गर्भवतींनी 145 किलो वजन उचलणं सुरक्षित आहे का? व्हायरल व्हीडिओमुळे वाद

सोनिका यादव

फोटो स्रोत, Sonika Yadav/Facebook

फोटो कॅप्शन, सोनिका यादव
    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

आंध्र प्रदेशातल्या अमरावती येथे 17 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया पोलिस वेटलिफ्टिंग स्पर्धेत सात महिन्यांच्या गरोदर असलेल्या सोनिका यादव यांनी 145 किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावलं.

ही कामगिरी करतानाचा त्यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला. एका बाजूला त्यांचं कौतुक झालं तर दुसऱ्या बाजूला अनेकांनी त्यांच्यावर टीका केली.

काहींनी म्हटलं की असं करून सोनिका यांनी त्यांचा आणि त्यांच्या बाळाचा जीव धोक्यात घातलाय. काहींनी तर त्यांना 'बेजबाबदार' किंवा 'निष्काळजी' देखील म्हटलं. या आक्षेपांना उत्तर देताना सोनिका म्हणाल्या की त्या स्पर्धेत त्या नेमकं काय करत आहेत हे त्यांना पक्कं ठाऊक होतं, तसेच यातल्या जोखमीची देखील त्यांना कल्पना होती.

सोनिका म्हणाल्या की, "मी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पॉवरलिफ्टिंग करत आहे. या स्पर्धेत भाग घेण्याआधी मी माझ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. अनेकांनी अशाही कमेंट्स केल्या आहेत की... माझं माझ्या होणाऱ्या बाळावर प्रेम नाहीये. पण हे खरं नाही. माझ्या मोठ्या मुलावर माझं जेवढं प्रेम आहे तेवढंच माझ्या पोटात असलेलं बाळ देखील मला प्रिय आहे."

आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या ऑल इंडिया पोलीस वेटलिफ्टिंग क्लस्टर 2025-26 मधील व्हायरल क्लिपमध्ये दिसतंय की सोनिका प्लॅटफॉर्मवर जातात, तिथला बारबेल उचलून 84 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकतात.

पण खरी गंमत त्यानंतर होते, बारबेल जमिनीवर आढळल्यानंतर त्यांच्या बरोब्बर मागे त्यांचे पती उभे असतात आणि त्यांना उभं राहण्यास मदत करतात. त्यानंतरच अनेकांना कळतं की सोनिका गर्भवती आहेत.

सोनिकांच्या या कामगिरीनंतर तिथे टाळ्यांचा कडकडाट होतो. व्हीडिओ व्हायरल होतो आणि मग इंटरनेटवर त्यांच्यावर टीका देखील होऊ लागते.

'शरीराची मर्यादा ओलांडू नका'

मे महिन्यात सोनिका यांना त्या गर्भवती असल्याचं कळलं आणि राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवण्याची तयारी करणाऱ्या सोनिका यांना धक्का बसला.

त्या म्हणतात की, "क्षणभर वाटलं की आता सगळं काही संपलं आहे, मला यावर्षीच्या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही आणि आता मला माझी तयारी थांबवावी लागेल. पण त्यानंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं ठरवलं. मी त्यांना म्हणाले की, मी वेटलिफ्टिंग करते आणि राष्ट्रीय स्तरावर मी खेळले आहे. यावर्षी देखील मला पदक मिळवायचं आहे."

सोनिका यांच्या डॉक्टरांनी त्यावर म्हटलं की, "तुझं शरीर हे करायला तुला परवानगी देत असेल तर माझीही काही हरकत नाही पण शरीराच्या मर्यादा ओलांडू नकोस."

सोनिका यादव

फोटो स्रोत, Sonika Yadav

फोटो कॅप्शन, सोनिका यादव

डॉक्टरांनी दिलेल्या परवानगीनंतर सोनिका यांनी मागे वळून बघितलं नाही. नियमित तपासण्या, डॉक्टरांचा सल्ला आणि काळजीपूर्वक तयारी करून त्यांनी सराव कायम ठेवला.

त्या म्हणाल्या, "माझं शरीर आधीपासूनच यासाठी तयार होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी गर्भधारणेदरम्यान काही नवीन सुरू केलं नाही मी फक्त माझा दिनक्रम आणि वेलिफ्टिंगचा सराव सुरू ठेवला."

या संपूर्ण प्रवासात व्यायामाची आवड असणाऱ्या त्यांच्या नवऱ्याने त्यांना साथ दिली. जिममध्ये तयारी करत असताना ते नेहमी त्यांच्या सोबत होते. सोनिका

म्हणतात की, "माझा नवरा माझा सगळ्यात मोठा आधार होता."

तज्ज्ञ काय म्हणतात?

सोनिकाने वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही तयारी केली असली तरी तज्ज्ञांना वाटतं की, प्रत्येक गर्भधारणा आणि प्रत्येक महिलेचं शरीर वेगवेगळं असतं त्यामुळे सगळ्याच महिलांसाठी हे योग्य नाही.

मुंबईतल्या क्लाउडनाईन हॉस्पिटलचे वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार म्हणतात की, "हे व्यक्तिपरत्वे बदलतं. प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक गर्भधारणा वेगळी असते काही निवडक प्रकरणांमध्ये, योग्य वैद्यकीय सल्ला आणि प्रशिक्षणासह, स्त्रिया सुरक्षितपणे स्ट्रेंथ ट्रेनिंग (व्यायाम) सुरू ठेवू शकतात."

डॉ. निखिल दातार

फोटो स्रोत, NikhilDatar/Facebook

फोटो कॅप्शन, डॉ. निखिल दातार

डॉ. दातार म्हणतात की, "सोनिका याबाबतीत खूप वेगळ्या ठरतात. त्यांनी यासाठी काळजीपूर्वक सराव केला आहे. त्यांच्या शरीराला व्यायामाची आणि विशेषतः वेटलिफ्टिंगची सवय आहे आणि त्यामुळे त्यांना ते शक्य झालं. सामान्य महिलांनी एवढं वजन उचलणं अत्यंत धोकादायक आहे."

गर्भवतींनी व्यायामच करू नये का?

बहुतेकवेळा गर्भधारणा झाल्यानंतर महिलांनी आराम करावा, कुठलीही जड वस्तू उचलू नये, असं म्हटलं जातं. पण डॉ. दातार म्हणतात की, "आम्ही जेव्हा म्हणतो की महिलांनी जास्त वजनाच्या गोष्टी उचलू नयेत तेव्हा बऱ्याचदा त्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. गर्भधारणा झाल्यानंतर मग साधी पिशवी देखील उचलली जात नाही. पण असं कारण योग्य नाही."

"गर्भवती महिलांसाठी मध्यम स्वरूपाचा व्यायाम केवळ सुरक्षितच नाही, तर उपयुक्त देखील ठरतो. गर्भवती महिलांनी पूर्ण विश्रांती घ्यावी, हा गैरसमज दूर करायला हवा," असं डॉ. दातार यांना वाटतं.

डॉ. दातार यांच्या मते व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारतं, वजन नियंत्रणात राहतं आणि प्रसूतीसाठी देखील शरीर तयार होतं.

"गर्भवती महिलेचं शरीर, आरोग्य, दिनक्रम आणि वैद्यकीय मार्गदर्शन या बाबी व्यायामाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण ठरतात. सोनिका यादव यांच्यासारखं धाडस करण्यासाठी डॉक्टर, प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यात समन्वय असणं आवश्यक आहे."

गर्भधारणेदरम्यान वजन उचलणं सुरक्षित आहे का?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दिल्लीत 23 वर्षांहून अधिक काळ स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या डॉ. याचना ग्रोव्हर म्हणतात, "गर्भवती महिला पहिल्या तीन महिन्यात म्हणजे 12 आठवड्यांपर्यंत 23 किलो वजन उचलू शकतात. 12 आठवड्यानंतर हळूहळू हे वजन कमी केलं पाहिजे. तीन ते सहा महिन्यांच्या काळात गर्भवती 11 किलोपर्यंत वजन उचलू शकतात. यापेक्षा अधिक वजन उचललं तर गर्भपाताचा धोका असतो."

"सोनिका यादव यांनी वजन उचलताना एका विशिष्ट तंत्राचा वापर केला आहे. त्यांनी अतिशय काळजीपूर्वक पायांचा वापर करून वजन उचललं यामध्ये त्यांनी कंबर आणि पाठ वापरली नाही त्यामुळे ते शक्य झालं. सामान्य माणसांना हे तंत्र माहिती नसतं त्यामुळे अपघात घडू शकतात," असं डॉ. याचना म्हणाल्या.

क्रीडा क्षेत्रात झालेल्या वैज्ञानिक संशोधनात देखील डॉ. दातार आणि डॉ. ग्रोव्हर यांच्या मताला दुजोरा देण्यात आलाय. गर्भधारणेदरम्यान मध्यम स्वरूपाचा व्यायाम केल्याने रोगप्रतिकारशक्ती, हृदयाचं आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य सुधारतं. पण यापेक्षा अधिक वजन उचलायचं असेल, तीव्र स्वरूपाचा व्यायाम करायचा असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आणि त्यांच्या देखरेखीखाली हे केलं पाहिजे.

गेटोरेड स्पोर्ट्स सायन्स इन्स्टिट्यूटच्या एका जागतिक अभ्यासात म्हटलं आहे की, "गर्भवती खेळाडू देखील त्यांना घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक तीव्रतेचं प्रशिक्षण घेऊ शकतात पण यासाठी त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्यावं लागेल."

सोनिका यादव

फोटो स्रोत, Sonika Yadav

फोटो कॅप्शन, सोनिका यादव

डॉ. दातार सांगतात की, कोणत्याही गर्भवतीनं अचानक तीव्र स्वरुपाचा व्यायाम सुरू करू नये.

सोनिकाही म्हणतात की इतरांनी त्यांचं अनुकरण करू नये. "ज्यांनी याआधी कधीच प्रशिक्षण घेतलं नाही, त्यांनी फक्त माझा व्हीडिओ बघून वजन उचलण्याचा प्रयत्न करू नये. माझं शरीर यासाठी मी तयार केलं आहे, यामागे दोन ते तीन वर्षांची तयारी आहे. आणि मी हे सगळं डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच केलं आहे."

'वजन कमी करायला सुरु केलेला व्यायाम कांस्य पदकापर्यंत घेऊन आला'

हा व्हीडिओ व्हायरल होण्याच्या खूप आधी म्हणजेच 2022 मध्ये सोनिका यांनी व्यायामाला सुरुवात केली.

त्या म्हणतात की, "माझं वजन खूप वाढलं होतं आणि जीवनशैलीशी संबंधित अनेक आजार जडले होते त्यामुळे माझ्या नवऱ्याने मला जिमला जायला सांगितलं."

सुरुवातीला फक्त वजन करण्यासाठी म्हणून सुरू केलेला हा व्यायाम पुन्हा आवडीने करू लागले आणि बरंच काही बदललं.

सोनिका

फोटो स्रोत, Sonika Yadav

फोटो कॅप्शन, सोनिका यादव

सोनिका सांगतात, "जानेवारी 2023 मध्ये मी स्पर्धात्मक खेळात उतरायचं ठरवलं. ऑगस्टमध्ये पहिल्यांदा राज्यस्तरीय डेडलिफ्ट स्पर्धेत भाग घेतला आणि सुवर्णपदक पटकावलं. पॉवरलिफ्टिंगमुळे मला शिस्त लागली आणि आत्मविश्वास मिळाला."

"मी एकाच वेळी खेळाडू आणि आई दोन्ही होऊ शकते हे माझ्या लक्षात आलं," असं सोनिका म्हणतात.

सोनिका यांना हे करण्यासाठी परदेशी खेळाडूंनी देखील प्रेरित केलं. त्या म्हणतात, "इंटरनेटवर मी अशा महिलांविषयी वाचलं होतं ज्या गर्भधारणेदरम्यानही सुरक्षितपणे खेळत राहिल्या. जर वैद्यकीय सल्ल्याच्या आधारे त्या हे करू शकतात, तर आपण का नाही?"

"गर्भधारणा का कसलाही आजार नाहीये त्यामुळे तिच्याकडे तसं बघू नये. हा महिलेच्या आयुष्यातला एक टप्पा आहे. त्यामुळे त्यासाठी सगळं काही थांबवलं पाहिजे असं अजिबात नाही."

खेळाचं मैदान गाजवलेल्या गर्भवती महिला

जगभरातील महिलांनी हे दाखवून दिलं आहे की मातृत्व आणि खेळ या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या जाऊ शकतात.

2014 मध्ये अमेरिकन धावपटू अ‍ॅलिसिया मोंटानो यांनी आठ महिन्यांची गर्भवती असतानाही यूएस चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला होता. त्याच्या बरोब्बर एक दशकानंतर 2024 मध्ये, इजिप्शियन खेळाडू नादा हाफेझ यांनी सात महिन्यांची गर्भवती असतानाही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजी स्पर्धेत भाग घेतला होता.

अशाच गोष्टींनी सोनिका यांना प्रेरित केलं आणि आता त्यांनी इतिहास घडवला आहे. त्या म्हणतात, "खेळामुळे मी माझ्याच शरीरावर विश्वास ठेवायला शिकले. माझ्या क्षमतेची क्षितिजे यामुळे विस्तारत गेली."

दिल्लीमध्ये परतलेल्या सोनिका सध्या नोकरीसोबतच हलका व्यायाम करतात. दिल्ली पोलिसांच्या कम्युनिटी पोलीस शाखेत त्या कार्यरत आहेत.

"मला आयुष्यभर एक खेळाडू म्हणून जगायचं आहे. फक्त पदकांसाठी नाही, तर मातृत्व आणि महत्त्वाकांक्षा हातात हात घालून चालू शकतात हे जगाला दाखवण्यासाठी," असं त्या म्हणतात.

महत्त्वाचे-जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात, उपचारात, औषधांमध्ये बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांची आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.