You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चीनच्या पंतप्रधानांची हत्या करण्यासाठी जेव्हा भारताचं विमान बॉम्बने उडवलं होतं...
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने एप्रिल 1955 मध्ये इंडोनेशियाच्या बांडुंग शहरात आफ्रो-आशिया परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.
या परिषदेसाठी चीनमधून काही प्रतिनिधी आणि पंतप्रधान शाओ एन लाइ येणार होते. बांडुंगला नेण्यासाठी त्यांच्या दिमतीला एअर इंडियाचं 'काश्मीर प्रिन्सेस' विमान देण्यात आलं होतं.
हे विमान 11 एप्रिलला दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी बँकॉकहून हाँगकाँगच्या काई टाक विमानतळावर पोहोचलं. या विमानतळावर पोहोचताच फ्लाइट इंजिनिअर ए एन कर्णिक यांच्या देखरेखीखाली विमानाची स्वच्छता सुरू करण्यात आली.
यावेळी को-पायलट गोडबोले म्हणाले होते की, "आज चीनचे पंतप्रधान शाओ एन लाई आमच्या विमानाने प्रवास करणार आहेत, आम्हाला आज त्यांना बघण्याची संधी मिळेल."
गोडबोलेंना ही माहिती विमानाची साफसफाई करणाऱ्या आणि इंधन भरायला आलेल्या ग्राउंड स्टाफने दिली होती.
चीनचे पंतप्रधान भारतीय विमानाने प्रवास करणार असल्याची बातमी हाँगकाँगमध्ये जगजाहीर झाली होती.
पण याच हाँगकाँगमध्ये चीनच्या विरोधात काम करणारे तैवानी एजंट मोठ्या संख्येने असायचे. त्यामुळे चीनच्या सरकारने पंतप्रधानांविषयीची ही बातमी बाहेर येऊ देताना काळजी घ्यायला हवी होती.
कॉकपिटमध्ये स्फोट
एअर इंडियाचे चार्टर्ड प्लेन 'काश्मीर प्रिन्सेस' हाँगकाँगच्या काई टाक विमानतळावर चीनच्या पंतप्रधानांची वाट पाहत थांबलं होतं.
विमान आता 'टेक ऑफ' करायला अगदी थोडा वेळ बाकी असतानाच कॅप्टन डी के जटार यांना रेडिओ मॅसेज मिळाला की, चीनच्या पंतप्रधानांनी शेवटच्या क्षणी आपला दौरा रद्द केलाय. त्यामुळे तुम्ही टेक ऑफ करू शकता असं त्यांना सांगण्यात आलं. दुपारी बरोबर 1 वाजून 26 मिनिटांनी विमानाने हाँगकाँग विमानतळावरून उड्डाण केलं.
काश्मीर प्रिन्सेस हे विमान लॉकहीड कंपनीचं एल-759 कॉन्स्टेलेशन विमान होतं. विमानाचं लँडिंग इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं होणार होतं. त्या विमानात कॅप्टन व्यतिरिक्त सात कर्मचारी आणि 11 प्रवासी होते.
यातले बहुतेक तर चिनी प्रतिनिधी होते, जे बांडुंग संमेलनात सहभागी होण्यासाठी निघाले होते. विमान हवेत झेपावून साधारण पाच तास झाले असतील इतक्यात कॉकपिटमध्ये मोठा स्फोट झाला. काही सेकंदातच विमानाच्या एका इंजिनमधून आगीचा लोट निघू लागला.
पायलटने विमानात फायर साइन ऑन झाल्याचं पाहिलं. विमान 18 हजार फूट उंचीवरून खूप वेगाने खाली येत होतं. विमानात बसलेले प्रवासी आणि कर्मचारी भीतीने ओरडू लागले होते.
जळतं विमान समुद्रात कोसळलं
पायलटने सर्वात आधी डिस्ट्रेस सिग्नल पाठवला, यात विमान दक्षिण चीन समुद्रातील नटुना बेटावरून जात असल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर पूर्ण ताकदीने विमानाचं थ्रॉटल दाबून विमान खालच्या दिशेने वळवलं.
जवळच्या विमानतळावर लँड करण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता, त्यामुळे प्रवाशांना वाचवण्यासाठी विमान समुद्राच्या पाण्यात उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. विमान पाण्यात पडताना त्याला आग लागलीच होती. विमानातील 19 जणांपैकी केवळ तीन कर्मचारी वाचले. या अपघातात बाकीच्या 16 जणांचा मृत्यू झाला.
नितीन गोखले त्यांच्या 'आरएन काव जेंटलमन स्पायमास्टर' या पुस्तकात लिहितात, "वाचलेल्या लोकांमध्ये फ्लाइट नेव्हिगेटर पाठक, विमानाचे मेकॅनिकल इंजिनिअर ए.एन. कर्णिक आणि को पायलट एमसी दीक्षित होते."
एअर इंडियाचे सर्वात अनुभवी पायलट कॅप्टन जठार यांचा या अपघातात मृत्यू झाला. विमान समुद्रात पडण्यापूर्वी एअर होस्टेस ग्लोरी एस्पेंसनने प्रत्येक प्रवाशाला आणि क्रू मेम्बर्सना लाइफ बेल्ट दिले होते. समुद्रात पडल्यावर मेंटेनन्स इंजिनिअर कर्णिक सुमारे नऊ तास पोहोत एका बेटावर पोहोचले. तिथं त्यांना मच्छिमारांनी वाचवलं आणि सिंगापूरला जाणाऱ्या ब्रिटिश युद्धनौकेवर चढवलं.
या शौर्यासाठी कर्णिक यांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आलं.
चौकशी करावी म्हणून नेहरूंना विनंती
चीनचे पंतप्रधान शाओ एन लाई यांनी शेवटच्या क्षणी आपला दौरा रद्द केला नसता तर कदाचित त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला असता.
चीन सरकारने 2004 साली काही गुप्त दस्तऐवज सार्वजनिक केले होते. त्यात म्हटलंय की, "शाओ एन लाई यांना अॅपेन्डिक्सचा त्रास होत होता म्हणून बीजिंगमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्यांनी बांडुंगला जाण्याचा निर्णय पुढे ढकलला."
ऑपरेशन झाल्यावर तीन दिवसांनी शाओ एन लाई रंगूनला गेले. तिथं त्यांनी जवाहरलाल नेहरू आणि बर्माचे पंतप्रधान यू नु यांची भेट घेतली. त्यानंतर ते रंगूनहून जवाहरलाल नेहरूंच्या विमानात बसून बांडुंगला पोहोचले.
या घटनेनंतर लगेचच चिनी रेडिओवर विमान पडल्याच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या. विमान पाडून भारत-चीन संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं देखील या बातम्यांमध्ये म्हटलं गेलं. चीनने यासाठी तैवानची गुप्तचर संस्था केएमटीला जबाबदार धरलं. पंतप्रधान शाओ एन लाई यांनी नेहरूंशी संपर्क साधून या अपघाताच्या तपासात भारताने सहभागी व्हावं अशी विनंती केली.
रामनाथ काव यांच्याकडे जबाबदारी
या तपासासाठी चांगला व्यक्ती शोधावा म्हणून नेहरूंनी त्यांचे विश्वासू आणि तत्कालीन इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख बी.एन. मलिक यांच्याशी संपर्क केला.
मलिक यांनी या कामासाठी 37 वर्षीय रामनाथ काव यांची निवड केली. काव यांनी या तपासात मदत व्हावी म्हणून इंटेलिजन्स अधिकारी चंद्रपाल सिंह यांना आपल्या सोबत घेतलं. नंतर हिंदुस्थान एअरक्राफ्ट फॅक्टरीतील इंजिनिअर विश्वनाथन हेही या तपास पथकात सामील झाले. काव यांनी या अपघातातून वाचलेल्या तीन भारतीयांशी संपर्क केला, त्यांच्याकडून माहिती घेतली.
नेहरू मेमोरिअल लायब्ररीला दिलेल्या कागदपत्रांमध्ये काव लिहितात, "भारतीय विमान हाँगकाँगला गेल्यावर जे लोक विमानाच्या संपर्कात आले होते त्यांची एक यादी मी तयार केली. त्या यादीत सर्व क्रू मेंबर तसेच विमानातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता."
काव यांनी बांडुंगकडे प्रस्थान केलं तोपर्यंत तिथं संमेलन चालूच होतं. त्यावेळी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये डेप्युटी डायरेक्टर पदावर असणारे केएफ रुस्तुमजी काव यांना नेहरूंकडे घेऊन गेले. नेहरूंनी त्याच संध्याकाळी काव आणि चीनच्या पंतप्रधानांची भेट घडवून आणली. या भेटीविषयी काव लिहितात, "शाओ एन लाई यांनी बॉयलर सूट परिधान केला होता. त्यांच्यासोबत हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलेला एक इंग्रजी दुभाषी होता.
शाओ एन लाई जरी चिनी बोलत असले तरी त्यांना इंग्रजीची चांगलीच समज होती. मी पहिल्यांदाच त्यांच्याबरोबर चायनीज ग्रीन टी प्यायलो त्यासोबत सुकलेली लिची आणि इतर अनेक गोष्टी होत्या."
या तपासात पाच देशांचा सहभाग होता
पहिल्या भेटीतच शाओ एन लाई यांना काहीतरी समजावून सांगावं म्हणून काव यांनी ब्रीफकेसमधून फाउंटन पेन बाहेर काढला. काव लिहितात, "याआधी मला मला विमान प्रवासाचा फारसा अनुभव नव्हता. मी पेनाचं टोपण काढलं तसं माझ्या हातावर पेनाची शाई ओघळू लागली. मी हात पुसण्यासाठी ब्रीफ केसमधून काही कागद बाहेर काढले. हे सगळं शाओ एन लाई बघत होते.
ते समोर बसलेल्या सोफ्यावरून काही न बोलता उठले आणि निघून गेले. मी थोडा अस्वस्थ झालो पण थोड्याच वेळात ते आले. त्यांच्यासोबत एक कर्मचारी होता, ज्याने वेट टॉवेल्स आणले होते. त्यांनी मला हात पुसण्याचा इशारा केला."
या बैठकीविषयी ब्रिटीश अधिकार्यांना काही सांगू नये, अशी सूचना शाओ एन लाई यांनी काव यांना केली. कारण या घटनेला अनेक आंतरराष्ट्रीय पैलू होते. म्हणजे विमानाने हाँगकाँगहून टेक ऑफ केलं होतं. पण आग लागल्यावर ते इंडोनेशियाच्या समुद्रात कोसळलं.
या विमानाची बांधणी अमेरिकेत झाली होती तर ते विमान भारताच्या मालकीचं होतं. आणि विमानातील प्रवासी चिनी होते. थोडक्यात या घटनेत ब्रिटन, इंडोनेशिया, अमेरिका, भारत आणि चीन या पाच देशांचा सहभाग होता. या घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी काव यांनी पुढचे पाच महिने ब्रिटीश, चिनी आणि हाँगकाँग गुप्तचर संस्थांसोबत काम केलं.
आणि काव यांच्या मेहनतीला यश आलं. सप्टेंबर 1955 च्या त्या दिवशी 'काश्मीर प्रिन्सेस' चं क्रॅश कसं झालं याची सगळी माहिती उजेडात आली.
काव यांच्या जीवाला धोका
काव बीजिंगला पोचल्यावर त्यांनी पुन्हा एकदा शाओ एन लाई यांची भेट घेतली. त्यावेळी केएमटीचे हेर पंतप्रधानांची हत्या करण्याचा कट आखत असल्याची माहिती चिनी सरकारला असून काव यांनी स्वतःच्या जीवाची खबरदारी घ्यावी असं शाओ एन लाई यांनी सुचवलं.
काव बीजिंगहून हाँगकाँगमध्ये आले, त्यावेळी हाँगकाँगच्या स्पेशल ब्रांचच्या हेडने त्यांची भेट घेतली. सोबतच काव यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश मिळाले असल्याचं सांगितलं.
काव यांच्या सोबतीला एक अनमार्क्ड कार आणि ब्रिटीश इन्स्पेक्टर देण्यात आला. काव यांनी सुद्धा आपल्या परीने खबरदारी घ्यायला सुरुवात केली. त्यांनी रात्री अपरात्री फिरणं, रस्त्यावर जाणं आणि अज्ञात ठिकाणी खाणं बंद केलं.
त्यांच्या हॉटेलच्या खोलीत कोणताही लॉकर नव्हता. त्यामुळे ते बाहेर येता जाता आपली ब्रीफकेस सोबत न्यायला सुरुवात केली. त्यांच्या या ब्रीफकेस मध्ये तपासाशी संबंधित सर्व कागदपत्रे होती.
काव लिहितात, "हॉटेलमध्येही असताना मी माझी ब्रीफकेस कधीच माझ्या नजरेआड होऊ दिली नाही. मी बाथरूममध्ये जातानाही ब्रीफकेस सोबत न्यायचो. रात्री मी ती उशाशी ठेऊन झोपायचो."
विमान अपघाताची चौकशी केल्यानंतर समजलं की, विमानाच्या चाकाखाली अंडर कॅरेजमध्ये टाईम बॉम्ब ठेवला होता. पण कोणी असं का करावं असा प्रश्न नंतर उपस्थित झाला.
काव यांनी या घटनेच्या या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास करायचं ठरवलं. त्यांनी हाँगकाँगचे ब्रिटिश गव्हर्नर सर अलेक्झांडर ग्रँथम यांच्यासोबत काम केलं. शेवटी या घटनेमागे हाँगकाँग एअरक्राफ्ट इंजिनीअरिंग कंपनीतील ग्राउंड मेंटेनन्स क्रूचा सदस्य चाऊ चू या तैवानच्या माणसाचा हात असल्याचं समजलं.
काव यांनी लागलीच ही माहिती चीनचे पंतप्रधान शाओ एन लाई यांना कळवली.
चाऊ चूने हे काम करावं यासाठी हाँगकाँगमधील केएमटीच्या गुप्तचर अधिकाऱ्याने त्याला फितवलं असल्याचं तपासात पुढं आलं. चाऊ चू हे काम करायला तयार नव्हता. पण हे काम केल्यास त्याला 60 हजार हाँगकाँग डॉलर्स देण्याचं आमिष देण्यात आलं.
हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी हाँगकाँगमधील हॉटेलांमध्ये केएमटीचे अधिकारी आणि चाऊ चू यांच्या भेटीगाठी झाल्या. त्यांनी चाऊ चू ला विमानात बॉम्ब ठेवण्याचं ट्रेनिंग दिलं.
या सगळ्या योजनेमागे च्यांग काई शेक या तैवानच्या एका नेत्याचा हात होता.
आणि चाऊ चू निसटला...
चीनचे पंतप्रधान शाओ एन लाई बांडुंग येथील संमेलनासाठी भारताच्या चार्टर्ड विमानाने प्रवास करणार आहेत ही बातमी जेव्हा फुटली तेव्हाच विमानात बॉम्ब लावायचं ठरलं.
या प्रकरणाची माहिती घ्यायला काव हाँगकाँगमध्ये आले तेव्हा तिथल्या पोलीस आयुक्त मॅक्सवेल यांनी सांगितलं की, या प्रकरणातला मुख्य आरोपी चाऊ चू निसटलाय. तो सकाळी 10 च्य सुमारास हाँगकाँगहून अमेरिकन विमानाने तैवानला पळून गेला होता.
तो तैवानमध्ये पोहोचताच केएमटीच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्याला अज्ञातस्थळी नेलं. त्यानंतर त्याचं काय झालं हे कधीच कोणाला समजलं नाही.
'काश्मीर प्रिन्सेस' विषयी अधिक माहिती गोळा करण्यासाठी हाँगकाँग पोलिसांनी 12 जून 1955 रोजी दुर्घटनेबाबत ठोस माहिती देणार्याला 1 लाख हाँगकाँग डॉलर्स देण्याची घोषणा केली. पण कोणीही माहिती देण्यासाठी आलं नाही.
रामनाथ काव यांना माहिती मिळाली होती की, दुर्घटनेच्या एक दिवस आधी चाऊ चू ला मूव्हीलँड हॉटेलमध्ये बोलावून ब्राऊन कलरच्या कागदात गुंडाळलेला टाइमबॉम्ब देण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केएमटीच्या एजंटने कारमधून त्याला हाँगकाँग विमानतळाच्या गेटवर सोडलं.
नितीन गोखले लिहितात, "त्यानंतर काव यांना माहिती मिळाली होती की, विमानात स्फोट झाल्याचं कळताच चाऊ चू आपलं बक्षीस घेण्यासाठी केएमटीच्या एजंट्सकडे गेला होता. पण त्यांनी चाऊ चू ला पैसे द्यायला नकार दिला, कारण स्फोट झालेल्या विमानात चीनचे पंतप्रधान नव्हते."
चीनचे पंतप्रधान शाओ एन लाई काव यांच्या तपासावर खुश झाले. त्यांनी पंडित नेहरूंना पत्र लिहून काव यांच्या कार्यपद्धतीची स्तुती केली. त्यांनी काव यांना आपल्या निवासस्थानी जेवणासाठी बोलावलं.
काव त्यावेळी ज्युनियर ऑफिसर होते. त्यांच्यासाठी हा मोठा सन्मान होता. चीनच्या पंतप्रधानांनी स्वतःचा एक शिक्का काव यांना दिला. काव भारतात आले त्यावेळी एखाद्या हिरोच्या थाटात त्यांचं स्वागत करण्यात आलं.
सीआयएचे कारस्थान?
चीनला या घटनेच्या किमान दोन दिवस आधी या षड्यंत्राचा सुगावा लागला होता. आता हा प्रश्न निर्माण होतो की चीन सरकारला तैवानच्या गुप्तहेरांच्या कारवायांबद्दल आधीपासूनच माहिती झाली होती तर त्यांनी ही घटना थांबवण्याचा प्रयत्न का नाही केला? आर. के. यादव आपलं पुस्तक मिशन आर अॅंड ब्लू मध्ये लिहितात की "शाओ एन लाई आणि त्यांच्या सरकारने ही दुर्घटना थांबवण्याचे प्रयत्न यासाठी नाही केले की या घटनेच्या निमित्ताने त्यांना या हाँगकाँगमधील केएमटीच्या गुप्त ठिकाणांचा पर्दाफाश करायचा होता जेणेकरून ते तिथून हटवता येतील.
दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना या घटनेच्या प्रचार मूल्याबाबतचा अंदाज होता. कारण घटनेच्या दुसऱ्याच दिवशी चीनी परराष्ट्र खात्याने हे म्हणण्यास सुरुवात केली की अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयए आणि च्यांग काइच्या केएमटीने मिळून चीनच्या पंतप्रधानांची हत्या करण्याचा प्रयत्न केला."
पण चीनच्या सरकारला सीआयए आणि केएमटीने एकत्र काम केल्याचा कुठलाही पुरावा सादर करता आला नाही. अर्थात त्याला एक अपवाद होता तो म्हणजे की या दुर्घटनेत वापरण्यात आलेला टाइमबॉम्ब हा अमेरिकेत बनला होता.
अमेरिकेनी तैवानचा मुख्य आरोपी चाऊ चू याला हाँगकाँगमधून प्रत्यार्पित करण्याची मागणी केली होती पण तैवानने ही मागणी धुडकावून लावली. मुख्य आरोपी चाऊ चू कधीच अटकेत आला नाही पण त्याचे साथीदार हाँगकाँगमध्ये अनेक दिवस पोलिसांच्या ताब्यात होते. 11 जानेवारी 1956 ला ब्रिटिश सरकारने लंडनमध्ये घोषणा केली की केएमटीच्या अधिकाऱ्यांनी चू ला हाँगकाँग प्रशासनाकडे सुपूर्त करण्यास नकार दिला आहे.
या दुर्घटनेत जिवंत राहिलेल्या तीन लोकांपैकी एक गृहस्थ एम. सी. दीक्षित हे देखील होते. काही दिवसांपूर्वीच 5 डिसेंबर 2022 ला त्यांचं वयाच्या 105 व्या वर्षी दिल्लीत निधन झालं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)