वाढत्या उष्णतेचा बाळांसह आपल्या मेंदूवर काय परिणाम होतोय, विज्ञान काय सांगतं?

डोकं धरलेला माणूस

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, थेरेस ल्युथी

हवामानात झपाट्याने होत असलेल्या बदलांचा परिणाम केवळ आपल्या सभोवतालच्या निसर्गावरच नाही, तर आपल्या मेंदूवरही होत आहे. उष्णतेचे प्रमाण वाढत चालल्यामुळे झोप, स्मरणशक्ती, निर्णयक्षमता आणि काही इतर गंभीर आजारांचे धोकेही वाढत आहेत.

हे गरम होणारं जग आता आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी एक नवीन संकट बनू लागलं आहे.

जेव्हा जेक पाच महिन्यांचा होता, तेव्हा त्याला पहिल्यांदा जोरात फिट्स आल्या. त्याचं छोटं शरीर सुरुवातीला एकदम कडक झालं आणि नंतर तो जोरजोरात झटके द्यायला लागला.

"त्या दिवशी खूप उष्णता होती, तो खूप तापला होता आणि आमच्या डोळ्यांसमोर हे घडलं, आमच्या आयुष्यातील तो सर्वात भयानक दिवस आहे, असं आम्हाला वाटलं," जेकची आई स्टेफनी स्मिथ सांगत होती.

उन्हाळ्यात उष्णता आणि दमट हवामान आलं की, जेकला पुन्हा पुन्हा फिट्स येऊ लागले. जसजसं उष्णतेचे दिवस सुरू व्हायचे, तसतसं कुटुंब शरीराला थंडावा देणारी वेगवेगळी साधनं वापरायचं. मग जेकचे फिट्स थांबवण्यासाठी त्यांची रोजची धडपड सुरू व्हायची.

जेक 18 महिन्यांचा असताना त्याची जनुकीय तपासणी (अनुवांशिक चाचणी) झाली, आणि त्याला 'ड्रॅव्हेट सिंड्रोम' असल्याचं निदान झालं. ही एक न्यूरोलॉजिकल (मेंदूशी संबंधित) स्थिती आहे, ज्यात फिट्स येतात आणि दर 15,000 मुलांपैकी एका मुलाला हा आजार होतो.

या आजारात फिट्ससोबतच रूग्णाच्या बौद्धिक विकासातही अडथळा येतो, तसेच काही वेगवेगळ्या समस्या जशा की ऑटिझम, एडीएचडी (लक्ष केंद्रित न होणं), बोलण्यात, चालण्यात, जेवणात आणि झोपेमध्ये अडचणी अशा त्रासांनाही सामोरं जावं लागतं.

महत्त्वाचं म्हणजे, उष्णता किंवा तापमानात अचानक बदल झाला, तरी या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला फिट्स येऊ शकतात.

जेक आता 13 वर्षांचा झाला आहे, परंतु हवामान बदललं की अजूनही त्याला बऱ्याचदा फिट्स येतात, असं त्याची आई सांगते.

"आधीच हा आजार खूप त्रासदायक आहे, त्यात आता वाढत चाललेले उन्हाळे आणि उष्णतेच्या लाटांमुळे हा त्रास आणखीनच वाढतोय," असं स्मिथ सांगतात.

हवामान बदलाचा मेंदूवर होतोय परिणाम

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधक संजय सिसोदिया म्हणतात की, ड्र्रॅव्हेट सिंड्रोम हा अशा अनेक मेंदूविकारांपैकी केवळ एक आहे, जो उष्णता वाढल्यावर अधिक गंभीर होतो.

सिसोदिया हे हवामान बदलांचा मेंदूवर होणाऱ्या परिणामांवर संशोधन करणारे आघाडीचे तज्ज्ञ आहेत.

सिसोदिया हे मेंदू आणि फिट्स (एपिलेप्सी) यांचे तज्ज्ञ आहेत. त्यांना अनेक रुग्णांच्या कुटुंबीयांकडून नेहमीच असं ऐकायला मिळायचं की, उष्णतेच्या लाटा आल्यावर त्रास वाढतो.

"आणि मग मी विचार केला, हवामान बदलाचा मेंदूवरही परिणाम होऊ शकतोच की. कारण शरीर उष्णतेशी कसं जुळवून घेतं, यामध्ये मेंदूची खूप महत्त्वाची भूमिका असते," असं ते सांगतात.

जेव्हा सिसोदियांनी यावर वैज्ञानिक संशोधन वाचायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना असं कळलं की वाढत चाललेली उष्णता आणि दमट हवामान मेंदूचे अनेक आजार अधिक खराब करतं.

हवामान बदलाचा मेंदूवर होतोय परिणाम

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यात फिट्स, स्ट्रोक, मेंदूचा दाह (एन्सेफलायटीस), मल्टिपल स्क्लेरोसिस, मायग्रेन आणि इतरही बऱ्याच मेंदूविकारांचा समावेश आहे.

त्यांना हेही लक्षात आलं की, हवामान बदलाचा मेंदूवर होणारा परिणाम आता हळूहळू दिसू लागला आहे.

उदाहरणार्थ, 2003 साली युरोपमध्ये आलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेत जास्त मृत्यू झाले, त्यापैकी साधारण 7 टक्के मृत्यू थेट मेंदूशी संबंधित आजारांमुळे झाले होते. अगदी अशीच परिस्थिती 2022 साली यूकेमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेतही पाहायला मिळाली.

पण उष्णतेचा परिणाम फक्त आजारांपुरता मर्यादित नाही. तो आपल्या मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीतही बदल घडवतो. उष्णतेमुळे माणूस जास्त चिडचिडा, रागीट, हिंसक किंवा उदास होऊ शकतो.

म्हणूनच, हवामान बदलामुळे जग जसजसं गरम होत चाललं आहे, तसं आपल्या मेंदूवर त्याचा काय परिणाम होणार आहे, हे आपण आता विचारायला हवं.

आपल्या शरीराचं तापमान जसं असतं, त्यापेक्षा मेंदूचं तापमान सरासरीने क्वचितच 1 अंश सेल्सिअसनेच जास्त असतं. पण मेंदू हा शरीरातील खूप ऊर्जा लागणारा अवयव आहे. आपण विचार करत असताना, गोष्टी लक्षात ठेवताना किंवा आपल्या आजूबाजूच्या गोष्टींना प्रतिसाद देताना, तो स्वतःच उष्णता निर्माण करतो.

म्हणून शरीराला मेंदू थंड राहावा म्हणून सतत प्रयत्न करावे लागतात. शरीरातील रक्तवाहिन्यांमधून वाहणारं रक्त मेंदूपर्यंत पोहोचून त्यातील जास्त उष्णता शोषून घेतं आणि त्यामुळे मेंदूचं तापमान नियंत्रणात राहतं.

हे सगळं आवश्यक आहे, कारण आपल्या मेंदूच्या पेशी उष्णतेच्या बदलांना खूप संवेदनशील असतात. मेंदूमधील पेशींमध्ये संदेश पोहोचवणाऱ्या काही रेणूंचं कामही तापमानावर अवलंबून असतं.

मेंदू खूप गरम किंवा खूप थंड झाला, तर हे रेणू व्यवस्थित काम करायचं थांबवतात आणि त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता मंदावते.

"या सर्व गुंतागुंतीच्या प्रक्रियांवर उष्णतेचा नेमका कसा परिणाम होतो, हे आपल्याला अजून पूर्णपणे समजलेलं नाही," असं सिसोदिया सांगतात.

"पण आपण असं समजू शकतो, जसं एखादं घड्याळ बिघडतं, तसं मेंदूही व्यवस्थित काम करणं थांबवतो."

जास्त उष्णता असली की, सगळ्यांच्या मेंदूवर त्याचा काही ना काही परिणाम होतोच. उदा. माणूस चुकीचे निर्णय घेतो किंवा जास्त धोका पत्करतो. पण ज्यांना मेंदूचे आजार आहेत, त्यांच्यावर याचा परिणाम जास्त गंभीर दिसून येतो.

यामागे अनेक कारणं असतात. उदा. काही आजारांमध्ये घाम येणं कमी होतं किंवा थांबतं, त्यामुळे शरीराला थंड ठेवणं कठीण जातं.

"तापमान नियंत्रित ठेवणं (थर्मोरेग्युलेशन) हे मेंदूचं एक काम आहे. पण मेंदूचा काही भाग नीट काम करत नसेल, तर ही प्रक्रिया बिघडू शकते," असं सिसोदिया सांगतात. उदा. मल्टिपल स्क्लेरोसिस या आजाराच्या काही प्रकारांमध्ये शरीराचं मूळ तापमानच बदललेलं दिसतं.

स्ट्रोकमुळे दरवर्षी 70 लाख लोकांचा मृत्यू

याव्यतिरिक्त, स्किझोफ्रेनियासारख्या मानसिक आणि मेंदूशी संबंधित काही आजारांवर दिल्या जाणाऱ्या औषधांमुळेही शरीराचं तापमान नियंत्रण बिघडतं. यामुळे असे औषध घेणारे लोक उष्णतेचे जास्त बळी ठरू शकतात. त्यांना हीटस्ट्रोक (उष्माघात) किंवा वैद्यकीय भाषेत हायपरथर्मिया होण्याचा धोका वाढतो आणि उष्णतेमुळे मृत्यूचा धोका देखील जास्त असतो.

उष्णतेच्या लाटा विशेषतः रात्रीचं वाढलेलं तापमान लोकांच्या झोपेवर परिणाम करतात. यामुळे मूड बिघडतो आणि काही आजारांची लक्षणं जास्त वाढू शकतात. "फिट्सचा त्रास असणाऱ्या अनेकांसाठी नीट झोप न लागणं म्हणजे फिट्स येण्याचा धोका वाढणं," असं सिसोदिया सांगतात.

स्ट्रोकमुळे दरवर्षी 70 लाख लोकांचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images

संशोधनातून असं दिसून आलं आहे की, उष्णतेच्या लाटा आल्या की डिमेन्शिया असणाऱ्या लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागण्याचं प्रमाण आणि मृत्यूचं प्रमाण वाढतं. यामागचं एक कारण वाढतं वयही असू शकतं. कारण वय वाढल्यावर शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणं कठीण जातं.

परंतु, डिमेन्शियामुळे मेंदूचं काम कमी झाल्यामुळेही अशा लोकांना उष्णतेशी जुळवून घेणं कठीण जातं. उदा. ते पुरेसं पाणी पिऊ शकत नाहीत, खिडक्या बंद करायला विसरतात किंवा उष्ण हवामानात बाहेर जातात, जे त्यांच्या आरोग्यासाठी आणखी धोकादायक ठरू शकतं.

वाढत्या तापमानाचा संबंध स्ट्रोक येण्याच्या प्रमाणात आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही दिसून आला आहे. एका अभ्यासात 25 देशांमधील स्ट्रोकमुळे झालेल्या मृत्यूंचा डेटा तपासण्यात आला.

त्यामध्ये असं आढळलं की, इस्केमिक स्ट्रोकमुळे होणाऱ्या 1,000 मृत्यूंपैकी, सर्वात जास्त उष्ण दिवसांमध्ये अतिरिक्त दोन मृत्यू होत होते. म्हणजेच केवळ उष्णतेमुळे मृत्यूचा धोका वाढलेला होता.

"दोन मृत्यू वाढले हे प्रमाण जास्त वाटणार नाही," असं यूकेमधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स ससेक्समध्ये काम करणाऱ्या वृद्धरोग तज्ज्ञ बेथन डेव्हिस सांगतात.

"परंतु, दरवर्षी जगभरात सुमारे 70 लाख लोक स्ट्रोकमुळे मरण पावतात. त्यामुळे उष्णतेमुळे दरवर्षी 10,000 पेक्षा जास्त अतिरिक्त मृत्यू होत असण्याची शक्यता आहे."

बेथन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, हवामान बदलामुळे हे प्रमाण येत्या वर्षांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे..

छोट्या बाळाच्या मेंदूच्या विकासावरही परिणाम

उष्णतेमुळे होणाऱ्या स्ट्रोकचा सर्वाधिक फटका मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांनाच बसणार आहे. ते आधीच हवामान बदलाने जास्त प्रभावित झाले आहेत आणि तिथे स्ट्रोकचं प्रमाणही जास्त आहे.

"तापमान वाढल्यामुळे देशांमधील आणि समाजांमधील आरोग्यविषयक विषमता आणखी वाढेल," असं बेथन डेव्हिस म्हणतात. संशोधनातून असंही दिसून आलं आहे की जास्त वय असलेले लोक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका अधिक असतो.

जग दिवसेंदिवस गरम होत चालल्यामुळे छोट्या बाळांच्या मेंदूच्या विकासावरही याचा वाईट परिणाम होताना दिसत आहे. "खूप उष्णतेचा गर्भधारणेवर परिणाम होतो, आणि त्यातून अर्धवट (वेळेआधी) बाळ होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे," असं यूकेतील इम्पीरियल कॉलेज लंडन येथील प्रोफेसर जेन हर्स्ट सांगतात.

अलीकडील एका मोठ्या वैज्ञानिक अभ्यासात असं आढळलं की, उष्णतेच्या लाटांमुळे अर्धवट जन्म होण्याचा धोका 26 टक्क्यांनी वाढतो. अशा वेळेआधी झालेल्या बाळांना नंतर मेंदूचा विकास मंदावणं किंवा बौद्धिक अडचणी येण्याची शक्यता जास्त असते.

"परंतु, अजूनही आपल्याला खूप काही गोष्टी माहीत नाहीत," असं हर्स्ट सांगतात.

"कोणत्या महिलांना याचा जास्त धोका असतो आणि का? कारण दरवर्षी सुमारे 13 कोटी महिला बाळंत होतात, त्यापैकी अनेकजण उष्ण हवामान असलेल्या देशांमध्ये राहतात, पण तरीही सर्वांनाच असा त्रास होत नाही."

हवामान बदलामुळे वाढलेली उष्णता मेंदूवर अतिरिक्त ताण आणू शकते, आणि त्यामुळे मेंदूच्या हळूहळू बिघडणाऱ्या (न्यूरोडीजनरेटिव्ह) आजारांचा (जसं की अल्झायमर) धोका वाढतो.

उष्णतेचा परिणाम मेंदूभोवती असणाऱ्या नैसर्गिक संरक्षणावरही होतो. हे मेंदूचे सुरक्षित कवच साधारणपणे हानिकारक पदार्थांना आत जाऊ देत नाहीत, पण जास्तीच्या उष्णतेमुळे हे कवच कमकुवत होते.

त्यामुळे टॉक्सिन्स (विषारी घटक), जीवाणू आणि विषाणू यांना मेंदूच्या आत प्रवेश मिळू शकतो आणि हे मेंदूचं नुकसान करतात.

तापमान सातत्यानं वाढत चालल्यामुळे हा धोका आणखी गंभीर होऊ शकतो. कारण झिका, चिकनगुनिया आणि डेंग्यूसारखे मेंदूचे आजार पसरवणारे विषाणूही पसरू शकतात. हे विषाणू डासांद्वारे पसरतात.

स्विस ट्रॉपिकल अँड पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञ टोबियास स्युटर म्हणतात, "झिका व्हायरसचा गर्भातल्या बाळावर परिणाम होऊन त्याचं डोकं लहान (मायक्रोसेफली) होऊ शकतं."

तापमानवाढीचा मेंदूवर नेमका काय परिणाम होतो?

उन्हाळा जास्त काळ टिकतोय आणि हिवाळा सौम्य होत चालला आहे. त्यामुळे डासांची पैदास लवकर सुरू होते आणि उशिरा थांबते. यामुळे आजार पसरण्याचा काळही त्याप्रमाणे वाढतो.

उष्णतेच्या लाटा मेंदूवर अनेक प्रकारे परिणाम करू शकतात. जसं की मेंदूच्या पेशींमधील विद्युत सिग्नल बिघडवणं, आत्महत्येचा धोका वाढवणं, हवामान बदलाची भीती (क्लायमेट अँझायटी) निर्माण होणं, आणि मेंदूच्या आजारांसाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांची प्रभाव कमी होणं. हे सगळे परिणाम एकत्रितपणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

परंतु, तापमान वाढल्यावर मेंदूवर नेमका काय आणि कसा परिणाम होतो, याचा शास्त्रज्ञ अजूनही शोध घेत आहेत. उष्णतेचा परिणाम वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा होतो. काही लोक उष्ण हवामानात सहज राहू शकतात, तर काहींना ते अजिबात सहन होत नाही.

"या फरकामागे विविध कारणं असू शकतात, आणि त्यापैकी एक कारण म्हणजे जनुकीय बांधणी," असं सिसोदिया सांगतात. काही लोकांच्या शरीरात असलेल्या विशिष्ट जनुकीय बदलांमुळे मेंदूमधील प्रोटीनचं स्वरूप वेगळं असू शकतं, ज्यामुळे त्यांना हवामान बदलाचा जास्त त्रास होतो.

"काही लोकांमध्ये असे गुणधर्म (फिनोटाइप्स) असू शकतात, जे उष्णतेसारख्या वातावरणातील ताणामुळेच दिसून येतात," असं सिसोदिया सांगतात. "आता जे मेंदूविकार असलेल्या लोकांमध्ये दिसून येतं, तेच हवामान बदल वाढत गेला तर साधारण निरोगी लोकांमध्येही ते दिसू शकतं."

अजूनही काही महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरितच आहेत. उदा. मेंदूवर जास्त परिणाम जास्तीत जास्त तापमानाचा होतो का? उष्णतेची लाट किती दिवस टिकते याचा होतो का? रात्रीचं तापमान जास्त असणं जास्त घातक असतं का? हे सर्व प्रत्येक व्यक्तीनुसार किंवा प्रत्येक मेंदूच्या आजारानुसार (न्यूरोलॉजिकल स्थितीनुसार) वेगळं असू शकतं.

परंतु, कोणत्या लोकांना उष्णतेचा जास्त धोका आहे आणि का, हे ओळखणं फार गरजेचं आहे. हे समजलं, की आपण अशा लोकांचं संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना तयार करू शकतो. उदा. उष्णतेची लाट येणार आहे हे आधीच सांगणारी यंत्रणा तयार करता येईल किंवा तीव्र उष्णतेमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांचं नुकसान भरून देणारी विमा योजना तयार केली जाऊ शकते.

"जगातील उष्णता वाढीचा काळ आता संपला आहे, आणि आता जग अक्षरशः उकळण्याच्या पातळीवर आलं आहे," असं यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी जुलै 2023 मध्ये सांगितलं होतं. तेव्हा तो महिना आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना ठरला होता.

हवामान बदल आता सुरूच आहे आणि दिवसेंदिवस तो अधिक तीव्र होतो आहे. आता मेंदूवर उष्णतेचा परिणाम होण्याच्या काळाला फक्त सुरुवात झाली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)