पाकिस्तानातील गाह गावातील बालपणीचे मित्र शेवटपर्यंत 'मोहना'ची प्रतीक्षा करत राहिले

मनमोहन सिंग त्यांचे बालपणीचे मित्र राजा मोहम्मद अली यांच्यासोबत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मनमोहन सिंग त्यांचे बालपणीचे मित्र राजा मोहम्मद अली यांच्यासोबत
    • Author, वकार मुस्तफा
    • Role, पत्रकार आणि संशोधक, बीबीसी उर्दूसाठी

'गाह' गावातील मोहना आता आपल्यात नाही. एका मोठाल्या झाडाखाली विटी-दांडू, गोट्या आणि कबड्डी खेळत ज्याचं बालपण आपल्या मित्रांसमवेत गेलं, त्याला त्याचे मित्र 'मोहना' नावानं पुकारायचे.

1932 साली या मोहनाचा जन्म ब्रिटीश अधिपत्याखाली असलेल्या भारतातील झेलम जिल्ह्यात झाला होता.

त्याचे वडील गुरमुख सिंह दुकानदार होते, तर आई अमृत कौर गृहिणी होती. या दाम्पत्याला झालेल्या बाळाचं नाव 'मनमोहन' ठेवण्यात आलं.

आता हे 'गाह' गाव पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादपासून 100 किलोमीटर दक्षिणेस असलेल्या चकवाल जिल्ह्यामध्ये येतं.

2004 साली मनमोहन सिंह भारताचे पंतप्रधान झाले आणि पुढील 10 वर्षे ते या पदावर कायम राहिले. त्यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये अनेक आर्थिक सुधारणा घडवून आणल्या.

इकडे मनमोहन सिंगांची कारकीर्द शिखरावर पोहोचली होती, तर तिकडे त्यांच्या मूळ गावी असलेले त्यांचे मित्र शाह वली आणि राजा मोहम्मद अली यांच्या हृदयात 'मोहना'सोबत घालवलेल्या दिवसांच्या आठवणी तरळत होत्या.

'मी आज जो काही आहे, तो शिक्षणामुळेच'

समाजशास्त्र विषयाचे तज्ज्ञ मॅथ्यू हे 2004 सालीच गाह गावी गेले होते.

'ट्रिब्यून इंडिया'मध्ये त्यांनी लिहिलेल्या एका लेखानुसार, या गाह गावातील ज्या शाळेत मनमोहन सिंग शिकले, त्या शाळेच्या रजिस्टरमध्ये मनमोहन सिंग यांचा क्रमांक 187 असा नोंदवण्यात आला होता. वडिलांचं नाव गुरमुख सिंह, जात (पंजाबी खत्री) कोहली, पेशा दुकानदार आणि प्रवेशाची तारीख 17 एप्रिल 1937 अशी नोंद होती.

या गावातील मनमोहन सिंग यांचे बालपणीचे मित्र शाह वली यांनी जॉर्ज मॅथ्यू यांना दिलेल्या माहितीप्रमाणे, दोन कच्च्या खोल्या म्हणजे ही शाळा होती.

शाह वली म्हणाले होते की, "आमचे मास्तर होते दौलत राम आणि मुख्याध्यापक होते अब्दुल करीम. या शाळेत मुली आणि मुलं एकत्रच शिकत असत."

मनमोहन सिंग यांचा शाळेतील रोल नंबर 187 होता.
फोटो कॅप्शन, मनमोहन सिंग यांचा शाळेतील रोल नंबर 187 होता.

'ट्रिब्यून पाकिस्तान'मध्ये छापून आलेल्या एका लेखानुसार त्यांचे मित्र गुलाम मोहम्मद खान यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं होतं की, "मोहना आमच्या वर्गाचा मॉनिटर होता आणि आम्ही सगळी मुले एकत्रच खेळत असू."

पुढे ते सांगतात की, "तो एक प्रामाणिक आणि हुशार मुलगा होता. आमचे मास्तर आम्हाला नेहमी सांगायचे की जर तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही या मोहनाची मदत घ्या."

इयत्ता चौथी पास केल्यानंतर हा मोहना आपल्या घरच्यांसमवेत आपल्या गावापासून 25 किलोमीटर दूर असलेल्या चकवालमध्ये गेला. तसेच, 1947 मध्ये ब्रिटीश इंडियाची भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी होण्यापूर्वीच तो कुटुंबासमवेत अमृतसरला गेला.

अशाप्रकारे हा मोहना आपल्या मूळ गावातील मित्र असलेल्या शाह वलीला पुन्हा कधीच भेटू शकला नाही.

मात्र, बालपणीचा मित्र असलेल्या राजा मोहम्मद अलीने 2008 मध्ये मनमोहन सिंग यांनी दिलेल्या मेजवानीमध्ये त्यांची भेट घेतली होती. नंतर 2010 साली राजा मोहम्मद अली यांचं निधन झालं.

मनमोहन सिंग यांचे पाकिस्तानातील चकवाल जिल्ह्यातील गाह हे गाव

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मनमोहन सिंग यांचे पाकिस्तानातील चकवाल जिल्ह्यातील गाह हे गाव

'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या माहितीनुसार, राजा मोहम्मद अली यांनी 'मोहना'ला शाल, चकवाली जूती (बूट), गावातील माती आणि पाणी भेट म्हणून दिलं. त्या बदल्यात त्यांना भेट म्हणून पगडी आणि नक्षीदार शाल मिळाली.

मनमोहन सिंग यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर लगेचच पाकिस्तानचे तत्कालीन सत्ताधारी जनरल परवेज मुशर्रफ यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी मुशर्रफ यांना 'गाह' गावाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती.

'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2010 रोजी मनमोहन सिंग यांनी कधी नव्हे ते एक भावनिक भाषण केलं होतं. या भाषणात मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं की, त्यांनी रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला होता.

"मी आज जो काही आहे, तो शिक्षणामुळे आहे," असं त्यांनी कापऱ्या आवाजात म्हटलं होतं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

गाहमधील मित्रांची आठवण आणि अपूर्ण इच्छा

मनमोहन सिंह यांनी केंब्रिज आणि त्यानंतर ऑक्सफर्डला जाण्याआधी भारतात अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं होतं.

1991 मध्ये जेव्हा ते भारताचे अर्थमंत्री झाले तेव्हा अर्थव्यवस्था अत्यंत वाईट अवस्थेत होती. मात्र, त्यानंतर 2007 साल येईपर्यंत भारताने आपला जीडीपीचा सर्वोच्च दर प्राप्त केला होता.

तिकडे गाह गावी मनमोहन सिंग यांचे बालपणीचे मित्र त्यांची प्रतीक्षा करत होते की ते कधी एकदा पाकिस्तानचा दौरा करतात आणि त्यांची भेट घेतात.

कारण, मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला येण्याचं निमंत्रण मान्य केलं होतं. मात्र, काही कारणास्तव ते पाकिस्तानला जाऊ शकलेले नव्हते.

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

बालपणीच्या या मित्रांना 'मोहना' येईल अशी प्रचंड आशा होती. कारण, मनमोहन सिंह यांची पत्नी गुरशरण सिंह यांचं कुटुंबदेखील फाळणीपूर्वीच्या पंजाबमधील झेलम जिल्ह्यातल्या ढक्कू गावी रहायचं.

भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांची वृत्ती विचित्र आहे. भेटायचं असेल तर निमित्त शोधतात, मात्र, जर भेटायचंच नसलं तर जवळून जाताना एकमेकांशी नजरही मिळवत नाहीत.

साऊथ एशियन असोशिएशन फॉर रिजनल कोऑपरेशनचं (सार्क) सोळावं शिखर संमेलन 2010 साली भूतानमध्ये झालं होतं.

मी दक्षिण आशियातील पत्रकारांच्या एका कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी तिथेच उपस्थित होतो.

मनमोहन सिंग यांचे गाहमधील वडिलोपार्जित घर
फोटो कॅप्शन, मनमोहन सिंग यांचे गाहमधील वडिलोपार्जित घर
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

'सार्क'मधील इतर देशांना असं वाटतं की, भारत आणि पाकिस्तानदरम्यान वाद होणं आणि सुसंवादाचा अभाव असणं, यामुळेच दक्षिण आशियाचा विकास थांबलेला आहे. आपली ही भावना या देशांनी उघडपणे मांडली होती.

कदाचित त्यामुळेच शिखर परिषदेचा यजमान असलेल्या भूतान देशाने एक वेगळीच कल्पना राबवली होती.

त्यांनी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना राजधानी थिंपूमधील 'सार्क' व्हीलेजमध्ये हिमालयाच्या आल्हाददायक पर्वतीय हवेमध्ये दोन मजली व्हिला देऊन एकमेकांचं शेजारी बनवलं.

येता-जाता हे दोघे एखाद्यावेळेस एकमेकांचा हालहवाला विचारतील वा विचारपूस करतील, अशी त्यांना आशा होती.

थिंपूमधील 'भूटान टुडे'नुसार, मनमोहन सिंग आणि गिलानी यांना किमान शेजारी म्हणून भेटण्यास भाग पाडण्याचा भूतानचा हा एक जुनाट पण तरीही प्रभावी प्रयत्न होता.

मात्र, दोन्हीही पंतप्रधानांनी हा प्रयत्न निष्प्रभ ठरवला. ज्यांना भेटायचं नव्हतं, ते भेटलेच नाहीत.

इतकंच नव्हे तर, सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांनाही एक दिवस त्यांना सांगावं लागलं की, त्या दोघांनी मावळत्या सायंकाळी फेरफटका मारायला जावं.

त्यानंतर 'सार्क'च्या प्रसिद्धीपत्रकानुसार, त्यांच्या सांगण्यावरून पाकिस्तान आणि भारताच्या पंतप्रधानांनी सार्क व्हीलेजमध्ये एकत्र फेरफटका मारला आणि गप्पाही मारल्या.

या भेटीमध्ये त्यांनी दोन्ही देशांमधील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी संवादाचे मार्ग खुले ठेवण्याचा निर्णय घेतला.

भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारण्याची आकांक्षा अद्याप फोल

त्यावेळी विरोधी पक्षांमधील भारतीय जनता पार्टीने मनमोहन सिंग यांच्या काँग्रेस सरकारवर असा आरोप केला होता की, ते पाकिस्तानबाबतीत फारच मवाळ भूमिका घेत आहेत.

जानेवारीमध्ये आपल्या शेवटच्या पत्रकार परिषदेत मनमोहन सिंग यांनी असा खुलासा केला होता की, त्यांचं सरकार परवेझ मुशर्रफ सरकारसोबत काश्मीरबाबत शांतता करार करण्याच्या अगदी जवळ आलं होतं. परंतु, त्यानंतर 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ले झाले.

भारताला जर आपल्या आर्थिक अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी काश्मीरची समस्या सोडवावी लागेल, असं मनमोहन सिंग यांचं मत होतं.

मनमोहन सिंग यांनी न्यूयॉर्कमध्ये मुशर्रफ यांच्यानंतर आलेले पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची भेट घेतली.

मनमोहन सिंग पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यासोबत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मनमोहन सिंग पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यासोबत

तसेच, त्यांनी 2011 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांना पंजाबमधील मोहालीमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचा सामना पाहण्याचं निमंत्रण दिलं होतं.

पत्रकार अभीक बर्मन यांनी लिहिलं होतं की, भारताने क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. मात्र, दुसऱ्या बाजूला 'क्रिकेट डिप्लोमसी'मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्हीही देश विजयी झाले आहेत.

पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांचे पाकिस्तानी समकक्ष पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी क्रिकेट मॅच आणि डिनर यादरम्यान एकमेकांसोबत सलग आठ तास चर्चा केली होती.

2012 मध्ये त्यावेळचे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री रहमान मलिक यांनी स्वतंत्र व्हीजा करारावर स्वाक्षरी केली. यामुळे, दोन्ही बाजूच्या लोकांना एकमेकांच्या देशांमध्ये ट्रॅव्हल व्हीजा प्राप्त करणं सोपं झालं.

त्याच वर्षी पंजाब आणि बिहार राज्यांतील भारतीय राजकारण्यांच्या एका शिष्टमंडळानेही पाकिस्तानला भेट दिली.

2013 मध्ये मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे दोघेही संयुक्त राष्ट्रांच्या जनरल असेंब्लीनिमित्त न्यूयॉर्कमध्ये भेटले होते.

दोघांनीही एकमेकांच्या देशांना भेट देण्याचं निमंत्रण स्वीकारलं होतं. मात्र, कोणतीही तारीख निश्चित झालेली नव्हती.

त्याच वर्षी मे महिन्यामध्ये नवाज शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर झालेली ही त्यांची पहिली प्रत्यक्ष भेट होती.

गुरुद्वारा दरबार साहिब इथे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गुरुद्वारा दरबार साहिब इथे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

त्यापुढील वर्ष हे मनमोहन सिंग यांच्या सरकारचं शेवटचं वर्ष होतं.

मनमोहन सिंग 2019 मध्ये पाकिस्तानात आले तेव्हाही ते 'एक सामान्य माणूस' म्हणून प्रवाशांच्या जत्थ्यामधूनच करतारपूरला गेले.

करतारपूरमधूनच, भारतातील शिखांसाठी डेरा बाबा नानकमार्गे पवित्र गुरुद्वारा दरबार साहिबला जाण्यासाठी कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे.

हेच 'करतारपूर मॉडेल' भविष्यातील वादांना सोडवण्यासाठी मदत करु शकेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती.

"समृद्ध भविष्याला आकार देण्यासाठी शांतता आणि सद्भावना हाच एकमेव मार्ग आहे," असं त्यांचं म्हणणं होतं.

मात्र, पाकिस्तानमध्ये आपल्या जन्मस्थळी दौरा करण्याची 'मोहना'ची इच्छा शेवटपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही.