तैवान आणि चीन यांच्यात नेमका वाद काय आहे?

तैवानच्या संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्या देशाच्या आजूबाजूच्या भागात चिनी लष्करी हालचाली वाढल्यानं चिंता व्यक्त केलीय. ते म्हणाले की, "तैवान सरकारला काळजी आहे की, एक छोटीशी ठिणगी देखील मोठ्या युद्धाला कारणीभूत ठरु शकते."

तैवानचे संरक्षण मंत्री चिऊ कुओ-चेंग यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका आहे.

गेल्या काही काळापासून चीन तैवानच्या आसपासच्या भागात युद्धनौका, ड्रोन आणि लढाऊ विमानं तैनात करत आहे. मात्र, चीनच्या या कारवाया लष्करी सरावाच्या नावाखाली केल्या जात आहेत.

चीनचा दावा आहे की, 'तैवान हा त्यांच्यापासून वेगळा झालेला प्रांत आहे आणि एक दिवस तो त्याच्या मुख्य भूभागाशी जोडला जाईल. त्यासाठी बळाचा वापर करावा लागला तरी चालेल.'

तैवानच्या मुद्द्यावरून वाद का?

तैवान हा चीनमधून वेगळा झालेला प्रांत आहे असं ते मानतात आणि चीनला असं वाटतं की तैवान हा शेवटी त्यांच्या ताब्यात येणार आहे.

तैवान आणि चीन यांचं एकीकरण होणार असल्याचा पुनरुच्चार चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केला आहे. ते मिळवण्यासाठी बळाचा वापर करण्याची शक्याताही नाकारलेली नाही.

तैवान स्वत:ला एक स्वतंत्र राष्ट्र मानतो. त्यांची स्वत:ची घटना आहे आणि त्यांनीच निवडून दिलेल्या नेत्यांचं सरकार आहे.

तैवान का महत्त्वाचं आहे?

तैवान चीनच्या अग्नेय समुद्र किनाऱ्यापासून 100 मैल अंतरावरचं एक बेट आहे.

चीन मानतं की तैवान त्यांच्यातलाच एक प्रांत आहे तो पर्यायाने एक दिवशी चीनचाच भाग होणार आहे. दुसरीकडे तैवान स्वत:ला एक स्वतंत्र प्रांत असल्याचं मानतं.

अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रदेशातच तैवान वसला आहे. चीनने जर तैवानवर ताबा मिळवला तर पाश्चिमात्य देशातील अनेक तज्ज्ञांच्या मते तो पॅसिफिक महासागरात दबदबा निर्माण करण्यात यशस्वी होईल.

त्यामुळे गुआम आणि हवाई बेटांवर असलेल्या अमेरिकेच्या सैन्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. मात्र आम्ही शांततेच्या मार्गाने जाणार असल्याचं चीनचं म्हणणं आहे.

चीनपासून तैवान वेगळा का झाला?

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी चीन आणि तैवान यांच्यात फूट पडली. त्यावेळी चीनमधल्या कम्युनिस्ट पक्षाचा तिथल्या सत्ताधारी कौमितांग पक्षाबरोबर लढा सुरू होता.

1949 मध्ये माओत्से तुंग यांच्या नेतृत्वात चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचा विजय झाला होता आणि त्यांनी राजधानी बीजिंगवर ताबा मिळवला. त्यानंतर कौमितांग पक्षाचे लोक मुख्य भूमीपासून ते अग्नेयच्या तैवान वेटावर निघून गेले.

त्यानंतर कौमितांग हा तैवानमधला सगळ्यांत महत्त्वाचा पक्ष झाला आहे. तैवानच्या इतिहासात बहुतांश काळ याच पक्षाची सत्ता आहे.

सध्या जगातील 13 देश तैवानला एक स्वतंत्र देश मानतात. तैवानला स्वतंत्र ओळख मिळू नये यासाठी चीन सातत्याने प्रयत्नशील असतो.

तैवानचे संरक्षण मंत्री सांगतात की गेल्या 40 वर्षांत त्यांचे चीनशी चांगले संबंध नाहीत.

तैवान स्वत:चं संरक्षण करू शकतं का?

चीन लष्करी कारवाई करून चीन आणि तैवानचं एकीकरण करू शकतं. दोन्ही देशात आर्थिक संबंध सुदृढ झाले तर हे शक्य होऊ शकतं. मात्र या दोन देशांत जर युद्ध झालं तर तैवान चीनच्या समोर अगदीच दुर्बळ सिद्ध होईल. चीनचा सैन्यावरचा खर्च अमेरिकेनंतर सर्वांत जास्त आहे. त्यांची लष्करी ताकद विशाल आहे.

मिसाईल तंत्रज्ञान असो की नौसेना किंवा वायुसेना असो, अगदी सायबर हल्ल्यात चीनइतकी ताकद खचितच इतर देशांपेक्षा जास्त आहे. लष्करी कारवाईच्या बाबतीत चीनची तुलना नाही.

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या मते चीनकडे एकूण 20.35 लाख सक्रिय सैनिक आहेत. तसंच तैवानमध्ये केवळ 1.63 लाख सक्रिय सैनिक आहेत. त्यामुळे चीनची ताकद तैवानपेक्षा 12 पट जास्त आहे.

लष्कराचं बोलायचं झालं तर त्यांच्याकडे 9.65 लाख सैनिक आहेत, तर तैवानमध्ये फक्त 88 हजार आहेत. नौदलाकडे 2.60 लाख सैनिक आहेत आणि तैवानचे 40 हजार आहेत.

चीनच्या वायुसेनेत चार लाख लोक आहेत मात्र तैवानमध्ये 35 हजार सैनिक आहेत. त्याशिवाय चीनकडे 4.15 लाख इतर सैनिक आहेत. तैवानमध्ये वेगळी परिस्थिती आहे.

पाश्चिमात्य देशातील अनेक तज्ज्ञांच्या मते जर चीन आणि तैवानमध्ये संघर्ष झाला तर तैवान जास्तीत जास्त तो हल्ला परतवण्याच्या परिस्थितीत असेल.

त्यांना अमेरिकेकडून मदत मिळू शकते. ते तैवानला शस्त्रं विकू शकतात. मात्र अमेरिकेचं तैवानबद्दलचं धोरण अस्पष्ट आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर तैवानवर हल्ला झाला तर अमेरिका काय करेल, तो तैवानला मदत करेल का हे अद्याप अस्पष्ट आहे.

राजनैतिकदृष्ट्या चीन सध्या 'एक चीन' या धोरणाचं समर्थन करतं. याचा अर्थ असा आहे की बीजिंगमधील सरकार हे चीनचा खरा प्रतिनिधी आहे. त्यांचा औपचारिक संबंध तैवान ऐवजी चीनशी आहे.

परिस्थिती चिघळत आहे का?

2021 मध्ये चीनने तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात त्याचे लढाऊ विमान पाठवून तिथे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

ज्या भागात परकीय देशातल्या विमानांना ओळखून त्यावर नियंत्रण ठेवलं जातं, अशा क्षेत्राला हवाई संरक्षण क्षेत्र म्हणतात.

तैवानने 2020 मध्ये विमानांच्या घुसखोरीचे आकडे सार्वजनिक केले होते. अशा प्रकारची घुसखोरी ऑक्टोबर महिन्यात वाढली होती.

ऑक्टोबर 2021 मध्ये एकाच दिवसात चीनची 56 विमानं तैवानच्या प्रदेशात गेल्याची सूचना मिळाली होती.

जगासाठी तैवान का महत्त्वाचं आहे?

तैवानची अर्थव्यवस्था जगासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आपण जे रोज इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरतो, उदा. मोबाईल, लॅपटॉप, घड्याळं यात जे चिप वापरतात ते तैवानमध्ये तयार होतात.

त्यामुळे या चीपसाठी तैवानची सगळ्या जगालाच गरज आहे. तैवानमधील वन मेजर नावाची कंपनी बहुतांश कंपन्यांसाठी चीप तयार करते.

2021 मध्ये चीपची बाजारपेठ जगभरात 100 अरब डॉलरची होती. तैवानचा त्यावर दबदबा आहे. तैवानवर चीनने ताबा मिळवला तर हा मोठा उद्योग चीनच्या ताब्यात जाईल.

तैवानचे लोक चिंतेत आहेत का?

चीन आणि तैवान यांच्यात तणाव वाढला असला तरी एका संशोधननानुसार या तणावाचा फारसा फरक तिथल्या लोकांवर पडलेला नाही.

ऑक्टोबरमध्ये तैवान पब्लिक ओपिनियन फाऊंडेशन ने तिथल्या लोकांना विचारलं की चीनबरोबर युद्ध होईल का? त्याचं उत्तर 64 टक्के लोकांनी नाही असं दिलं.

तसंच दुसऱ्या एका संशोधनात तैवानचे लोक स्वत:ला चीनपेक्षा वेगळं मानत नाहीत, असंही समोर आलं आहे.

नॅशनल चेंग्ची विद्यापीठाच्या एका सर्वेक्षणात 1990 च्या तुलनेत आज तैवानच्या लोकांमध्ये तैवानी ओळख मोठ्या प्रमाणात जागृत झाली आहे. लोक स्वत:ला चीनी किंवा तैवानी किंवा दोन्ही मानण्याच्या वृत्तीत बरीच घट झाली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)