संजय राऊत म्हणतात, 'मी बाहेर असो वा तुरुंगात, 2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल' #5मोठ्या बातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. मी बाहेर असो वा नसो, 2024 ला महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री – संजय राऊत

मी बाहेर असो वा नसो, 2024 पर्यंत पुन्हा महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे.

काल आपल्या वाढदिवसानिमित्त (15 नोव्हेंबर)प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

ते पुढे म्हणाले, “2024 पर्यंत आमची लढाई सुरुच राहील. 2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री असेल. मी तुरुंगाबाहेर असो वा हे लोक पुन्हा मला तुरुंगात टाकू दे, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे.”

“आमच्यावर असे खोटे आरोप आणि खोट्या कायदेशीर कारवाया होत राहतील. शिवसेनेचं रक्त स्वस्त नाही. सध्याच राजकीय वातावरण अस्थिर आहे, असंही संजय राऊत म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली.

2. राहुल गांधी : मोदीजी, सत्तेत येऊन 8 वर्षे झाली, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्यांचं काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत येऊन 8 वर्षे झाली आहेत. त्यांनी दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन देऊन देशातील तरुणांची फसवणूक केली आहे.

देशातील तरूण मोदींना नोकऱ्या कुठे आहेत, असा सवाल विचारत आहेत, पण मोदी गप्प आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

भारत जोडो यात्रेदरम्यान वाशिम येथील चौक सभेत राहुल गांधी बोलत होते.

ते म्हणाले, देशातील तरुणांना रोजगार मिळण्याऐवजी उलट चुकीच्या पद्धतीने GST, नोटबंदी यांच्यामुळे उद्योग बंद पाडून लोकांचे रोजगार घालवण्यात आले आहेत. देशाचा कणा असलेले लघु, मध्यम, छोटे व्यापार दुकानदार यांचे व्यवसाय बंद पडले आहेत.

केवळ दोन-तीन उद्योगपतींसाठी मोदी सरकार काम करतं. गॅस 40 रुपये, पेट्रोल 70 रुपये आणि डिझेल 60 रुपये असताना नरेंद्र मोदी UPA सरकारवर कठोर टीका करत होते.

आता गॅस 1200 रुपये, पेट्रोल 109 रुपये आणि डिझेल 96 रुपये झाले तरी नरेंद्र मोदी एकही शब्द उच्चारत नाहीत.

सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी यांच्याशी मोदी सरकारला काहीही देणंघेणं नाही, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. ही बातमी लोकमतने दिली.

3. अभियांत्रिकीच्या मराठी भाषेतील पुस्तकांचं वितरण

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) मराठी भाषेत भाषांतरित केलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या 9 तर पदविका अभ्यासक्रमाच्या 11 पाठ्यपुस्तकांचे वितरण मुंबई विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आलं.

या कार्यक्रमास केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार उपस्थित होते. तंत्रशिक्षण संचालनालय आणि AICTE यांच्या विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात मराठी भाषेमध्ये निर्मित पुस्तकांचे 12 संस्थांच्या प्राचार्यांना आणि 12 विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आलं.

यावेळी बोलताना सुभाष सरकार म्हणाले, “अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पुस्तके भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचा हाती घेतलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. तो उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रादेशिक भाषांना प्राधान्य देण्याची केंद्राची भूमिका प्रादेशिक भाषांविषयी कटिबद्धता दर्शवणारी आहे. भारतीय भाषा, भारतीयत्वाचा आत्मा आणि भविष्य आहे.”

ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

4. सहज बोलायला तुम्ही सामान्य नागरीक नाही, अजित पवारांनी खडसावले

'हल्लीच्या राजकारणात वाचळवीरांचं प्रस्थ वाढलं आहे. काही मंत्री बोलतात त्यातून मंत्रिमंडळाची प्रतिमा खराब होते. आपल्या विधानानंतर सहज बोललो, असं काही जण म्हणतात. पण सहज बोलायला तुम्ही काय सामान्य नागरीक आहात का?', अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राजकीय नेत्यांना खडसावलं आहे.

ते पुढे म्हणाले, तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, लोक ऐकून घेत असतात, पाहतात आणि लक्षातही ठेवत असतात. त्यामुळे संविधान, कायदा, नियम यांचा सर्वांनी आदर करायला हवा. मंत्रिमंडळातील लोक चुकत असतील, तर त्यांना स्पष्ट सांगितलं पाहिजे. वाचाळवीरांना आवरलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. ही बातमी सामनाने दिली.

5. बाबासाहेब पुरंदरे शिवरायांच्या ध्यासाने जगले – राज ठाकरे

बाबासाहेब पुरंदरे हे आपल्या आयुष्याची 100 वर्ष एकच ध्यास घेऊन जगले. तो ध्यास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाबासाहेबांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकताना त्यातली उत्कटता मनाला भिडायची, जसं लतादीदींचं गाणं आर्त वाटतं तशीच ही अनुभूती असायची, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी व्यक्त केलं आहे.

शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली.

या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची उत्कटता, आर्तता ही एका जन्मात येऊ शकत नाही. बाबासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांवरची भक्ती ही अनेक जन्मांची असणार. ही श्रद्धाच त्यांच्या आयुष्याची ताकद ठरली, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

ही बातमी ई-सकाळने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)