टेनिसपटू राधिका यादवची वडिलांनी हत्या का केली? आतापर्यंत काय काय माहिती समोर आली?

फोटो स्रोत, Kamesh Srinivasan
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"कुटुंबातील मुलीने एवढं मोठं नाव कमावल्यावर कुणाला वाईट वाटेल? मुलगी अकॅडमी चालवायची, त्यावरून बापाला टोमणे मारले गेले आणि ती चीड डोक्यात घेऊन बापाने मुलीवर गोळी चालवली.
जे घडलं ते दुर्दैवी होतं पण आता काय करू शकतो?", राधिका यादवच्या एका नातेवाईकांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं.
हरियाणाच्या गुरुग्राममध्ये माजी राष्ट्रीय टेनिसपटू राधिका यादव हिचा गोळ्या लागून मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितलं की, तिचे वडील दीपक यादव यांनी तिच्यावर पाठीमागून तीन गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.
ही घटना 10 जुलैच्या सकाळी गुरुग्रामच्या सेक्टर 57 मध्ये घडली.
पोलिसांनी दावा केला आहे की, राधिकाच्या वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. राधिकाचे काका कुलदीप यादव यांच्या तक्रारीवरून गुरुग्राम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक न्यायालयाने दीपक यादव यांना पोलीस कोठडीत पाठवले असून तपास सुरू आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या राधिकाच्या हत्येमुळं सोशल मीडियावर आणि इतर ठिकाणी मोठी चर्चा सुरू झाली आहे.
बीबीसीनं या घटनेनंतर घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा राधिकाच्या तीनमजली घराची दारं बंद होती. राधिका आणि तिचं कुटुंब या घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहतं. घराबाहेर पत्रकार आणि नातेवाईकांची गर्दी जमली होती.
नातेवाईकांपैकी बहुतेक जण बोलायला तयार नव्हते. जे बोलले, त्यांनी फारच मर्यादित माहिती दिली. राधिकाच्या मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसलेला स्पष्ट दिसत होता.
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, ही हत्या 10 जुलै रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता घडली.एफआयआरमध्ये नमूद आहे की, दीपक यादव यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
"माझी मुलगी राष्ट्रीय चॅम्पियन होती. खांद्याला दुखापत झाल्यानंतर तिने स्वतःची अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय घेतला.
मी वझीराबाद गावात दूध आणायला जात असे, तेव्हा लोक म्हणायचे, 'तू मुलीच्या कमाईवर जगतोस.' हे ऐकून माझा आत्मसन्मान दुखावला. म्हणून मी तिला अकॅडमी बंद करण्यास सांगितलं. तिने नकार दिला, म्हणून मी तिच्यावर गोळ्या झाडल्या," असं त्यांनी जबाबात सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितलं की, दीपक यादव यांनी राधिकावर तीन गोळ्या झाडल्या आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Kamesh Srinivasan
दीपक यांनी टोमण्यांमुळे हत्या केल्याचं सांगितलं असलं, तरी माध्यमं आणि नातेवाईकांमध्ये इतर शक्यता चर्चेत आहेत.
एका नातेवाईकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, "दीपकने कधीच तिच्या टेनिस खेळण्याला विरोध केला नाही. उलट त्यानेच लाखो रुपये खर्च करून तिला साहित्य दिलं. तो खूप शांत स्वभावाचा होता. हे कसं घडलं हे आम्हाला अजूनही समजत नाही."
पोलिसांनी सांगितलं की, राधिकाची आई मंजू यादव यांनी लेखी जबाब दिलेला नाही. मात्र त्यांनी सांगितलं, "ही घटना घडली तेव्हा मी दुसऱ्या खोलीत झोपले होते. माझी मुलगी अतिशय सभ्य होती. दीपकने तिचा खून का केला हे मला समजत नाही."
राधिकाचा भाऊ धीरज यादव या घटनेच्या वेळी घरी नव्हता.
वडिलांनी अकॅडमी बंद न केल्यामुळे हत्या केल्याचं सांगितलं असलं, तरी त्यांनी नेहमीच तिच्या टेनिस कारकीर्दीला पाठिंबा दिला होता. त्यामुळं या प्रकरणाचा नेमका उद्देश तोच होत तपासात स्पष्ट होईल.
राधिकाची टेनिस अकॅडमी
काही महिन्यांपूर्वी राधिकाने गुरुग्रामच्या सेक्टर 61 मध्ये एक जागा भाड्याने घेऊन टेनिस अकॅडमी सुरू केली होती.
ही अकॅडमी अॅट स्पोर्ट्स 18 क्रिकेट अकॅडमीच्या संकुलात होती. तिथं विविध खेळांसाठी मैदानं भाड्याने दिली जातात.

फोटो स्रोत, ANI
या संकुलात तीन टेनिस कोर्ट आहेत आणि राधिकाने ती कोर्ट भाड्याने घेऊन अकॅडमी सुरू केली होती.
या जागेची देखभाल करणारे तनू म्हणाले, "राधिका मॅडम रोज सकाळी आणि संध्याकाळी इथे यायच्या. त्यांनी एक महिन्यापूर्वी क्लासेस सुरू केले होते. दोन-चार मुलं शिकायला यायची. त्या खूप मन लावून शिकवायच्या. आम्हाला एवढंच माहिती होतं."
राधिकाची टेनिस कारकीर्द
इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन (ITF) च्या वेबसाईटनुसार, राधिकाने ITF अंतर्गत 36 एकेरी आणि 7 दुहेरी सामने खेळले होते.
तिचा शेवटचा एकेरी सामना मार्च 2024 मध्ये झाला होता, तर शेवटचा दुहेरी सामना जून 2023 मध्ये झाला होता. खांद्याला दुखापत झाल्यानंतर तिने गुरुग्राममध्ये टेनिस अकॅडमी सुरू केली.
2024 मध्ये तिने ITF महिला दुहेरीत 113 ही सर्वोत्तम कारकीर्द रँकिंग मिळवली होती. तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.

फोटो स्रोत, Kamesh Srinivasan
राधिकाच्या मृत्यूनंतर काही खेळाडूंनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं आहे.
राष्ट्रीय टेनिसपटू सौजन्य बावीसेट्टीने लिहिलं, "हे हृदयद्रावक आहे. मी तिला एका स्पर्धेत एकदाच भेटले होते. ती खूप गोड हसायची. तिचे वडील एवढा भयंकर गुन्हा करू शकतात यावर विश्वास बसत नाही. 'लोक काय म्हणतील?' या मूर्ख विचारामुळे तिचा जीव गेला."
टेनिस खेळाडू शर्मदा बालूने लिहिलं, "ही बातमी हृदयद्रावक आणि अत्यंत अस्वस्थ करणारी आहे."
पोलीस काय म्हणाले?
गुरुग्राम पोलिसांचे प्रवक्ते संदीप कुमार म्हणाले, "दीपक यादव, जे इमारती भाड्याने देतात, ते त्यांच्या मुलीच्या अकॅडमीमुळे नाराज होते.

त्यांना वाटायचं की आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे तिला काम करण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांनी तिला अकॅडमी बंद करण्यास सांगितलं."
"राधिकाने नकार दिला. मोठा वाद झाला आणि दीपक यादव यांनी परवानाधारक बंदुकीने तिची हत्या केली. आम्ही आरोपीला अटक केली असून बंदूक जप्त केली आहे," असं कुमार म्हणाले.
एक वर्षांपूर्वीच्या म्युझिक व्हीडिओचा संबंध?
राधिकाच्या हत्येनंतर तिच्या इंस्टाग्राम रिल्स आणि एका म्युजिक व्हिडिओमुळे ही हत्या झाल्याची चर्चा होती. मात्र पोलिसांनी ही माहिती फेटाळली आहे.
संदीप कुमार म्हणाले, "आतापर्यंतच्या तपासात त्या व्हीडिओचा आणि हत्येचा काहीही संबंध आढळलेला नाही. या सगळ्या अफवा आहेत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











