You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजीव गांधींची मारेकरी नलिनी म्हणते ‘आम्हाला गोळी मारली असती तर बरं झालं असतं’
- Author, मुरलीधरन काशी विश्वनाथन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणी कैदेत असलेली नलिनी यांची 32 वर्षांनंतर तुरुंगातून मुक्तता झाली.
सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत सलेल्या नलिनी आणि आर. पी. रविचंद्रन यांच्याबरोबर सर्व आरोपींना सुटका करण्याचा आदेश दिला.
ज्या दिवशी हा आदेश आला त्याच्या एक तासाच्या आतच बाकी दोषींसकट नलिनी तुरुंगाच्या बाहेर आली.
या सहा दोषींमधील इतर चार संथन, मुरुगन, जयतकुमार आणि रॉबर्ट पायस श्रीलंकेचे होते. त्यांना एका स्पेशल कँपमध्ये नेण्यात आलं.
बीबीसीशी विशेष बातचीत करताना या घटनेवर नलिनीने दु:ख व्यक्त केलं. ती म्हणाली की आता ती तिच्या कुटुंबाला एकत्र आणण्यात आणि नातं सुदृढ करण्यावर भर देईल.
नलिनी आत्मघाती पथकात असल्याचं आढळलं होतं. तिला या प्रकरणात दोषी ठरवलं गेलं आणि तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
मात्र सोनिया गांधींनी एक अपील दाखल केलं आणि तिच्या शिक्षेचं रुपांतर जन्मठेपेत करण्यात आलं. त्यानंतर नंदिनी तिच्या सुटकेसाठी न्यायालयीन लढा देत होती.
नलिनी सांगते की तुरुंगात जाण्याआधी या सर्व गोष्टींबद्दल काहीही माहिती नव्हती. “जेव्हा मला रिमांडमध्ये घेऊन गेले तेव्हा मला वेगळ्या सेलमध्ये ठेवलं तेव्हा मी खूप घाबरले होते.”
मी जोरात ओरडले. एकदम गोंधळ उडाला. मी बाहेर पळून गेले. अधिराई आणि माझी आई एकाच सेलमध्ये बंद होते. तेही खूप घाबरले होते. माझी परिस्थिती पाहून तेही ओरडायला लागले.
मला आत जायला मनाई करण्यात आली. तिथे रायफल घेऊन असलेल्या जवानाला म्हटलं, “आम्हाला गोळी मारली असती तर बरं झालं असतं.”
तुरुंगातले अनुभव
ती सांगते, “मी इतकी ओरडले की माझ्या घशातून रक्त निघायला लागलं. तो माझ्यासाठी फार कठीण काळ होता. जेव्हा मला अटक झाली तेव्हा मला खूप ताप होता. मी पलंगावरून उठून उभी सुद्धा राहू शकत नव्हते.
दोन दिवस त्यांनी मला झोपू दिलं नाही. या परिस्थितीचा सामना करण्याची माझी हिंमत नव्हती. मी अनेकदा दात घासायची नाही, केस विंचरायची नाही.
ही परिस्थिती जरा सुधारली तेव्हा माझ्या छातीत दुखायला लागलं. अनेकांना वाटलं की मी नाटक करत आहे. मात्र जेव्हा डॉक्टरांनी तपासलं तेव्हा माझी तक्रार खरी आहे असं त्यांच्या लक्षात आलं.
त्यानंतर काही काळ परिस्थिती सुधारली. त्याचवेळी कोडियाक्कराई शणमुगमचा मृत्यू झाला. तुरुंग प्रशासनाने आम्हाला बेड्या घालायला सुरुवात केली. मी गंमतीने म्हणायचे की आमच्या हातात बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे.
टाडा न्यायालायाने ज्या लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली त्यात सगळ्यांत वर माझं नाव होतं. ते पाहून मी आश्चर्यचकित झाले.
या अपराधासाठी मी कधीही कबुलीजबाब दिला नव्हता."
नलिनीला जेव्हा अटक झाली तेव्हा ती दोन महिन्याची गरोदर होती. तिच्या अटकेनंतर लगेच तिचा नवरा, आई आणि छोट्या भावाला अटक करण्यात आली.
नलिनी सांगते की तिची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. या सर्व घडामोडीमुळे ती आणखीच डळमळीत झाली. राजीव गांधींच्या हत्येवेळी आणखी 16 लोकांचा जीव गेला होता. त्यांचे कुटुंबीय या दोषींच्या सुटकेचा विरोध करत आहेत.
पश्चाताप
नलिनी म्हणते, “मला त्यांच्या कुटुंबाबद्दल वाईट वाटतं. त्यांच्या कुटुंबियांना काही मदत मिळाली की नाही याबदद्ल मला काही कल्पना नाही. त्यांच्यासाठी ही मोठी हानी आहे.
कुटुंबप्रमुखाला गमावणं हे खरंच खूप नुकसानकारक आहे. मला वाटतं की त्यांनी आमच्या परिस्थितीचाही विचार करायला हवा. 17 लोकांना मारण्यामागे माझा काय उद्देश असेल? त्याची काय गरज आहे? मी काय शिक्षित नाही का? मला त्यांची हत्या करून काय मिळेल? हे करून काय माझं घर चालतं का?”
त्याचं उत्तर ती स्वत:च देते. “असं काहीही नाही. मला त्यांचं नावही माहिती नाही. मात्र त्यांच्या हत्येसाठी मला दोषी ठरवलं जातं.”
जे लोक या हत्येत सहभागी होते त्यांच्याबद्दल नलिनी म्हणते, “ते लोक असे वाटत नव्हते मी तेव्हा तितकी समजूतदार नव्हते असंही तुम्ही म्हणू शकता. मी तेव्हा फार व्यग्र असायचे. मी तेव्हा शिक्षण घेत होते. काम करत होते. क्लासला जात होते.
क्लासहून आल्यावर 11 वाजता मी झोपून जायचे. अशा दिनचर्येबद्दल मी कधी विचार केला नाही."
जेव्हा नलिनीची मृत्यूदंडांची शिक्षा रद्द केली तेव्हा इतर लोकांच्या आशा जागृत झाल्या. त्यांच्या फाशीची सात वेळा घोषणा झाली होती. त्यातील चार वेळा तारीखही निश्चित झाली होती. फाशीची दोरीही तयार करण्यात आली होती. फाशीच्या कैद्याचा सेलसुद्धा तयार करण्यात आला होता. इतकंच काय अंतिम इच्छा जाणून घेण्यासाठी एक धर्मगुरूही येऊन गेला. सगळी तयारी झाली होती.
नलिनी सांगते, “हे सगळं माझ्या डोळ्यासमोर झालं. मात्र मी आशा सोडली नाही. मी विचार केला की मी काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे माझ्याबरोबर काहीही वाईट होणार नाही.”
आता सुटकेनंतर एक नवीन आयुष्य जगण्याची संधी तिला मिळाली आहे. नलिनीला आशा आहे. “मी माझा नवरा आणि मुलीबरोबर राहू इच्छिते. मी कुटुंबात एकजूट निर्माण करणार आहे. हीच माझी इच्छा आहे.”
घटनाक्रम
21 ऑक्टोबर 1991 ला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूतील चेन्नईजवळ असलेल्या श्रीपेरंबदूरमध्ये एका निवडणूक रॅलीत धनू नावाच्या लिट्टेच्या एका आत्मघातकी हल्लेखोराने हत्या केली.
या घटनेत राजीव गांधी आणि धनू यांच्यासकट 16 लोकांचा मृत्यू झाला आणि 45 लोक गंभीर जखमी झाले होते.
या प्रकरणात सत्र न्यायालयाने एकूण 26 लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र मे 1999 मध्ये सुप्रीम कोर्टाने 19 लोकांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती इतर सातपैकी चार दोषी (नलिनी मुरुगन, श्रीहरन, संथन आणि पेरारिवलन) यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आणि इतर (रविचंद्रन, रॉबर्ट पायस आणि जयकुमार) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
या चौघांनी दयेचा अर्ज दाखल केला होता. त्यावर तामिळनाडूच्या राज्यपालांनी ही शिक्षा जन्मपठेपेत रुपांतरित केली होती. इतरांची याचिका 2011 मध्ये राष्ट्रपतींनी फेटाळली होती. सर्व दोषी मुदतपूर्व सुटका व्हावी म्हणून बराच काळ कायदेशीर लढाई लढत होते.
तामिळनाडू सरकारनेही त्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस केली होती. राज्यपालांनी ती मान्य केली होती आणि पुढील मंजुरीसाठी राष्ट्रपतींना पाठवली होती.
त्याआधी मद्रास हायकोर्टात जूनमध्ये नलिनी आणि रविचंद्रन यांनी रिट याचिका दाखल करून तामिळनाडू सरकारला सुटकेचा आदेश देण्याची विनंती केली होती.
2018 मध्ये त्यांच्या सुटकेसाठी जी शिफारस करण्यात आली होती त्यावर राज्यपालांच्या संमतीशिवाय अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली होती.
18 मे ला पेरारिवलन यांची सुटका करण्यात आली. कोर्टाने संविधानातल्या कलम 142 अंतर्गत विशेष अधिकारांचा आधार घेत ही सुटका केली होती. पेरारिवलन 30 वर्षं तुरुंगात होता. त्यात आधारावर नलिनीची सुटकाही करण्यात आली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)