डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत अशा गोष्टी, ज्या फार कमी लोकांना माहितीयेत - फोटो फीचर

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा या निवडणुकीत पराभव झाला. 2020 सालच्या पराभवानंतर चार वर्षांनी ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचा 14 जून 1946 रोजी न्यूयॉर्कच्या क्वीन्समध्ये जन्म झाला. ते पाच भावंडांमध्ये चौथे आहेत.

वडील फ्रेड यांची बांधकाम कंपनी होती. 1968 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनीही याच उद्योगात काम करायला सुरुवात केली. पण लवकरच त्यांनी मॅनहटनमधून स्वतःचा उद्योग सुरू केला.

आज त्यांच्या मालकीचे कॅसिनोज, काँडोमेनियम्स, गोल्फ कोर्सेस आणि हॉटेल्स आहेत. अमेरिकेतल्या अटलांटिक सिटी, शिकागो, लास वेगासपासून ते भारत, तुर्की, फिलीपीन्सपर्यंत ट्रम्प यांचा व्यवसाय पसरलेला आहे.

ट्रम्प यांच्या अनोख्या व्यक्तीमत्त्वामुळे ते न्यूयॉर्कच्या बिझनेस जगात वेगळे ठरले आणि उठून दिसले. शिवाय 'द अॅप्रेंटिस'सारख्या टीव्ही शोमुळे त्यांना मनोरंजन क्षेत्रातही प्रसिद्धी मिळाली.

1977 मध्ये त्यांनी पहिल्यांदा इव्हांका झेल्निकोव्हा यांच्याशी लग्न केलं.

ट्रम्प यांनी तीनवेळा लग्न केलं असून त्यांना 5 मुलं आहेत.

ट्रम्प यांनी दुसरं लग्न मार्ला मेपल्स यांच्याशी केलं. 1999 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.

2005 मध्ये त्यांनी मेलानिया यांच्याशी त्यांनी लग्न केलं. हे त्यांचं तिसरं लग्न. लग्नाच्या वेळी ते 52 वर्षांचे होते तर मेलानिया या 28 वर्षांच्या होत्या.

2015 साली त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. ट्रम्प टॉवरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचं जाहीर केलं. त्यांचं ब्रीदवाक्य होतं - 'मेक अमेरिका ग्रेट अगेन!'

या निवडणुकीची प्रचार मोहीम आरोप-प्रत्यारोपांनी गाजली. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत डोनाल्ड ट्रम्प 2017 मध्ये अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष झाले.

अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांसाठी ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ हा अनिश्चिततेचा होता. कारण त्यांचे जागतिक नेत्यांशी अनेकदा वाद झाले. ट्रम्प हे पर्यावरण आणि व्यापार विषयक महत्त्वाच्या करारांतून बाहेर पडले आणि चीनसोबत त्यांनी ट्रेड वॉर सुरू केलं.

कोव्हिडची जागतिक साथ आलेली असताना ही परिस्थिती त्यांनी ज्याप्रकारे हाताळली, याबद्दल त्यांच्यावर त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षांमध्ये टीका झाली. 2020 मध्ये निवडणूक प्रचार करत असताना त्यांना कोव्हिड झाल्याने प्रचारातून ब्रेक घ्यावा लागला होता.

2020 च्या या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत जो बायडन यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. पण हा निकाल स्वीकारायला त्यांनी नकार दिला. या निकालांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी 6 जानेवारीला वॉशिंग्टनमध्ये समर्थकांची रॅली काढली आणि त्यांना काँग्रेसवर चालून जाण्याचं आव्हान केलं.

याचं रूपांतर कॅपिटॉलवरच्या दंगलीत झालं. यासाठी त्यांच्यावर दोन क्रिमिनल केसेस दाखल आहेत.

त्यांचं राजकीय करियर संपल्यात जमा धरलं जात असतानाच त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठी ते आघाडीचे उमेदवार झाले.

त्यांनी प्रचार सुरू केला तेव्हा त्यांच्यावर 91 गंभीर आरोप दाखल होते.

अॅडल्ट फिल्म अॅक्टर स्टॉर्मी डॅनियल्स यांना 2016 च्या निवडणुकीपूर्वी 'हश मनी' दिल्याच्या 34 आरोपांखाली ते दोषी असल्याचं मे 2024 मध्ये जाहीर करण्यात आलं.

प्रचार पुन्हा सुरू केल्यानंतर बटलर, पेन्सलव्हेनियामधल्या त्यांच्या सभेदरम्यान 20 वर्षांच्या हल्लेखोरांने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

यानंतर काही दिवसांनी रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये त्यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं.

2024 निवडणूक जिंकून डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे आजवरचे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा हा कार्यकाळ संपेल तेव्हा ते 82 वर्षांचे असतील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)