतीने त्याचं विश्लेषण करण्यात आलं.
भारतात चीनने केलेल्या घुसखोरीकडे दोन पद्धतीने पाहता येईल- पश्चिम मध्य (अक्साई चीन वाला प्रदेश) आणि पूर्व (अरुणाचल प्रदेश)
लडाख भागातील अक्साई चीन भारत त्यांचा भाग मानतं. मात्र तिथे चीनचं नियंत्रण आहे.
1962 च्या युद्धात तिथल्या हजारो किलोमीटर जमिनीवर चीनने ताबा मिळवला आहे, असा दावा भारताने केला आहे.
या संशोधनात अभ्यासकांच्या असं लक्षात आलं की पश्चिम भागात चीनची घुसखोरी ही राजनैतिक पातळीवर विचारपूर्वक केलेली कृती होती. या परिसरावर कायमचं नियंत्रण मिळवणं हा चीनचा उद्देश होता.
या भागात चीनच्या सैनिकांना कोणत्याही प्रकारची ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहायला गेल्यास त्यावर भारताचं नियंत्रण आहे, असं मानतात.
चीन ने घुसखोरी केली अशी 13 ठिकाणं अभ्यासकांनी शोधली.
15 वर्षाची आकडेवारी पाहिली तर चीनने दरवर्षी सरासरी आठ वेळा घुसखोरी केली. मात्र सरकारी आकडेवारीनुसार हा आकडा अधिक आहे.
नेमका वाद काय आहे?
भारत आणि चीन यांच्यात 3488 किमीची सीमा आहे. या मुद्द्यावर कोणाचंही एकमत नाही.
चीनच्या मते अरुणाचल प्रदेश दक्षिण तिबेटचा भाग आहे. भारताने मात्र हा दावा खारिज केला आहे.
लडाखमध्ये अक्साई चीनचा एक मोठा भाग आहे. तो सध्या चीनच्या नियंत्रणात आहे. मात्र भारत त्याला आपला भाग मानतो.
भारत सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार चीनच्या सैन्याने 2016 ते 2018 या काळात 1025 वेळा भारतीय क्षेत्रात घुसखोरी केली होती.
2019 मध्ये तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लोकसभेत माहिती दिली होती की 2016 मध्ये चीन ने 273 वेळा घुसखोरी केली होती. हा आकडा 2017 मध्ये 426 आणि 2018 मध्ये 326 झाला होता.
टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ डेल्फ्टचे जॉन टिनो ब्रीदुवर आणि रॉबर्ट फॉकिंक, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी ऑफ पब्लिक इंटरनॅशनल अफेअर्सचे केव्हिन ग्रीन, नेदरलँड्स डिफेन्स अकॅडमीचे रॉय लिंडलॉफ यांच्याबरोबर नेदरलँड्सचे आणि काही तज्ज्ञ, अमेरिकेतल्या नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या कॉम्प्युटर सायन्स विभागाचे सुब्रमण्यस आणि बफे इन्स्टिट्युट ऑफ ग्लोबल अफेअर्स यांनी या संशोधनात योगदान दिलं आहे.
गुरुवारी या संशोधनाशी निगडीत एक प्रेस नोट जारी करण्यात आली. त्यानुसार चीनने चुकून भारतीय सीमेत घुसखोरी केली नव्हती. चीनने घुसखोरी केल्याच्या घटना वाढतच आहेत.
संशोधकांच्या मते पूर्व आणि मध्य भागात झालेला संघर्ष हा चीनच्या विस्तारवादी रणनीतिचाच भाग होता.
नॉर्थवेस्टर्नचे वी. एस. सुब्रमण्यम म्हणतात, “अचानक कोणतीही योजना नसताना घुसखोरी करणं केवळ अशक्य आहे. मात्र पूर्व भागात हे प्रमाण पश्चिमेपेक्षा कमी आहे.”
हळूहळू मोठा भाग ताब्यात घेण्याची तयारी
अक्साई चीन भागात वारंवार अगदी ठरवून घुसखोरी केल्याचे अनेक संकेत अभ्यासकांना मिळाले आहेत. दीर्घकाळ फौजा तैनात करून चीनला तिथे नियंत्रण मिळवायचं आहे.
वी. एस. सुब्रमण्यम म्हणतात, “चीन थोड्या भागावर ताबा मिळवतो. भारताने तो भाग चीनचा असं मान्य केलं नाही तर वारंवार ते ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. चीन छोट्या छोट्या भागावर ताबा मिळवतो. काही काळ उलटल्यावर तो मोठा भाग होतो.”
अक्साई चीन भागात चीनला अधिक रस आहे. त्यावर सुब्रमण्यम म्हणतात की पश्चिम भागातली घुसखोरी फारशी आश्चर्यकारक नाही.
अक्साई चीनचं वेगळं महत्त्व आहे. तिथे चीनला विकास करायचा आहे. त्यामुळे अक्साई चीनचं महत्त्व जास्त आहे.
तसंच तो चीन, तिबेट आणि शिनजियांग या चीनच्या स्वायत्त भागांमधला एक महत्त्वाचा मार्ग आहे.
या संशोधनात 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या घुसखोरीचाही उल्लेख आहे. त्या संघर्षात 20 भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे. त्यावेळी चीनच्या चार सैनिकांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं होतं.
मात्र चीनचे अनेक सैनिक मारले गेल्याचा दावा भारताकडून करण्यात येतो. या संघर्षात भारतापेक्षा चीनचे सैनिक अधिक संख्येने मारले गेल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात आल्या होत्या.
थोड्या थोड्या दिवसांनी चीन भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो, असा दावा या संशोधनात केला आहे.
वाटाघाटींच्या फेऱ्या झाल्यावर दोन्ही देशांच्या सैनिकांनी माघार घेतली आहे. तरीही डेमचॉक आणि देप्सांग भागातला वाद अजून निवळलेला नाही.
चीन घुसखोरी कधी वाढवतो?
उत्तर पश्चिम भागातील एका संशोधनात सुब्रमण्यम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या आणखी एका शोधाचाही उल्लेख आहे.
त्यांच्या मते जेव्हा जेव्हा चीनला असुरक्षित वाटलं तेव्हा घुसखोरीत वाढ झाली आहे.
सुब्रमण्यम म्हणतात, “जेव्हा आर्थिक क्षेत्रात संकटं आली, त्यांच्या ग्राहकांवरून विश्वास उडाला, तेव्हा तेव्हा ते हल्ला करतात. भारत आणि अमेरिका यांच्यात जवळीक वाढल्यावरही हल्ल्याचं प्रमाण वाढतं.”
या संशोधनानुसार अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर भारतात क्वॉड समूहात सामील झाला नाही. यासाठीसुद्धा चीनची घुसखोरी कारणीभूत होती.
त्याचवेळी दुसऱ्या बाजूला चीन पाकिस्तानला सहकार्य करत आहे आणि अफगाणिस्तानमधून पाश्चिमात्य सैनिकांनी काढता पाय घेतला आहे. त्यामुळे ही रिकामी जागा भरण्यासही चीन तयार आहे.
चीनचं परराष्ट्र धोरण वेगाने आक्रमक होत आहे. त्यांनी तैवानच्या आसपास कारवाया वाढवल्या आहेत आणि दक्षिण चीन समुद्रातही विस्तार करत आहे.
जगातल्या सगळ्यांत जास्त लोकसंख्या असलेल्या दोन देशांमध्ये वाढता तणाव जागतिक सुरक्षा आणि अर्थव्यस्थेच्या दृष्टीने धोकादायक आहे.
भविष्यात भारत आणि चीन यांच्यातली परिस्थिती सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे दोन्ही देश हायअलर्टवर आहे.
भारत आणि चीन यांच्यात गेल्या 29 महिन्यापासून तणावपूर्ण स्थिती आहे.
पूर्व लडाखच्या गलवान भागात हिंसाचार झाल्यावर द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.
भारत चीन सीमेवर शांतता निर्माण झाली तरच द्विपक्षीय संबंध दृढ होतील या भूमिकेवर भारत ठाम आहे.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)