You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊतांचे गुरु शरद पवारांचा इतिहास खंजिराचाच
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. संजय राऊतांचे गुरु शरद पवारांचा इतिहास खंजिराचाच – चंद्रकांत पाटील
संजय राऊत ज्यांना गुरू मानतात, त्या शरद पवारांचा इतिहास खंजिराचाच आहे, अशी टीका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी वरील वक्तव्य केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला काल (16 नोव्हेंबर) त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली होती.
या भेटीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकाही केली होती.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला हात जोडायला जात असाल, तर हातातील खंजीर बाजूला ठेवा, असं राऊत यांनी म्हटलं होतं.
याच टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं. ते
म्हणाले, “संजय राऊत ज्यांना गुरू मानतात, त्या शरद पवारांचा इतिहास खंजिराचाच आहे. शिंदे गटाच्या खंजिराला एक पार्श्वभूमी आहे. उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा विसर पडल्यामुळे आणि ते असह्य झाल्यामुळे शिंदेंनी शिवसेना सोडली. पण त्यांचा हा आपसातला विषय आहे.” ही बातमी लोकसत्ताने दिली.
2. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा थांबवण्याची मागणी
राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवावी, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.
राहुल गांधी यांचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचं ते म्हणाले.
हे राज्य कायद्याचं आणि सावरकरांचं आहे असं दाखवून देऊया असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
ही बातमी एबीपी माझाने दिली.
3. नोटाबंदी ही रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीनंतरच, मोदी सरकारचे कोर्टात स्पष्टीकरण
नोटाबंदी हा केवळ सरकारचा निर्णय नव्हता तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या शिफारशीनंतरच त्याचा निर्णय घेण्यात आला, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिलं आहे.
याप्रकरणात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्रही दाखल केलं असून यामध्ये वरील बाबींचा उल्लेख त्यांनी केला आहे.
बनावट नोटा, टेरर फंडिंग रोखण्यासाठी, काळा पैसा आणि करचुकवेगिरीचा सामना करण्यासाठी नोटाबंदी हा एक प्रभावी उपाय आहे. त्यामुळे केंद्राने 2016 साली नोटाबंदीचा निर्णय घेतला, मात्र, हा केवळ सरकारचा निर्णय नव्हता, तर रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाने केंद्र सरकारला दिलेल्या विशिष्ट शिफारशीनुसार केली गेली.
आरबीआयने या शिफारशीच्या अंमलबजावणीसाठी मसुदा आराखडाही प्रस्तावित केला होता, असं या प्रतित्रापत्रात म्हटलं आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.
4. दांडी यात्रेप्रमाणेच भारत जोडो यात्रा ऐतिहासिक – बाळासाहेब थोरात
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा ही महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील दांडी यात्रेप्रमाणे ऐतिहासिक ठरेल, असं मत आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर ही भारत जोडो यात्रा सुरू आहे. सध्या ही यात्रा आता महाराष्ट्रात असून, राज्यातील यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे.
यात्रेच्या संदर्भात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “भारत जोडो यात्रेला देशभरातील पुरोगामी विचारांच्या संघटना आणि मित्र पक्षांचा मोठा पाठिंबा लाभत आहे. जाती-धर्मांच्या नावावर देशात राजकारण सुरू असून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही महागाई, बेरोजगारी याविरुद्ध आवाज उठवत प्रेमाचा व एकतेचा संदेश देत आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील दांडी यात्रेप्रमाणे ही यात्रासुद्धा ऐतिहासिक ठरेल.” ही बातमी अॅग्रोवनने दिली.
5. संजय राऊत यांनी पुन्हा EDची नोटीस
अंमलबजावणी संचालनालय अर्थात EDने शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
संजय राऊत यांनी चौकशीसाठी 18 नोव्हेंबरला ED कार्यालयात हजर व्हावं, असं या नोटिशीत म्हटलं आहे.
ED कडून दाखल असलेल्या पत्राचाळ गैरव्यवहाराच्या आरोपांखाली संजय राऊत यांना 100 दिवसांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहायला लागलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाली होती.
दरम्यान, ED ने एका बाजूला चौकशीसाठी पुन्हा बोलावलं आहे. तर, यासोबतच त्यांनी संजय राऊतांच्या जामिनाविरोधात सुधारित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी सदर याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या याचिकेवर 25 नोव्हेंबरला सुनावणी होईल. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)