ख्रिश्चन समुदायातील ऑस्कर शिंडलरने 1200 ज्यू लोकांची नाझींच्या तावडीतून कशी केली सुटका?

1200 ज्यूंना नाझींच्या तावडीतून सोडवणाऱ्या ऑस्कर शिंडलरची गोष्ट

फोटो स्रोत, Alamy

    • Author, ग्रेग मॅककेविट
    • Role, बीबीसी न्यूज

13 मार्च 1943 रोजी नाझींनी पोलंडमधील क्राको येथील एका कारखान्यात शेकडो ज्यू कैद्यांना हालाहाल करून मारून टाकलं. या घटनेनं या कारखान्याच्या मालकाला मोठा धक्का बसला. उर्वरित कैद्यांना नाझींच्या तावडीतून सोडवत तो या ज्यू लोकांसाठी मसीहाच बनला.

थॉमस केनेलीची कादंबरी 'शिंडलर्स आर्क' आणि स्टिव्हन स्पिलबर्गचा चित्रपट 'शिंडलर्स लिस्ट' या चित्रपटातून या माणसाची गोष्ट सांगण्यात आली आहे.

या पुस्तक आणि चित्रपटामुळे ऑस्कर शिंडलर हा इतिहासातील दुर्लक्षित नायक जगाला गवसला. पण 1982 साली शिंडलरवर कादंबरी लिहिणाऱ्या लेखक थॉमस केनेली यांनी सांगितलं की ऑस्कर शिंडलरची ही गोष्ट त्यांना अनावधानानेच माहीत झाली. एका दुकानदाराकडून बॅग खरेदी करत असताना त्यांना हा इतिहासातील नायक गवसला.

1964 साली बीबीसीवर पहिल्यांदा ऑस्कर शिंडलरची कथा सांगितली गेली तेव्हा उत्तरार्धातील ऑस्कर शिंडलर हे एकांतवासात आयुष्य जगत होते. ते जिवंत असताना जगानं त्यांची फारशी दखल घेतली नव्हती.

त्यावेळी बीबीसीवरील एक कार्यक्रम सादर करताना पत्रकार मॅग्नस मॅग्नसन म्हणाले होते की, "आज कदाचित तुम्ही ऑस्कर शिंडलर हे नाव पहिल्यांदा ऐकत असाल. पण भविष्यात हे नाव कायमसाठी इतिहासात कोरलं जाईल. आज ते जर्मनीत अतिशय दुर्लक्षित आणि सामान्य आयुष्य जगतो आहेत. वय वाढल्यामुळे ते आता आजारी, बेरोजगार आणि कंगाल आहे. त्यांच्याकडे उपजीविकेचं स्वतःचं साधन नाही. ते आज लोकांनी दिलेल्या देणगीवर जगत आहेत. पण म्हणून ते अतिशय हलाखीत आहे, असं अजिबात नाही. कारण त्यांना मिळणारी देणगी भक्कम आहे.

ज्या 1200 ज्यू लोकांचे प्राण त्यांनी वाचवले ते लोक व त्यांचे कुटुंबीय आजही उपकाराची परतफेड म्हणून ही देणगी त्यांना देत असतात. हे कुटुंब आपली वर्षभरातील एक दिवसाची कमाई ऑस्कर यांना देतात त्यामुळे आजही ऑस्कर शिंडलर हाताला काम नसतानाही आरामात आयुष्य जगत आहेत. 1200 ज्यू लोक त्यांना आपला जीव वाचवणारा देवाचा अवतारच मानतात."

1200 ज्यूंना नाझींच्या तावडीतून सोडवणाऱ्या ऑस्कर शिंडलरची गोष्ट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑस्कर शिंडलर

1964 मध्ये ऑस्कर शिंडलर चर्चेत असण्याचं कारण म्हणजे एक बातमी होती. ऑस्कर शिंडलर यांच्या आयुष्यावर 'टू द लास्ट आवर' नावाच्या एका चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली होती.

होलोकॉस्ट मधून वाचलेल्या पोल्डेक प्फेफरबर्ग यानं एमजीएम या प्रसिद्ध चित्रपट स्टुडिओचे निर्माते मार्टिन गोश यांना ऑस्कर शिंडलरची गोष्ट सांगितली होती.

एकेकाळी नाझींच्या युद्धखोरीचा फायदा उकळणारा हा चेकोस्लोवाकियाचा देखणा, दारूडा, उद्योजक कसा 1200 ज्यूंचा जीवनदाता बनला, ही गोष्ट खरंच एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच होती. पण निर्मितीच्या टप्प्यातच खोळंबला गेल्यामुळे या चित्रपट कधी प्रदर्शित होऊ शकला नाही.

त्यामुळे ऑस्कर शिंडलरची गोष्ट जगासमोर येण्याची आणखी एक संधी दवडली‌ गेली. पण 1980 साली पोल्डेक प्फेफरबर्गची भेट अपघातानेच एका ऑस्ट्रेलियन लेखकाशी झाली आणि या भेटीनं इतिहास रचला.

ऑस्कर शिंडलर या इतिहासातील नायकाशी थॉमस केनेली यांची ओळख ते अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना झाली. लॉस एंजेलिसमध्ये आपल्या एका पुस्तकाच्या प्रमोशनसाठी ते आले होते.

प्रकाशकांनी त्यांच्यासाठी राहायला बेवर्ली हिल्स मध्ये एक अलिशान हॉटेल बूक केलं होतं. प्रचार आटोपल्यानंतर परत मायदेशी सिडनीला निघण्याआधी ते खरेदीसाठी म्हणून बाहेर पडले.

तिथे एक ब्रिफकेस खरेदी करायला म्हणून ते एका दुकानाबाहेर घुटमळत होते. तेव्हा त्या दुकानदाराने बाहेर येऊन त्यांची आस्थेनं चौकशी केली. आपल्या बोलण्याच्या कौशल्याने त्याने थॉमस केनेलींना दुकानात येऊन ब्रिफकेस खरेदी करायला भाग पाडलं.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी बीबीसीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला भेट द्या
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी बीबीसीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला भेट द्या
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

लेखक थॉमस केनेली या भेटी विषयी सांगतात, "मी माझ्या अमेरिकेच्या दौऱ्यात बॅग खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेलो होतो आणि ते दुकान नेमकं पोल्डेक प्फेफरबर्ग यांचं होतं. त्यांनी मला एक अतिशय चांगली ब्रिफकेस दाखवली आणि मी ती विकतही घेतली. माझ्या क्रेडिट कार्ड वरून बिल भरण्यासाठी मी दुकानात थांबलो पण माझं क्रेडिट कार्ड ऑस्ट्रेलियन असल्यामुळे कदाचित खातरजमा करण्यासाठी त्यांनी वेळ घेतला असावा. ही क्रेडिट कार्डची भानगड लवकर सुटत नसल्यामुळे आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला लागलो. बोलता बोलता त्याने दुसऱ्या महायुद्धातील त्याचे अनुभव सांगायला सुरुवात केली."

गप्पा मारत असताना प्फेफरबर्गच्या जेव्हा लक्षात आलं की आपला हा ग्राहक एक लेखक आहे तेव्हा ते केनेली यांना म्हणाले, "माझ्याकडे तुमच्यासाठी एका पुस्तकाची कल्पना आहे. मी आणि माझी पत्नी ऑशविट्झमधील नाझींच्या ज्यूंसाठींच्या छळ छावणीतून जिवंत वाचलेल्या लोकांपैकी एक आहोत. ऑस्कर शिंडलर नावाच्या एका देव माणसानं आमच्यासह शेकडो ज्यूंचा जीव वाचवला. स्वतः जर्मन कॅथलिक नागरिक असून देखील त्याने आमची नाझींच्या तावडीतून एकहाती सुटका केली. माझ्याकडे ही गोष्ट खरी आहे हे सिद्ध करणारी सगळी कागदपत्रं आहेत. 15 वर्षांपूर्वी यावर एक चित्रपटही बनता बनता राहिला. तुम्ही लेखक आहात तर तुम्हाला यावर एखादं पुस्तक लिहिता येईल. तुमचं क्रेडिट कार्ड मंजूर व्हायला थोडा वेळ लागेल. तोपर्यंत माझ्याकडे असलेला हा सगळा ऐतिहासिक दस्तावेज मी तुम्हाला दाखवू शकतो. यावर पुस्तक लिहिता येऊ शकेल काय, हे मग तुम्हीच ठरवा."

लिअम नेसन या अभिनेत्यानं स्टिव्हन स्पिलबर्गच्या शिंडलर्स लिस्ट या चित्रपटात ऑस्कर शिंडलरची भूमिका वठवली.

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, लिअम नेसन या अभिनेत्यानं स्टिव्हन स्पिलबर्गच्या शिंडलर्स लिस्ट या चित्रपटात ऑस्कर शिंडलरची भूमिका वठवली.

"प्फेफरबर्गनं आपल्या मुलाला दुकानावर बसवलं आणि तो मला घेऊन तिथल्या बाजूच्या एका कार्यालयात गेला. तिथे त्याने त्यांच्याकडील कागदपत्रांच्या फोटोकॉपीज बनवायला सांगितल्या. ती कागदपत्रं बघून मीच हैराण झालो. कारण ही कागदपत्रे म्हणजे मौलिक ऐतिहासिक दस्तावेज होता. युरोपच्या इतिहासातील दुर्लक्षित नायक मला यात गवसला. या दस्तावेजामधील सर्वात महत्त्वाचा दस्तावेज होता तो म्हणजे शिंडलरची यादी. ही यादी म्हणजे जीवनदायी होती," असं केनेली सांगतात. या कागदपत्रांच्या आधारेच त्यांनी 'शिंडलर्स आर्क' ही कादंबरी लिहिली.

स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी देखील केले कौतुक

स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी शिंडलर्स लिस्ट हा चित्रपट काढला आणि त्यानंतर ऑस्कर शिंडलर यांचं नाव सर्वदूर पोहोचलं. अपघातानेच शिंडलर यांचे नाव जगासमोर आल्याबद्दल ते लेखक आणि प्फेफरबर्गचे ऋणी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

"खरंतर आपण सगळ्यांनीच पोल्डेक प्फेफरबर्गचे ऋणी असायला हवं. त्याच्यामुळेच ऑस्कर शिंडलरची गोष्ट जगासमोर आली. त्याच्यामुळेच मलाही ऑस्कर शिंडलरवर चित्रपट बनवणं शक्य झालं," असं स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी देखील पुढे म्हटलं.

'संधीसाधू व्यापारी ते निस्वार्थी जीवनदाता'

पोल्डेक प्फेफरबर्गचा जन्म पोलंडमधील क्राको या शहरात एक ज्यू कुटुंबात झाला होता. तो तेथील एका विद्यालयात शिक्षक आणि शारीरिक शिक्षणाचा प्राध्यापक म्हणून काम करत होता. आयुष्य सुरळीत सुरू आहे असं वाटत असतानाच 1939 साली नाझी जर्मनीनं पोलंडवर हल्ला केला.

या युद्धात प्फेफरबर्ग पोलंडच्या लष्करातील सैनिक बनून लढला आणि जखमी देखील झाला. नाझींच्या हातून युद्धात पाडाव झाल्यानंतर पोलंड पूर्व आणि पश्चिम अशा दोन तुकड्यांमध्ये विभागला गेला. पश्चिम पोलंडचा ताबा नाझी जर्मनीनं घेतला तर पूर्वेकडील पोलंडवर सोव्हियत रशियानं कब्जा मिळवला.

युद्धात पोलंडकडून लढणाऱ्या सैनिकांसमोर आता दोन पर्याय होते. एकतर पूर्वेकडे सोव्हियत रशियात राहायला जायचं किंवा पश्चिमेला नाझींच्या ताब्याखालील प्रदेशात स्थलांतर करायचं.

1200 ज्यूंना नाझींच्या तावडीतून सोडवणाऱ्या ऑस्कर शिंडलरची गोष्ट

फोटो स्रोत, Getty Images

ज्यू असूनही प्फेफरबर्गनं दुसरा पर्याय निवडला. हे युद्ध जिंकल्यानंतर सोव्हियत रशियाच्या लष्करानं स्टॅलिनच्या आदेशावरून केटीन प्रांतात पोलंडच्या लष्करातील हजारो सैनिकांची नुकतीच हत्या केली होती. आपलीही तीच अवस्था होईल या भीतीनेच प्फेफरबर्गनं पश्चिम पोलंडमध्ये जायचं ठरवलं. तिथे गेल्यानंतर तो ज्यू असल्यामुळे नाझी राजवटीनं त्याची रवानगी क्राको वस्तीत केली.

ही वस्ती म्हणजेच नंतर ज्यूंची छळ छावणी बनली. इथे आधी जवळपास स्वतंत्र पोलंडधील 3000 नागरिक राहत होते. नाझी जर्मनीनं या प्रदेशाचा ताबा घेऊन तिथे तब्बल 15,000 ज्यूंना अक्षरशः डांबून ठेवलं होतं. या सगळ्या ज्यूंना तिथे अतिशय अमानुष परिस्थितीत नाझींनी अक्षरशः डांबून ठेवलं होतं. पोल्डेक प्फेफरबर्ग त्यापैकीच एक होते.

संधीसाधू व्यापारी ते निस्वार्थी जीवनदाता

फोटो स्रोत, Getty Images

नाझी पक्षाचे सदस्य असलेल्या ऑस्कर शिंडलरनं त्यावेळी क्राको प्रांतातच आपला व्यवसाय थाटला होता. युद्धात हरलेल्या पोलंडच्या तिथल्या नागरिकांची मालमत्ता त्याने हडप केली.

युद्धानंतर तिथले मूळनिवासी आपला सगळा कारभार तसाच मागे टाकून जीव वाचवण्यासाठी पळून गेले होते. याचा फायदा उठवत शिंडलर यांनी अनेक महत्त्वाच्या इमारती जप्त करत स्वतःच्या ताब्यात घेतल्या‌. यात काही कारखान्यांचाही समावेश होता. हे कारखाने आता ऑस्कर शिंडलर त्यांचे मालक बनून चालवू लागले.

सुरुवातीला त्यांनी या कारखान्यांमध्ये स्थानिक पोलीश कामगार नियुक्त केले. पण नंतर तिथल्या बंदी करण्यात आलेल्या ज्यू लोकांना अगदी कमी वेतनावर या कारखान्यात कामगार बनवून राबवायला सुरुवात केली. यातून त्यांनी बक्कळ नफा कमावला. कारण या हतबल ज्यू कामगारांना कुठलाच हक्क व अधिकार नव्हता.

नाझींनी पोलंडमधील या वस्त्यांमध्ये कोंबण्यात आलेल्या बऱ्याच ज्यू लोकांची रवानगी बंदुकीच्या धाकावर नजीकच्या छळ छावणीत करायला सुरुवात केली. या छळ छावण्यांमध्ये या ज्यू लोकांसोबत काम झालं, याचा इतिहास आपण जाणतोच. बाकी जे मागे उरले त्यांचंही आयुष्य काही कमी खडतर नव्हतं.

आत्तापर्यंत नाझी पक्षाचा सदस्य आणि समर्थक असलेल्या ऑस्कर शिंडलरसोबत मार्च 1943 मध्ये अशी एक घटना घडली की जिने तो मूळापासून हादरला आणि त्याचं मनपरिवर्तन झालं.

शिंडलर्स लिस्ट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिंडलर्स 'लिस्ट'

नाझींनी क्राको वस्तीतील ज्यू कैद्यांचा अक्षरशः नरसंहार सुरू केला. जे ज्यू लोक शारीरिकदृष्ट्या काम करण्यासाठी सक्षम होते त्यांना नजीकच्या प्लासझोव कामगार वसाहतीत हलवण्यात आलं.

बाकी काम करण्यासाठी असक्षम ठरवण्यात आलेल्या हजारो ज्यूंना एकतर रस्त्यांवरच ठेचून मारण्यात आलं किंवा त्यांची रवानगी थेट ऑशविट्झ - बिरकेन्यू या कत्तलखान्यात करण्यात आली. तिथे या ज्यू लोकांची अर्थातच निघृण हत्या केली जात होती.

हे पाशवी हत्याकांड रोखण्यासाठी मग ऑस्कर शिंडलरने प्रयत्न सुरू केले. नाझी पोलीस अधिकाऱ्यांंना फूस लावून व पैसे चारून या लोकांना ठार मारण्याऐवजी माझ्याकडे पाठवा, अशी विनंती केली. या लोकांना मी माझ्या कारखान्यात कामगार म्हणून फुकटात राबवेल, असं सांगितलं. ऑस्कर शिंडलरच्या कारखान्यात शस्त्रास्त्रांची सुद्धा निर्मिती केली जायची.

ही शस्त्रास्त्रे नाझी सैन्याला दुसरं महायुद्ध लढण्यासाठीच पुरवली जायची. या ज्यू कैद्यांना कत्तलखान्यात पाठवण्याऐवजी माझ्या कारखान्यात पाठवल्यानं कमी खर्चात शस्त्रास्त्रांची निर्मिती होऊन जर्मन सैन्याचाच फायदा होईल, हे नाझी अधिकाऱ्यांना पटवून देण्यात ऑस्कर शिंडलर यशस्वी झाला.

ऑस्कर शिंडलर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑस्कर शिंडलर इस्रायल भेटीमध्ये

कत्तलखान्यात रवानगी करण्यात येणार असलेल्या अशा शेकडो ज्यू कैद्यांची यादी बनवून ते कसे कुशल कामगार आहेत, हे पटवून सांगत त्याने या ज्यूंना मरणाच्या दारातून सोडवलं आणि आपल्या कारखान्यात ठेवून घेतलं.

बीबीसीशी बोलताना केनेली सांगतात की, "वरिष्ठ नाझी अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या मार्गाने फूस लावून ऑस्कर शिंडलरने एकदा नव्हे तर दोनदा ज्यूंना कत्तलखान्यात रवानगी होण्यापासून वाचवलं. यासाठी त्याने अनेक शक्कल लढवल्या. नाझी राजवटीतील नेमक्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हेरून अतिशय शिताफीने त्याने ही चाल खेळली."

दुसरं महायुद्ध संपल्यानंतर मात्र ऑस्कर शिंडलरचा व्यवसाय लयाला गेला. उद्योग बुडाल्यामुळे निराश झालेला ऑस्कर शिंडलर मद्याच्या आहारी गेला. आयुष्याच्या उत्तरार्धात सगळ्या बाजूंनी असहाय्य झालेल्या ऑस्कर शिंडलरला जगवण्यासाठी मग त्याच्यामुळे जीव वाचलेले सगळे ज्यू पुढे आले.

1974 साली वयाच्या 66 वर्षी त्याचा मृत्यू झाला. पण त्याला आर्थिक विवंचना कधी ग्रासली नाही. त्याला शेवटपर्यंत ज्यू लोकांकडून देणगी मिळत होती. ते मेल्यानंतर त्यांचं पार्थिव याच ज्यू लोकांनी इस्रायलमध्ये आणलं आणि जेरूसलेममधील कॅथलिक स्मशानभूमीत त्यांची समाधी बांधली गेली.

त्यांच्या समाधीवर आजही पुढील अक्षरं कोरली गेलेली दिसतात, "1200 ज्यू लोकांना मृत्यूच्या तावडीतून सोडवणारा इतिहासातील आमचा तारणहार."

ऑस्कर शिंडलरची कबर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑस्कर शिंडलरची कबर

या 1200 लोकांमध्ये पोल्डेक प्फेफरबर्ग आणि त्यांची पत्नी मिलाचाही समावेश होता. युद्ध संपल्यानंतर या जोडप्यानं अमेरिकेची वाट धरली‌. अमेरिकेतील बेवर्ली हिल्समध्ये ते राहू लागले.

पोल्डेक आणि मिला प्फेफरबर्ग यांनी लिओपोल्ड व लुडमिला पेज नावानं ऑस्कर शिंडलरचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी अनेक महत्वाची दस्तावेज व कागदपत्र जमा करण्याचं काम केलं.

2008 साली केनेली यांनी 'सर्चिंग फॉर शिंडलर' नावाचं एक आत्मचरित्रपर पुस्तकही लिहिलं. या पुस्तकात त्यांनी शिंडलरचा वारसा कसा शोधून काढला, याचं इत्यंभूत वर्णन त्यांनी केलं आहे.

शिंडलर वाचवलेली 'मुलं'

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिंडलर वाचवलेली 'मुलं'

आत्मचरित्राचं नाव आपल्याला 1947 साली एलिस बेटावर असताना सुचल्याचं थॉमस केनेली सांगतात. हे एलिस बेट म्हणजे अमेरिकेत येणाऱ्या स्थलांतरितांना डांबून ठेवण्याची जागा होती. तिथूनच या पुस्तकाची कल्पना थॉमस केनेलीला सुचली. कारण ज्यूंना देखील पोलंडमध्ये असंच डांबून ठेवलं गेलं होतं.

हे पुस्तक लिहण्यामागे फक्त ऑस्कर शिंडलरच नव्हे तर पोल्डेक प्फेफरबर्ग सुद्धा एक महत्त्वाचं कारण होता, असं थॉमस केनेली यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. 2001 साली पोल्डेक प्फेफरबर्गचा मृत्यू झाल्यानंतर हे पुस्तक थॉमस केनेलीनं लिहायला घेतलं आणि 2008 साली ते प्रकाशित केलं.

"ऑस्कर शिंडलर तर तर निर्विवादपणे इतिहासातील महत्वाचा नायक आहे. पण ऑस्कर शिंडलरचं कर्तृत्व जगासमोर आणणारा पोल्डेक प्फेफरबर्गही इतिहासातील तितकंच महत्त्वाचं पात्र आहे," अशी भावना थॉमस केनेली व्यक्त करतात.

पुस्तक आणि चित्रपटावर पुरस्कारांचा वर्षाव

1994 साली शिंडलर्स लिस्ट या आपल्या चित्रपटाबद्दल स्टिव्हन स्पिलबर्गने ऑस्कर जिंकला तेव्हा हा पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात तो म्हणाला की, "पोल्डेक प्फेफरबर्गशिवाय हा चित्रपट बनूच शकला नसता. त्याबद्दल फक्त मीच नव्हे तर आपण सगळ्यांनीच त्याचा ऋणी असायला हवं. कारण इतिहासात हरवलेल्या नायकाला त्याने आपल्यासाठी शोधून काढलं. त्याच्यामुळेच ऑस्कर शिंडलरचं साहस आणि कर्तृत्व आपल्यापर्यंत पोहचू शकलं."

स्टिव्हन स्पिलबर्गचा हा चित्रपट थॉमस केनेलीच्या 'शिंडलर्स आर्क' या कादंबरीवर आधारित आहे. या कादंबरीनंही 1982 साली युनायटेड किंग्डम (यूके) मधील मानाचं बूकर पारितोषिक जिंकलं.

थॉमस केनेलीच्या या कादंबरीवर काही जणांनी आक्षेप सुद्धा घेतला. त्याचं कारण असं की कादंबरी हा एक कल्पनाविस्ताराचा साहित्य प्रकार मानला जातो. पण ऑस्कर शिंडलरच्या कथेत काल्पनिक काहीच नव्हतं. ही सगळी अमानुष हिंसा ज्यूंनी प्रत्यक्षात सहन केली होती.

इस्रायल भेटीत ऑस्कर शिंडलर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रायल भेटीत ऑस्कर शिंडलर

त्यामुळे कादंबरीतील अतिरंजित मजकूर वाचून काही जणांना तो काल्पनिक आहे,असं वाटू शकतं. त्यामुळे याला कादंबरी न म्हणता ऐतिहासिक लिखाण अथवा दस्तावेज मानलं जावं, असं या आक्षेप घेणाऱ्या लोकांचं म्हणणं होतं. यातून उगवलेल्या वादाकडे थॉमस केनेली सकारात्मकतेनं पाहतात.

"असे वाद निर्माण झाले तर उलट पुस्तक अधिक चर्चेत येतं आणि लोक ते अधिक संख्येनं वाचतात. यात लेखक म्हणून माझा फायदाच आहे. सध्याचा काळच असा आहे की कोणीही येतो आणि पुस्तकावर बंदी घालायची मागणी करतो. सरकारसुद्धा दबावाला बळी पडत ही बंदी घालतं‌. याने लेखक आणि एकूणात साहित्य विश्वाचाच मोठा तोटा होतो. त्यामुळे उलट असे साहित्यिक वाद या निमित्ताने निर्माण होत असतील तर ती उलट चांगली गोष्ट आहे. या वादातून माझ्या पुस्तकाची लोकप्रियता आणि खप आणखी वाढलेला आहे," अशा शब्दात 2008 साली बीबीसीशी बोलताना थॉमस केनेली यांनी या सगळ्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली होती.

स्टिव्हन स्पिलबर्ग आपल्या पत्नीसमवेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्टिव्हन स्पिलबर्ग आपल्या पत्नीसमवेत

बूकर पारितोषिक स्वीकारताना थॉमस केनेलीनं पोल्डेक प्फेफरबर्गसह इतर अनेक ज्यूंचे आभार मानले ज्यांनी त्यांचे अनुभव केनेलीसोबत मांडले होते. हे अनुभव गोळा करूनच त्याने ही कादंबरी लिहिली.

पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात केनेली म्हणाला, "आज माझी अवस्था एखाद्या चित्रपट निर्मात्यासारखी झालेली आहे. पुरस्कार स्वीकारताना चित्रपट निर्माता अनेकांचे आभार मानतो. कारण चित्रपट बनवण्यात अनेक लोकांचा सहभाग असतो. चित्रपट निर्मितीची प्रक्रियाच तशी सामूहिक असते. त्यामुळे चित्रपट बनवणं हे काही एकट्याचं काम नाही. त्यामागे अनेकांचा हात असतो. सामान्यतः कादंबरी लेखक हा एकटा लिहितो. लिखाणाची प्रक्रिया वैयक्तिक असते. पण माझी कादंबरी याला अपवाद आहे. ही कादंबरी मी एकट्याने लिहिलेली नाही. अनेकांनी त्यांचे जीवनानुभव मला सांगितले आणि त्यांचीच गोष्ट मी कादंबरीच्या रूपात या पुस्तकात मांडली आहेत. यातले बरेच लोक तर आजही जिवंत आहेत. त्यामुळे या कादंबरीमागे त्यांचंही श्रेय आहे. त्यांचे आभार मानणं मला भाग आहे. हे आभार मानण्याबरोबरच या क्षणी मी या सगळ्या लोकांचे जीव एकहाती वाचवणाऱ्या ऑस्कर शिंडलरच्या पवित्र स्मृतीला श्रद्धांजली अर्पण करतो."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.