You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महिला त्यांच्या जोडीदारांच्या करिअरला प्राधान्य का देतात?
- Author, केट मॉरगन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जेव्हा केरी तिच्या विशीत होती तेव्हा ती सामाजिक क्षेत्रात काम करायची. ही नोकरी करत असताना तिने बराच पैसा कमावला ज्यामुळे तिच्या गरजा भागल्या आणि बरीच बचतही केली. तिचा पार्टनर विद्यार्थी होता आणि तो अर्धवेळ नोकरी करायचा. केरी जास्त पैसे कमवायची. त्यामुळे बरीचशी बिलं ती भरायची. तिचा पार्टनर पदवीधर झाला, त्याला नोकरी मिळाली आणि मग गोष्टी बदलल्या.
“त्याला खूप दूर नोकरी मिळाली. मी माझी नोकरी सोडली आणि त्याच्याबरोबर शिफ्ट झाले. मी तिथे खूश होते पण जागा बदलल्यामुळे मला ती नोकरी शोधावी लागली. तिथे मी कोणालाही ओळखत नव्हते आणि मला नोकरी मिळाली नाही.” शिकागोची असलेली केरी सांगते.
कालांतराने कॅरीला लक्षात आलं की तिने तिच्या पार्टनरच्या करिअरला जास्त महत्त्व दिलं आहे. त्यामुळे तिच्या करिअरचं नुकसान झालं आणि कितीतरी वर्षांच्या कमाईचं नुकसान झालं
अमेरिकेत शिक्षणात स्त्रिया पुरुषांच्या पुढे असतात तरी नोकरीच्या ठिकाणाचा विचार केला तर त्यांची संख्या अर्धी आहे. अनेकांना केरीसारखे अनुभव आले आहेत. Delloite Women@Work 2023 ने 5000 बायकांचं सर्वेक्षण 10 देशांमध्ये केलं. त्यापैकी 98 टक्के बायका विरुद्धलिंगी नात्यात होत्या. त्यातील 40 टक्के बायकांनी सांगितलं की ते त्यांच्या पार्टनरचं करिअर जास्त महत्त्वाचं ठरत आहे. त्यासाठी त्यांनी अनेक कारणं सांगितली आहेत. त्यात आर्थिक आणि सामाजिक बाबी तर आहेतच पण त्याचबरोबर घरची आणि इतरांची काळजी हाही मुद्दा होता.
मात्र या सर्वेक्षणात स्वत:चं करिअर पणाला लावण्याचं आणखी एक मोठं कारण स्त्रियांनी सांगितलं ते म्हणजे त्यांचे पार्टनर्स जास्त पैसा कमावतात. हे फारसं आश्चर्यकारक नाही. कारण जागतिक पातळीवर पहायचं झाल्यास काही आकडेवारी असं सांगते की जर पुरुष एक डॉलर कमावत असेल तर स्त्री 77 सेंट कमावते. म्हणजे भारतीय भाषेत सांगायचं झालं तर पुरुष एक रुपया कमावत असेल तर स्त्री 77 पैसे कमावते.
“काही जण असे असतात जे नेहमी म्हणतील की ही व्यक्ती सगळ्यात जास्त पैसे कमावते. जेव्हा परिस्थिती बिकट असते तेव्हा जो कमी पैसे कमावतो तो म्हणतो की माझं करिअर पणाला लावलं. मग ते ठरवून असो किंवा न ठरवता.” असं लंडनमधील डेलॉईटमध्ये इक्विटी अँड इन्क्लयुजन ऑफिसर असलेल्या एम्मा कॉड सांगतात.
काहीही झालं तरी निवड वास्तववादी असते असं पॅमेला स्टोन म्हणतात. त्या न्यूयॉर्क शहरात प्राध्यापक आहेत. त्यांनी ऑप्टिंग आऊट नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. त्यांनी त्यांच्या दोन पुस्तकांसाठी अनेक महिलांची मुलाखत घेतली. त्यापैकी अनेक महिलांचे पार्टनर्स वेगाने प्रगती करताना दिसले. जेव्हा स्वत: बद्दल निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा त्या म्हणाल्या, की आम्हाला माहितीच होतं की आमच्यापेक्षा जास्त पैसा कमावणार आहे.
जेव्हा पैशाची गोष्ट येते तेव्हा हा निर्णय कमी भावनिक असतो. “याचा अर्थ असा नाही की स्त्रियांना काही दूरदृष्टी नाही, त्या पुरोगामी नाही असं नाही. कोणाला जास्त चांगली संधी आहे यावर सगळं अवलंबून आहे. जर तुम्हाला पैजा लावायची सवय असेल तर तुम्ही पुरुषांच्या करिअरवर जास्त पैज लावाल कारण मार्केटमध्ये लिंगभेद आहेच.”
मात्र अशी पैज एक दुष्टचक्र असू शकते असं कॉड म्हणतात. कारण ज्या महिला त्यांच्या करिअरला प्राधान्य देत नाही ते त्यांच्या मूळ क्षमतेएवढंही करिअर करू शकत नाही किंवा त्यांच्या पार्टनरएवढेही पैसे कमावू शकत नाही.
“वास्तविक पाहता, महिला मुख्य कमावत्या असणं हे चित्र जास्त आश्वासक आहे.” असं कॉड म्हणाल्या, “मात्र इतक्या मोठ्या संख्येने महिला त्यांच्या करिअरला प्राधान्य देऊ शकत नसतील त्या कुटुंबातील प्रमुख कमावत्या होण्याची शक्यता अतिशय कमी आहे.” असं त्या पुढे म्हणाल्या.
मात्र महिला पुरुषांपेक्षा जास्त कमावू लागल्या तरीही त्यांचं करिअर प्राधान्य होईल याची शाश्वती नाही. डेलॉईटच्या अहवालात सांगितलेल्या अनेक केसेसमध्ये महिलांनी त्यांचं करिअर दुय्यम स्थानावर ठेवल्याचं लक्षात आलं आहे. 10 पैकी एक एक महिला त्यांच्या घरी प्राथमिक कमावणारी आहे. 20 टक्के महिलांना त्यांच्या पार्टनरच्या करिअरला प्राधान्य देण्याचं दडपण होतं.
“हा आकडा आमच्यासाठी बऱ्यापैकी आश्चर्यकारक होता. त्याच्या मागे काही सांस्कृतिक भाग होता की नाही कोणाला माहिती.”
याचा अर्थ असा आहे की पैशापायी ते महिला त्यांचं करिअर सोडत नाहीयेत तर त्यांच्या मागे काही सामाजिक दबाव आणि अपेक्षासुद्धा आहेत.
एकापेक्षा अधिक पिढींचा अभ्यास करण्यासाठी स्टोन आणि तिच्या सहकाऱ्यांनी हार्वर्डच्या 25000 पदवीधरांचा अभ्यास केला. त्यांच्यापैकी अनेकांना आदर्श लग्नाची अपेक्षा होती जिथे दोघांच्याही करिअरला सारखंच महत्त्व मिळेल. या सर्वेक्षणात सर्व वयोगटातील लोकांचा समावेश होता. त्यांना अपेक्षा होती की त्यांचं करिअर पुढे जाईल.
पुरुष कर्ता असायला हवा अशी अपेक्षा असते. फक्त पैसाच कमावणारा नाही तर त्याहीपेक्षा अधिक काहीतरी करणारा असा या शब्दाचा अर्थ होतो. युकेच्या बाथ विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेक्षणात सांगितलं होतं की आपल्या पार्टनर पेक्षा जास्त पैसे कमावतोय की नाही यावर पुरुषांचं मानसिक स्वास्थ्य अवलंबून असतं. 2023 मध्ये Pew Research Center ने केलेल्या सर्वेक्षणात असं सांगितलं की जरी जोडप्याने सारखेच पैसे कमावले तरी ते त्यांच्या मूळ पदावरच जातात. पुरुष कामाच्या ठिकाणी आणि फावल्या वेळात त्यांची कामं उरकतात आणि स्त्रिया घराची आणि लहान मुलांची काळजी घेतात.
जेव्हा पुरुष स्वत:ला कर्ता समजतात तेव्हा त्यांना त्यांच्या बायकोच्या करिअरबद्दल त्यांना कमी आदर असतो आणि त्यांच्या कामाशी ते फारशी तडजोड करत नाही. हे सुद्धा एक वर्तुळ आहे असं स्टोन म्हणतात. त्यामुळे जेव्हा पुरुष त्याच्या बायकोच्या करिअला किंमत देत नाही तेव्हा स्त्रियांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी फारच कमी असते.
मात्र या सगळ्यासाठी पुरुषच जबाबदार असतात असं नाही बरेचदा स्त्रियाही त्यांच्या करिअरची किंमत कमी करतात. जेणेकरून नातेसंबंधामध्ये शांतता रहावी. केरी च्या केसमध्ये असं झालं की तिचा पार्टनर त्यांच्या नात्यात असं असंतुलन असताना सुद्धा खूश होता. एकदा ती त्याला म्हणाली की मला तुझी काळजी घ्यायला आवडतं. हे ती कितीही मनापासून म्हणाली असली तरी त्याच्या खाली काय दडलं होतं हे तिचं तिला माहिती होतं.
“मी करत असलेल्या तडजोड़ीची जितकी किंमत व्हायला हवी होती तितकी ती होत नव्हती.” असं ती म्हणते. “ मला वाटत नाही त्याला ते कधी नीट समजलं.” केरी लिंगाधारित टिपिकल भूमिकांमध्ये कधी गेली हे तिचं तिलाही कळलं नाही. तिला तिचं नातं तोडायचं नव्हतं.
स्त्रियांना इतर अनेक जबाबदाऱ्या असल्यामुळे स्त्रिया त्यांच्या करिअरला जास्त प्राधान्य देत नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. डेलॉईट च्या अहवालानुसार, 88 टक्के बायका पूर्णवेळ काम करणाऱ्या होत्या त्यापैकी प्राथमिक जबाबदारी घरगुती कामाची असते. 10 टक्के बायकांनी ही जबाबदारी नवरे पार पडत असल्याचं सांगितलं.
कॉड यांच्या मते फक्त थकवा आल्यामुळे स्त्रिया असा निर्णय घेत असाव्यात असं त्यांचं मत आहे. “खरं सांगायचं तर तुम्ही पूर्णवेळ काम करत असता, घरी आल्यावर संध्याकाळी घरातली कामं करता. वीकेंडला आणि कामाला जाण्यापूर्वी तुम्ही तेच करत असता. त्यामुळे थकवा येतो, तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे कदाचित असं वाटत असावं की जाऊ दे, आता मी माझ्या करिअरमध्ये काहीही करणार नाही.”
घराची काळजी घेणं आणि इतर कामं त्यांनी स्वत:हून ठरवलेली नसतात तरी ती बायकांवरच पडतात असं कॉड यांना वाटतं.
“अशा जबाबदाऱ्या लवकर दूर होत नाहीत. या जबाबदाऱ्या कधी तुमच्या कामाच्या मध्ये येतात.” कामाच्या ठिकाणी फक्त काम करणं असं नसतं याची आपल्याला कल्पना आहेच. जर तुम्ही एखाद्यासाठी तुमचं करिअर पणाला लावत असाल किंवा तुम्हाला माहिती आहे की घरचं काम कोणालातरी म्हणजे तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही ही दोन्ही कामं कराल का? मला वाटतं नाही करणार”
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)