'त्या दिवशी गावात भीतीचं वातावरण होतं; लहान मुलं घरातच होती आणि नरबळीची चर्चा होती'

- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
2 जुलै 2024ची दुपार... कोल्हापूर जिल्ह्यातल्या कौलव गावच्या सरपंचांना एक फोन येतो. फोनवर त्यांना सांगितलं जातं, "आपल्या गावात आज प्रचंड भीतीचं वातावरण आहे. गावातल्या एका घरात कुणाचातरी नरबळी दिला जाणार आहे. तुम्ही काहीतरी करा."
या कॉलनंतर राधानगरी तालुक्यातल्या कौलव गावाचे 54 वर्षीय सरपंच रामचंद्र कुंभार अस्वस्थ होतात आणि गावात नेमकं काय घडलंय हे पाहण्यासाठी बाहेर पडतात.
त्या दिवसाचं वर्णन करताना रामचंद्र कुंभार म्हणतात की, "त्यादिवशी संध्याकाळी गावात ठिकठिकाणी भीतीचं वातावरण होतं. कोणीही लहान मुलं बाहेर सोडलेली नव्हती, गावातली मुलं त्यादिवशी शाळेत गेलेली नव्हती, तरुणांमध्ये दबक्या आवाजात काही चर्चा सुरु होत्या.
"आमच्या गावात बाहेरगावाहून दहा-पंधरा लोक आल्याचं मला कळलं. त्यानंतर मी संशयिताच्या घराजवळ जाऊन गावच्या पोलीस पाटलांना यासंदर्भात सांगितलं आणि असं काही घडत असेल तर आपण रोखलं पाहिजे असं म्हणालो."
कौलवमध्ये राहणाऱ्या शरद धर्मा माने यांच्या घरी काहीतरी अघोरी घडत असल्याची ही चर्चा होती. सुमारे पाच हजार लोकवस्तीच्या या छोट्याशा गावात नरबळीची दहशत पसरली होती.
कुणी म्हणत होतं शरद मानेच्या घरी मागच्या दोन-तीन दिवसांपासून काहीतरी सुरु आहे, अमावस्येच्या रात्री काहीतरी घडणार आहे, त्यांच्या घरातून खोदण्याचा आवाज येतोय तर कुणी म्हणत होतं त्या घरात कुणाचा तरी नरबळी दिला जातोय.
2 जुलैच्या रात्री राधानगरी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 या कायद्यानुसार एकूण सहा जणांना अटक केली आहे.
राधानगरी तालुक्यातल्या या छोट्याशा गावात घडलेला हा प्रकार नरबळीचा होता का? जर तसं नसेल तर शरद माने या आरोपीच्या घरी दहा बाय दहा च्या खोलीत मोठा खड्डा का खोदला होता?
तिथे नेमकी कसली पूजा सुरु होती? त्याठिकाणाहून अटक करण्यात आलेले भोंदू मांत्रिक नेमकं काय करत होते? आणि पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली आहे? याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.

गावात दहशत पसरली होती
याप्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपींची नरबळीच्या संदर्भात कसून चौकशी केली.
त्यानंतर असं उघडकीस आलं की मुख्य आरोपी शरद माने याच्या घरी गुप्तधन होतं आणि ते काढण्यासाठी पूजा व जादूटोण्याचा प्रकार केला जात होता. याकामात भोंदू महाराज महेश काशिद हे माने यांना मदत करत होते. यासाठीच इतरही लोक शरद धर्मा माने यांच्या घरी जमले होते.
यासंदर्भात बोलताना कौलव गावचे सरपंच रामचंद्र कुंभार बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "त्यादिवशी मी शरद माने यांच्या घरी गेलो असता बाहेरून आलेले हे लोक त्यांच्या घरात बसलेले दिसले. त्यानंतर मी माझे सहकारी आणि पोलीस पाटील यांना घेऊन त्यांच्या घरात गेलो आणि तिथे गेल्यावर जे काही दिसलं ते भयानक होतं."
कुंभार म्हणाले की, "तिथे एका चटईवर केळीच्या पानावर हळद-कुंकू, सुपारी, पानाचे विडे, टाचण्या मारलेला लिंबू असं सगळं साहित्य ठेवलं होतं. यातला एक आरोपी चंद्रकांत धुमाळ या काहीतरी मंत्र पुटपुटत होता, त्याच्या गळ्यात रुद्राक्ष आणि वेगवेगळ्या मण्यांच्या माळा घातलेल्या दिसून आल्या. त्याच्या बाजूला आमच्या गावचे रहिवासी शरद माने हे बसले होते. ते बघून आम्हाला हा जादूटोण्याचा अघोरी प्रकार असल्याचा संशय आला."

त्यानंतर फिर्यादी अनिल पाटील आणि सरपंच कुंभार हे आतील खोलीत गेले आणि तिथे देवघरासमोर तीन ते चार फुटांचा खड्डा खणल्याचं दिसून आलं. तो खड्डा बघून चौकशी केली असता यातील आरोपी संतोष लोहार याने सांगितलं की, "या खड्ड्यात गुप्तधन आहे त्यासाठी आम्ही ही पूजा करत आहोत."
त्यानंतर आरोपी आशिष चव्हाणने अनिल पाटील आणि संतोष कुंभार यांना तिथून निघून जा नाहीतर तुम्हाला ठार मारीन अशी धमकी दिली. या प्रकारानंतर सरपंच, पोलीस पाटील आणि गावकऱ्यांनी पोलिसांना पाचारण केलं आणि तिथे सुरु असलेली पूजा उधळून लावली.
गुप्तधनाचा शोध, 11 जणींची निर्घृण हत्या; तरीही फाशीपासून बचावलेले आरोपी
पहिल्यांदा घरात गेलो तेव्हा मलाच दगाफटका होण्याची भीती वाटली
नरबळीच्या शक्यतेबाबत बोलताना सरपंच कुंभार म्हणाले की, "माझ्या कानावर असं आलं आहे की गुप्तधन काढणे या प्रकारातला शेवटचा विधी हा नरबळीचा असतो. त्यामुळे ती घटना घडून गेल्यानंतर काहीतरी करण्यापेक्षा आधीच काहीतरी करणं गरजेचं होतं.
"आरोपीच्या घरी काहीतरी खोदकाम सुरु आहे आणि आरोपीचा थोरला मुलगा त्यांच्या घरात कोण जातं यावर लक्ष ठेवून असल्याचं मला कळलं. तो मुलगा कुणालाच घरात जाऊ देत नव्हता."
"मला त्यादिवशी बऱ्याच गोष्टी कानावर आल्या होत्या. त्यामुळे मला राहवलं नाही, म्हणून मी पोलीस पाटलांना सोबत घेऊन मी त्यांच्या घरी गेलो.
आरोपीच्या घराजवळ स्मशानशांतता होती, शेजारचे लोक आपापल्या घरात बसले होते, गावकऱ्यांनी आपापली मुलं घेऊन, घरांची दारं बंद करून घेतली होती त्यामुळे असं काही घडत असल्याची कल्पना असल्याचं मला वाटत होतं."
घरी गेल्यानंतरचा प्रसंग सांगताना ते म्हणाले की, "गावातली अस्वस्थता मला बघवली नाही. जर खरंच माझ्या गावात असं काही घडणार असेल तर संबंधित घटना घडून गेल्यावर काहीतरी करण्यापेक्षा मी थेट शरद माने यांच्या घरी गेलो तर तिथे खड्डा खणलेला, पूजेचं सामान मांडलेलं आणि इतर गोष्टी दिसून आल्या. ते वातावरण बघून मलाच दगाफटका होऊ शकतो अशी भीती मला वाटली आणि मी तात्काळ तिथून बाहेर आलो. मी तिथून बाहेर पडत असताना 'धरा त्याला' असं कुणीतरी म्हणल्याच मला वाटलं."
"मी बाहेर येऊन ग्रामपंचायत सदस्य आणि सहकाऱ्यांना फोन केला. त्यानंतर कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून याची माहिती दिली त्यांनी लगेच कारवाई करत राधानगरी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना तिथे पाठवलं. पोलिसांनीही कसलीच कुचराई न करता लगेच कारवाई केली आणि या पूजेचा डाव उधळून लावला."

कुंभार म्हणाले की, "एकूण दहा ते पंधरा लोक आमच्या गावात आल्याची माहिती आहे. पण मला चार-पाच लोकांनाच पकडून देता आलं. कदाचित दोन-तीन दिवसांपासून खड्डा खणायला सुरुवात केली होती.
अमावास्येच्या रात्री बारा वाजता ही पूजा करण्याचं त्यांचं नियोजन असू शकतं. दरम्यान गावात अशा चर्चा सुरु होत्या की त्या घरात सशस्त्र माणसं आली आहेत आणि अनेकांनी मला तुम्ही त्या घरात जाऊ नका असा सल्लाही गावातील लोकांनी दिला होता."
अजूनही त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो असं रामचंद्र कुंभार यांना वाटतं. याबाबत बोलताना ते म्हणाले की, "मी भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपप्राचार्य म्हणून काम करतो.
या प्रकरणातल्या चार-पाच जणांना पकडून देण्यात मला यश आलेलं असलं तरी यांचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे माझ्या जीवाचं बरंवाईट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. असं असलं तरी त्यादिवशी आमच्या गावातली अघोरी पूजा उधळल्याचं मला समाधान आहे."
नरबळीचा प्रकार नव्हता तर आरोपीने वेगवेगळी उत्तरं का दिली?
कौलव गावात घडलेल्या या प्रकाराबाबत माहिती देताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती म्हणाले की, "गावकरी, सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार टळला आहे. आधीच्या तुलनेत ग्रामीण भागात अंधश्रद्धा आणि अघोरी प्रथांच्या बाबतीत जागरूकता वाढली असून यामुळेच कौलव गावातला हा प्रकार उघडकीस आला."
या घटनेबाबत सांगताना कृष्णात स्वाती म्हणाले की, "त्यादिवशी संध्याकाळी आम्ही आरोपीच्या घरात पोहोचून विचारणा केली असता त्याने आम्हाला वेगवेगळी उत्तरं दिली. कधी तो म्हणाला की माझ्या चुलत्याची शांती करत आहोत, तर कधी म्हणत होता की माझ्या मुलाच्या जीवाला धोका असल्याने या पूजेचा घाट घातला आहे. गावकऱ्यांना आलेला संशय आणि आरोपीच्या विसंगत उत्तरांमुळे हा नरबळीचा प्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही."
पोलीस काय म्हणाले?
राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 जुलै 2024 रोजी रात्री नऊच्या सुमारास राधानगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या कौलव गावातून एक फोन आला. कौलवचे रहिवासी संदीप चरापले यांनी माहिती दिली की गावात राहणाऱ्या शरद धर्मा माने यांच्या घरी खड्डा खणलेला असून तिथे काही मांत्रिक आले आहेत आणि त्या खड्ड्यात नरबळी दिला जाणार आहे.
राधानगरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरबळीच्या संदर्भात फोन येताच ते काही सहकाऱ्यांसह आरोपी शरद मानेच्या घरी पोहोचले.
तिथे गेल्यावर त्या घरात देवघराजवळ खड्डा खणल्याचं आढळून आलं. त्या खड्ड्याच्या आजूबाजूला लिंबू पडल्याचं पोलिसांना आढळून आलं आणि त्यामुळे पोलिसांनी घरात उपस्थित असलेल्या शरद धर्मा माने यांच्यासह बाहेरगावातून आलेल्या पाच कथित मांत्रिकांना अटक करण्यात आली आहे.
अटक झालेल्यांमध्ये कराड तालुक्यातील महेश सदाशिव काशिद, आशिष रमेश चव्हाण, चंद्रकांत महादेव धुमाळ यांना अटक झाली असून यांच्यासह संतोष निवृत्ती लोहार आणि कृष्णात बापू पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, kolhapurpolice.gov.in
राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "पोलिसांना सदरील घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही लगेच घटनास्थळी पोहोचलो आणि शरद माने यांच्यासह इतर पाच जणांना अटक केली आहे. "

पोलीस निरीक्षक संतोष गोरे म्हणाले की, "आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 कायद्याच्या कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भारतीय न्याय संहिते 2023च्या कलम 351(2), 3(5) नुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपींना न्यायालयासमोर सादर केलं जाणार आहे."
जादूटोणाविरोधी कायदा काय आहे?
विवेकवादी विचारवंत नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र सरकारने 2013 साली तडकाफडकी जादूटोणा, अघोरी कृती, नरबळी आणि काळी जादू याच्या विरोधात कायदा संमत केला.
या आधी हा कायदा पास व्हावा म्हणून दाभोलकरांनी 2010 पासून अनेक प्रयत्न केले होते. याच कायद्याचा मसुदा त्यांच्याच अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थेने तयार केला होता.
अनेक उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी हा कायदा 'हिंदू-विरोधी' आहे असं म्हणत याला विरोध केला होता. संसदेच्या सलग सात अधिवेशनांमध्ये यासंबंधी बिल मांडलं गेलं होतं पण दाभोलकरांच्या मृत्यूआधी हा कायदा पास होऊ शकला नाही.

फोटो स्रोत, FACEBOOK
सध्या या कायद्यात 12 कलमं आहेत. यात मारहाण, छळ, जबरदस्तीने मानवी विष्ठा खायला लावणं, भूत उतरवण्याच्या नावाखाली लैंगिक शोषण करणं, चमत्कार घडवण्याचा दावा करणं, काळी जादू केल्याचा आरोप करणं, काळी जादू केली म्हणून एखाद्याला बहिष्कृत करणं, जादूने एखाद्याचा आजार बरा करण्याचा दावा करणं अशा गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे.
या कायद्याची अंमलबजावणी होते का?
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या ॲड मनिषा महाजन म्हणाल्या की, "संपूर्ण महाराष्ट्रात किती प्रकरणं दाखल होतात याचा अचूक आकडा सांगता येणं अवघड आहे पण जवळपास 100 केसेस तरी दरवर्षी या कायद्याअंतर्गत दाखल होत असाव्यात. आम्ही आजवर 700 प्रकरणं कोर्टात लढलो आहोत. यात लैंगिक शोषण, बाल नरबळी आणि आर्थिक फसवणुकीचे गुन्हे येतात."
पण या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे याकडेही त्या लक्ष वेधतात.

फोटो स्रोत, Getty Images
"अगदी बोटावर मोजण्याइतक्या प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा होते. अशा गुन्ह्यांचे पुरावे गोळा करणं प्रचंड अवघड आहे. या स्वयंघोषित शक्तीशाली बाबा-बुवांना लोक घाबरतात त्यामुळे ते पुढे येत नाहीत."
लोकांचा खरंच विश्वास असतो की या बुवा-बाबांकडे अघोरी शक्ती असते आणि ते आपल्याला त्रास देऊ शकतात. ही भीती कधी कधी पोलिसांमध्येही दिसते. शेवटी ते ही याच समजाचा भाग आहेत, हेही त्या अधोरेखित करतात.










