You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जवान : शाहरूख, सलमान, अक्षय... 90 च्या दशकांतील हिरोंची क्रेझ कायम का?
- Author, मधु पाल
- Role, बीबीसी मराठीसाठी
शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे.
पहिल्याच दिवशी या चित्रपटाची साडेसात लाखांहून अधिक तिकिटं विकली गेल्याचं बोललं जातंय.
जवान या चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटली कुमार यांनी केलंय. चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यात दीपिका पदुकोणचा कॅमिओ आहे.
मल्टिप्लेक्ससोबतच सिंगल स्क्रीनवरही 'जवान'च्या शोला मोठी मागणी आहे. जवान चित्रपट गदर 2 चा रेकॉर्ड मोडणार की नाही याकडे चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांचं लक्ष लागलेलं आहे.
गदर 2 ने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींहून अधिक कमाई केली. पण त्याचबरोबर सनी देओलला नव्या पिढीच्या नायकांच्या शर्यतीतही आणलं.
सनी देओल गेली 40 वर्षं हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. या 40 वर्षांत त्याचे अनेक चित्रपट यशस्वी झाले तर अनेक चित्रपट फ्लॉप झाले. पण जर सनी देओलच्या मागच्या 22 वर्षाबद्दल बोलायचं झालं तर सनी देओलने एकूण 33 चित्रपट केले.
ज्यामध्ये 'यमला पगला दीवाना' हा चित्रपट हिट झाला. देओल कुटुंबाचा 'अपने' आणि 'चुप' या चित्रपटांनी तशी सरासरी कमाई केली, पण बाकीचे सर्व चित्रपट फ्लॉप होते. म्हणजे सनी देओलचे 30 चित्रपट फ्लॉप झाले. आता गदर 2 मुळे त्याच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली.
पण हे चांगले दिवस केवळ सनी देओलसाठीच आलेत असं नाही बरं का. शाहरुख खान असो अक्षय कुमार असो या दोघांची देखील चर्चा इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे.
पठाण, गदर 2 आणि ओह माय गॉड 2 च्या यशाने 90 च्या दशकातील सिनेसृष्टी आणि कलाकारांमध्ये एक नवी उमेद जागवली आहे.
90 च्या दशकातील सुपरहिट फॉर्म्युला पुन्हा एकदा
केवळ अभिनेतेच नाहीत तर पुन्हा एकदा 90 च्या दशकातील सिनेमांची चर्चा सुरू झाली आहे. आता बॉर्डर 2 बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
एवढंच नाही तर 1986 मध्ये आलेल्या सुभाष घई दिग्दर्शित ‘कर्मा’ चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची चर्चा आहे.
30 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सुभाष घई यांच्या ‘खलनायक’ या चित्रपटाचाही सिक्वेल येणार आहे. या सिक्वेलमध्ये 64 वर्षांचा संजय दत्त पुन्हा एकदा दिसणार आहे.
थोडक्यात नव्वदच्या दशकातील अभिनेत्यांचे चांगले दिवस सुरू झालेत.
पठाण आणि तारा सिंग बऱ्याच वर्षांनी एकत्र
प्रसिद्ध चित्रपट व्यापार विश्लेषक आणि समीक्षक गिरीश वानखेडे सांगतात, "90 च्या दशकातील चांगले दिवस परत आलेत. गेल्या 3 महिन्यांत करण जोहरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी, रजनीकांतचा जेलर, पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमारचा ओह माय गॉड 2, हे सर्व चित्रपट यशस्वी झाले आणि त्यांनी चांगली कमाई केली."
"बर्याचदा असं दिसून आलंय की, एखादा ट्रेंड सुरू झाला किंवा एखादी गोष्ट हिट झाली की सिनेसृष्टी त्यामागे धावू लागते. हा फिल्म इंडस्ट्रीचा जुनाच फॉर्म्युला आहे. जेव्हा जेव्हा साऊथचे सिनेमे हिट होतात तेव्हा त्यांच्या सिनेमांचे रिमेक बनू लागतात.
आता जेव्हा 90 च्या दशकातील अभिनेत्यांचे चित्रपट हिट होऊ लागले आहेत तसे सगळेजण त्यांच्या मागे पळू लागले आहेत. तसं बघायला गेलं तर 90 च्या दशकातील सुपरस्टार देखील सकारात्मक विचाराने एकत्र येत आहेत."
अलीकडेच गदर 2 च्या यशानंतर, सनी देओलने त्याच्या घरी एक मोठी पार्टी आयोजित केली होती. यात नव्या कलाकारांसह 90 च्या दशकातील कलाकारांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं. हे अभिनेते क्वचितच एका छताखाली दिसतात.
यावेळी शाहरुख आणि सनी देओल एकमेकांना मिठी मारताना दिसले. यशराज यांच्या ‘डर’ या चित्रपटात ही जोडी शेवटची एकत्र दिसली होती. हा चित्रपट सुपरहिट झाला पण दोघांमध्ये एवढा दुरावा आला की आजतागायत याच्या चर्चा झडत असतात.
पण इतक्या वर्षांनंतर त्यांना गळाभेट घेतना पाहून पठाण आणि तारा सिंग यांच्यातील मैत्री आणखीनच घट्ट झाली आहे, याचा अंदाज येतो.
सनी देओलच्या पार्टीत सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार, अजय देवगण, अनिल कपूर, संजय दत्त हे देखील एकमेकांना प्रोत्साहन देताना दिसले.
गिरीश वानखेडे सांगतात, "पूर्वी 90 च्या दशकात एवढी एकजूट दिसायची नाही. पण आता एकमेकांच्या चित्रपटांचे ट्रेलर येताच ते एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात.
शाहरुख खानच्या 'जवान'चा ट्रेलर येताच सर्वांनी शाहरुखला पाठिंबा दिला. इतकंच नाही तर सलमान आणि शाहरुख एकमेकांच्या चित्रपटांमध्ये स्पेशल अपिअरन्सही देत आहेत."
तेव्हा 'हे' घडलं नव्हतं, पण...
80 आणि 90 च्या दशकात असं कधीच घडलं नव्हतं. पण आता अचानक अक्षय कुमार, शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण हे सर्वजण एकमेकांच्या पाठीशी उभे आहेत आणि एक सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहेत, जी खूप चांगली गोष्ट आहे.
90 च्या दशकातील कलाकारांच्या मागे आजही त्यांचे चाहते खंबीरपणे उभे आहेत
चित्रपट इतिहासकार एस एम एम औसाजा म्हणतात, "90 च्या दशकातील अनेक अभिनेते आजही काम करत आहेत. पण शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांसारखे काहीच कलाकार मोठे झाले आहेत. बाकी कोणीच यांच्या रांगेत नाहीये. हे अभिनेते एवढ्या उंचीवर जाण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे मोठे बॅनर म्हणजेच प्रॉडक्शन हाऊस आहेत."
ते स्वत: मोठे निर्माते आहेत. ते स्वतःच्या आणि इतर कलाकारांच्या चित्रपटांची निर्मिती करतात. दुसरं कारण म्हणजे त्यांची चित्रपट निवडण्याची कला. प्रेक्षकांना काय आवडतं आणि त्यांना कोणत्या प्रकारचे चित्रपट पाहायचे आहेत हे त्यांना माहीत आहे.
जेव्हा जेव्हा हे अभिनेते इतर शैलीचे चित्रपट करतात तेव्हा त्यांचे चित्रपट चालत नाहीत. उदाहरणार्थ, अक्षय कुमारने पृथ्वीराज आणि रामसेतू सारखे काही चित्रपट केले जे चालले नाहीत. मात्र जेव्हा अक्षयने ‘ओह माय गॉड’ 2 सारखा चित्रपट केला तेव्हा तो चित्रपट हिट झाला.
या अभिनेत्यांची स्वतःची एक प्रतिमा आहे. ज्या चित्रपटातून त्यांना आदर आणि प्रसिद्धी दोन्ही मिळालं आहे. ते टिकवून ठेवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत असतात.
एस एम एम औसाजा पुढे म्हणतात की, नव्या अभिनेत्यांची आजच्या पिढीवर चांगली पकड आहे. पण 90 च्या दशकातील अभिनेत्यांची आजच्या पिढीवर आणि 80 आणि 90 च्या दशकातील लोकांवरही चांगली पकड आहे. त्यामुळे त्यांची अपील व्हॅल्यू वाढते आणि ते मोठे स्टार ठरतात.
हे पाच अभिनेते केवळ त्यांच्या शैलीमुळे प्रसिद्ध आहेत असं नाही तर ते सगळ्या लोकांना आवडतात.
अमिताभ बच्चनची परंपरा पुढे नेली...
या अभिनेत्यांची जेवढी भुरळ आहे, तेवढी क्वचितच इतर कुणासाठी असेल. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चाहते त्यांना पाहण्यासाठी खूप लांबून येत असतात. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घराच्या अंगणात किंवा गच्चीवर उभे राहून चाहत्यांना अभिवादन करायला सुरुवात केली.
आजही त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक तासनतास त्यांच्या घराबाहेर उभे असतात. अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना भेटण्याची परंपरा सुरू केली. हळूहळू शाहरुख खाननेही ती सुरू केली आणि नंतर आमिर आणि सलमानने.
आजही 90 च्या दशकातील सुपरस्टार्सची लोकांमध्ये चलती आहे.
लोकांच्या प्रेमाचा संदर्भ देताना एस एम एम औसाजा सांगतात, "लोकांना या अभिनेत्यांची भुरळ आहे कारण त्या काळात त्यांना बघणं शक्य नव्हतं. त्यांना पाहण्याचं एकमेव माध्यम म्हणजे सिनेमा, थिएटर आणि नंतर टीव्ही. त्यावेळी लोकांकडे दुसरा पर्याय नव्हता. पण आज तसं नाहीये.
आजच्या पिढीला सगळे नवे कलाकार इथे तिथे पाहायला मिळतात. ते काय खातात, कुठे फिरत असतात, कोणते चित्रपट करत असतात. सोशल मीडियामुळे त्यांची प्रत्येक छोटी हालचाल त्यांना कळते. त्यामुळे त्यांच्यात आता कलाकारांना पाहण्याचा तो वेडेपणा उरलेला नाही."
"आपण जितकं त्यांना पाहू तितकी त्यांची भुरळ कमी होत जाते. पण पूर्वी असं नव्हतं. कलाकारांना पाहण्यासाठी खूप मोठी गर्दी असायची आणि आजही तेच आहे कारण त्यांचा सोशल मीडियावर मुक्त वावर नाहीये. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाचा वापर फक्त चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा आणि ट्रेलरपुरता मर्यादित ठेवला आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)