पतियाळाचे राजे भूपिंदर सिंह हिटलर- मुसोलिनीला केव्हा भेटले? सोन्याच्या ताटात जेवणाऱ्या, चांदीच्या टबात अंघोळ करणाऱ्या राजाची गोष्ट

 पतियाळाचे महाराजा भूपिंदर सिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पतियाळाचे महाराजा भूपिंदर सिंग
    • Author, रेहान फजल

1930 च्या दशकात प्रसिद्ध उर्दू कवी जोश मलिहाबादी आर्थिक संकटात होते. त्यावेळी ते पतियाळा येथील महाराजा भूपिंदर सिंग यांचे परराष्ट्रमंत्री के.एम पणिक्कर यांच्याकडे प्रसिद्ध वकील तेज बहादूर सप्रू यांचं पत्र घेऊन गेले होते, याबाबतचा एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे.

पणिक्कर यांना लिहिलेल्या पत्रात तेज बहादूर सप्रू यांनी महाराजांना जोश मलिहाबादी यांच्यासाठी पेन्शन निश्चित करण्यास सांगितलं होतं.

पणिक्कर जोश मलिहाबादी यांना महाराजांकडे घेऊन गेले आणि त्यांना दरमहा 75 रुपये पेन्शन दिली जावी अशी शिफारस केली.

पणिक्कर आपल्या आत्मचरित्रात लिहितात, "महाराज माझ्याकडे वळले आणि आश्चर्यानं म्हणाले, तू दक्षिण भारतीय आहेस, म्हणून तुला या कवीचं मोठेपण कळणार नाही. आपल्याला सगळे लोक विसरतील, मात्र लोक कालिदासांसारखी त्यांची आठवण काढतील.

एवढ्या मोठ्या माणसासाठी इतकी माफक पेन्शन माझ्या प्रतिष्ठेशी जुळत नाही, म्हणून मी ठरवलं आहे की, जोश यांना आयुष्यभरासाठी 250 रुपये पेन्शन द्यावी."

ग्राफिक्स
ग्राफिक्स

बहुआयामी व्यक्तिमत्व

पतियाळाचे महाराजा भूपिंदर सिंग हे फक्त उदार आणि जास्त खर्च करणारे असे विलक्षण राजे असते तर चरित्रकारांना त्यांच्याबद्दल इतका रस वाटला नसता. त्यांच्यामध्ये अनेक गुण होते.

त्यांचे चरित्रकार नटवर सिंग त्यांच्या 'द मॅग्निफिसेंट महाराजा, द लाइफ अँड टाइम्स ऑफ महाराजा भूपिंदर सिंग ऑफ पटियाला' या पुस्तकात लिहितात, "महाराजांचे आकर्षण त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वात होतं.

ते एक महाराजा, देशभक्त, एक परोपकारी, एक खेळाडू, एक सैनिक, एक संगीत आणि कला प्रेमी, एक प्रेमळ पिता, एक विश्वासू मित्र, एक धोकादायक शत्रू, भारतीय क्रिकेटचे जनक तसंच एक चतुर राजकारणी होते."

प्रसिद्ध उर्दू कवी जोश मलिहाबादी

फोटो स्रोत, PREM MOHAN KALRA

फोटो कॅप्शन, प्रसिद्ध उर्दू कवी जोश मलिहाबादी

महाराजा भूपिंदर सिंग यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1891 रोजी झाला. लहानपणी त्यांना 'टिक्का साहेब' म्हटलं जायचं. त्यांचे वडील राजिंदर सिंग यांचं निधन झालं तेव्हा ते केवळ नऊ वर्षांचे होते.

त्याआधी त्यांची आई जसमित कौर यांचंही निधन झालं होतं. ते फक्त 10 वर्षांचे असताना पतियाळाच्या गादीवर बसले होते.

वयाच्या 12 व्या वर्षी महाराजा भूपिंदर सिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वयाच्या 12 व्या वर्षी महाराजा भूपिंदर सिंग

राणी व्हिक्टोरियाच्या मृत्यूमुळे त्यांचा राज्याभिषेक सोहळा जवळपास एक वर्ष पुढं ढकलण्यात आला होता.

भूपिंदर सिंग सज्ञान होईपर्यंत पतियाळाचा कारभार मंत्रिमंडळ चालवत असे. 1903 मध्ये ब्रिटनचे महाराजा एडवर्ड पंचम यांच्या शाही दरबाराची दिल्लीत स्थापना झाली.

त्यावेळी भूपिंदर सिंग 12 वर्षांचे होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते त्यांच्या काकांसह एका विशेष रेल्वेने दिल्लीला पोहोचले, तिथे त्यांनी त्यांचं पहिलं जाहीर भाषण केलं.

पहिल्या महायुद्धात ब्रिटनला मदत

वर्ष 1904 मध्ये त्यांना लाहोरच्या एचिसन कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. त्यांच्या मदतीसाठी 50 मदतनिसांची टीम लाहोरला गेली. त्यांच्या बुटाची लेसही नोकर बांधत असत.

प्रौढ झाल्यावर सत्तेचे अधिकार त्यांच्या हाती देण्यात आले. त्यांच्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमात व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो सहभागी झाले होते.

या काळात ते चैनीचं जीवन जगले आणि आपला सगळा वेळ पोलो, टेनिस आणि क्रिकेट खेळण्यात घालवला.

महाराजा भूपिंदर सिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाराजा भूपिंदर सिंग

पहिल्या महायुद्धात त्यांनी ब्रिटनला मदत केली. त्यांनी मेजर वॅली यांच्यासमवेत लष्करी भरती मोहीम सुरू केली. एका दिवसात 521 तरुणांची सैन्यात भरती केली.

डॉ. दलजित सिंग आणि गुरप्रीत सिंग हरिका त्यांच्या चरित्र 'महाराजा भूपिंदर सिंग, द ग्रेट रूलर ऑफ द पटियाला स्टेट' मध्ये लिहितात, "महाराजा भूपिंदर सिंग यांनी युद्धासाठी ब्रिटिश सरकारला दीड कोटी रुपये दिले, जी त्या काळात खूप मोठी रक्कम होती. याशिवाय पतियाळा राज्यानं युद्धादरम्यान 60 लाख रुपये स्वतंत्रपणे खर्च केले.

एवढंच नाही तर त्यांनी 72 व्या पतियाळा कॅमल कॉर्प्सला 612 उंट आणि 8 व्या पतियाळा कॅमल कॉर्प्सला 1072 उंट दिले. याशिवाय त्यांनी 247 खेचरं, 405 घोडे, 13 मोटारगाड्या ब्रिटिश सैन्याला दिल्या."

त्यांनी शिमला हिल स्टेशनमधील 'रॉकवूड' आणि 'ओकओव्हर' या निवासस्थानांचं रूपांतर रुग्णालयात केलं.

हिटलर आणि मुसोलिनी यांची घेतली भेट

भूपिंदर सिंग हे उंच आणि धिप्पाड होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांची सहानुभूती इंग्रजांच्या बाजूने होती.

त्यांना त्यांची स्टाइल आणि फॅशन स्टेटमेंटचा अभिमान होता. विशेषत: ते ज्या शाही शैलीनं आपली पगडी बांधत असत त्याचा त्यांना विशेष अभिमान होता. ते पंजाबी भाषेचे मोठे पुरस्कर्ते होते आणि त्यांनी ती दरबारी भाषा बनवण्याचा भरपूर प्रयत्न केला.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि महाराजा भूपिंदर सिंग यांचे नातू अमरिंदर सिंग यांचे चरित्रकार खुशवंत सिंग त्यांच्या 'कॅप्टन अमरिंदर सिंग द पीपल्स महाराजा' या पुस्तकात लिहितात, 'भूपिंदर सिंग हे पंजाबी भाषेचे इतके मोठे प्रेमी होते की, त्यांच्या सल्ल्यानुसार रेमिंग्टन टाइपरायटर कंपनीनं गुरुमुखी टाइपरायटर बनवला होता, ज्याला 'भूपिंदर टाइपरायटर' असं नाव देण्यात आलं होतं.

जर्मनीचा हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जर्मनीचा हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर

स्वतःचं विमान असणारे ते भारतातील पहिले व्यक्ती होते. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात त्यांनी ते ब्रिटनमधून आणलेलं होतं. त्यासाठी त्यांनी पतियाळा येथे धावपट्टीही बांधली होती.'

त्यांना जगातील दोन हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी आणि हिटलर यांना भेटण्याची संधी मिळाली.

हिटलरनं त्यांना जर्मन बनावटीचे एक डझनभर लिग्नोस पिस्तूल आणि एक पांढरी मेबॅक कार भेट दिली होती.

जगातील दुर्मिळ वस्तू गोळा करण्याची आवड

भूपिंदर सिंग जेव्हा जेव्हा लंडनला जात तेव्हा त्यांच्या भेटींना ब्रिटिश प्रसारमाध्यमे भरपूर प्रसिद्धी देत. 'डेली मेल'ने 3 ऑगस्ट 1925 च्या अंकात लिहिलं, "महाराजा जगातील सर्वात उंच क्रिकेट मैदानाचे मालक आहेत. ते चांदीच्या बाथटबमध्ये आंघोळ करतात आणि त्यांचे हॉटेल त्यांना दररोज 3000 गुलाब पाठवतं. त्यांनी 200 सूटकेस सोबत आणल्या आहेत."

भारतातील 560 राज्यकर्त्यांपैकी फक्त 108 राज्यकर्त्यांना तोफांची सलामी मिळण्याचा अधिकार होता. हैदराबाद, बडोदा, काश्मीर, म्हैसूर आणि ग्वाल्हेरच्या राजांना 21 तोफांची सलामी मिळत असे. भूपिंदर सिंग जिथे जिथे जात तिथे त्यांना 17 तोफांची सलामी दिली जात.

लंडनमधील शेवो हॉटेलच्या छतावर उभे असलेले महाराजा भूपिंदर सिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लंडनमधील शेवो हॉटेलच्या छतावर उभे असलेले महाराजा भूपिंदर सिंग

भूपिंदर सिंग यांना पुस्तके, गाड्या, गालिचे, कपडे, कुत्रे, दागिने, हस्तलिखित, पदके, चित्रे, घड्याळे आणि जुनी वाईन गोळा करण्याचा छंद होता. त्यांचे दागिने 'कार्तिया' आणि त्यांची घड्याळे 'रोलेक्स' कडून खास ऑर्डर करून बनवली जात. त्याचे सूट 'सॅव्हिल रो' मधून शिवले जात आणि त्याचे बूट 'लॉब्स' मधून विकत घेतले जात असत.

जॉन लॉर्ड आपल्या 'महाराज' या पुस्तकात लिहितात, "त्यांच्याकडे एकूण 27 रोल्स रॉइस कार होत्या. त्यांची देखभाल कंपनीने पाठवलेला एका इंग्रज व्यक्ती करत असत."

'पटियाला पेग'ची सुरुवात

महाराजा भूपिंदर सिंग यांच्या दातृत्वाचे किस्से सर्वत्र प्रसिद्ध होते. विद्यापीठांना आणि गरिबांसाठी काम करणाऱ्या संस्थांना ते उदार हस्ते देणगी देत असत.

महाराजांचे मंत्री म्हणून काम पाहिलेले दिवाण जरमनी दास त्यांच्या 'महाराजा' या पुस्तकात लिहितात, "मदन मोहन मालवीय यांच्यासारखे मोठे नेते जेव्हाही महाराजांना बनारस विद्यापीठासाठी पैशाची विनंती करत तेव्हा ते नेहमी 50,000 रुपयांचा धनादेश घेऊन जात असत."

महाराजांच्या खाण्यापिण्याचा ठराविक प्रोटोकॉल होता. पटियाला पेगची सुरुवात त्यांच्या इथनूच सुरू झाली होती.

नटवर सिंग लिहितात, "याचा अर्थ पाण्याशिवाय एका घोटात चार इंचापर्यंत व्हिस्की पिणे. महाराजांना व्हिस्कीपेक्षा वाईन जास्त आवडायची. त्यांना सर्व प्रकारच्या वाईन्सची माहिती होती. त्यांचे वाइन कलेक्शन कदाचित त्यावेळी भारतातील सर्वोत्तम होते."

द मॅग्निफिसंट महाराजा पुस्तक

फोटो स्रोत, RUPA PUBLICATIONS

सोने आणि रत्नांच्या ताटात जेवण

भूपिंदर सिंग यांच्या महालात 11 स्वयंपाक खोल्या होत्या. तिथे दररोज शेकडो लोकांसाठी अन्न शिजवलं जात असे.

दिवाण जरमनी दास लिहितात, "महाराण्यांना सोन्याच्या ताटात आणि वाटीत जेवण दिलं जात असे. त्यांना दिल्या जाणाऱ्या पदार्थांची संख्या 100 होती. राण्यांना चांदीच्या ताटात जेवण दिले जात. त्यांना 50 प्रकारचे अन्नपदार्थ दिले जात.

इतर महिलांना पितळेच्या ताटात जेवण देण्यात येई. त्यांना दिले जाणारे पदार्थ हे 20 पेक्षा जास्त नसत. रत्नांनी जडवलेल्या सोन्याच्या ताटात स्वतः महाराजांना जेवण देण्यात येत. त्यांना दिल्या जाणाऱ्या पदार्थांची संख्या 150 पेक्षा कमी नव्हती."

भूपिंदर सिंग

फोटो स्रोत, KANISHKA PUBLISHERS

विशेष प्रसंगी, जसं की महाराज, महाराण्या आणि राजपुत्रांच्या वाढदिवसादिवशी मेजवानी दिली जात. ज्यामध्ये सुमारे 300 लोकांचा स्वयंपाक केला जात असे.

या मेजवानीत इटालियन, भारतीय आणि इंग्रजी वेटर्स जेवण वाढत असत. अन्न आणि मद्य उच्च दर्जाचे असत. मेजवानी नंतर एक संगीतमय कार्यक्रम व्हायचा. ज्यामध्ये भारताच्या विविध भागातून आमंत्रित नर्तक महाराजांचं मनोरंजन करत असत. अशा प्रकारची पार्ट्या सहसा सकाळी उशिरा संपत. तोपर्यंत सर्वजण दारूच्या नशेत असत.

क्रिकेटची प्रचंड आवड

महाराजा भूपिंदर सिंग यांचे क्रिकेटवर प्रचंड प्रेम होते. फार कमी लोकांना माहीत असेल की, विसाव्या शतकाच्या शेवटी महान क्रिकेटपटू रणजी महाराजांचे वडील महाराज राजिंदर सिंग यांचे एडीसी होते.

1898 मध्ये पटियाला येथे येईपर्यंत ते क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध झाले होते. परंतु नवानगरचे राजा म्हणून त्यांची ओळख संपुष्टात आली होती.

 भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज मोहम्मद निसार

फोटो स्रोत, BCCI

फोटो कॅप्शन, भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज मोहम्मद निसार

सुरुवातीला ते जोधपूरचे महाराजा सर प्रताप सिंह यांच्याकडे गेले होते. त्यांनी त्यांना पत्र लिहून पटियालाच्या महाराजांना पाठवले.

1911 मध्ये, वयाच्या 20 व्या वर्षी, भूपिंदर सिंग यांनी इंग्लंडला जाणाऱ्या पहिल्या क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं होतं.

नटवर सिंग लिहितात, "पतियाळामध्ये क्रिकेटमध्येही प्रोटोकॉलचे पालन केले जात असत. एकदा त्या काळातील सर्वात वेगवान गोलंदाज मोहम्मद निसार पगडीशिवाय मोतीबागच्या राजवाड्यात गेले होते. ते शीख नव्हते किंवा ते पतियाळाचेही नव्हते. पण ते महाराजांच्या टीमचे सदस्य होते. भूपिंदर सिंग यांनी सहा फूट दोन इंच उंच निसारला पाहताच 'निसार ताबडतोब परत जा आणि पगडी घालून या' असे ओरडले."

भूपिंदर सिंग यांनी दिलं 'रणजी ट्रॉफी' नाव

एकदा ते लाला अमरनाथ यांच्यावर रागावले. त्यांनी निसार यांना जर त्यांनी त्यांच्या बाउन्सरनं लालांच्या डोक्यावर मारलं किंवा जखमी केलं तर त्यांना मोठं बक्षीस मिळेल, असं सांगितलं.

लाला यांचा मुलगा राजिंदर अमरनाथ त्यांचे चरित्र 'लाला अमरनाथ लाइफ अँड टाइम्स'मध्ये लिहितात, "जेव्हा निसार हे अमरनाथ यांना संपूर्ण षटकात सलग बाऊन्सर टाकू लागले, तेव्हा अमरनाथ निसार यांच्याकडे गेले आणि 'तुझं डोकं तर फिरलं नाही ना? तू चेंडू बाऊन्स का करत आहेस?'

त्यावेळी निसार हसत उत्तरले, 'अरे अमर, तुझ्या डोक्यासाठी शंभर रुपये बक्षीस ठेवलं आहे. महाराजा पतियाळा म्हणाले आहेत की, मी जितक्या वेळी मारेल तितके शंभर रुपये मिळतील. एकदा तरी चेंडूचा मार खा. आपण पैसे अर्धे-अर्धे घेऊ."

त्यावर अमरनाथ यांचं उत्तर होतं, "तुझा चेंडू लागल्यानंतर जिवंत कोण वाचेल?"

लाला अमरनाथ

फोटो स्रोत, RUPA & COMPANY

महाराज लाला अमरनाथ यांना नेहमी 'छोकडा' म्हणत. एकदा ते त्यांना म्हणाले, "छोकडे, तू केलेल्या प्रत्येक धावांसाठी मी तुला सोन्याचं नाणं देईन. अमरनाथ यांनी शतक केलं आणि त्यांचं बक्षीस मिळवलं."

राजिंदर अमरनाथ लिहितात, "जेव्हा 1932 मध्ये राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचं नाव ठेवण्याची वेळ आली. तेव्हा काही लोकांना वेलिंग्टन ट्रॉफी असं नाव द्यायची इच्छा होती. या ट्रॉफीला रणजी यांचं नाव सुचवणारे सर्वप्रथम महाराजा भूपिंदर सिंग हेच होते. एवढंच नाही तर ही ट्रॉफी बनवण्यासाठी त्यांनी मोठी रक्कमही दिली. त्यांच्या प्रयत्नातूनच मुंबईचे प्रसिद्ध ब्रेबॉर्न स्टेडियम बांधले गेले होते."

गामा पैलवानचा सन्मान

महाराजा भूपिंदर सिंग यांना क्रिकेटशिवाय इतर खेळांमध्येही रस होता. प्रसिद्ध गामा यांना पैलवान महाराजांनी संरक्षण दिलं होतं. गामा यांनी 1910 मध्ये जॉन बुल वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती.

बार्बरा रेमुसॅक आपल्या 'द न्यू केंब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया, द इंडियन प्रिन्सेस अँड देअर स्टेट्स' या पुस्तकात लिहितात, "1928 मध्ये पतियाळा येथे गामा पैलवानची कुस्ती आयोजित करण्यात आली होती. ही कुस्ती पाहण्यासाठी 40 हजार प्रेक्षक आले होते. या सामन्यात गामांनी पोलिश पैलवान स्टॅनिस्लॉस झ्बिस्कोचा पराभव केला होता.

प्रसिद्ध कुस्तीपटू गामा

फोटो स्रोत, WRESTLING FEDERATION OF INDIA

फोटो कॅप्शन, प्रसिद्ध कुस्तीपटू गामा (उजवीकडे)

गामा कुस्ती जिंकताच महाराजा भूपिंदर सिंग यांनी मोत्यांचा हार काढला आणि गामा यांना तो दिला. त्यांनी त्यांचा सन्मान केला आणि त्यांना राजपुत्रांच्या हत्तीवर बसवलं. त्याचबरोबर त्यांना एक गाव भेट म्हणून दिलं आणि त्यांच्यासाठी शिष्यवृत्तीही दिली."

त्यांच्या निधनानंतर पतियाळा येथील मोतीबाग पॅलेसचं आता राष्ट्रीय क्रीडा संस्थेत रूपांतर करण्यात आलं आहे.

तरुण वयातच दृष्टी गमावली

भूपिंदर सिंग आपल्या सातव्या परदेश दौऱ्यावरून परतले, तेव्हा त्यांची प्रकृती खूपच खालावली होती.

परदेशात असताना त्यांना हृदयविकाराचे तीन झटके आले. अखेरच्या क्षणी त्यांची दृष्टी गेली होती.

दिवाण जरमनी दास लिहितात, "महाराजांना त्याच्या अंधत्वाबद्दल आपल्या पत्नींना कळावं असं वाटत नव्हतं. त्यांचा जवळचा सहाय्यक मेहर सिंगनं शेवटपर्यंत त्यांची दाढी आणि पगडी व्यवस्थित ठेवण्याचं काम केलं. आपल्या पत्नींना आणि आजूबाजूच्या लोकांना आपण अंध आहोत हे कळू नये म्हणून डोळ्याला दिसत नसतानाही ते पूर्वीसारखं आरशासमोर बसायचे. पूर्वीप्रमाणेच, त्यांचे सेवक त्यांच्या डोळ्यांना सुरमा लावत राहिले."

त्यांनी शेवटपर्यंत पांढरी सिल्क शेरवानी परिधान केली. महाराजांची दृष्टी गेली आहे हे फक्त त्यांचे डॉक्टर, त्यांचे पंतप्रधान, त्यांचे काही खास सेवक यांनाच माहिती होतं.

भूपिंदर सिंग

फोटो स्रोत, KANISHKA PUBLISHERS

वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी निधन

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यांना पाहण्यासाठी पॅरिसहून फ्रेंच डॉक्टरांना बोलावण्यात आलं. त्यांच्या पाठीच्या कण्यामध्ये इंजेक्शन देण्यात आलं, त्यामुळं त्याची प्रकृती अधिकच बिघडली.

के.एम पणिक्कर लिहितात, "मृत्यूशय्येवर असतानाही त्यांची ताकद आणि ऊर्जा पाहण्यासारखी होती. मृत्यूच्या दिवशीही त्यांनी दहा अंड्यांचं ऑम्लेट खाल्लं होतं. त्यांच्या मृत्यूच्या तीन दिवस आधी मी त्यांना भेटायला गेलो, तेव्हा त्यांना त्यांच्या पत्नींनी घेरलं होतं. त्या अवस्थेतही त्यांनी राजेशाही वस्त्रे परिधान केली होती, त्यांच्या गळ्यात मोत्यांचा हार होता. त्यांनी आपल्या कानात बाली आणि हातात कडं घातले होते."

ज्यांनी त्यांना पाहिलं त्यांच्यामध्ये महात्मा गांधींचे डॉक्टर बी.सी रॉय हे ही होते, जे 1947 नंतर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले.

दि. 23 मार्च 1938 रोजी दुपारी 12 वाजता महाराजा भूपिंदर सिंग कोमात गेले. आठ तास ते याच अवस्थेत होते. त्यानंतर त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

त्यावेळी त्यांचं वय अवघं 47 वर्षे होतं. त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी सुमारे 10 लाख लोक आले होते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.