अमेरिकेत चीनचं पोलीस स्टेशन, FBIही चक्रावून गेली

अमेरिकेत चीनशी संबंधित पोलीस स्टेशन असल्याच्या बातम्या छापून आल्यात. या बातम्यांवर अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयने चिंता व्यक्त केलीय. 

सप्टेंबर महिन्यात प्रकाशित झालेल्या एनजीओ सेफगार्ड डिफेंडर्सच्या अहवालात म्हटलं होतं की, "चीनने जगभरात अनेक बेकायदेशीर पोलीस स्टेशन उघडलेत. आणि विशेष म्हणजे यातले काही पोलीस स्टेशन अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्येही आहेत." 

एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांनी अमेरिकेच्या सिनेट कमिटीला सांगितलं की, हा जो रिपोर्ट प्रकाशित झाला आहे त्यावर आमची नजर आहे.

एफबीआय संचालक म्हणाले की, "आम्हाला अशा स्टेशनविषयी माहिती मिळाली आहे. व्यक्तिशः बघायला गेलं तर चीनने अशा पद्धतीने इतर देशांमध्ये आणि न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी पोलीस स्टेशन सुरू करणं अत्यंत चुकीचं आहे. कोणतीही माहिती न देता अशी कृती करणं अजिबात योग्य नाही."

ते पुढे म्हणाले की, यामुळे अमेरिकेच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन तर झालंच आहे. शिवाय अमेरिकन न्यायव्यवस्थेकडेही दुर्लक्ष करण्यात आलंय.

या स्टेशन्समुळे अमेरिकन कायद्यांचं उल्लंघन झालं आहे का? असा प्रश्न विचारताच ख्रिस्तोफर म्हणाले की, "आम्ही यातील सर्व कायदेशीर बाबी तपासत आहोत."

वरिष्ठ गुप्तचर अधिकारी व्रे, अमेरिकन सिनेट होमलँड सिक्युरिटी कमिटीच्या सुनावणीदरम्यान बोलत होते. 

दरम्यान अनेक खासदारांनी त्यांच्यासमोर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत.

जगभरात चीनचे पोलीस स्टेशन्स

स्पेनस्थित एनजीओ सेफगार्ड डिफेंडर्सच्या म्हणण्यानुसार, चीनच्या पब्लिक सेफ्टी ब्यूरोने परदेशात सर्विस स्टेशनची स्थापना केलीय. बऱ्याच खंडांमध्ये हे पोलीस स्टेशन्स आहेत.

यात लंडन आणि ग्लासगो मध्ये दोन, उत्तर अमेरिकेतील टोरंटो आणि न्यूयॉर्कमध्ये या स्टेशन्सची स्थापना करण्यात आली आहे.

या पोलीस स्टेशन्सचा वापर आंतरराष्ट्रीय गुन्हे रोखण्यासाठी आणि परदेशात राहणाऱ्या चिनी नागरिकांना प्रशासकीय सेवा पुरवण्यासाठी केला जातोय.

यातली प्रमुख सेवा म्हणजे ड्रायव्हर लायसेन्स जारी करणे. 

पण गुन्हेगारी रोखणं किंवा चिनी नागरिकांना सोयी सुविधा पुरवणं हा या स्टेशन्सचा मुख्य उद्देश नाहीये. 

सेफगार्ड डिफेंडर्सच्या म्हणण्यानुसार, 'हे पोलीस स्टेशन्स कुटील डाव पूर्ण करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आले आहेत.'

मात्र चीनने अशा पोलीस स्टेशन्सच्या अस्तित्वावर स्पष्टपणे नकार दिलाय.

आयर्लंड आणि कॅनडाने उचलली पावलं

एफबीआयच्या संचालकांनी सिनेट कमिटीशी बोलताना सांगितलं की, त्यांच्या एजन्सीने अनेक चिनी अधिकार्‍यांवर लोकांना त्रास देणे, त्यांचा पाठलाग करणे, ब्लॅकमेल करणे यासाठी खटले भरलेत. 

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात बोलणारे लोक या चिनी सरकारी अधिकाऱ्यांच्या निशाण्यावर असतात.

ते म्हणाले, "ही खरंतर वास्तविक अडचण आहे. यासाठी आम्ही इतर सहकारी देशांशीही बोलतोय. कारण विषय एकट्या अमेरिकेचा नाहीये."

अमेरिकेने ऑक्टोबर महिन्यात सात चिनी नागरिकांविरुद्ध खटले भरल्याची माहिती दिली होती. 

तसेच त्यांच्यावर हेरगिरी केल्याचा आणि अमेरिकेत राहणाऱ्या एका चिनी व्यक्तीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. चिनी सरकारला त्या व्यक्तीला परत चीनमध्ये न्यायचं आहे.

सेफगार्ड डिफेंडर्सच्या अहवालानंतर, मागच्याच महिन्यात आयर्लंडची राजधानी डब्लिनमधील असंच एक पोलीस स्टेशन बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. 

तदनंतर कॅनडाच्या इंटेलिजन्स एजन्सीने म्हटलंय की, चीनने कॅनडाच्या भूमीवर असे बेकायदेशीर पोलीस स्टेशन्स सुरू केलेत का याची सध्या चौकशी सुरू आहे.

हेही वाचलंत का?