You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत-चीन संबंधांवर चीनची भाषा अचानक बदलली?
चीन आणि भारत सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झालाय. हा तणाव निवळावा यासाठी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी, वांग यी यांनी भरतासोबत संबंध सुधारण्यावर भर देणार असल्याचं म्हटलंय.
वांग यी रविवारी (25 डिसेंबर) म्हणाले की, "चीन आणि भारताचे संबंध दृढ व्हावेत यासाठी आम्ही भारतासोबत काम करण्यास तयार आहोत."
फक्त भारतच नाही तर, जगातील इतर देशांसोबतच्या संबंधाबाबतही वांग यी यावेळी बोलले. येत्या वर्षात म्हणजेच 2023 मध्ये चीन आपलं मुत्सद्देगिरीचं धोरण आणखीन सक्षमपणे पुढे नेईल असं ही त्यांनी यावेळी सांगितलं.
2022 मध्ये चीनच्या इतर देशांसोबत असलेल्या संबंधांवर रविवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी उपस्थित होते.
ते म्हणाले, "येत्या वर्षात आम्ही एक वैश्विक व्हिजन तयार करून त्याप्रमाणे पुढे जाऊ. आम्ही नवा इतिहास रचू तसेच देशाच्या मुत्सद्देगिरीच्या धोरणात यश मिळवू." बीजिंगमध्ये आयोजित या कार्यक्रमात भारतासोबतच्या संबंधांवर वांग यी म्हणाले,"दोन्ही देश राजनैतिक आणि लष्करी माध्यमातून परस्पर संपर्क राखून आहेत."
या महिन्यात अरुणाचलमधील तवांगमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती. आणि अशातच आता चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचं भारतासंबंधीच हे वक्तव्य समोर आलंय. या झटापटीवरून भारताच्या विरोधी पक्षाने केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी सरकारवर तोफ डागली होती.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत माहिती देताना सांगितलं होतं की, "पीएलएच्या सैनिकांनी 9 डिसेंबर 2022 रोजी तवांग सेक्टरमधील यांगत्से भागात लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवर अतिक्रमण करून स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. यावर भारताच्या सैन्याने त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे."
ते पुढे म्हणाले की, "या फेस-ऑफ (झटापटीत) हाणामारी सुध्दा झाली होती. भारताच्या सैन्याने पीएलएला त्यांच्या पोस्टवर परतण्यास भाग पाडलं."
राजनाथ सिंह म्हणाले की, "या झटापटीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. पण या घटनेत कोणत्याही सैनिकाचा मृत्यू झालेला नाही, तसेच कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही."
वांग यी यांनी बोलताना भलेही भारताचा उल्लेख केला असेल मात्र ते या घटनेविषयी काहीच बोलले नाहीत. तसेच दोन्ही देश संपर्कात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
ते म्हणाले, "चीन आणि भारत राजनैतिक माध्यमातून तसेच लष्करी माध्यमातून संपर्क ठेऊन आहेत. दोन्ही देशांच्या सीमावर्ती प्रदेशात स्थिरता राहावी यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत."
भारत-चीन सीमा वाद
2020 च्या एप्रिल महिन्यापासून भारत आणि चीनमध्ये सीमेवरून तणाव निर्माण झालाय.
भारत-चीन बाउंन्ड्री मेकॅनिजम या यंत्रणेत विशेष प्रतिनिधी म्हणून वांग यी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचा समावेश आहे. मात्र ही यंत्रणा सध्या निष्क्रिय आहे.
2020 च्या एप्रिल महिन्यापासून भारत आणि चीनमध्ये सीमेवरून तणाव निर्माण झालाय.
भारत-चीन बाउंन्ड्री मेकॅनिजम या यंत्रणेत विशेष प्रतिनिधी म्हणून वांग यी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा समावेश आहे. मात्र ही यंत्रणा सध्या निष्क्रिय आहे.
वांग यी पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
चीन आणि पाकिस्तानच्या संबंधांवर वांग यी म्हणाले, दोन्ही देश एकमेकांना समर्थन देतात आणि येणाऱ्या काळातही ते एकमेकांना पाठिंबा देतील.
तसेच दोन्ही देश राजकीय दृष्ट्या आपले संबंध अधिक दृढ करण्यावर भर देतील.
वांग यी अमेरिकेशी असलेल्या संबंधावर काय म्हणाले?
चीन आणि अमेरिकेच्या संबंधांवर वांग यी म्हणाले की, अमेरिकेच्या चीनविषयीच्या चुकीच्या धोरणाला आमचा कडाडून विरोध आहे. दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
या आठवड्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन म्हणाले होते की, 'चीन हा अमेरिकेचा एकमेव प्रतिस्पर्धी आहे.' अमेरिकेने चीनसोबतच्या व्यापारावर अनेक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या काळापासून चीन आणि अमेरिकेत जे ट्रेड वॉर सुरू आहे ते आजतागायत थांबलेलं नाही.
दक्षिण चीन समुद्रात चीनचं वाढतं वर्चस्व अमेरिकेला मान्य नाही. अमेरिकेने याला वेळोवेळी विरोध केलाय. तसेच या भागातील नेव्हिगेशनच्या स्वातंत्र्याचा हवाला देत नेहमीच इथं युद्धनौका पाठवल्या आहेत.
पण चीनला मात्र हा भाग आपला असल्याचं वाटतं. चीनने या समुद्रात अनेक कृत्रिम बेटं तयार केली आहेत. यातल्या काहींवर त्यांचे लष्करी तळही आहेत.
वांग यी यांनी यावेळी बोलताना तैवानचा मुद्दाही उपस्थित केला. तैवानबाबत अमेरिकेच्या भूमिकेला आपण घाबरत नसल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, चीन स्वतःचं हित आणि राष्ट्रीय सन्मान जपण्यासाठी कटिबद्ध आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्या वक्तव्यानंतर वांग यी यांनी 23 डिसेंबर रोजी त्यांच्याशी फोनवरून संपर्क केला. आणि नवीन वर्षात दोन्ही देशांनी संबंध सुधारून जगाला सकारात्मक संदेश द्यायला हवा, असं सांगितलं.
रशियासोबतच्या संबंधावर काय म्हटलं?
युक्रेनचं युद्ध सोडून चीन आणि रशियाचे संबंध अधिक दृढ होत असल्याचं वांग यी म्हटले.
वांग यी पुढं म्हणाले की, "चांगले शेजारी म्हणून आमचे संबंध, मैत्री आणि सहकार्य आणखीन घट्ट झालं आहे. दोन्ही देशांमधील राजकीय भागीदारी आता परिपक्व झाली आहे."
वांग यी पुढे म्हणाले की, "मागच्या वर्षभरात एकमेकांचे हितसंबंध लक्षात घेऊन चीन आणि रशियाने एकमेकांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक विश्वास आणखी दृढ झाला आहे."
युक्रेन युद्धाविषयी काय म्हटले?
युक्रेन युद्धाविषयी बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणात आम्ही वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षता ही मूलभूत तत्त्वं पाळली आहेत. आम्ही कोणा एकाची बाजू घेतलेली नाही , तसेच आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी आगीत तेलही ओतलेलं नाही.
दोन्ही बाजुंनी शांतता राखण्याचं आवाहन आम्ही केलंय. तसेच प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो सोडवावा असंही सांगितलं आहे.
वांग यी म्हणाले, "राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी याआधीही म्हटलंय की, युद्धात कोणीही विजेता नसतो आणि गुंतागुंतीच्या समस्येवर कोणताही सोपा उपाय नसतो. दोन मोठ्या देशांमधील संघर्ष कोणत्याही परिस्थितीत टाळला पाहिजे."
सौदी अरेबियाविषयी काय म्हटले ?
सौदी अरेबियाशी असलेल्या संबंधांबाबत वांग यी म्हणाले की, यामध्ये ऐतिहासिक प्रगती झाली आहे.
ते म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 2022 मध्ये पहिल्या चीन-अरब शिखर संमेलनाला हजेरी लावली होती. तसेच 1949 मध्ये चीन अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच राजनैतिक पातळीवर संपर्क प्रस्थापित झाला आहे.
बेल्ट अँड रोड हा चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले की, 2023 मध्ये या प्रकल्पांतर्गत तिसऱ्या आंतरराष्ट्रीय फोरमचं आयोजन करण्यात येईल.
ते पुढे म्हणाले की, या प्रकल्पासंदर्भात चीनने 2022 मध्ये आणखीन 5 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे या प्रकल्पात आता एकूण 150 देश आणि 32 आंतरराष्ट्रीय संस्था सामील झाल्या आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)