मेलेल्या माणसांचा काढला विमा, तर जिवंत माणसांची केली 'हत्या'; विमा घोटाळ्याने देशात खळबळ

बुलंदशहरच्या सुनीता यांचे पती गंभीर आजारी होते. याच काळात एका विमा घोटाळा करणाऱ्या टोळीने त्यांच्याशी संपर्क साधला.

फोटो स्रोत, Prabhat Kumar/BBC

फोटो कॅप्शन, बुलंदशहरच्या सुनीता यांचे पती गंभीर आजारी होते. याच काळात एका विमा घोटाळा करणाऱ्या टोळीने त्यांच्याशी संपर्क साधला.
    • Author, दिलनवाज पाशा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, संभल येथून

पश्चिम उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात उघड झालेला विमा घोटाळा केवळ बनावट कागदपत्रांपुरता मर्यादित नाही. या घोटाळ्याच्या जाळ्यात आशा वर्करपासून ते बँक मॅनेजर, हॉस्पिटल कर्मचारी आणि दलालसुद्धा सहभागी असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं आहे.

गंभीर आजारी असलेल्या आणि मृत व्यक्तींच्या नावे विमा करून कोट्यवधी रुपये उकळले गेले. काही प्रकरणांत तर 'अपघात' दाखवून हत्याही करण्यात आल्या आहेत. या घोटाळ्याचे सर्वात मोठे बळी ठरले ते गरीब, अशिक्षित लोक.

विमा रकमेचा गैरफायदा घेण्यासाठी विविध प्रकारचे बनावट व्यवहार करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश केल्याचा दावा आता पोलिसांनी केला आहे.

या वर्षी जानेवारीमध्ये सुरू झालेल्या तपासात आतापर्यंत 60 जणांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये आशा वर्कर, बँकेचे कर्मचारी, विमा क्लेम तपासणारे लोक आणि इतर अनेकांचा समावेश असल्याची माहिती या तपासाचं नेतृत्व करणाऱ्या संभलच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) अनुकृती शर्मा यांनी दिली.

पोलिसांचा दावा आहे की, विम्याचे पैसे हडपण्यासाठी या टोळ्यांनी गंभीर आजारी लोकांचा विमा उतरवला. काही मरण पावलेल्यांना कागदोपत्री 'जिवंत' दाखवलं, आणि काही प्रकरणांमध्ये तर खून करूनही विमा क्लेम घेतला गेला.

या घोटाळ्यांसाठी आधार डेटामध्ये बदल करण्यात आला आणि लोकांच्या नकळतच त्यांच्या नावावर बँकेत खाती उघडण्यात आली.

हा घोटाळा कसा उघड झाला?

या तपासाची सुरुवात जानेवारी 2025 मध्ये झाली. पोलिसांनी पाठलाग करून दोन आरोपींना ताब्यात घेतलं होतं.

या आरोपींच्या मोबाइल आणि कारमधून मिळालेल्या कागदपत्रांची सखोल तपासणी केली असता, विमा घोटाळ्याच्या अनेक गोष्टींचा पर्दाफाश झाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक अटक करण्यात आली.

अनुकृती शर्मा म्हणतात, "आमच्याकडे अनेक राज्यांमधून तक्रारी आल्या आहेत. हजारो लोक फसवले गेले असावेत, आणि हा विमा घोटाळा सहजपणे 100 कोटींच्याही पुढे जाऊ शकतो."

गंभीर आजारी असलेल्या लोकांचा विमा

बुलंदशहरच्या भीमपूर गावात राहणाऱ्या सुनीता देवी यांचे पती सुभाष गंभीर आजारी होते. त्यावेळी विमा घोटाळा करणाऱ्या टोळीनं एका आशा वर्करमार्फत त्यांच्याशी संपर्क साधला.

पोलिसांचं म्हणणं आहे की, सुनीता यांच्या पतीचा विमा उतरवला गेला आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बँक खात्यात आलेली विमा रक्कम टोळीने काढून घेतली.

संभल पोलिसांनी माहिती दिल्यानंतरच सुनीता यांना याबद्दल समजलं. त्यांच्या पतीचा जून 2024 मध्ये आजाराने मृत्यू झाला होता.

पोलिसांना सुनीता यांची कागदपत्रं अटकेत असलेल्या आरोपींच्या मोबाइलमध्ये सापडली होती.

जून 2024 मध्ये सुनीता यांचे पती सुभाष यांचे निधन झाले. पण त्यांच्या नावावरच्या विमा रकमेचे पैसे स्कॅम करणाऱ्या टोळीने काढून घेतले. सुनीता यांना याची माहितीही नव्हती.

फोटो स्रोत, Prabhat Kumar/BBC

फोटो कॅप्शन, जून 2024 मध्ये सुनीता यांचे पती सुभाष यांचे निधन झाले. पण त्यांच्या नावावरच्या विमा रकमेचे पैसे स्कॅम करणाऱ्या टोळीने काढून घेतले. सुनीता यांना याची माहितीही नव्हती.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एएसपी शर्मा म्हणतात, "आम्हाला आरोपींच्या मोबाइलमधून विम्याशी संबंधित शेकडो लोकांची कागदपत्रं मिळाली. तपासासाठी आम्ही आजूबाजूच्या काही प्रकरणांची निवड केली.

जेव्हा पोलिसांची टीम सुनीता यांच्याकडे गेली, तेव्हा त्यांनाच माहिती नव्हतं की त्यांच्या पतीचा विमा उतरवण्यात आला आहे, आणि त्यांच्या नावानं बँकेत खातं उघडून त्यातून पैसेही काढले गेले आहेत."

सुनीता अशिक्षित आहेत आणि त्यांचं कुटुंब खूपच गरीब आहे. भीमपूर गावात एका खोलीत त्या राहतात.

सुनीता सांगतात, "माझ्याकडे एकदा आशा वर्कर आल्या होत्या. त्यांनी एक फॉर्म भरायला लावला, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे घेतली, आणि माझ्याकडून सहीही करून घेतली. त्यांनी सरकारकडून तुम्हाला विमा मिळेल आणि पतीच्या उपचारासाठी मदत होईल, असं सांगितलं."

सुनीता यांच्या नावावर बुलंदशहरच्या अनूप शहर येथील येस बँकेच्या शाखेत एक खातं उघडण्यात आलं होतं. विम्याची रक्कम याच खात्यात जमा झाली होती, पण ती रक्कम एका दुसऱ्या महिलेनं 'सेल्फ चेक'च्या माध्यमातून बँकेत जाऊन काढली होती.

एएसपी शर्मा म्हणतात, "या घोटाळ्यात आशा वर्करपासून बँकेच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच सामील होते. सुनीता या कधीच बँकेत गेल्या नव्हत्या, पण त्यांचं केवायसी करून खातं उघडण्यात आलं.

बँकेत न जाता 'सेल्फ चेक'च्या माध्यमातून पैसेही काढले गेले. या प्रकरणात आम्ही येस बँकेच्या दोन डेप्यूटी मॅनेजरलाही अटक केली आहे."

अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी बँक काही पावलं उचलत आहे का?, असा प्रश्न 'बीबीसी'ने येस बँकेला विचारला. मात्र बँकेकडून यावर कोणतंही उत्तर मिळालं नाही.

जमीन गहाण ठेवली, मंगळसूत्रही विकलं

पोलिसांच्या माहितीनुसार, गंभीर आजारी असणाऱ्या लोकांना ही विमा घोटाळा करणारी टोळी शोधत असे.

ते त्यांच्या कुटुंबीयांना 'सरकारी मदत मिळेल' असं सांगून त्यांची कागदपत्रं मिळवत आणि नंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर विमा रकमेचे पैसे स्वतः काढून घेत असत.

असंच एक प्रकरण संभलमधल्या एका गावात राहणाऱ्या प्रियांका शर्मा यांचं आहे.

प्रियांका यांचे पती दिनेश शर्मा कॅन्सरने आजारी होते, तेव्हाच विमा घोटाळा करणाऱ्या टोळीने त्यांच्याशी संपर्क केला.

प्रियांका सांगतात, "मी पतीला घेऊन हॉस्पिटलला जात होते, तेव्हा हे लोक मला भेटले. त्यांनी सांगितलं की, ते सरकारकडून गंभीर आजारी असलेल्या लोकांना मदत करतात.

उपचारासाठी तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील, आणि जर पतीला काही झालं तर 20 लाख रुपये मिळतील."

प्रियांका यांचे पती कॅन्सरने आजारी होते. तेव्हाच विमा घोटाळा करणाऱ्या टोळीने त्यांच्याशी संपर्क साधला आणि सरकारी मदत मिळेल असं खोटं आश्वासन दिलं.

फोटो स्रोत, Prabhat Kumar/BBC

फोटो कॅप्शन, प्रियांका यांचे पती कॅन्सरने आजारी होते. तेव्हाच विमा घोटाळा करणाऱ्या टोळीने त्यांच्याशी संपर्क साधला आणि सरकारी मदत मिळेल असं खोटं आश्वासन दिलं.

प्रियांका यांचा दावा आहे की, मदतीचं आमिष दाखवणाऱ्या त्या लोकांनी त्यांच्याकडून 1 लाख 40 हजार रुपये घेतले आणि सगळी कागदपत्रंही घेतली.

प्रियांका यांचे पती दिनेश शर्मा यांचा मार्च 2024 मध्ये कॅन्सरमुळे मृत्यू झाला.

संभलमध्ये विमा फसवणुकीची चौकशी सुरू झाल्यानंतर प्रियांका यांनीही पोलिसांकडे तक्रार दिली.

तरीही त्यांची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींपैकी दोन अजूनही फरार आहेत.

पतीचा मृत्यू आणि त्यानंतर विम्याच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीमुळे प्रियांका पूर्णपणे खचून गेल्या आहेत.

त्यांनी आपली जमीन गहाण ठेवली आहे आणि आता कसं तरी दूध विकून आपल्या तीन मुलांचा उदरनिर्वाह करत आहेत.

जे लोक आधीच मरण पावले, त्यांचाही विमा

विमा फसवणुकीच्या तपासादरम्यान अशी प्रकरणंही समोर आली, ज्यात मरण पावलेल्यांना कागदोपत्री 'जिवंत' दाखवून त्यांचा विमा काढण्यात आला होता.

असंच एक प्रकरण दिल्लीत राहणाऱ्या त्रिलोक यांचं आहे. त्यांचा मृत्यू जून 2024 मध्ये कॅन्सरमुळे झाला होता.

त्रिलोक यांच्यावर दिल्लीतील निगमबोध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्याची पावती देखील उपलब्ध आहे.

त्रिलोक यांच्या मृत्यूनंतर स्कॅम करणाऱ्या टोळीने दिल्लीतील एका बँकेत त्यांच्या नावाने खातं उघडलं, विमा पॉलिसी काढली आणि मग दिल्लीच्या जीबी पंत रुग्णालयातून त्यांचं मृत्यू प्रमाणपत्रही बनवून घेतलं.

या टोळीने विम्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न सुरू केला होता, पण त्याआधीच ते संभल पोलिसांच्या हाती लागले.

त्रिलोक यांचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर विमा घोटाळ्यातील टोळीने त्यांच्या नावाने बनावट कागदपत्रं तयार करून विमा करून घेतला. नंतर पुन्हा त्यांनाच मृत दाखवून विम्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला.

फोटो स्रोत, Prabhat Kumar/BBC

फोटो कॅप्शन, त्रिलोक यांचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर विमा घोटाळ्यातील टोळीने त्यांच्या नावाने बनावट कागदपत्रं तयार करून विमा करून घेतला. नंतर पुन्हा त्यांनाच मृत दाखवून विम्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला.

दिल्लीच्या शालीमार बाग परिसरात राहणाऱ्या त्रिलोक यांच्या पत्नी सपना या, या फसवणुकीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत.

सपना 'बुटीक' चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 'बीबीसी'शी बोलताना त्या म्हणाल्या, "माझ्या पतीचा मृत्यू झाला होता. पण त्यांनी कागदोपत्रांमध्ये त्यांना पुन्हा जिवंत दाखवलं आणि नंतर परत मृत दाखवून फसवणूक केली."

सपना आपल्या पतीला आठवून भावूक होतात. त्या म्हणतात, "आम्ही सर्व ठिकाणी उपचार करून पाहिले, पण कॅन्सर सतत वाढतच गेला. त्यांच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे खचून गेले होते."

त्रिलोक यांच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी विमा घोटाळा करणाऱ्या टोळीने सपना यांच्याशी संपर्क साधला आणि सरकारी मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.

सपना यांना वाटत होतं की, सरकारकडून त्यांना काही मदत मिळेल. पण नंतर जे लोक कागदपत्रं घेऊन गेले होते, त्यांनी फोन उचलणं बंद केलं.

संभल पोलीस विमा घोटाळ्याचा तपास करताना जेव्हा सपना यांच्यापर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांना मुळात हेच माहिती नव्हतं की, त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने विमा उतरवला आहे.

ग्राफिक्स

सपना सांगतात, "जेव्हा पोलीस घरी आले, तेव्हा मी खूप घाबरले होते. मी विधवा आहे आणि पोलिसांना पाहून गावातल्या लोकांना वाटलं की, कदाचित मीच काहीतरी चुकीचं केलं आहे.

पण मग अनुकृती शर्मा यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं की तुमच्यासोबत गुन्हा घडला आहे. तुमची फाईल समोर आली आहे, कारण तुमच्या पतीला कागदोपत्री जिवंत दाखवून पुन्हा मृत दाखवलं गेलं आहे."

सपना पुढे सांगतात, "ही टोळी माझ्यासारख्या आधीच त्रासात असलेल्या लोकांना लक्ष्य करत आहे.

जर पोलिसांनी माझी परिस्थिती समजून घेतली नसती, तर या फसवणुकीत दोष माझ्यावरच आला असता, कारण वापरले गेलेली सगळी कागदपत्रं तर माझ्याच नावाने होती."

अनुकृती शर्मा म्हणतात, "विमा रकमेचा दावा करण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र असणं गरजेचं असतं. त्रिलोक यांच्या प्रकरणात दिल्लीच्या जीबी पंत रुग्णालयातून मृत्यू प्रमाणपत्र बनवण्यात आलं होतं."

जीबी पंत रुग्णालयाने ते मृत्यू प्रमाणपत्र बनावट असल्याचं संभल पोलिसांना दिलेल्या उत्तरात स्पष्ट सांगितलं होतं.

संभल पोलिसांनी 5 जुलै रोजी जीबी पंत रुग्णालयाशी संबंधित असलेल्या एका सुरक्षारक्षक आणि वॉर्ड बॉयला अटक केली होती. पोलिसांचा दावा आहे की, या दोघांनी रुग्णालयाच्या कागदपत्रांचा गैरवापर करून हे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार केलं होतं.

या अटकेपूर्वी 'बीबीसी'ने जीबी पंत रुग्णालयाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, रुग्णालयाने कोणतंही उत्तर दिलं नाही.

त्रिलोक यांच्या एका विमा पॉलिसीचे 20 लाख रुपये बँक खात्यात जमा झाले होते. पण टोळीतील सदस्य हे पैसे काढण्याआधीच संभल पोलिसांनी त्यांना अटक केली.

विम्याच्या पैशासाठी 'खून'ही केले

विम्याच्या रकमेसाठी केलेली ही फसवणूक केवळ गंभीर आजारी किंवा मरण पावलेल्या लोकांपुरतीच मर्यादित राहिली नाही. पोलिसांचा दावा आहे की, विम्याच्या पैशांसाठी काही ठिकाणी हत्या देखील करण्यात आल्या आहेत.

एएसपी शर्मा यांचा दावा आहे की, तपासादरम्यान संभल पोलिसांच्या समोर अशी किमान चार प्रकरणं आली, ज्या ठिकाणी खून झाल्यावर तो अपघाती मृत्यू असल्याचं दाखवण्यात आलं होतं.

या चार प्रकरणांपैकी एक होतं 20 वर्षांच्या अमनचं. पश्चिम उत्तर प्रदेशातील अमरोहा आणि संभल जिल्ह्याच्या सीमेवरून जाणाऱ्या रस्त्यावरील रहला पोलीस ठाण्यापासून सुमारे पाच किलोमीटर दूर असलेल्या निर्जन ठिकाणी, नोव्हेंबर 2023 मध्ये अमनचा मृत्यू 'अपघातात' झाल्याचं दाखवण्यात आलं. त्यावरून विमा रकमेचा क्लेम करून पैसे वसूल करण्यात आले होते.

नंतर पोलिसांच्या तपासात असा दावा करण्यात आला की, अमनची हत्या विमा फसवणूक करणाऱ्या टोळीनेच केली होती.

20 वर्षांच्या अमनच्या मृत्यूला अपघात दाखवून विम्याच्या रकमेपैकी एक भाग वसूल करण्यात आला होता. आता पोलीस हा प्रकार हत्या असल्याच्या शक्यतेवरून तपास करत आहेत.
फोटो कॅप्शन, 20 वर्षांच्या अमनच्या मृत्यूला अपघात दाखवून विम्याच्या रकमेपैकी एक भाग वसूल करण्यात आला होता. आता पोलीस हा प्रकार हत्या असल्याच्या शक्यतेवरून तपास करत आहेत.

अनुकृती शर्मा म्हणतात, "आम्हाला आरोपींकडून अमनच्या नावावर अनेक विमा पॉलिसीचे कागदपत्रं मिळाली होती. जेव्हा आम्ही त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट पाहिला, तेव्हा लक्षात आलं की, त्याच्या शरीरावर कुठेही खरचटलेलं नव्हतं. फक्त डोक्यावर चार गंभीर जखमा होत्या."

अनुकृती शर्मा सांगतात, "जेव्हा आम्ही त्या टोळीचे सात लोक पकडले, तेव्हा त्यापैकी एकजण बोलून गेला की, आम्ही रहरा भागात जाऊनच हत्या करतो.

जेव्हा आम्ही आणखी खोलात जाऊन चौकशी केली, तेव्हा त्यानं सलीम नावाच्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. तीही अगदी अशाच प्रकारे करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांच्याकडे विम्याचे 78 लाख रुपये आले होते."

ग्राफिक्स

अमनचं आधार कार्ड दिल्लीच्या छतरपूर परिसरातल्या भाटी खुर्द गावाचं बनवण्यात आलं होतं. मात्र स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार अमन कधीच तिथं राहिला नव्हता.

संभल पोलिसांनी या विमा फसवणुकीच्या तपासादरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अनेक गुन्हे नोंदवले आहेत आणि आतापर्यंत सुमारे 60 लोकांना अटक केली आहे.

आधार डेटामध्ये केले बदल

तपासात हेही समोर आलं की, घोटाळा करण्यासाठी आधार डेटामध्ये बदल करण्यात आले आणि बनावट वय व पत्ते नोंदवले गेले.

एएसपी शर्मा म्हणतात, "यूआयडीएआयने (आधार प्राधिकरण) डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक सुरक्षा व्यवस्था तयार केल्या आहेत, ज्या सहज बायपास करता येत नाहीत.

परंतु, विमा घोटाळा करणाऱ्या टोळीचं नेटवर्क इतकं गुंतागुंतीचं होतं की त्यांनी आधारच्या प्रत्येक सुरक्षा व्यवस्थेला बायपास केलं."

'बीबीसी'ने आधार डेटामधील बदलांबाबत यूआयडीएआय म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाला अशा फसवणुकीचे प्रकार थांबवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा प्रश्न विचारला. पण, त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळालं नाही.

या तपासाची सुरुवात विमा क्लेम तपासणारे ओंकारेश्वर मिश्रा यांच्या अटकेने झाली होती. सध्या ते तुरुंगात आहेत. ओंकारेश्वर यांचे वकील नीरज तिवारी यांनी 'बीबीसी'ला ते निर्दोष आहेत आणि त्यांना लवकरच जामीन मिळेल, असं सांगितलं.

आधार डेटामध्ये बदल करण्यासाठी आरोपींनी एक बनावट वेबसाइट सुरू केली होती.

फोटो स्रोत, Sambhal Police

फोटो कॅप्शन, आधार डेटामध्ये बदल करण्यासाठी आरोपींनी एक बनावट वेबसाइट सुरू केली होती.

विमा घोटाळ्याशी संबंधित अनेक आरोपींचा संबंध संभल जिल्ह्यातील बबराला या एका छोट्याशा शहराशी आहे.

आरोपी सचिन शर्मा आणि गौरव शर्मा यांच्या बबरालामधील घरांना सध्या कुलूप लागलेलं आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे सायकलच्या टायरचं पंक्चर काढण्याचं छोटंसं दुकान होतं, असं त्यांचे काही शेजारी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगतात.

सचिन शर्मा आणि गौरव शर्मा यांच्या कुटुंबाची ग्रेटर नोएडामध्येही अनेक घरे आहेत. त्यांच्या भूमिकेबाबत जाणून घेण्यासाठी आम्ही ग्रेटर नोएडामध्ये राहणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांची भेट घेतली, परंतु आम्हाला उत्तर मिळालं नाही.

संभलमध्ये उघडकीस आलेल्या या विमा घोटाळ्याचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसं त्यामागचे अनेक पदर समोर येत आहेत. हा घोटाळा अनेक राज्यांपर्यंत पसरलेला असण्याची शक्यता असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

ग्राफिक्स

एएसपी अनुकृती शर्मा म्हणतात, "आमच्याकडे ज्या तक्रारी आणि माहिती आहेत, त्या अनेक राज्यांमधून आल्या आहेत. हा एक खूप गुंतागुंतीचा घोटाळा आहे, ज्यामध्ये अनेक क्षेत्रांतील लोक सामील आहेत.

आम्ही आशा वर्कर, ग्रामपंचायतीचे सरपंच, बँक व विमा कंपनीचे एजंट, आधार पीओसी सेंटरमधील कर्मचारी, रुग्णालयाशी संबंधित लोक आणि इतर अनेक क्षेत्रांतील व्यक्तींना अटक केली आहे.

तुम्ही असं म्हणू शकता की, जसं एका अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळे खेळाडू असतात, तसंच एका 'फ्रॉड इकॉनॉमी'तही तितक्याच प्रकारचे भ्रष्ट लोक सामील असतात."

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा कागद म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र असतं.

वकील प्रवीण पाठक यांनी हा घोटाळा समोर आल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे.

प्रवीण पाठक म्हणतात, "किमान एक अशी ऑटोमेटेड आणि डिजिटल प्रणाली असायला हवी, जिथे कुणाचा मृत्यू झाला आहे हे समजू शकेल आणि त्यावरून लगेच पडताळणी करता येईल.

यामुळे मृत्यू झालाय का आणि नेमका कधी झाला, हे स्पष्टपणे सिद्ध करता येईल. जर ही प्रणाली सुधारली गेली, तर अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल."

केवायसी कागदपत्रांचा गैरवापर

या मोठ्या प्रमाणावर उघड झालेल्या विमा फसवणुकीनंतर विमा कंपन्यांमध्येही चिंता वाढली आहे.

एसबीआय लाइफचे सीओओ रजनीश मधुकर म्हणतात की, कंपनी विमा धारकाला त्रास न देता त्याच्या दाव्याची प्रक्रिया लवकर करून पूर्ण करते आणि याचाच फायदा फसवणूक करणारे लोक घेतात.

रजनीश मधुकर म्हणतात, "विमा रकमेचा दावा मंजूर करताना हे लक्षात घेतलं जातं की, ज्यांनी दावा केला आहे त्यांना फार त्रास होऊ नये, कारण मृत्यू झाल्यानंतर कुटुंब आधीच खूप संकटात असतं. आणि अशा वेळी हे स्कॅमर (घोटाळेबाज) फसवणूक करतात."

ग्राफिक्स

या फसवणुकीच्या मुळाशी केवायसी म्हणजेच ओळखीशी संबंधित कागदपत्रांचा गैरवापर आहे.

एएसपी शर्मा म्हणतात, "या फसवणुकीत सगळ्यात मोठी अडचण म्हणजे लोकांच्या कागदपत्रांचा गैरवापर केला जातो. अशा परिस्थितीत खरे पीडित असलेले लोकही चौकशीच्या कक्षेत येतात. त्यामुळे खरं आव्हान हे अशा निरपराध लोकांचं संरक्षण करणं आहे."

इन्शुरन्स रिस्क मॅनेजमेंट असोसिएशनचे डॉ. रमेश खरे सांगतात, "जेव्हा फसवणूक उघडकीस येते, तेव्हा ज्यांचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड वापरलेलं असतं, तेच लोक अडचणीत सापडतात. म्हणून केवायसी कागदपत्रांचा गैरवापर होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे."

विमा फसवणुकीच्या घटना वाढत आहेत– आयआरडीएआय

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) विमा क्षेत्रात होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी 2024 मध्ये मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्या अंतर्गत, कुठल्याही फसवणुकीची माहिती मिळाली, तर त्याची चौकशी करणं अनिवार्य आहे.

विमा फसवणुकीचे प्रमाण नेमकं किती मोठं आहे, याचा कोणताही अधिकृत आकडा उपलब्ध नाही. मात्र अंदाजानुसार ही रक्कम हजारो कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.

संभलमधील एका इन्शुरन्स कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना आयआरडीएआयच्या कार्यकारी संचालक मीना कुमारी यांनी विमा फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे मान्य केलं.

मीना कुमारी म्हणाल्या, "अनेक वेळा लोक असं म्हणतात की फसवणूक झाली तर फारतर काय होईल, विमा क्लेम वाढतील. पण अशा वेळी, जेव्हा दावे वाढतात, तेव्हा पुढच्या वर्षी नवीन पॉलिसी घेणाऱ्यांना याची किंमत मोजावी लागते, कारण विमा कंपनी प्रीमियम वाढवतात."

मीना कुमारी म्हणाल्या की, अशा फसवणुकीचा थेट परिणाम त्या ग्राहकांवर होतो, जे विमा कंपन्यांकडे पॉलिसी खरेदी करण्यासाठी येतात.

या विमा फसवणुकीची व्याप्ती किती मोठी आहे, या प्रश्नावर अनुकृती शर्मा म्हणतात, "आम्ही गेल्या पाच महिन्यांपासून तपास करत आहोत. सुमारे 60 लोकांना अटक केली आहे, हजारो बनावट पॉलिसी उघड झाल्या आहेत.

माझ्या मते, आपण कदाचित अजून फक्त 10 टक्केच काम पूर्ण केलं आहे. अशा फसवणुकीला आळा बसण्यासाठी अजून खूप काम करणं गरजेचं आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.