You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निवडुंगाचं फळ तुम्ही खाल्लंय का? या फळाचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
- Author, अहमद अल-खतीब
- Role, बीबीसी प्रतिनिधी
निवडुंगाचं फळ ज्याला टिन शुकी, काटेरी नाशपती किंवा कॅक्टस म्हणूनही ओळखलं जातं. हा एक पौष्टिक आणि औषधी गुणांनी भरलेला वनस्पती खजिना आहे.
प्राचीन काळापासून विविध संस्कृतींमध्ये याचा उपयोग आरोग्य सुधारण्यासाठी आणि औषध म्हणून केला जातो. आजच्या काळातही त्याचे अनेक फायदे संशोधनातून समोर येत आहेत.
या निवडुंग फळाच्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल जाणून घेऊया.
जुलै-ऑगस्टच्या उच्च तापमानात, कैरोच्या रस्त्यांवरून जाणारे लोक एखाद्या झाडाची सावली धरून चालत असतात.
अशाच रस्त्यांच्या कोपऱ्यांवर, या दिवसांत एक दृश्य हमखास दिसतं आणि ते म्हणजे ट्रॉलीवरून विकला जाणारा 'काटेरी नाशपती' म्हणजेच आपलं निवडुंगाचं फळ.
इजिप्तमध्ये याला 'टिन शुकी' म्हणतात, तर पूर्व अरब देशांमध्ये त्याला 'सबार' किंवा 'सबर' म्हणतात.
हे फळ ज्याला मराठीत आपण निवडुंगाचं फळ असंही म्हणतो.
वेगवेगळ्या देशांत कॅक्टसच्या फळांना अनेक रंग असतात. काही फळं हिरवट असतात, काही पिवळी, काही लालसर तर काही जांभळ्या रंगाचीही दिसतात. या फळांची चव किंवा स्वादसुद्धा वेगवेगळी असते.
हे फळ विकणारे सय्यद (लोक त्यांना अबू यासीनही म्हणतात) यांनी सांगितलं की, पिवळ्या रंगाचं टिन (कॅक्टस) फळ चवीला इतकं चांगलं असतं की, ते लाल रंगाच्या फळांपेक्षाही जास्त स्वादिष्ट वाटतं.
वयाची चाळीशी गाठलेले अबू यासीन हे इजिप्तच्या दक्षिण भागातून आलेले आहेत, ते सांगतात, "मादी निवडुंगाचं फळ नर फळाच्या तुलनेत चवीला जास्त गोड आणि मऊसर असतं."
ते असंही म्हणतात की, त्यांना नर आणि मादी फळं सहज ओळखता येतात. कारण नर फळांवर काही उंचवटे असतात आणि त्यावर परागकणांचे थोडेसे अवशेषसुद्धा दिसून येतात.
अबू यासीन म्हणतात की, या वर्षी कैरोमध्ये एका निवडुंगाच्या फळाची किंमत अंदाजे 2 ते 7 इजिप्शियन पाउंड (म्हणजे सुमारे 0.04 ते 0.14 डॉलर्स) दरम्यान आहे. ही किंमत फळाच्या एकूण आकारावर अवलंबून असते.
त्यांच्या मते, एका टोपलीत सुमारे 85 फळं असतात आणि अशा टोपलीची एकूण किंमत ही वाहतूक आणि इतर खर्चांसह सुमारे 400 इजिप्शियन पाउंड (8.22 डॉलर्स) पडते.
हे फळ विकणारे अबू यासीन सांगतात की, या व्यवसायातून फारसा नफा होत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, "खरा नफा तर तो व्यापारी कमावतो जो थेट शेतातून माल खरेदी करतो. माझ्यासारख्या रस्त्यावरून विकणाऱ्या लोकांची मात्र फार थोडी कमाई होते, तेही फक्त दीड महिन्याच्या हंगामातच."
आरोग्याचा खजिना असलेलं नैसर्गिक फळ
इजिप्तमध्ये निवडुंगाच्या फळाला 'गरिबांचं फळ' म्हणून ओळखतात, कारण ते स्वस्तात उपलब्ध होतं. तर ट्युनिशियामध्ये त्याला 'सुलतान घला' (म्हणजे पिकांचा राजा) असं म्हणतात, कारण त्याचं महत्त्व खूप मोठं आहे.
कॅक्टस म्हणजेच निवडुंगाचं फळ खरंच एक वनस्पतींचा खजिना आहे, कारण त्यात पोषण आणि औषधी दोन्ही गुण असतात.
अलीकडेच संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेनं एक संशोधन प्रकाशित (एफएओ) केलं. यामध्ये या फळात अँटिऑक्सिडंटची ताकद नाशपती, सफरचंद, टोमॅटो आणि केळीपेक्षा दुप्पट असते.
याचं कारण म्हणजे त्यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी, फ्लॅव्होनॉइड्स आणि बेटालिन्स असतात, असं म्हटलं आहे.
या अभ्यासात असंही म्हटलं आहे की, कॅक्टस फळ भरपूर प्रमाणात असलेला आहार घेतल्यास हृदयाच्या धमन्यांचा आजार (कोरोनरी आर्टरी डिसीज) आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.
या फळामध्ये असलेल्या तंतुमय पदार्थांमुळे (फायबर) शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसंच, ही फळं नियमित खाल्ल्यास रक्तातील प्लेटलेट्सची कार्यक्षमताही सुधारते.
एफएओच्या अभ्यासानुसार, कॅक्टसच्या फळात पोटॅशियम भरपूर आणि सोडियम कमी असतं, त्यामुळे ते मूत्रपिंडाचे आजार असलेल्यांसाठी आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी खूपच फायदेशीर ठरतं.
संपूर्ण आहार, मजबूत आरोग्य
शेकडो वर्षांपासून आजपर्यंत, निवडुंगाच्या फळाचा पारंपरिक उपचारांमध्ये वापर होतो. याचा उपयोग मधुमेह, स्कर्व्ही (व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होणारा आजार) अशा अनेक आजारांच्या उपचारासाठी केला जातो.
संशोधनातून निवडुंग फळाचे आणखी आरोग्यदायी फायदे समोर आले आहेत. यात अशा गुणधर्मांचा समावेश आहे जे आतडे, यकृत, मूत्रपिंड आणि मूत्राशय स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं, कारण त्यात डाययुरेटिक गुणधर्म आहेत.
'बीबीसी'शी बोलताना आहारतज्ज्ञ माजद अल-खतीब यांनी सांगितलं की, निवडुंगाचं फळ पचनसंस्था, हृदय आणि अगदी मानसिक आरोग्यावरसुद्धा सकारात्मक परिणाम करतं.
खतीब सांगतात की, निवडुंगाच्या फळामध्ये भरपूर आहारतंतू (फायबर) असतात, जे आतड्यांची हालचाल सुधारतात आणि बद्धकोष्ठतेपासून वाचवतात. याशिवाय, हे फळ शरीरातील चांगल्या जीवाणूंची (बॅक्टेरिया) वाढ करण्यासाठीही मदत करतं.
इथे 'आतडे-मेंदू संबंध' (गट-ब्रेन अॅक्सिस) या गोष्टीचं महत्त्व समोर येतं, म्हणजेच पचनसंस्थेचं आरोग्य आणि मन:स्थिती यांचा असलेला संबंध. अभ्यासांनुसार, आतड्यातील जीवाणूंचं संतुलन राखल्याने मानसिक आरोग्य सुधारू शकतं आणि ताणतणाव कमी होऊ शकतो.
आहारतज्ज्ञ माजद अल-खतीब सांगतात की, निवडुंगाचं फळ हे टाइप-2 मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतं.
यातील फायबर आणि पेक्टिन फळातील साखरेचं शोषण कमी गतीने करतात, तर अँटिऑक्सिडंट्स शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता वाढवतात.
याशिवाय, हे अँटिऑक्सिडंट्स दाह, तसेच ताणतणाव आणि चिंताही कमी करण्यास मोठी मदत करतात.
खतीब यांच्या मते, निवडुंगाचं फळ वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यात आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढवण्यास मदत करतं. म्हणूनच, ते हृदय आणि धमन्यांच्या आजारांपासून वाचण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
व्हिटॅमिन सी आणि आवश्यक खनिजं यांचं भरपूर प्रमाण असल्यामुळे निवडुंगाचं फळ रोगप्रतिकारक शक्ती मोठ्याप्रमाणात वाढवतं आणि शरीराला दाह व दीर्घकालीन आजारांशी लढण्यासाठी मदत करतं. यामुळेच त्याला 'संपूर्ण आरोग्याला साथ देणारं परिपूर्ण अन्न' म्हटलं जातं.
परंतु, या सगळ्या फायद्यांनंतरही माजद अल-खतीब निवडुंगाचं फळ मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात, विशेषतः मधुमेहाचे रुग्ण, कमी रक्तदाब असणारे आणि आतड्याचा त्रास (आयबीएस) असलेल्या लोकांनी काळजी घ्यावी.
त्यांच्या मते, हे फळ संतुलित आहाराचा भाग म्हणून आणि गरज पडल्यास वैद्यकीय देखरेखीखाली खाल्लं तर अधिक सुरक्षित ठरतं.
आहारतज्ज्ञांच्या मते, दिवसाला दोन निवडुंगाची फळं खावीत आणि त्यासोबत पुरेशा प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे.
या फळामध्ये मध्ये लोह, फॉस्फरस, पोटॅशियम यासारखे भरपूर पोषक तत्त्वं असतात, तसेच अँटिऑक्सिडंट्स आणि दाह कमी करणारे घटकही असतात. म्हणूनच, हे फळ अनेक आजारांशी लढण्यासाठी उपयुक्त ठरतं.
निवडुंगाच्या पानांच्या अर्काचा उपयोग डोकेदुखी, दातदुखी आणि सूज-काळे पडलेले व्रण कमी करण्यासाठी केला जातो.
निवडुंग वनस्पतीचा इतिहास
निवडुंगाचं फळ आणि निवडुंग वनस्पतीचा उपयोग प्राचीन काळापासून औषध म्हणून केला जातो, विशेषतः मध्य अमेरिकेत, आणि त्यातही मेक्सिकोमध्ये.
इतिहासानुसार, कॅक्टस हा अॅझटेक लोकांच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग होता. अॅझटेक संस्कृती इ.स. 14व्या ते 16व्या शतकात विकसित झाली होती.
अॅझटेक सैन्याच्या ध्वजावर निवडुंगाच्या झाडावर बसलेला गरुड आणि त्याच्या चोचीत साप असं चिन्ह होतं. त्यांची राजधानी 'टेनोटिटलन' या नावानं ओळखली जात होती, याचा अर्थ आहे, दगडावर उगवलेला कॅक्टस.
मेक्सिकोतील अॅझटेक लोक निवडुंगाच्या फळाला 'टेनोश्टली' म्हणत असत.
इ.स. 1492 पर्यंत युरोपियन लोकांना कॅक्टसचं फळ माहितच नव्हतं. कॅरेबियन समुद्रातील हिस्पानिओला बेटावर (आता हैती आणि डॉमिनिकन रिपब्लिक) स्पॅनिशने आक्रमण केल्यावर, तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांना हे फळ दिलं.
तेव्हा स्थानिक लोक या फळाला 'ट्यून' म्हणत असत, असं एफएओच्या अभ्यासात म्हटलं आहे.
स्पॅनिश लोकांनी निवडुंगाची वनस्पती युरोपमध्ये आणली आणि ती 16व्या आणि 17व्या शतकात भूमध्य समुद्र किनाऱ्यावर आणि उत्तर आफ्रिकेत पसरली.
अठराव्या शतकात निवडुंग दक्षिण आफ्रिका, भारत आणि चीनमध्ये पसरला.
निवडुंगाचं स्थलांतर यशस्वी होण्यामागे काही कारणं होती, निवडुंग वनस्पतीची लांबच्या प्रवासातही नवीन मुळे निर्माण होण्याची ताकद कमी होत नाही, आणि ती जगण्याची, वेगवेगळ्या प्रकारच्या माती आणि उष्णतेत (40 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानात) स्वतःला जुळवून घेण्याची प्रचंड क्षमता असते. म्हणून ती सहज वेगवेगळ्या ठिकाणी वाढू शकते.
निवडुंगाला फारसं सांभाळण्याची गरज नसते, ना त्याला रासायनिक मदतीची आवश्यकता असते. पण, जास्त क्षारता किंवा पाण्याखाली बुडाल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
निवडुंगाचे इतर उपयोग
प्राचीन काळापासून कॅक्टस म्हणजेच निवडुंगाचा उपयोग आजारांवर उपचार म्हणून आणि जखमा बरे करण्यासाठी केला जातो.
याशिवाय, त्याचा वापर मॉइश्चरायझर, साबण, शॅम्पू आणि लिपस्टिकसारख्या सौंदर्यप्रसाधनांमध्येही होतो. तसेच, कॅक्टस वापरून वनस्पतींचे डिंक आणि रंगही तयार केले जातात.
काही समुदायांमध्ये, जसं की मेक्सिको आणि कॅलिफोर्नियात, निवडुंगाची पानं (पॅडल्स) खाल्ली जातात. ती पानं कापून, तळून, मसाले लावून किंवा तूपात तळून खाल्ली जातात, आणि त्यावर चीज टाकूनही खातात.
निवडुंगाचा वापर जनावरांच्या चाऱ्याच्या उत्पादनातही होतो. त्याच्या पानांमध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट, स्टार्च आणि बीटाकॅरोटीन असतात, जे जनावरांसाठी पौष्टिक असतात.
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या (एफएओ) अभ्यासानुसार, निवडुंगाची शेती वाढवण्याचा सल्ला दिला जातो, कारण हे वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड कमी करण्यास मदत करतात.
विशेषतः शुष्क आणि अर्ध-शुष्क भागात निवडुंग कार्बन साठा करण्याचं काम करतात, ज्यामुळे पर्यावरण संरक्षणाला चालना मिळते.
निवडुंगाचा वापर प्राचीन काळी सजावटीसाठीही केला जात असे. स्पॅनिश उच्चवर्गीय आपल्या बागेत सर्रास निवडुंग लावायचे. आजही काही बागांमध्ये निवडुंगाला वेगळ्या प्रकारचं कुंपण म्हणून लावतात, जे वारा थांबवण्यास आणि संरक्षण करण्यास मदत करतं.
मोरोक्कोमध्ये आजही निवडुंगाला 'ताबिया' म्हणतात, जे स्पॅनिश भाषेतील "फेन्स" (कुंपण) या शब्दावरून आलेलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.