हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्याविरोधात 32 गुन्हे, कोट्यवधींचे फसवणूक प्रकरण काय?

फोटो स्रोत, FACEBOOK/JAWED HABIB
- Author, सैयद मोजिज इमाम
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"ते माझ्या लग्नासाठी जमवलेले पैसे होते", उत्तर प्रदेशच्या संभलमधील मियां सराय इथली रहिवासी अलबीना यांचा हे सांगताना गळा दाटून येतो.
बीएससीपर्यंत शिकलेल्या अलबीना पूर्वी एका स्थानिक खासगी हॉस्पिटलमध्ये नोकरी करायच्या. पण आता, त्यांना पोलीस ठाण्यात फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यांचे 4 लाख 70 हजार रुपये एका स्कीममध्ये बुडाले आहेत.
उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात अलबीना यांच्यासारख्या जवळपास शंभर जणांचे पैसे अशाच प्रकारे बुडाले आहेत.
या सर्वामध्ये भारतातील प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांचंही नाव येतं आहे. त्यामुळंच संभल पोलिसांनी जावेद यांच्या विरोधात एकापाठोपाठ 32 गुन्हे नोंदवले आहेत.
या प्रकरणात बीबीसीनं जावेद हबीब यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. त्यांच्या एका वकिलांनी बीबीसीला सांगितलं की, ज्या कंपनीत लोकांनी पैसे गुंतवले आहेत त्या कंपनीशी जावेद हबीब यांचा काहीही संबंध नाही.
24 ऑगस्ट 2023 ला संभलमधील 'रॉयल पॅलेस' या एका मंगल कार्यालयात 'फॉलिकल ग्लोबल' या कंपनीच्या नावानं एक सेमिनार झाला होता.
कंपनीच्या माहितीपत्रकात (ब्रोशर) 'द टीम'च्या नावानं जावेद हबीब आणि त्यांचा मुलगा अनस हबीब यांचे फोटो छापण्यात आले होते. माहितीपत्रकात त्यांची नावं संस्थापक म्हणून देण्यात आली होती.
या सेमिनारमध्ये संभल आणि जवळपासच्या भागातील 200 जण सहभागी झाले होते. यातील अनेक जणांनी अधिक परतावा मिळवण्याच्या इच्छेनं कंपनीत गुंतवणूक केली होती.
ही स्कीम कशी सुरू झाली?
या स्कीममध्ये गुंतवणीक केलेल्या अनेकांशी आम्ही बोललो. 'ही कंपनी वेलनेस इंडस्ट्रीला डिजिटाईज करते आहे. कंपनी जमीन, हेल्थ आणि ब्यूटी बिझनेसमधील गुंतवणुकीतून चांगला नफा कमावून देऊ शकते,' असं व्यासपीठावरून सांगण्यात आलं होतं, असं अनेकांनी सांगितलं.
गुंतवणुकदारांना ते दरमहा 20 ते 30 टक्क्यांपर्यत नफा कमावू शकतात, असं आश्वासन देण्यात आलं होतं.
अलबीना म्हणतात की, 'माझ्या भावाच्या एका मित्रानं जावेद हबीब कंपनीत पैसे गुंतवा असं सांगितलं. दर महिन्याला नफा मिळेल, असंही सांगितलं. मला वाटलं जावेद हबीब यांचं नाव मोठं आहे. त्यामुळं फसवणूक होणार नाही.'
अलबीना यांच्याप्रमाणेच अनेक जणांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. या सर्वांनाच 'फॉलिकल' नावाच्या कंपनीत गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा मिळण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं.
संभलचे पोलीस अधीक्षक (एसपी) कृष्ण कुमार बिश्नोई बीबीसीला म्हणाले की, "सर्वसामान्य लोकांनी जावेद हबीब यांच्या नावामुळे या स्कीमवर विश्वास ठेवला. त्यांनी सरासरी 5 ते 7 लाख रुपयांची गुंतवणूक केली.
या स्कीममध्ये 100 हून अधिक जणांनी पैसे गुंतवले होते. अडीच वर्षे झाल्यावरही त्यातील एकालाही एक रुपयादेखील मिळाला नाही."
ते म्हणाले, "या स्कीमच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांची जवळपास 5 ते 7 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. प्राथमिकदृष्ट्या हा गुन्हा असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे."
संभलच्या लोकांचा दावा आहे की, फक्त जावेद हबीब यांच्या नावामुळेच ते या गुंतवणुकीच्या दाव्यावर विश्वास ठेवत होते.

यात आणखी एक व्यक्ती आहेत, असं शेतकरी सरफराज हुसैन म्हणाले.
"आम्हाला सांगण्यात आलं होतं की जावेद हबीब स्वत: या कंपनीचे मालक आहेत. सैफुल्ला, ज्याला काहीजण सैफुल हसन म्हणूनही ओळखतात. तो या कंपनीचा स्थानिक एजंट होता. त्यानंच जावेद हबीब यांच्याबरोबर आमची भेट करून दिली. मी तीन लाख रुपये गुंतवले आहेत," असं त्यांनी सांगितलं.
या गुंतवणुकदारांनी बीबीसीला एका व्हीडिओही दाखवला. त्यात अनस हबीब व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकांना या स्कीमबद्दल माहिती देत असल्याचं दिसत होतं.
संभलच्याच मोहम्मद रेहान यांनी बँकेतून कर्ज घेऊन या कंपनीत गुंतवणूक केली होती.
ते म्हणाले की, "जावेद हबीब यांच्या कंपनीत गुंतवणूक करा, असं सांगण्यात आलं होतं. तुम्हाला दरमहा 20-30 टक्के नफा मिळेल. मात्र दोन वर्षांमध्ये एक पैसाही मिळाला नाही."
कंपनीकडून देण्यात आलेल्या यादीनुसार, जास्त गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.
यात 14 स्लॅब तयार करण्यात आले होते. उदाहरणार्थ 45,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास 2,970 रुपये प्रति महिना, तर 9,99,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास 86,184 रुपये प्रति महिना आणि एका व्यक्तीला कझाकस्तानला पर्यटनासाठी पाठवण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं होतं.
याप्रकारच्या स्कीमच्या मोहातून संभल आणि जवळपासच्या भागातील अनेकांनी यात गुंतवणूक केली.
मियां सराय मोहल्ल्यात कपड्यांचं दुकान असणारे मोहम्मद सादिक म्हणतात, "आधी संभलमध्ये आणि नंतर दिल्लीत जावेद हबीब यांची भेट झाली. त्यांनी आश्वासन दिलं की, पैसे परत करतील, मात्र त्यापुढे काहीही झालं नाही."
स्थानिक एजंट सैफुल्ला उर्फ सैफुल हसन यानं बहुतांश लोकांकडून रोख रक्कम घेतली. तर काही जणांकडून त्याच्या वैयक्तिक खात्यात पैसे ट्रान्सफर करून घेतले.
आता कित्येक महिन्यांपासून त्याचं घर बंद आहे. शेजारी सांगतात की "ते कित्येक महिन्यांपासून इथे आलेले नाहीत."
पोलिसांकडे तक्रारींची नोंद
संभलच्या रायसत्ती पोलीस ठाण्यात आतापर्यंत या फसवणुकीशी संबंधित 32 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्कीममध्ये 100 हून अधिक जणांनी गुंतवणूक केली होती. प्रत्येक व्यक्तीनं सरासरी 5 ते 7 लाख रुपये गुंतवले होते.
संभलचे पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई म्हणाले, "आम्ही जावेद हबीब यांचा जबाब नोंदवण्यासाठी नोटिस पाठवली होती. 12 दिवसांचा कालावधी दिला होता. ते स्वत: आले नाहीत. तर त्यांचे वकील आले. आता पोलिसांनी सर्च वॉरंट जारी केला आहे."
"पोलिसांची टीम दिल्लीला गेली होती. मात्र ते तिथे सापडले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी मुंबईत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे."

पोलिसांचं म्हणणं आहे की, हा तपास फक्त संभलपर्यंत मर्यादित राहणार नाही.
पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई म्हणाले की, "या घोटाळ्याचा संबंध बिटकॉइन खाती आणि परदेशी देवाण-घेवाणीशी जोडलेला असू शकतो, अशी आम्हाला शंका आहे."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "आतापर्यंत 40 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. 32 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या एफआयआरमध्ये जावेद हबीब, अनस हबीब आणि सैफुल्ला उर्फ सैफुल हसन यांची नावं आहेत."
जावेद हबीब यांची बाजू
अनेक वेळा फोन करूनही जावेद हबीब यांचा फोन स्विच ऑफच होता. त्यामुळे त्यांची बाजू जाणून घेता आली नाही.
दुसऱ्या बाजूला जावेद हबीब यांच्याकडून अलाहाबाद उच्च न्यायालयात एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची सुनावणी या आठवड्यात होऊ शकते.
जावेद यांचे वकील पवन कुमार म्हणाले की, "जावेद हबीब यांचा फॉलिकल ग्लोबल या कंपनीशी काहीही थेट संबंध नाही."

वकिलांचं म्हणणं आहे की, जावेद हबीब फक्त एका सेमिनारमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. तिथे ते फक्त हेअर स्टाईल आणि ब्यूटी व्यवसायाला चालना देण्याबद्दल बोलले होते.
ते म्हणाले की, 22 जानेवारी 2023 लाच जावेद हबीब यांच्याकडून एक सार्वजनिक नोटिस जारी करण्यात आली होती. त्यात स्पष्ट म्हटलं होतं की, त्यांचा फॉलिकल ग्लोबल कंपनीशी कोणताही व्यावसायिक किंवा आर्थिक संबंध नाही.
पवन कुमार म्हणाले, "आम्हाला जेव्हा माहिती मिळाली की, या नावावर लोकांची फसवणूक केली जाते आहे, तेव्हा आम्ही आधीच ही नोटिस प्रसिद्ध केली होती."
बिटकॉईन आणि मनी लाँडरिंगचा तपास
पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, तपासातून आता हेदेखील समोर येतं आहे की हे संपूर्ण नेटवर्क क्रिप्टोकरन्सी म्हणजे बिटकॉईनद्वारे काम करत होतं.
एसपी कृष्ण बिश्नोई म्हणाले की, "कंपनीचं मुख्यालय दुबईत असल्याचं सांगण्यात आलं आहे. अशी शंका आहे की, मनी लाँड्रिंगद्वारे बिटकाईन खात्यांमधून पैसे परदेशात पाठवण्यात आले असतील. त्याचा तपास सुरू आहे."
जावेद यांनी स्वत: येऊन जबाब नोंदवावा यासाठी, 12 ऑक्टोबरला त्यांना 94 बीएनएस अंतर्गत नोटीस देण्यात आली होती. मात्र, ते गैरहजर राहिलेत. त्यानंतर पोलिसांनी 100 बीएनएस अंतर्गत सर्च वॉरंट जारी केला आहे.
तपास अधिकारी म्हणतात, "आम्ही त्यांच्या दिल्लीतील घरी गेलो होतो. मात्र ते तिथे सापडले नाहीत. त्यांच्या मुंबईतील घर, कार्यालयांची झडती घेण्यासाठी कायदेशीर कारवाई केली जाईल."

फोटो स्रोत, FACEBOOK/JAWED HABIB
संभल आणि जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये या स्कीममुळे अनेकजणांची फसवणूक झाली आहे.
एक पीडित म्हणाला की "आम्हाला वाटलं की जावेद हबीबसारखं मोठं नाव असल्यामुळे फसवणूक होणार नाही. मात्र आता पैसाही परत मिळत नाही आणि काहीही उत्तरदेखील मिळत नाही."
गुंतवणूकदार सरफराज हुसैन म्हणाले, "आम्ही जेव्हा जावेद हबीब यांची भेट घेतली, तेव्हा ते म्हणाले, 'चिंता करू नका, मी तुमचे पैसे देईन.' त्यावेळेस आम्हाला वाटलं की इतका मोठा माणूस खोटं बोलणार नाही. मात्र त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही."
सरफराज हुसैन यांच्या दाव्यानुसार, 20 ऑक्टोबर 2024 ला दिल्लीतील साऊथ एक्स परिसरात त्यांची जावेद हबीब यांच्याशी भेट झाली होती.
अर्थात संभलमधील लोकांची आता एवढीच इच्छा आहे की त्यांचे पैसे परत मिळावेत.
एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, संभलमध्ये आधीदेखील बिटकॉईनच्या नावाखाली फसवणूक झाली आहे. मात्र तरीदेखील लोक पैशांच्या मोहात अडकतात आणि त्यांची फसवणूक होते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











