You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शक्तिशाली चीनला एका गंजलेल्या जहाजाच्या मदतीनं 'हा' चिमुकला देश आव्हान देतोय
- Author, रूपर्ट विंगफील्ड-हेस
- Role, बीबीसी न्यूज
फिलिपाईन्सनं त्यांच्या एका रसद पुरवणाऱ्या (सप्लाय) बोटीला चिनी कोस्टगार्डच्या जहाजानं दक्षिण चीन सागरात धडक दिल्याचा आरोप केला आहे.
या घटनेच्या व्हिडिओमध्ये फिलिपाईन्स कोस्टगार्डचे जहाज आणि चीनच्या मिलिशिया जहाचाजी ही धडक पाहायला मिळत आहे.
दक्षिण चीन सागरात फिलिपाईन्स आणि चीन यांच्यात अनेक दशकांपासून संघर्ष सुरू आहे. पण गेल्या काही महिन्यांत यात काही बदलही झाले आहेत.
समुद्रात दोन्ही देशांमध्ये संघर्षाच्या या घटना आता फिलिपाईन्सची माध्यमं टीव्हीवर रंगवून दाखवत आहेत.
फिलिपाईन्सच्या पत्रकारांनी दक्षिण चीन सागरात एका विशिष्ट उथळ अशा भागामध्ये या घटनेचं चित्रण केल्याचा प्रकार एका आठवड्यात दुसऱ्यांदा घडला आहे. हे ठिकाण सेकंड थॉमस शोल, अयुंगीन शोल किंवा रेन आय रीफ नावानं ओळखलं जातं.
असं का करत आहे फिलिपाईन्स?
ही घटना अचानक कॅमेऱ्यात कैद झालेली नाही. तर, चीनच्या वर्चस्व दाखवण्याच्या प्रयत्नाकडं लक्ष वेधण्याच्या उद्देशानं फिलिपाईन्स सरकारनं अवलंबलेल्या धोरणाचा हा एक भाग आहे. हा त्यांचा सागरी भाग असून चीन त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं फिलिपाईन्सचं म्हणणं आहे.
"मला वाटतं, आपण यावर्षी अत्यंत म्हत्त्वाचा बदल पाहिला आहे. याला मी एक 'पारदर्शक मोहीम' म्हणेल," असं मत स्टॅनफॉर्ड युनिव्हर्सिटीच्या गोर्डियन नोट सेंटरचे निवृत्त कर्नल रेमंड पॉवेल यांनी व्यक्त केलं.
फिलिपाईन्सच्या सरकारनं यावर्षी जानेवारीपासून अशा संघर्षांचे अधिकाधिक व्हिडिओ स्थानिक माध्यमांना द्यायला सुरुवात केली, तेव्हापासून याची सुरुवात झाली.
या उन्हाळ्यापर्यंत त्यांनी बीबीसीसह इतर अधिकाधिक पत्रकारांना त्यांच्या बोट आणि विमानांद्वारे वादग्रस्त जलक्षेत्रात नेणं सुरू केलं.
"चीनबरोबरच्या संघर्षाबाबतच्या मोहीमांवर प्रकाश टाकण्यासारखं हे होतं," असं कर्नल पॉवेल म्हणाले.
चीन मात्र या नव्या रणनीतीनं संतप्त असल्याचं जाणवत आहे. फ्रीमॅन एसपोगली इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजच्या ओरियाना स्कायलर मॅस्ट्रो यांनी ही रणनिती कामी येत असल्याचं दिसतंय, असं म्हटलं.
"चीनच्या हालचालीमध्ये अचानक शांतता दिसू लागली आहे," असं त्या म्हणाल्या.
फिलिपाईन्स कुठे पाठवतं रसद?
चीननं काहीशी सूट दिलेली असल्यामुळं फिलिपाईन्सला सेकंड थॉमस शोलकडे त्यांच्या आऊटपोस्टवर अनेकदा रसद पाठवता आली आहे. फिलिपाईन्सची ही आऊटपोस्ट म्हणजे दुसऱ्या महायुद्धातील एक जहाज आहे. त्याचं नाव आहे सिएरा माद्रे.
1999 मध्ये हे जहाज मुद्दाम समुद्रामध्ये उथळ स्थानावर सोडण्यात आलं होतं. गंजल्यामुळं हळूहळू ते मोडकळीस येत आहे. सध्या याठिकाणी फिलिपाईन्सच्या नऊ सैनिकांची एक छोटीशी तुकडी तैनात आहे.
बीबीसीच्या एका टीमनं 2014 मध्ये या जहाजावर दौरा केला होता. त्यावेळी हे जहाज अत्यंत वाईट स्थितीमध्ये होतं. त्यात मोठमोठी छिद्र होऊ लागली होती आणि समुद्राच्या लाटांचं पाणी जात होतं.
चीननं एक मोठा खेळ खेळण्याची तयारी केली असल्याचं अनेक विश्लेषकांचं मत आहे.
चीन आणि फिलिपाईन्स यांच्यात अत्यंच चांगलं नातं राहिलं आहे. चीनच्या कोस्टगार्डनं सिएरा माद्रेवर सप्लाय म्हणजे रसद पाठवण्याची परवानगी दिली होती. पण दोन्ही देशांमध्ये काहीसा तणाव आला तेव्हा चीननं या जहाजावर होणारा पुरवठा अडवला होता.
पण सिएरा माद्रे हे जहाज हळूहळू मोडकळीस येत असल्यानं ते कायमस्वरुपी तिथं राहणार नाही. त्यामुळं फिलिपाईन्सला त्यांच्या सैनिकांना तिथून हलवावं लागेल, असा चीनचा अंदाज आहे.
चीन-फिलिपाईन्स यांच्यात पुढे काय होणार?
गेल्यावर्षी राष्ट्रपती फर्डिनेंड मार्कोस ज्युनियर निवडणूक जिंकल्यापासून फिलिपाईन्सचं परराष्ट्र धोरण माजी राष्ट्रपती रोड्रिगो डुटर्टे यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळापेक्षा अगदी वेगळं राहिलं आहे.
राष्ट्रपती मार्कोस यांनी डुटर्टे यांच्या चीनच्या सोबत राहण्याचं धोरण उलथवून लावण्याबरोबरच अमेरिकेबरोबरच्या भागिदारीच्या धोरणाचाही पुन्हा अवलंब केला. त्याचवेळी त्यांनी फिलिपाईन्सच्या 200 नॉटिकल मैल अंतरावरील विशेष आर्थिक क्षेत्रात चीननं घुसखोरी केल्याचा मुद्दाही जोरकसपणे उपस्थित केला.
या प्रकरणी इतरही बरंच काही घडत आहे. फिलिपाईन्सच्या सुत्रांच्या मते, फिलिपाईन्स सिएरा माद्रेवर रसद म्हणून अन्न आणि पाणी घेऊन जात आहे. पण त्याचबरोबर ते गोपनीय पद्धतीनं बांधकाम साहित्यही घेऊन जात आहेत.
कर्नल पॉवेल यांच्या मते, "ते या जहाजाचं आयुष्य कसं वाढवणार किंवा ते अधिक काळ टिकावं म्हणून काय करणार हे पाहणं विशेष ठरणार आहे. मला वाटतं आपण एका संकटाच्या दिशेनं जात आहोत. सिएरा माद्रेचा अंत जवळ येत आहे. ते लवकरच संपूर्णपणे नष्ट होऊ शकतं."
कदाचित याच कारणामुळं चीन आणि फिलिपाईन्स यांच्यात या भागात आमने-सामनेचा संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फिलिपाईन्स अयुंगीन शोलमध्ये त्यांच्या उपस्थितीबाबत अत्यंत ठाम आहे. त्याचवेळी चीन पुन्हा एकदा त्यांच्या शक्तीचा अंदाज घेत असून, सिएरा माद्रेला वाचू द्यायचं नाही, असं त्यांनी ठामपणे ठरवलेलं आहे.
पण, जर अखेर सिएरा माद्रे दक्षिण चीन सागर किंवा फिलिपाईन्सच्या शब्दांत पश्चिम फिलिपाईन्स सागरात नष्ट झालं तर पुढं काय होईल?
ज्याप्रमाणं चीननं दक्षिण चीन सागरात इतर ठिकाणी ताबा मिळवला तसाच एका झटक्यात ते या उथळ भागावर ताबा मिळवतील का?
किंवा फिलिपाईन्स अयुंगीन शोलमध्ये दुसरं एखादं जहाज उभं करेल का? आणि तसं झालं तर अमेरिकेची त्यावर काय प्रतिक्रिया असेल?
हे सगळं आताच कोणालाही माहिती नाही, पण तो दिवस येणार आहे आणि कदाचित लवकरच येणार आहे.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)