पाकिस्तानमधली ही महिला पोलीस अधिकारी भारतातही का व्हायरल होत आहे?

पाकिस्तान

फोटो स्रोत, Social media

धर्म किंवा पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या अपमानाच्या आरोपात एखाद्या व्यक्तीवर संतप्त जमावाचा हल्ला ही काही पाकिस्तानसाठी नवी गोष्ट नाही.

रविवारी लाहोरच्या अछरा बाजार परिसरात काही लोकांनी एका महिलेवर ईशनिंदेचा आरोप करत त्यांना घेराव घातला.

महिलेनं परिधान केलेल्या कपड्यांवर 'कुराणमधील आयतं लिहिलेली होती' असा आरोप संतप्त जमावानं केला.

पण पंजाब पोलिसांच्या एका अधिकारी महिलेनं अत्यंत हुशारी आणि धाडसीपणानं हे प्रकरण हाताळत यामहिलेला सुरक्षितपणे गर्दीच्या तावडीतून बाहेर काढलं.

त्यानंतर स्थानिक उलेमांच्या मदतीनं त्या महिलेच्या कपड्यांवर कुराणची आयत प्रिंट केलेली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

प्रकरण नेमके काय होते?

रविवारी दुपारी लाहोरच्या अछरा बाजारात पतीबरोबर खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या कपड्यांवर अरबी भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं होतं.

त्यावरून महिलेनं कुराणची आयतं लिहिलेले कपडे परिधान करून धर्माचा अपमान केला असल्याचा आरोप करण्यात आला.

काही वेळातच लोक त्याठिकाणी गोळा होऊ लागले. त्यानंतर संतप्त गर्दीनं महिला आणि तिच्या पतीला त्रास द्यायला सुरुवात केली.

परिस्थिती अधिक खराब होऊ लागल्यानंतर महिलेनं लाहोर पोलिसांकडे मदत मागितली. त्यावर गुलबर्गच्या एएसपी सय्यदा बानो नक्वी लगेचच घटनास्थळी पोहोचल्या आणि स्थिती आणखी हाताबाहेर जाण्यापासून टाळलं.

त्यांनी स्थानिक उलेमांच्या मदतीनं संतप्त गर्दीला समजावलं आणि त्यांच्या धार्मिक भावना शांत केल्या. त्या महिलेलाही गर्दीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात त्यांना यश आलं.

पाकिस्तान

फोटो स्रोत, Twitter/OfficialDPRPP

या घटनेनंतर लगेचच गर्दीमध्ये अडकलेल्या महिलेचे अनेक फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली.

एका व्हीडिओमध्ये महिला पतीबरोबर एका लहानशा रेस्तराँमध्ये बसलेली दिसत आहे. त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्यावर धर्माचा अपमान केल्याचा आरोप करताना दिसत आहे. त्यामुळं घाबरलेली महिला चेहरा लवपत असल्याचं त्यात पाहायला मिळतं.

एएसपी सय्यदा बानो नक्वी यांनी गर्दीला समजाववण्याचा व्हीडिओही सोशल मीडियावर शेअर केला. त्यात त्या गर्दीला समजावत आहेत की, संबंधित महिलेनं जर धर्माचा अपमान केला असेल तर तिच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.

तसंच त्यांना बाजारातून त्या महिलेला सुरक्षितपणे बाहेर नेण्यातही यश आल्याचं पाहायला मिळालं.

या घटनेबाबत अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. दोन्हीकडून हे प्रकरण चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात आलं आहे.

...तर परिस्थिती चिघळळी असती

बीबीसी प्रतिनिधी कॅरोलिन डेव्हीस यांनी अछरा बाजारातून महिलेला संतप्त जमावामधून वाचवणाऱ्या पोलिस अधिकारी एएसपी सय्यदा बानो नक्वी यांच्याशी चर्चा केली.

"आम्हाला दुपारी दीड वाजेच्या सुमारास माहिती मिळाली. त्यात काहीतरी गडबड झाली आहे एवढंच समजलं होतं. बाजारात एका महिलेनं पैगंबरांचा अपमान केला असल्याचं, कॉलवरून समजलं होतं. एका महिलेच्या कुर्त्यावर कुराणची आयत लिहिली असून, लोक जमा होत असल्याचं सांगण्यात आलं," असं एएसपी सय्यदा नक्वी म्हणाल्या.

परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि प्रचंड गर्दी गोळा झाली, असं नक्वी म्हणाल्या.

"आम्हाला संबंधित ठिकाणी पोहोचण्यात अडथळे येत होते. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. अखेर आम्हाला त्याठिकाणापर्यंत जाण्यासाठी 400 ते 600 मीटर पायी जावं लागलं," असंही त्यांनी सांगितलं.

"आम्ही जेव्हा त्याठिकाणी पोहोचलो तेव्हा त्यावेळी जवळपास दोनशे ते तीनशे लोक रेस्तराँबाहेर जमा झालेले होते," असंही त्या म्हणाल्या.

पण कुर्त्यावर नेमकं काय लिहिलं आहे हे तोपर्यंत कुणालाही माहिती नव्हतं, असं त्यांनी सांगितलं.

पाकिस्तान

फोटो स्रोत, Twitter

"अशा परिस्थितीत महिला सुरक्षित राहाव्या म्हणून त्यांना तिथून सुरक्षितपणे बाहेर काढणं, हे सर्वांत महत्त्वाचं काम होतं," असं त्यांनी सांगितलं.

एएसपी सय्यदा नक्वी यांच्या मते, "आम्हाला त्यांच्याशी बोलावं लागलं. आम्ही गर्दीला जाऊ देण्याची विनंती केली. त्यांनी गुन्हा केला असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा विश्वास आम्ही त्यांना दिला."

"जर मी त्यावेळी ओरडून गर्दीला आम्ही कारवाई करू असं समजावलं नसतं तर परिस्थिती आणखी चिघळली असती. ईश्वराच्या कृपेनं त्यावेळी सगळं काही आमच्या बाजूनं घडत गेलं," असंही त्यांनी म्हटलं.

पाकिस्तानात धर्मासंबंधी अपमानाच्या वाढत्या घटनांवरही त्यांनी मत व्यक्त केला. एएसपी सय्यदा म्हणाल्या की, "दोन आठड्यांपूर्वीही अशी घटना घडली होती आणि एक दीड महिन्यापूर्वीही घडली होती. अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. पण आम्ही त्यांना थांबवू शकतो."

उलेमांची मदत घेतली

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पण त्या महिलेला केवळ त्या गर्दीतून सुरक्षितपणे बाहेर काढणं एएसपी नक्वी यांच्यासाठी पुरेसं नव्हतं.

कारण आधी अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात पोलिसांनी संबंधित व्यक्तीला वाचवलं. पण नंतर गर्दीनं पोलिस ठाण्यावरच हल्ला केला आणि त्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण झाला.

सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

त्या व्हीडिओत त्या याबाबत सांगत आहेत. "आज अछरा बाजारात एक महिला पतीबरोबर शॉपिंगसाठी आल्या होत्या. त्यांनी एक कुर्ता परिधान केला होता. त्यात अरबी भाषेत काहीतरी लिहिलं होतं. त्यावरून काही लोकांना वाटलं की ते धार्मिक शब्द आहेत. त्यावरून गैरसमज निर्माण झाला."

या व्हीडिओमध्ये त्यांच्याबरोबर संबंधित महिला आणि काही स्थानिक धार्मिक अभ्यासकही होते.

यापैकी एक धार्मिक अभ्यासक म्हणाले की, "आम्ही कुर्त्यावर प्रिंट केलेले शब्द पाहिले आहेत. ते अरबी शब्द आहेत पण सामान्य शब्द आहेत. या मुलीनं पुन्हा असे कपडे परिधान करणार नाही, असं म्हटलं आहे. त्यानंतर तिला माफ करण्यात आलं आहे."

व्हीडिओमध्ये महिलेची बाजूही आहे.

"मी शॉपिंगसाठी अछरा बाजारमध्ये गेले होते. मी जो कुर्ता परिधान केला होता तो डिझाइन समजून खरेदी केला होता. त्यावर लिहिलेल्या शब्दांना लोक आयत समजतील हे मला माहिती नव्हतं," असं त्या म्हणाल्या.

"माझा असा काहीही उद्देश नव्हता. जे काही घडलं ते नकळत घडलं. मीही मुस्लीम आहे त्यामुळे धर्म किंवा पैगंबरांच्या अपमानाबाबत मी विचारही करू शकत नाही. हे सर्व माहिती नसल्यामुळं घडलं आहे. तरीही मी खेद व्यक्त करते. माझ्याकडून पुन्हा असं काही घडणार नाही."

पाकिस्तान

फोटो स्रोत, Social Media

पंजाब पोलिसांनी एएसपी सय्यदा बानो नक्वी यांना सरकारी सन्मान आणि पदक देण्याची शिफारस केली आहे.

पंजाब पोलिसांचे आयजी डॉक्टर उस्मान अन्वर यांच्या हवाल्यानं एक वक्तव्य जारी करण्यात आलं आहे.

"लाहोरच्या एका परिसरात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून संबंधित महिलेला संतप्त जमावाच्या तावडीतून सुरक्षितपणे वाचवणाऱ्या एएसपी सय्यदा बानो नक्वी यांना पंजाप पोलिसांकडून शौर्य दाखवल्याबद्दल कायद-ए-आझम पोलीस पदकानं सन्मानित करण्यासाठी पाकिस्तान सरकारला शिफारस केली जाणार आहे," असं त्यात म्हटलं आहे.

तर धार्मिक पक्ष तहरीक-ए-लब्बैकनंही एक वक्तव्य जारी केलं आहे. यात हे प्रकरण तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांच्या मदतीनं सोडवलं असल्याचं म्हटलं आहे.

"आता या घटनेची पारदर्शक आणि न्यायिक चौकशी करावी आणि घटनेतील दोषींना कठोर शिक्षा दिला जावी अशी आमची मागणी आहे. जर हे मानवी चुकीमुळं घडलं असेल तर लोकांनी अशा प्रकरणात अत्यंत सावधपणे वागायला हवं. अल्लाहनं पोलिसांच्या शौर्याद्वारे देशाला मोठ्या घटनेपासून वाचवलं," असं यात म्हटलं आहे.

महिलेच्या ड्रेसवर नेमके काय लिहिले होते?

महिलेनं जो ड्रेस परिधान केला होता त्याबाबत सोशल मीडिया यूझर्सनं अनेक स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. हा सौदी अरबमधील शालिक रियाझ नावाचा महिलांच्या कपड्यांचा ब्रँड असून त्याठिकाणी असे अरबी शब्द असलेले कपडे हे अगदी सामान्य असल्याचं, त्यात म्हटलं आहे.

विविध व्हीडिओ आणि शेअर केल्या जाणाऱ्या फोटोमध्ये त्या महिलेनं परिधान केलेल्या कपड्यांवर अरबी अक्षरांमध्ये 'हलवा' असा शब्द प्रिंट केलेला होता.

अरबी भाषेत हलवा या शब्दाचा अर्थ सुंदर आणि गोड असा होतो.

पाकिस्तानात सोशल मीडियावर काही लोक, या प्रकरणी महिलेऐवजी तिला त्रास देणाऱ्यांनी माफी मागावी असं म्हणत आहेत.

तर सोशल मीडियावर काही यूझर्स या महिलेची ओळख गुप्त ठेवून तिचं संरक्षण करण्याची मागणी करत आहेत. तर काही महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या शौर्याबाबत चर्चा करत आहेत.

अँकर राबिया अनम यांनी एक्सवर याबाबत प्रतिक्रिया दिली.

"महिला पोलीस अधिकाऱ्यांचं त्यांच्या हुशारीसाठी कौतुक. आता अत्यंत वाईट पद्धतीनं घाबरवण्यात आलेल्या त्या मुलीला सुरक्षा प्रदान करावी. तसंच घाबरवणाऱ्यांना अटक करावी, म्हणजे परत कोणी असं करणार नाही," असं त्यांनी म्हटलं.

पोशाखाचा फोटो

पत्रकार रझा रुमी यांनी "या महिला अधिकारी स्टार आहेत. जेव्हा नागरिकांना धर्मावरील कथित आरोपांसाठी घाबरवलं जातं, त्यावेळी जे करायला हवं तेच त्यांनी केलं आहे," असं लिहिलं.

"पैगबरांच्या अपमानाबाबतचा कायदा, त्याचा होणारा गैरवापर, हिंसक जमाव आणि राज्यातील कट्टरतावादी टोळ्यांनी या देशाला दरीत ढकललं आहे," असंही त्यांनी लिहिलं.

रमीश फातिमा नावाच्या यूझरनं, "राजकीय वाद असो, आर्थिक प्रकरणं असो, खासगी राग असो, नोकरीशी संबंधित वाद असो किंवा काहीही असो, धर्माच्या अपमानाचा आरोप हे शस्त्र बनलं आहे," अशी पोस्ट केली.

"या शस्त्राला परवाना देणारे, त्याला कायदेशीर ठरवणारे, उद्देश चांगला असल्याचं म्हणतात. पण हे सुरू करणारे सगळेच आरोपी आहेत."

अम्मार अली जान यांनी, "एएसपी बानो यांनी एका महिलेला संतप्त जमावापासून वाचवणं, धाडस करणं हे संस्थांमध्ये महिलांच्या समावेशाचं महत्त्वं विशद करतं," अशी पोस्ट केली.

"आपण पैगंबरांच्या अपमानाच्या खोट्या आरोपांसाठी कठोर शिक्षा दिली नाही तर पाकिस्तान उध्वस्त होईल. असे खोटे आरोप आपल्या समाजाची दिशा ठरवत असतात."