ऑनलाईन गेमिंगमध्ये 15 लाखांचं नुकसान, दोन मुलांना पाण्याच्या टाकीत फेकून आईची आत्महत्या

- Author, अमरेंद्र यारलागड्डा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ऑनलाईन गेममध्ये 15 लाख रुपयांचं नुकसान झाल्याने एका महिलेने आपल्या दोन मुलांना पाण्याच्या टाकीत फेकून हत्या करून आत्महत्या केल्याचं प्रकरण तेलंगणातील चौतुप्पल येथे समोर आलं आहे.
राजेश्वरी अवशेट्टी असं महिलेचं नाव असून 27 जून रोजी शहरातील मल्लिकार्जून नगर परिसरात ही घटना घडली.
राजेश्वरी ही मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळायची. या नादातून कर्जबाजारी झाल्यानेच तिने आत्महत्या केली, असं तिच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांत देशभरात अशा प्रकारच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.
राजेश्वरी आत्महत्या प्रकरणातही ऑनलाईन गेमिंगचाच अँगल पोलिसांसमोर आला आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून करण्यात येत असून त्याचा बीबीसी ग्राऊंड रिपोर्टमध्ये घेतलेला आढावा.
जीवापेक्षा कर्ज जास्त आहे का?
भुवनगिरी येथील शासकीय रुग्णालयात राजेश्वरी आणि तिच्या मुलांचं पोस्टमॉर्टम सुरू होतं.
पाच वर्षीय अनिरुद्ध आणि तीन वर्षीय हर्षवर्धन यांचं पोस्टमॉर्टम पूर्ण झाल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेत ठेवण्यात येत होतं.
यावेळी, मृतांच्या नातेवाईकांव्यतिरिक्त इतर कुणीही रुग्णालय परिसरात दिसलं नाही. रुग्णालयातून आम्ही थेट मल्लिकार्जून नगरला म्हणजे जिथे राजेश्वरीचं कुटुंब राहतं, त्या ठिकाणी गेलो.
येथील मल्लिकार्जून स्वामी मंदिराजवळ रस्त्यावर राजेश्वरीचं तीन खोल्यांचं घर आहे. या ठिकाणी राजेश्वरी, तिचा पती मल्लेश अवशेट्टी आणि दोन मुले राहायची.
घराच्या दर्शनी भागाचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. परिसरात अशाच प्रकारची अर्धवट बांधकामे झालेली काही घरे आहेत.
राजेश्वरी व मुलांचे मृतदेह घरी पोहोचताच सुमारे शंभरावर कुटुंबीय, नातेवाईक आणि आजूबाजूचे लोक जमा झाले.

मृतदेह उतरवताना नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
"काय गं पोरी, काय केलंस हे? मुलांनाही मारलं. जीवापेक्षा कर्ज जास्त आहे का? राजेश्वरीची आजी धाय मोकलून रडत होती.
राजेश्वरीचा पती मल्लेश हा ट्रक चालक म्हणून काम करतो. मल्लेश आणि राजेश्वरी यांचा विवाह 2014 साली झाला होता.
अवशेट्टी दांपत्याने एका वर्षापूर्वीच ही जमीन विकत घेतली होती. तिथे तात्पुरतं कच्च्या स्वरुपातलं घर बांधून दोघे आपल्या दोन मुलांसह राहत होते.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळत कर्जबाजारी झाल्याने राजेश्वरीने आत्महत्येचा मार्ग निवडला.
राजेश्वरीला तीन महिन्यांपासून ऑनलाइन गेमचे व्यसन होतं. सुरुवातीच्या काळात ती या गेममध्ये जिंकत गेली. त्यामुळे हळूहळू गेम खेळण्याची सवय वाढत जाऊन त्याचं व्यसनात रुपांतर झालं.
पती मल्लेश सांगतो, “आम्ही वाचवलेले 4 लाख 15 हजार रुपये बँकेत जमा होते. तेही गायब झाल्याचं समजल्यानंतर ऑनलाईन गेमचं प्रकरण आमच्यासमोर आलं. हे पैसे गेल्या दोन-तीन महिन्यांत उडाले. पण राजेश्वरीला गेम खेळण्याची सवय कशी लागली हे मला माहीत नाही. कुटुंबावर आधीच कर्ज होतं. त्यात गेम खेळण्यासाठी आणखी कर्ज घेतल्याने त्याचा बोजा वाढत चालला होता.”

मल्लेश म्हणाला, "नुकतेच तिने एक नवीन फोन मागितला होता. मी तिला तो 18 हजार रुपयांना विकत घेऊन दिला. ती अनेक वर्षांपासून फोन वापरत होती."
पण राजेश्वरीच्या शिक्षणाबाबत तिचा भाऊ आणि पतीने सांगितलेल्या माहितीत तफावत आढळून येते. राजेश्वरीचा भाऊ नरसिंह सांगतो की तिने दहावीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे, तर पती मल्लेशच्या म्हणण्यानुसार तिने पदवीपर्यंत शिक्षण घेतलेलं होतं.
मल्लेश म्हणाला, “15 लाखांचं नुकसान झाल्याचं समजल्यानंतर आम्ही ते कर्ज फेडण्यासाठी तयार होतो. त्यासाठी आमचा प्लॉटही आम्ही विकला. त्याचे पैसे येत्या 1 तारखेला मिळणार होते. पण त्यापूर्वीच हा प्रकार घडला.
घर बांधणं, ट्रकची खरेदी-विक्री, मल्लेशच्या लहान भावाचं लग्न तसंच प्लॉट खरेदी आदी कारणांमुळे एकामागून एक कर्ज वाढतच जात होतं, असं नातेवाईकांनी सांगितलं.
पैशांच्या हव्यासापोटी व्यसन
आजकाल आर्थिक अडचणींमुळे अनेकजण कमाईचे विविध मार्ग शोधत असतात. अशा स्थितीत विविध प्रकारच्या ऑनलाईन गेमिंग अप्सचं यामुळे फोफावत आहे.
प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. सुरुवातीला गंमत म्हणून ऑनलाईन गेमिंग सुरू केलं जातं. त्यानंतर त्याचं व्यसन लागत जातं, अशी माहिती मानसोपचार तज्ज्ञ आर. अनिता यांनी दिली.

त्या म्हणतात, “असं का होतं, हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. मोबाईल गेमिंगमध्ये तुम्ही सुरुवातीला काही काळ जिंकत जाता. त्यामुळे त्यातून तुम्हाला आनंद मिळतो. त्यानंतर पैशांच्या हव्यासामुळे ते पुन्हा-पुन्हा खेळण्याची इच्छा होते. यानंतर एकदा हरलो तरी ते पैसे पुन्हा मिळवण्याच्या नादात लोक आणखी पैसे गमावतात.
राजेश्वरीचा मोठा भाऊ नरसिंह याने बीबीसीशी बोलताना म्हटलं, “त्या दिवशी संध्याकाळी राजेश्वरीने मला फोन केला होता. कर्जदाते घरी आले आहेत, एकदा घरी ये, असं ती म्हणाली.
“मी येतो, असं म्हणालून मल्लेश यांना फोन देण्यास सांगितलं. पण ते फोनवर आले नाहीत. मल्लेशच्या मोठ्या भावाने त्यांना काही कर्ज दिलेलं होतं. त्यामुळे श्रीशैलमला फोन करून बोला, घरात भांडणं करू नका. याबाबत आपण उद्या सकाळी बोलू, असं मी त्यांना बोललो होतो,” असं नरसिंहने सांगितलं.
नरसिंह पुढे म्हणाला, "त्यानंतर, मला संध्याकाळी 5.48 ला मला फोन आला मी एका ठिकाणी बाहेर गेलो, त्यानंतर 6.15 वाजता राजेश्वरीच्या मृत्यूचा निरोप देण्यासाठीचा फोन मला आला.”
अवशेट्टी यांच्या घरासमोरच्या पाण्याच्या टाकीची खोली सुमारे 12 फूट आहे. नळाचं पाणी नीट येत नसतं तेव्हा केवळ चार फूट पाणी विहिरीमध्ये असतं. पण दोन दिवसांपूर्वी पाणी भरपूर सोडण्यात आलं होतं. त्यामुळे टाकीत काठोकाठ पाणी भरलेलं होतं, असं नातेवाईकांनी सांगितलं.
संपूर्ण प्रकार घडला, त्यावेळी आपण कर्जाच्या प्रश्नावर बोलण्यासाठी जवळच एका नातेवाईकाकडे गेलो होतो, अशी माहिती पती मल्लेशने दिली.
तो म्हणाला, “मी घरी आलो, तेव्हा मुले आणि राजेश्वरी कुठेच दिसले नाही. शोधाशोध केल्यानंतर पाण्याच्या टाकीचं झाकण उघडं दिसलं. त्यामध्ये तिघांचे मृतदेह टाकीत आढळून आले. प्लॉट विकून काही पैसे तीन दिवसांत मिळणार होते. पण तरीही तिने आत्महत्या केली.”
मल्लेशचा लहान भाऊ श्रीशैलम याने त्यांच्यावर दबाव आणल्यामुळेच राजेश्वरीने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत.
बीबीसीने श्रीशैलमशीही बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र राजेश्वरीच्या आत्महत्येपासून तो गायब आहे.
पोलिसांनी काय म्हटलं?
या प्रकरणी, कर्जाचा त्रास सहन न झाल्याने राजेश्वरीने आत्महत्या केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे.
राजेश्वरीची आई रामुलम्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून अवशेट्टी श्रीशैलम, वेलंग ललिता आणि वेलंग राजेश्वरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्ज न भरल्यास घराला कुलूप लावून मेंढ्या, गुरे घेऊन जाऊ, असं धमकावल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

चौतुप्पलचे पोलीस अधिकारी वाय. मोगलैय्या यांनी या प्रकरणी बीबीसीला माहिती दिली.
ते म्हणाले, “राजेश्वरीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला आहे. मल्लेश अवशेट्टीचा धाकटा भाऊ श्रीशैलम आणि इतर दोन महिला आल्या आणि त्यांनी कर्ज फेडण्यासाठी दबाव टाकून धमकावलं, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत.
"राजेश्वरी ऑनलाइन गेम खेळत होती का? कर्ज कसे फेडणार होते, हे सखोल चौकशीनंतरच कळेल," असं त्यांनी म्हटलं.
सध्या राजेश्वरीचा फोन पाण्यात पडून खराब झाला आहे. त्याचा डिस्प्ले योग्यरित्या काम करत नाही. ती खेळत असलेल्या गेमिंग अपमध्ये काही चुका आढळल्यास त्याच्यावरही कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असं मोगलैय्या यांनी सांगितलं.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिता यांच्या मते, ऑनलाइन गेमिंगचं व्यसन लागलेलं असल्यास त्यातून मुक्त होणंही शक्य आहे.
त्या म्हणतात, मोबाईल गेमिंगपेक्षा आनंद मिळवण्याचे इतर मार्ग आपण निवडले पाहिजेत.
त्यासाठी दैनंदिन नियोजन करा. चालणं, जॉगिंग, योगासन आदींची मदत त्यासाठी घेता येईल.
याव्यतिरिक्त सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांशी बोला. भविष्यातील योजना बनवाव्या, त्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या सगळ्या कामांमध्ये स्वतःला गुंतवून व्यसनांपासून दूर जाता येऊ शकतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








