You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
औषधी गुणधर्म आणि खायलाही चविष्ट; या रानभाज्यांचा आहारात समावेश केला तर होतील 'हे' फायदे
- Author, शताली शेडमाके
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पावसाळा सुरू झाला की, बाजारात विविध रानभाज्या दिसायला लागतात. ग्रामीण भाग खासकरून जंगलालगतच्या लोकांसाठी हा निसर्गाचा ठेवा बहुमुल्य आहे. तो केवळ त्यांच्या आहाराचा भाग नाही, तर त्यांच्या आयुष्याचा महत्वाचा घटक आहे.
बदलत्या ऋतुबरोबर नवनव्या रानभाज्या येतात. प्रत्येक ऋतूमध्ये मिळणाऱ्या ठराविक भाजीसाठी वाट पाहणारी काही जुनी मंडळीही आहेत. परंतु, तरुणमंडळींमध्ये याची आवड आणि उत्सूकता हवी तशी दिसून येत नाही.
आपल्यापैकी बरेचजणांना विविध भाज्यांची नावं माहीत नसतात, त्यांची चव माहीत नसते. आधीच दैनंदिन आहारातीलही काही भाज्यांबाबत नाक मुरडलं जात असताना रानभाज्यांचा तर विषयच वेगळा. मात्र, या रानभाज्या आपल्या आगळ्यावेगळ्या चवीसह विविध गुणधर्मांनी परिपूर्ण असतात.
पावसाळ्यात मिळणाऱ्या काही रानभाज्यांबद्दल, त्यांचे गुणधर्म आणि महत्व याबद्दल जाणून घेऊया.
रानभाज्या आणि त्यांचे गुणधर्म
पावसाळ्यात जंगलातील सात्या (जंगली मशरुमचा प्रकार), तरोटा (टाकळा), कोयार, खापरखुटी, धानभाजी, पातूर, कडूभाजी, रानधोपा, हरतफरी, कपाळफोडी, चुका यासारख्या विविध भाज्या मिळतात.
या भाज्यांमध्ये अनेक प्रकारची औषधी गूणधर्म, शरीरासाठी आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळेच रानभाज्या खा आणि ठणठणीत राहा, असं ग्रामीण भागात बोललं जातं.
'बखर रानभाज्यांची' या पुस्तकाच्या लेखिका आणि निसर्ग अभ्यासक निलीमा जोरवर सांगतात, "रानभाज्यांमध्ये भरपूर औषधी गुण असतात. त्याकडे पोषणदृष्या समृद्ध असणाऱ्या आणि दुसऱ्या आजारावरील औषध म्हणून पाहता येईल."
पुढे त्या सांगतात, "पावसाळ्यात गढूळ पाण्यामुळे बरेचदा पोटाचे आजार उद्भवतात. अशा समस्यांवर टाकळ्याची भाजी उपयोगी ठरते. टाकळ्याची भाजी उत्तम कृमीनाशक आहे. कावीळ झाल्यास अमुनीकमूनी नामक एक रानभाजी आहे ती खाऊ घालतात. शेंदळ माकड ही पित्तासाठी फार चांगली मानली जाते. काही लोकं याचा रसदेखील काढून पितात. चिचुरडा भाजी (रान वांगी) देखील चवीला थोडी कडवट पण आरोग्याच्या दृष्टीने चांगली असते.
भारंगीच्या कोवळ्या पानांची भाजी भाजीही पोटदुखीवर उपयोगी आहे. रानभाज्यांमध्ये पोषक जीवनसत्वं आणि फायटर न्युट्रीयंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. घोळभाजीत ओमेगाचं भरपूर प्रमाण असतं. त्याचप्रकारे कुरडूची भाजी, गुळवेलची भाजी, नाळीची भाजी, माठवर्गीय भाज्या रक्तवाढीसाठी उपयुक्त असतात."
नीलिमा जोरवर अनेक वर्षं रानभाज्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत.
गडचिरोली जिल्हा वनराईने नटलेला जिल्हा आहे. इथे रानभाज्यांचा खजिना आहे. यातील काही भाज्यांबाबत जाणून घेऊया –
1. कैमूल जब्बा – ही भाजी नदी-नाल्या किनारी आढळते. ताप, खोकला असल्यास ही भाजी खातात. ही भाजी ताप, खोकल्यावर गुणकारी असून शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, असं स्थानिक सांगतात.
2. रासा जब्बा – रासा जब्बा म्हणजे रताळीची भाजी, ही भाजी हातापायाच्या दुखण्यावर उपयुक्त असते असं मानतात.
3. बोते जब्बा – या भाजीला मराठी उंदीरकानी म्हणतात. याची पाने उंदराच्या कानासारखी असल्याने तिचं नाव उंदीरकानी पडल्याचं म्हटलं जातं.
4. दोबे जब्बा – दोबे जब्बा म्हणजे रानधोप्याची भाजी. याची सुकी भाजी किंवा डाळींबरोबर पातळ भाजी करतात.
5. गुंडे – याला मराठीत अळू किंवा कोचई असं म्हणतात.
6. कोडिल जब्बा – कांचनच्या झाडाची कोवळी पाने तोडून त्याची भाजी केली जाते. याला माडिया भाषेत कोडिल जब्बा म्हणतात. ही भाजी रक्तवाढीसाठी, मासिक पाळी सुरळीत होण्यासाठी गुणकारी असल्याचं सांगतात.
7. एटोळ जब्बा– मराठीत या भाजीला तरोटा किंवा टाकळा असं म्हणतात.
8. वरील जब्बा – याची पानं लांब वर्तुळाकार असतात आणि मध्ये बारीक कणसासारखे तुरे असतात.
9. कुहकु (बांबू) – याला मराठीत वासदे असंही म्हणतात. जमिनीतून नुकताच निघालेल्या बांबूच्या कोवळ्या कोंबांची कोरडी भाजी किंवा वडे करून खातात.
10. कोट काया (रान वांगी) - याला मराठीत चिचुरडा भाजी म्हणतात. ही चवीला थोडी कडवट असते. यात अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
11. दवळी - दवळी ही रानभाजी विशेषतः पावसाळ्यात आढळते. या भाजीला 'कुरडू' किंवा 'सिल्व्हर कॉक कॉम्ब' (Silver cock's comb) असेही म्हणतात. ही भाजी नैसर्गिकरित्या माळरानावर, शेतात किंवा जंगलाच्या कडेला उगवते. या भाजीत लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असून ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते, असं म्हणतात.
रानभाज्यांचं महत्व
आदिवासी भागांमध्ये जल-जंगल-जमीन यांना अमुल्य स्थान आहे. निसर्गाप्रति असलेलं त्यांचं प्रेम त्यांच्या भाषेतून, रहन-सहणीतून दिसून पडतं. रानभाज्या आदिवासी समुहातील लोकांसाठी फक्त उदरनिर्वाहाचं साधनंच नव्हे तर त्यांच्या उपजिविकेचाही मोठा भाग आहे. त्यांच्या जीवनातील या भाज्यांचं महत्व मोठं आहे.
ऋतूनुसार रानभाज्यांचा आहारात समावेश हा फक्त आवड म्हणूनच नव्हे, तर वनौषधीच्या रुपातही केला जातो. आदिवासी समाजात जंगलांचं महत्व आणि त्यातील प्रत्येक घटकालाही ओळखून घेण्याचं पारंपरिक ज्ञान उपजतच असल्याचं म्हटलं जातं.
भामरागड येथील सामुहिक वनहक्क व्यवस्थापन प्रतिनिधी, चिन्ना महाका सांगतात, "जंगलात जाऊन योग्य भाजी शोधून ती खुडून आणणे, हे एक पारंपारिक ज्ञान आहे जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातं. जंगलात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात. यातील काही भाज्या खाण्यायोग्य, तर काही विषारीदेखील असतात.
उदा. बांबूखाली मिळणाऱ्या सात्या (जंगली मशरुम किंवा अळिंबी), धानात आढळणाऱ्या सात्या आणि डोंगरावर मिळणाऱ्या सात्या. यातल्या काही सात्या दिसायला सारख्या असल्या तरी त्या खाण्यायोग्य नसतात, त्यातील फरक ओळखता यायला हवा."
हे ज्ञान कुठल्याही पुस्तकात वाचून प्राप्त होत नाही. तर, प्रत्यक्षात जंगलात जाऊन त्याचं निरीक्षण करून अनुभवातून शिकावं लागतं, असं महाका म्हणतात.
रानभाज्यांवरून पडली गावांची नावं
गडचिरोली जिल्ह्यातील काही गावांची नावंही या रानभाज्यांवरून पडली आहेत. उदा. प्रसिद्ध लोकबिरादरी प्रकल्प असलेलं 'हेमलकसा' या गावाचं नाव त्या भागात बहुलतेनं आढळणाऱ्या ऐमेल या रानभाजीवरून पडल्याचं तेथील चिन्ना महाका यांनी सांगितलं.
महाका म्हणतात, "आदिवासी समाजाचं आणि जंगलांचं खूप जुनं नातं आहे. जंगलातील प्रत्येक वस्तू मग ती रानभाजीच का असेना तीचंही वेगळं महत्व आहे. वापर आणि परिसरात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या रानभाज्यांवरून आमच्या भागातील काही गावांची नावंही ठेवण्यात आली आहेत."
हे सांगतांना त्यांनी एक-दोन गावांच्या नावांचे दाखले दिले. हेमलकसा या गावाचं नाव एमील नावाच्या भाजीवरून पडल्याचं त्यांनी सांगितलं. कसा म्हणजे डोह, पाण्याची उथळ जागा. त्याच्या किनारी आढळणाऱ्या एमील नावाच्या भाजीवरून या गावाचं नाव हेमलकसा पडल्याचं त्यांनी सांगितलं.
त्याचप्रकारे धबधब्याजवळ आढळणाऱ्या दोबे भाजीवरून पडलेलं 'दोबूर' हे गाव, इरपनार (मोहाच्या झाडावरून पडलेलं नाव), दवळी भाजीवरुन दवंडी गावाचं नाव, कोडेल भाजीवरुन कोडेलवाही, कुकडेल भाजीवरुन कुकडेल हे गाव, मरदूर, आलवडासारख्या गावांची नावंही त्यांनी सांगितली. यासह आताच्या तरुणमंडळींमध्ये जंगलाबद्दल हवं तसं प्रेम दिसून येत नाही, अशी तक्रारही ते करतात.
चिन्ना महाका म्हणाले, "रानभाज्या किंवा वनौषधीबाबत गावातील तरुणमंडळींना तितकंस ज्ञान नाही. त्यांची या विषयाप्रति जास्त आवडही दिसून येत नाही. त्यामुळे हे परंपरागत ज्ञान एका पीढीकडून दुसऱ्या पीढीकडे जाण्याचा जो कल होता तो हळूहळू संपत चाललाय. आधी रानभाज्या प्रत्येकाच्या जेवणात दिसून यायच्या आता फक्त बाजारातील भाज्यांचाच समावेश जास्त दिसतो.
रानभाज्यांना जंगलातून शोधून तोडून आणावं लागतं, साफ करावं लागतं, नंतर भाजी करावी लागते. त्यापेक्षा बाजारातून विकत आणलेल्या भाज्या विनामेहनत मिळतात आणि बनवायलाही सोप्या जातात. बऱ्याच तरुणांना रानभाज्यांची चव आवडत नाही. त्यांना नेहमीच्याच भाज्या खाण्यात हव्या असतात.
काहीजण जंगलातून आणून विक्री करतात, त्यांच्याकडून भाजी विकत घेऊन बनवता येते. पण ती महाग असते, मग रोजच्याच भाज्यांचा ताटात समावेश करण्याचं प्रमाण वाढत चाललंय."
रानभाज्यांचं प्रमाण कमी झालंय का?
रानभाज्या संपत चाललेल्या नाहीत, तर त्याचं महत्व आणि ओळख पटविण्याचं जे ज्ञान आहे, ते कमी होत चालल्यांचं निरीक्षण बारीपाडा पॅटर्न राबवणारे पद्मश्री चैत्राम पवार यांनी नोंदवलं.
निसर्गाचा हा ठेवा जोपासण्यासाठी त्याचं संवर्धन करण्याची गरज असल्याचं पवार सांगतात. यासह बाजारात रानभाज्यांची विक्री केली जाते. परंतु, वाढत्या मागणीसह पुरवठ्याच्या हव्यासापोटी त्या पूर्णत:च ओरबाडून टाकल्या जाऊ नयेत, याचीही काळजी घेण्याची गरज असल्याचं पवार म्हणाले.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असणाऱ्या सुमारे 100 उंबऱ्यांच्या बारीपाडा गावात मागच्या 3 दशकांमध्ये केलेल्या कामासाठी चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात करण्यात आलं आहे.
रानभाज्यांच्या संवर्धनासाठी चैत्राम पवार आणि वनवासी कल्याण आश्रम संस्थेसह मिळून काम करतात. गेल्या 20 वर्षांपासून ते बारीपाडा गावात वनभाजी महोत्सव आणि स्पर्धेचं आयोजन करताहेत.
एखादी रानभाजी संपत चालली असेल, तर तिचं जतन कसं करता येईल या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, "गरज असेल तितकीच ती तोडावी. खाण्याच्या नावाखाली पूर्णच ओरबाडून टाकली तर ती भविष्यात उपलब्ध होणार नाही.
जंगलासह शेतातही मिळणाऱ्या भाज्या तननाशकाच्या वापरामुळे संपत चालल्या आहेत. आमच्या भागात रासायनिक खतांचा, तणनाशकाचा वापर अद्याप कमी आहे. परंतु, इतर भागात तणनाशकांचा वापर केला जातो. या तणनाशकांचे तोटे समजून घेऊन त्याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. यासह रानभाज्यांचं मार्केटिंग करू नये, तर तिचं संवर्धन करावं."
"आम्ही बारीपाडा गावाच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनावर कशाप्रकारे भर देता येईल यासाठी गेल्या 33 वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. प्रत्येक जिल्ह्यात निसर्गाच्या संवर्धनाचं महत्व पटवून देणारं एक गाव उभं करता येईल का? शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांना याच्याशी कशाप्रकारे जोडता येईल यासाठी आणखी काय प्रयत्न करता येईल हेही पाहायला हवे," असं पवार यांनी सांगितलं.
यावर उपाय काय?
रानभाज्यांची विक्री होऊ नये, तर त्यांचं संवर्धन, संरक्षण आणि पुढच्या पिढीसाठी त्या कशाप्रकारे सुपूर्द करता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं चैत्राम पवार सांगतात.
"ज्या रानभाज्या संपुष्टात येत आहेत असं वाटतं त्यांचं बियाणं गोळा करून त्या कशाप्रकारे वाचवता येईल, शेतीच्या माध्यमातून त्यांचं संरक्षण करता येईल का, यासाठी प्रयत्न करायला हवेत.
रानभाज्यांचं संरक्षण म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण यात जल, जंगल, जमीन, जन आणि जनावरं 5 मुख्य बिंदू आहेत. या पाचही बिंदूंचा विचार करायला हवा. जंगलाच्या बचावासाठी लोकसहभागातून प्रयत्न करायला हवे, सगळं सरकारच्या भरवशावर टाकल्यानं नाही चालणार, असं पवार म्हणाले.
"जंगलातील एखादी भाजी अगदी कमी प्रमाणात मिळत असेल, तर आदिवासी महिला ती भाजी न तोडता त्या भाजीचं फक्त पान किंवा फुल आणून दाखवतात. कारण त्यांना माहीत आहे की, ही वनस्पती आपण भाज्यांसाठी तोडून टाकली, तर भविष्यात तिचं अस्तित्व धोक्यात येईल.
आपण आदिवासी समाजाला निरक्षर, अडाणी म्हणतो, पण त्यांच्याकडे असलेली ही समज प्रत्येकाकडे असायला हवी. तरंच राना-वनांचं संरक्षण शक्य आहे. जोपर्यंत विचार बदलत नाही, कृतीतही बदल होणार नाही. शाळेच्या माध्यमातून जर हा विषय मांडला, तर विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच याची गोडी लागेल आणि भविष्यात याचं संरक्षण करण्याची योजना अधिक सोयीची होईल", अशी भावना चैत्राम पवार यांनी व्यक्त केली.
वनभाजी महोत्सवाच्या माध्यमातून रानभाज्यांचं महत्व नागरिकांना पटवून देता येईल. परंतु, हे करताना मार्केटशी लिंक केलं तर व्यावसायाच्या नावाखाली लोकं या भाज्या ओरबाडून टाकतील, हा मुद्दाही आमच्या निरीक्षणात पुढे आला. त्यामुळे रानभाज्यांचं संरक्षण आणि रिप्लँटेशनची योजना आखण्याची गरज आहे, असं पवार म्हणाले.
आम्ही जवळपास 18 वर्षांपासून लोकसहभागातून वनभाजी महोत्सव आणि स्पर्धा आयोजित करत आहोत. गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या इको ट्रायबल टुरिझमच्या सोबतीने आम्ही वनभाजी महोत्सव आणि स्पर्धा राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
परंपरागत ज्ञानाचं जतन कसं केलं जातंय
पवार सांगतात, "आदिवासी समाजात विशेषत: स्त्रीयांमध्ये वनवैभवाचं ज्ञान म्हणजे जंगल-जमीनीचं ज्ञान निसर्गत:च असतं. त्यांनी पीढ्या न् पीढ्या हे ज्ञान जोपासलंय. परंतु, बदलत्या काळासोबतच या ज्ञानाचं संगोपन करणंही गरजेचं आहे.
रानभाज्यांची ओळख पटवणं सोपं काम नाही. या पारंपारिक ज्ञानाची आधी लेखी नोंद नव्हती, त्याचं महत्व ओळखून 2003 साली आम्ही काही अभ्यासकांसोबत मिळून बारीपाडा येथे वनभाजी महोत्सवाची सुरुवात केली. त्यावेळी जवळपास 26 महिलांनी भाग घेतला होता. या उपक्रमाला गेल्यावर्षी 20 वर्ष पूर्ण झाले."
पवार पुढे म्हणाले, "आमच्या या उपक्रमाला दरवर्षी महिला-पुरुषांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो. ज्या महिला यात सहभाग नोंदवतात त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येतं. गेल्यावर्षी 48 गावांतून 310 महिलांनी नावनोंदणी केली होती."
"वनभाजी महोत्सवात आणलेल्या भाज्यांच्या परीक्षणासाठी डॉक्टर, संबंधित विषयातील प्राध्यापक, अभ्यासकांचं एक पथक असतं. परीक्षणाअंती ती भाजी शिजवून, भाज्यांचं ते ताट महोत्सवात सहभागी केलं जातं.
आपण या भाज्या आधी आहारात वापरत होतो, हे ही लोकांच्या लक्षात आणून दिलं जातं. आमच्या भागात आतापर्यंत शेकडो भाज्यांची नोंद आम्ही केली आहे."
गेल्यावर्षी एका शाळकरी मुलीने 155 भाज्यांचं एक डिश तयार करुन आणल्याचं पवार यांनी सांगितलं.
आदिवासी जीवनात रानभाज्या म्हणजे फक्त ताटातील एक पदार्थ नसतो, तर ही भाजी त्यांच्या संस्कृतीचाही एक महत्वाचा भाग आहे. जंगल त्यांच्यासाठी अतिशय मौल्यवान आहे. त्यातील प्रत्येक वस्तूचं महत्व त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे निसर्गातील या संसाधनांची ओळख कायमची पुसली जाऊ नये, यासाठी आदिवासी समाज पिढ्यांपासून प्रयत्न करत आलाय. आणि आज जंगलांचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकानेच आदिवासी समाजाकडून जल-जंगल-जमीनीच्या संरक्षणासाठीचे धडे शिकून घेण्याची गरज आहे", असंही पवार म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)